50 वर्षांपूर्वी सौदी अरेबियाचे राजा फैसल यांची हत्या कशी झाली हे तुम्हाला माहिती आहे का?

सौदी अरेबियाचे राजे फैझल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पाश्चात्य देशांना आव्हान देणारा राजा, ज्याची हत्या पुतण्याची गळाभेट घेताना झाली.
    • Author, लुईस हिडाल्गो
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

"तो दिवस मी कधीही विसरणार नाही. त्या दिवशी माझ्या वडिलांच्या बाबतीत घडलेल्या गोष्टीचं सर्व दु:खाची मला जाणीव झाली."

"विचार करा, एक माणूस त्याचे गुरू, शिक्षक आणि मित्र यांच्यासमोर उभा आहे. त्याचवेळी त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. अगदी तिथल्या तिथेच, इतक्या जवळ", असं डॉ. माई यामानी यांनी बीबीसीला सांगितलं.

25 मार्च 1975 च्या दिवशी काय घडलं याची आठवण ते सांगत होते.

सौदी अरेबियाचे राजे फैझल त्यांच्या पुतण्याचं स्वागत करत असताना आणि त्याची गळाभेट घेत असताना त्यांच्यावर अगदी जवळून एकापाठोपाठ 3 गोळ्या झाडण्यात आल्या.

माई यांचे वडील म्हणजे शेख अहमद झाकी यामानी. ते 15 वर्षे राजाचे एकनिष्ठ मंत्री होते. शेख अहमद हे माई यांच्या बाजूला उभे होते.

राजे फैझल सौदी अरेबियाचे तिसरे शासक होते. ते सौदी राजवटीच्या संस्थापकाचे तिसरे पुत्र होते. राजे फैझल यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्यानंतर त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.

त्या दिवशी तिथून काही मैल अंतरावर, 18 वर्षांच्या माई त्यांच्या वडिलांची वाट पाहत होत्या.

"मी माझ्या वडिलांच्या विभागात उभी होते. तिथे आजूबाजूला त्यांच्या संग्रहातील पुस्तकं होती."

"ते आत आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर सर्वात विचित्र, अत्यंत वेदनेच्या भावना होत्या. ते थेट डायनिंग रुममध्ये गेले आणि तिथे जाऊन ओरडले. त्यानंतर ते जेमतेम एकच शब्द उच्चारू शकले, संकट!" असं माई यांनी नमूद केलं.

त्यांच्या वडिलांनी असं वागणं किंवा व्यक्त होणं ही काही नेहमीची बाब नव्हती. अतिशय शांत राहण्याबद्दल आणि अतिशय हळू आवाजात बोलण्याबद्दल त्यांची ख्याती होती.

नेमकी कशी झाली होती राजे फैझल यांची हत्या?

मग शेख अहमद झाकी यांनी माई यांना काय घडलं आहे ते सांगितलं.

"सकाळी 10 वाजता, कुवेतचं एक कच्च्या तेलासाठीचं शिष्टमंडळ राजे फैझल यांची राजवाड्यात भेट घेणार होतं. माझे वडील तेलमंत्री होते. त्यामुळे ते राजे फैझल यांना या भेटीसंदर्भात आवश्यक ती माहिती देण्यासाठी गेले."

डॉ. माई पुढे म्हणाल्या, "राजकुमारांचं नावदेखील राजांच्या नावासारखंच होतं. त्यांचं नाव प्रिन्स फैझल इबू मुसैद होतं. राजकुमार कुवेतच्या तेलमंत्र्यांबरोबर आले. पुतण्याचं स्वागत करत राजांनी त्यांना मिठी मारण्यासाठी हात पुढे केले."

"त्यावेळी प्रिन्स फैझल यांनी त्यांच्या खिशातून एक छोटं पिस्तूल काढलं आणि राजे फैझल यांच्यावर गोळ्या झाडल्या."

"राजे फैझल यांच्या डोक्यात तीन गोळ्या झाडण्यात आल्या," असं माई यांनी सांगितलं.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट , सौदी अरेबियाचे राजे इब्न सौद

फोटो स्रोत, Hulton Archive via Getty Images

फोटो कॅप्शन, हत्या झालेली व्यक्ती राजे इब्न सौद यांचा मुलगा होता, जे या चित्रात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांच्याबरोबर दिसत आहेत, राजे सौद यांनी 30 वर्षे लढा देऊन सौदी अरेबियाला एकत्र आणलं आणि 1932 मध्ये सौदी अरेबियाची स्थापना केली.

