शेअर बाजार सतत घसरतोय, तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल?

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजाराची स्थिती आणि त्या संबंधित आर्थिक प्रश्न सर्वसामान्य लोकांमध्ये चर्चेचा विषय आहेत.
एकीकडे, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर, डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात उदयोन्मुख केंद्र म्हणून भारताची ओळख आणि जागतिक गुंतवणूकदारांचा वाढता रस याबद्दल चर्चा आहे.
दुसरीकडे, सामान्य लोक महागाई, वाढते कर्जाचे हप्ते, नोकऱ्यांबाबत अनिश्चितता आणि शेअर बाजारातील गोंधळामुळे चिंतेत आहेत.
शेअर बाजारातील चढउतारावर अनेकदा बातम्या येतात. मात्र, या चढउताराचा सामान्य लोकांच्या वैयक्तिक जीवनावर कसा परिणाम होईल, हा प्रश्न त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे.
भारताच्या आर्थिक प्रगतीचा सामान्य नागरिकांसाठी काय अर्थ आहे? सध्याची शेअर बाजारातील घसरण दीर्घकाळ सुरूच राहील का?
भारताची आर्थिक धोरणे जागतिक बाजारपेठेतील परिणामांपासून लोकांना संरक्षण देण्यास सक्षम आहेत का?
नोकरीच्या संधी वाढवणे हा सरकारी धोरणांचा भाग आहे का? आणि भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील प्रमुख आव्हाने कोणती आहेत?
बीबीसी हिंदीच्या 'द लेन्स' या साप्ताहिक कार्यक्रमात, कलेक्टिव्ह न्यूजरूमचे 'डायरेक्टर ऑफ जर्नलिजम' मुकेश शर्मा यांनी या सर्व मुद्द्यांवर चर्चा केली.
या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. नरेंद्र जाधव, द मिंटच्या सल्लागार संपादक पूजा मेहरा आणि द एन शोचे संपादक नीरज बाजपेयी सहभागी झाले.
शेअर बाजारातील घसरणीचे कारण काय?
भारतीय शेअर बाजारातील घसरण थांबण्याची कोणतीही चिन्हं दिसत नाहीत. अनेक वर्षांनंतर इतकी दीर्घ काळ घसरण सुरू आहे.
काही महिन्यांपूर्वीपर्यंत बाजारात गुंतवणुकीवर हजारो आणि लाखोंच्या नफ्याबद्दल बोलणाऱ्या अनेक तज्ज्ञांचा बोलण्याचा सूर बदलू लागला आहे.
सप्टेंबर 2024 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (बीएसई) सेन्सेक्स सुमारे 86 हजारांच्या पातळीवर पोहोचला होता. आता तेथे 74,000 रुपयांच्या आसपास व्यवहार सुरू आहेत.
भारतीय शेअर बाजारातील अलिकडच्या घसरणीबाबत 'द एन शो'चे संपादक नीरज बाजपेयी म्हणाले, "भारतापेक्षा अमेरिकेत गुंतवणूक करून लोक जास्त नफा मिळवत आहेत. हेच कारण आहे की ते भारतीय बाजारपेठेतून पैसे काढून परदेशी बाजारपेठेत गुंतवणूक करत आहेत."

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणाले, "भारत, चीन, मलेशिया, थायलंड यासारख्या देशांमधून भांडवल अमेरिकेकडे सरकत आहे. याचे कारण म्हणजे अमेरिकेत गुंतवणूकदारांना जास्त जोखीम न घेता 6-7 टक्के परतावा मिळत आहे."
शेअर बाजारातील अलीकडच्या घसरणीवर प्रतिक्रिया देताना, द मिंटच्या कन्सल्टिंग एडिटर पूजा मेहरा म्हणाल्या, "बाजार किती काळ घसरणीच्या स्थितीत राहील हे अनेक घटकांवर अवलंबून असेल. यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे निर्माण झालेली जागतिक अनिश्चितता हे एक प्रमुख कारण आहे."
त्या म्हणाल्या, "गुंतवणूकदार अमेरिकन बाजारपेठा सुरक्षित मानतात. कारण तिथे जोखीम कमी आहे आणि सध्या अमेरिकेची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार त्यांचे पैसे अमेरिकन बाजारपेठेकडे वळवत आहेत."

फोटो स्रोत, Getty Images
यावर नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, "भारतीय अर्थव्यवस्थेची ताकद पाहता, मला वाटते की, ही घसरण थोड्या काळासाठी चालू राहू शकते. परंतु ही परिस्थिती फार काळ टिकणार नाही."
ते म्हणाले, "डोनाल्ड ट्रम्प दररोज वेगवेगळ्या बातम्या घेऊन येत आहेत. त्यांच्या धोरणांमध्ये आणि विधानांमध्ये स्पष्टतेचा अभाव आहे. अमेरिकन अर्थव्यवस्था मेक्सिकोसारख्या देशांमधून मोठ्या प्रमाणात आयात करते. जर मेक्सिकोसारख्या देशांवर अतिरिक्त शुल्क लादले गेले, तर अमेरिकन नागरिकांच्या अडचणी वाढतील आणि तेथे महागाई वाढू शकते. ज्या दिवशी या मुद्द्यांवर स्पष्टता येईल, त्या दिवशी बाजारात स्थिरता परत येईल."
डॉ. जाधव यांच्या मते, भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबूत पायाभूत बाबी आणि जागतिक अनिश्चिततेचा प्रश्न सुटल्यानंतर बाजारपेठेत सुधारणा होण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.