राजांच्या एका अंगरक्षकानं त्याची तलवार म्यान असतानाही राजकुमारावर प्रहार केला.

त्यावेळी शेख यामानी यांनी सुरक्षा रक्षकांना राजकुमारांना ठार न मारण्याचे आदेश दिल्याचंही सांगितलं गेलं.

त्यावेळी इतर बातम्यांमध्ये असं म्हटलं गेलं की, हल्लेखोरानं पोलिसांना सांगितलं की, शेख त्यावेळेस राजे फैझल यांच्या इतक्या जवळ उभे होते की त्याला वाटलं की त्यांनीदेखील राजाला मारलं आहे.

मात्र तसं नव्हतं. अजूनही जिवंत असलेल्या राजे फैझल यांना शेख यामानी यांनी हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे डॉक्टरांनी राजे फैझल यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा मृत्यू झाला.

"त्यानंतर सर्व काही शांत झालं. रियाधचे रस्ते ओस पडले होते," असं माई नमूद करतात.

वाळवंटाचा राजा

फैझल 1964 मध्ये सौदी अरेबियाचे राजे झाले होते.

सौदी अरेबिया हा देश म्हणजे पश्चिम युरोपच्या आकाराचं वाळवंट होतं. त्याचा शासक म्हणून राजे फैझल यांनी पश्चिम आशियातील या सर्वात मागासलेल्या देशांपैकी एक असलेल्या देशाचं आधुनिकीकरण करण्याचं ठरवलं.

राजे फैझल हे अब्दुलअझीझ अल सौद यांच्या ज्येष्ठ पुत्रांपैकी एक होते.

अरबी द्वीपकल्पाला एकत्र आणण्यासाठी वडिलांनी चालवलेल्या मोहिमेत फैझलदेखील लढले होते. या मोहिमेतून 30 वर्षांपूर्वी सौदी अरेबियाची स्थापना झाली होती. सौद यांच्या नावावरून हा देश सौदी अरेबिया म्हणून ओळखला जाऊ लागला.

सौदी अरेबियाचे राजे फैझल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राजे फैझल हे अब्दुलअझीझ अल सौद यांच्या ज्येष्ठ पुत्रांपैकी एक होते.

नंतर फैझल यांनी त्यांच्या मोठ्या भावाच्या कारकिर्दीत पंतप्रधान म्हणून काम केलं. त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर ते राजा झाले.

जेव्हा ते गादीवर बसले, तोपर्यंत एक चतुर, धार्मिक, कष्टाळू आणि सुधारणावादी राजकारणी असा त्यांचा नावलौकिक झालेला होता.

ते जगातील अनेक देशांच्या राजधान्यांमध्ये व्यापार करण्यास सरावलेली व्यक्ती होते.

सुधारणावादी शासक

तो एक असा शासक होता, ज्याला सौदी अरेबियात नव्यानंच शोध लागलेल्या कच्च्या तेलातून निर्माण होणाऱ्या संपत्तीचा वापर आधुनिक देशांमध्ये सरकारकडून दिलं जाणारं आधुनिक शिक्षण, आरोग्यसेवा आणि न्यायव्यवस्थेची व्यवस्था सौदी अरेबियात आणण्यासाठी करायचा होता.

मात्र राजे फैझल करत असलेल्या सुधारणा नेहमीच इस्लाममधील कडवट पंथातील अधिक कट्टरतावादी किंवा परंपरावादी घटकांना पसंत नव्हत्या. या घटकांशी त्यांचं कुटुंब जोडलेलं होतं.

उदाहरणार्थ, जेव्हा फैझल यांनी 1960 च्या दशकाच्या मध्यात सौदी अरेबियात पहिलं टीव्ही केंद्र सुरू केलं, तेव्हा त्या इमारतीवर सशस्त्र हल्ला झाला होता. या हल्ल्याचं नेतृत्व, नंतर राजे फैझल यांची हत्या करणाऱ्या व्यक्तीच्या भावानंच केलं होतं.

मात्र तोपर्यंत, फैझल यांनी महिलांच्या शिक्षणासारख्या अत्यंत दुर्लक्षित क्षेत्रातही महत्त्वाचं योगदान दिलं होतं आणि नंतर ते सुरू राहिलं.

सौदी अरेबियाचे पेट्रोलियम मंत्री शेख अहमद झाकी यामानी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सौदी अरेबियाचे पेट्रोलियम मंत्री शेख अहमद झाकी यामानी यांचा 1973 मध्ये अरब देशांच्या कच्च्या तेलाचा पुरवठा न करण्याच्या निर्णयाच्या वेळचा फोटो.

1956 मध्ये फैझल युवराज असताना, त्यांनी मुलींसाठी सरकारद्वारे चालवण्यात येणारी पहिली नियमित शाळा सुरू केली. या शाळेची स्थापना त्यांच्या पत्नी इफ्फत यांच्या पाठिंब्यानं करण्यात आली होती.

"राणी इफ्फत यांनी सौदी अरेबियात मुलींच्या शिक्षणाची सुरुवात केली. मला हे सांगताना अभिमान वाटतो की, त्यांच्या शाळेतील पहिल्या 9 विद्यार्थिनींपैकी मी एक होते. त्या शाळेचं नाव 'दार अल हनान' होतं. म्हणजे कोमलतेची शाळा," असं माई म्हणतात.

"राजे फैझल यांनी धार्मिक संस्थांना, पंथांना पटवून दिलं की, महिलांना शिक्षण दिल्यामुळे त्या अधिक चांगल्या माता होतील," असं त्या म्हणाल्या.

शेख यामानी यांचा राजे फैझल यांच्या सरकारमध्ये समावेश

माई यामानी यांच्या वडिलांनी 1960 मध्ये राजे फैझल यांच्याबरोबर काम करण्यास सुरुवात केली.

त्यांची गोष्ट जरा वेगळी होती. कारण ते उच्चशिक्षित असले आणि एक वकील असले, तरी ते एक सामान्य व्यक्ती होते. ते काही सौदी राजघराण्यातील नव्हते.

शेख यामानी यांनी लिहिलेले काही लेख राजे फैझल यांनी वाचले होते. या लेखांनी राजे फैझल यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

माई म्हणाल्या, "माझ्या वडिलांनी त्यांची पहिली लॉ फर्म सुरू केली. नंतर त्यांनी लोकशाही आणि सुशासनाचं आवाहन करणारे काही अतिशय चिथावणी देणारे लेख लिहिले."

"त्यावेळेस फैझल, युवराज होते आणि ते कायदेशीर सल्लागाराच्या शोधात होते. ते म्हणाले की, हा माणूस कोण आहे?"

राजे फैझल यांनी नंतर शेख यामानी यांची नियुक्ती केली. नंतर शेख यामानी त्यांचे तेल मंत्री म्हणून ओळखले जाऊ लागले.

शक्तीशाली झालेला सौदी अरेबिया

नंतर राजा आणि त्यांच्या जनतेनं एकत्रितपणे एक धोरण तयार केलं. त्यामुळे पहिल्यांदाच तिथल्या राजवटीला देशातील कच्च्या तेलाच्या विशाल संपत्तीवर पूर्ण नियंत्रण मिळालं. त्यामुळे तो देश अरब जगत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक शक्तीशाली देश म्हणून पुढे आला.

1973 मध्ये इस्रायल आणि त्याच्या शेजारील अरब देशांमध्ये झालेल्या युद्धानंतर, सौदी अरेबियानं कच्च्या तेलाचा वापर पहिल्यांदाच राजकीय शस्त्र म्हणून करण्याच्या मोहिमेचं नेतृत्व केलं. त्यावेळेस सौदी अरेबिया जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश होता.

ज्या देशांनी इस्रायला पाठिंबा दिला होता, त्या देशांना करण्यात येत असलेला कच्चा तेलाचा पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या.

नो गॅस अशी पाटी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1970 च्या दशकातील इंधनाचं संकट, कच्च्या तेलाचा तुटवडा आणि वाढलेल्या किमती यामुळे पहिल्यांदा ऊर्जा बचतीच्या तंत्रज्ञानाच्या दिशेनं पावलं पडली.

शेख यामानी यांना यासंदर्भातील संदेश देण्यासाठी पाठवण्यात आलं होतं.