सामान्य गुंतवणूकदारांसाठी हे किती चिंतेचं कारण आहे?
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणुकीचे मूल्य कमी झाले आहे आणि काही गुंतवणुकींमुळे तोटाही झाला आहे. स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्सची सतत विक्री होत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सेन्सेक्समधील घसरणीमुळे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (एसआयपी) माध्यमातून बाजारात गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड गुंतवणूकदार चिंतेत आहेत.
त्यांना सध्या एसआयपी थांबवावी की त्यातून त्यांचे सर्व पैसे काढून घ्यावेत हे समजत नाहीये.
शेअर बाजाराच्या सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करताना, द एन शोचे संपादक नीरज बाजपेयी म्हणाले, "बाजारात दोन प्रकारचे लोक असतात. एक जे व्यापार करतात आणि दुसरे जे गुंतवणूकदार असतात. सध्या, गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओचेही नुकसान झाले असले, तरी बाजाराच्या परिस्थितीमुळे व्यापारी खूप नाराज आहेत."

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणाले, "ही निश्चितच चिंतेची बाब आहे. मात्र, तुम्ही चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असेल, तर घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्ही चांगला स्टॉक निवडला असेल, तर भीतीपोटी तो विकू नका."
"तुम्ही एसआयपीत किंवा इतर कोणत्याही पद्धतीने गुंतवणूक केली असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्ही चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली नसेल आणि तुमचे पैसे निम्मे झाले असतील तरच तुम्हाला काळजी करण्याची गरज आहे."
बाजारांच्या प्रकारांबद्दल बोलताना बाजपेयी म्हणाले, "बाजारपेठांचे तीन प्रकार आहेत. लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप. ज्यांनी लार्जकॅपमध्ये गुंतवणूक केली आहे त्यांना जास्त काळजी करण्याची गरज नाही. परंतु ज्यांनी मिड आणि स्मॉलकॅपमध्ये गुंतवणूक केली आहे त्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे."
गुंतवणूकदारांना सल्ला देताना ते म्हणाले, "जर तुम्ही स्मॉल आणि मिड कॅपमध्ये गुंतवणूक करत असाल, तर किमान 10 वर्षांसाठी पैसे सोडण्याची तयारी ठेवा. लार्ज कॅपमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी किमान पाच वर्षे गुंतवणूक ठेवावी."
जागतिक बाजारपेठांच्या स्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले, "2025 पर्यंत परतावा मिळवणं खूप कठीण जाणार आहे. जगातील सर्व बाजारपेठा अमेरिकेकडे पाहतात. जोपर्यंत तेथे अनिश्चितता कायम आहे, तोपर्यंत जगातील कोणताही बाजार योग्यरित्या कार्य करू शकणार नाही."
भारतातील वाढत्या बेरोजगारीची कारणे
बेरोजगारी ही भारतातील एक ज्वलंत समस्या आहे. भारतात बेरोजगारी सातत्याने वाढत आहे आणि देशातील तरुण पिढीसाठी हा चिंतेचा विषय आहे.
प्रत्येक वेळी निवडणुकीच्या काळात हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला जातो, परंतु निवडणुका संपताच हा मुद्दा बाजूला ठेवला जातो.
अशा परिस्थितीत प्रश्न असा पडतो की, इतक्या वर्षांनंतर आणि इतक्या सरकारांनंतरही या गंभीर प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा का सापडला नाही?
भारतातील वाढत्या बेरोजगारीबद्दल चिंता व्यक्त करताना, द मिंटच्या कन्सल्टिंग एडिटर पूजा मेहरा म्हणाल्या, "गेल्या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, सध्या जितक्या नोकऱ्या निर्माण करायच्या आहेत तितक्या नोकऱ्या निर्माण होत नाहीत. ही परिस्थिती सुधारण्यासाठी कोणत्या प्रकारच्या धोरणांची आवश्यकता आहे हे देखील सर्वेक्षणात सांगितले आहे."
"सर्वेक्षणात असेही नमूद केले आहे की, महागाई वाढत असताना लोकांचे उत्पन्न त्याच वेगानं वाढत नाही. सर्व आवश्यक धोरणे लागू केल्याशिवाय हा प्रश्न आगामी काळात सुटेल असं मला वाटत नाही."
या प्रश्नांच्या राजकीय बाजूवर बोलताना मेहरा म्हणाल्या, "माझ्या मते, निवडणुकीत बेरोजगारी हा इतका मोठा मुद्दा बनला नाही. राजकीय पक्ष इतर मुद्द्यांवर निवडणुका जिंकू शकतात. त्यामुळे, आपल्या देशातील नेत्यांवर बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी फारसा दबाव नाही."
भारतातील वाढती बेरोजगारी आणि रोजगाराच्या गुणवत्तेशी संबंधित मुद्द्यांवर नीरज बाजपेयी म्हणाले, "जर आपण गेल्या 25-30 वर्षांतील भारताच्या इतिहासावर नजर टाकली, तर आपली अर्थव्यवस्था 7 टक्क्यांच्या वर जाऊ शकलेली नाही."
"अलीकडच्या आकडेवारीनुसार, आपली अर्थव्यवस्था सुमारे 6-6.5 टक्क्यांनी वाढत आहे. हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की, आपली अर्थव्यवस्था मंदावत नाही, उलट ती पूर्वीप्रमाणेच वेगानं पुढे जात आहे."