"इस्रायलनं ज्या अरब प्रदेशावर कब्जा केला आहे, तिथून त्यांचं सैन्य पूर्णपणे माघारी घ्यावं ही आमची मागणी आहे. त्यानंतर त्यांना सप्टेंबर 1973 प्रमाणेच कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यात येईल," असं शेख यामानी यांनी त्यावेळेस बीबीसीला स्पष्ट केलं होतं.

कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे विकसनशील देश, तेल उत्पादक देश आणि औद्योगिक देश यांच्यातील जागतिक शक्ती संतुलनात बदल झाला.

टाइम मासिकानं 1974 मध्ये राजे फैझल यांचा उल्लेख 'मॅन ऑफ द ईयर' म्हणून करून या बदलाची दखल घेतली. हे त्यांच्या मृत्यूच्या एक वर्ष आधीच झालं.

राजाच्या हत्येनंतर

प्रिन्स फैझल इबू मुसैद याला काकांवर हल्ला केल्यानंतर लगेचच अटक करण्यात आली.

त्याची चौकशी करण्यात आली. डॉक्टर आणि मानसोपचारतज्ज्ञांनी पुष्टी केली की त्यांना वाटतं की प्रिन्स फैझलचं 'मानसिक संतुलन' बिघडलेलं आहे.

हत्या करण्यापूर्वी आणि झाल्यानंतरही प्रिन्स शांत असल्याचं वृत्त आहे.

राजाच्या हत्येनंतर शोक व्यक्त करण्यासाठी रियाध तीन दिवस पूर्णपणे बंद होतं.

राजे फैझल यांची हत्या झाल्यानंतर त्यांचे भाऊ राजे खालिद यांनी सौदी राजघराण्याच्या सहमतीनं त्यांची जागा घेतली.

प्रिन्स फैझल बिन मुसैद याला नंतर राजहत्येसाठी दोषी ठरवण्यात आलं.

जून 1975 मध्ये इस्लामिक कायद्यानुसार सौदी अरेबियात मृत्यूदंड देण्याच्या पारंपारिक पद्धतीनुसार रियाधच्या चौकात त्याचा शिरच्छेद करण्यात आला.

"राजांच्या हत्येमागं खरं कारण आम्हाला माहित नाही. इतकंच माहित आहे की हत्या करणारा एक मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्ती होता."

"शाही मंत्रिमंडळानं जारी केलेल्या ठरावानुसार", प्रिन्स मुसैद याला अधिकृतपणे वेडा किंवा मानसिक रुग्ण म्हणून जाहीर करण्यात आलं.

सौदी अरेबियाचे राजे फैझल यांच्या अंत्यसंस्कारावेळीचं दृश्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सौदी अरेबियाचे राजे फैझल यांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक राष्ट्रप्रमुख उपस्थित होते, इथे राजे खालिद यांच्याबरोबर पीएलओचे नेते यासर अराफत आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अन्वर अलं-सादत दिसत आहेत.

प्रिन्स मुसैद यानं त्याच्या काकांची हत्या का केली यामागची कारणं त्यानं शेवटपर्यंत सांगितली नसली तरी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता की त्यानं त्याचा मोठा खालिद यांच्या मृत्यूचा बदला घेतला होता. 1966 मध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत खालिदचा मृत्यू झाला होता.

त्याचबरोबर काही कट कारस्थानांचं सिद्धांतदेखील व्यक्त करण्यात येत होते. अर्थात नंतर तपासातून दिसून आलं की ही हत्या प्रिन्स फैझल बिन मुसैद यानं एकट्यानं केली होती.

त्यानंतर शेख यामानी 1986 पर्यंत म्हणजे पुढील 11 वर्षे सौदी अरेबियाचे तेल मंत्री राहिले.

माई यामानी यांनी अमेरिकेत त्यांचं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. ऑक्सफर्ड विद्यापीठातून डॉक्टरेट करणाऱ्या त्या सौदी अरेबियातील पहिल्या महिला ठरल्या.

डॉ. यामानी यांनी अरब अस्मितेवर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. तसंच त्यांनी गोल्डमन सॅक्ससारख्या बँका आणि शेल सारख्या तेल कंपन्यांसाठी सल्लागार म्हणून काम केलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)