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणाले, "आपल्या देशात बेरोजगारीचा प्रश्न नाही, तर रोजगाराच्या गुणवत्तेबाबत मोठी काळजी करायला लावणारी परिस्थिती आहे. म्हणजेच काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामानुसार पुरेसा पगार मिळत नाही."
बाजपेयी यांनी देशांतर्गत कर्जाच्या वाढत्या पातळीबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, "आपले देशांतर्गत कर्ज पूर्वी जीडीपीच्या प्रमाणात 29-30 टक्के होते. आता ते 40 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. एक तृतीयांश लोक टीव्ही, मोबाईल इत्यादी वस्तू खरेदी करण्यासाठी वैयक्तिक कर्जांसारखे असुरक्षित कर्ज घेत आहेत. ही गंभीर चिंतेची बाब आहे. तुम्ही वैयक्तिक वापरासाठी कर्ज घेत असाल, तर याचा अर्थ तुमचे उत्पन्न कमी होत आहे."
ते म्हणाले, "आजही एखाद्या इंजिनयरला कॅम्पस प्लेसमेंटमध्ये 15-20 वर्षांपूर्वीप्रमाणेच 3.5-4 लाख रुपयांचे पॅकेज मिळत असेल, तर हे स्पष्ट आहे की समस्या इथेच आहे."
तांत्रिक आव्हानांबद्दल बोलताना ते म्हणाले, "तांत्रिक बदलांमुळे कोणतेही सरकार नोकऱ्या निर्माण करू शकत नाही. अमेरिकेसारख्या देशातही आरोग्य आणि वित्त क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या काढून टाकण्याची तयारी आहे. कारण तिथे एआयचा वापर करून काम केले जात आहे."
ते म्हणाले, "जगासमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे नोकऱ्या आणि रोजगाराचा दर्जा कसा सुधारायचा हे आहे. जगातील कोणतेही सरकार हा मुद्दा लोकांसमोर योग्यरित्या मांडू शकेल, असं मला वाटत नाही."

फोटो स्रोत, Getty Images
नरेंद्र जाधव या मुद्द्यावर म्हणाले, "भारतात रोजगाराच्या संधी कमी आहेत आणि रोजगाराची क्षमता आणखी कमी आहे. असे नाही की पदवीधर महाविद्यालयांमधून बाहेर पडत नाहीत, ते मोठ्या संख्येने आहेत. परंतु त्यांच्यासाठी नोकऱ्या नाहीत. कारण ते त्या नोकऱ्या करण्यास सक्षम नाहीत. रोजगाराची क्षमता वाढवण्यासाठी, कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे."
ते म्हणाले, "राष्ट्रीय पातळीवर आपण आपल्या देशातील बेरोजगारीचं प्रमाण स्वीकारण्यास तयार नाही, असं मला वाटतं. विशेषतः सुशिक्षित लोकांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण खूप जास्त आहे."
"जगातील सर्व अर्थव्यवस्थांमध्ये भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगाने वाढणारी आहे. परंतु ही वाढ फक्त संघटित क्षेत्रातच दिसून आली आहे. असंघटित क्षेत्र अजूनही कोविडच्या पातळीवरून सावरलेले नाही."
त्यांनी उत्पन्न आणि मागणी यांच्यातील बिघडलेल्या समतोलावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, "ज्यांच्याकडे नोकऱ्या आहेत त्यांचे पगार जितके वाढायला हवे होते तितके वाढत नाहीत. त्यामुळे एकूण वापर मर्यादित आहे. याचा अर्थ असा की, जर मागणी वाढत नसेल, तर नोकऱ्या कशा निर्माण होतील?"
परदेशी गुंतवणूकदारांच्या मुद्द्यावर ते म्हणाले, "जर आपण गुंतवणूकदारांबद्दल बोललो, तर कर सुधारणांनंतरही अमेरिकन बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना 7-8 टक्के परतावा मिळत आहे. जर त्यांना भारतात फक्त 5 टक्के परतावा मिळत असेल, तर ते भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक का करतील? भारताने परदेशी गुंतवणूकदारांवर लादलेला भांडवली नफा कर (कॅपिटल गेन टॅक्स) त्वरित रद्द करण्याची गरज आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)












