मक्केतील इस्लामचं पवित्र स्थान असलेल्या काबाच्या चाव्या कोणाकडे आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
मुस्लिम समुदायाचे सर्वात पवित्र धर्मस्थळ असणाऱ्या काबाच्या चाव्यांचे संरक्षक डॉ. सालेह बिन झैनुल अबेदिन अल शेबी यांचे निधन झाले आहे.
काबाच्या दरवाजाची चावी फक्त डॉ. सालेह यांच्याकडेच राहत होती.
असं मानलं जातं की, पैगंबर मोहम्मद यांच्या काळात ही चावी त्यांच्या पूर्वजांकडे देण्यात आली आणि तेव्हापासून या चावीच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्या कुटुंबाकडे आहे.
डॉ. साहेल बिन झैनुल आबेदिन यांच्या कुटुंबावर अनेक शतकांपासून ही चावी सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आहे.
डॉ. सालेह हे अल शेबी कुटुंबाचे 109 वे वारस होते, ज्यांना ही चावी सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
2013 मध्ये त्यांचे काका अब्दुल कादिर ताहा अल शेबी यांच्या निधनानंतर ही चावी डॉ. सालेह यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
1947 मध्ये मक्का शहरात डॉ. सालेह यांचा जन्म झाला. त्यांनी उम्म उल कुरा विद्यापीठातून इस्लामिक स्टडीजमध्ये पीएचडी केली होती. मक्का हे इस्लामचे सर्वात पवित्र शहर मानले जाते.
या विद्यापीठात त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले. त्यांनी इस्लामशी संबंधित अनेक संशोधन लेख आणि पुस्तकेही प्रकाशित केली.
काबाच्या चावीची जबाबदारी
काबामध्ये प्रवेश करण्यासाठी एकच दरवाजा आहे, ज्याला बाब-ए-काबा म्हणतात.
काबा हरमच्या मजल्यापासून 2.13 मीटर उंचीवर आहे. हा दरवाजा काबाच्या ईशान्येकडील भिंतीजवळ आहे आणि काळ्या दगडाच्या अगदी जवळ आहे, जिथून तवाफ सुरू होतो.
हज (किंवा उमराह) दरम्यान यात्रेकरू या काळ्या दगडाचे चुंबन घेतात आणि नंतर तवाफ नावाच्या प्रक्रियेत काबाची प्रदक्षिणा करतात.

फोटो स्रोत, HARAMAIN SHARIFAIN
इस्लामिक इतिहासकार अहमद अदान यांनी बीबीसी सोमालीशी काबाच्या चाव्या हाताळण्याशी संबंधित इतिहासाविषयी बोलताना सांगितले की, “जेव्हा प्रेषित मोहम्मद यांचा जन्म झाला, तेव्हा कुरैश वंशाच्या जबाबदाऱ्या विभागल्या गेल्या होत्या. पैगंबराचा जन्म बनी हाशिम कुटुंबात झाला होता, त्यांच्याकडे झमझमची विहीर होती आणि तिची चावी त्यांच्याकडे होती. काबाची चावी उस्मान बिन तलहा यांच्याकडे होती."
अहमद अदानने त्या घटनेचाही संदर्भ दिला आहे, ज्यामध्ये प्रेषित मोहम्मद यांनी उस्मान बिन तल्हा यांना सांगितले होते, 'ज्या दिवशी माझ्याकडे ही चावी असेल तो दिवस जवळ आला आहे.'
इस्लामिक इतिहासानुसार, मक्का जिंकल्यानंतर ही चावी उस्मान बिन तलहा यांच्याकडून काही काळ काढून घेण्यात आली होती, परंतु नंतर अल्लाहच्या आदेशानुसार ती त्यांना परत करण्यात आली.
पैगंबर मोहम्मद यांनी स्वतः ही किल्ली उस्मान बिन तल्हा यांना दिली आणि तेव्हापासून त्यांचे कुटुंब ही चावी पिढ्यानपिढ्या हाताळत आहे.
उस्मानला ही चावी देताना पैगंबर मोहम्मद यांनी सांगितले होते की, "काबाची ही चावी सदैव तुमच्याकडे राहील आणि एखाद्या आक्रमकाशिवाय इतर कोणीही तुमच्याकडून ही चावी घेऊ शकणार नाही."

सध्या तिथे असलेला दरवाजा कसा आहे?
काबाचा दरवाजा कोणी बांधला आणि कसा बांधला याबद्दल 1942 पूर्वीच्या इतिहासात फारसा उल्लेख नाही.
मात्र, 1942 मध्ये इब्राहिम बद्रने चांदीचा दरवाजा बांधला होता. यानंतर 1979 मध्ये इब्राहिम बद्र यांचा मुलगा अहमद बिन इब्राहिम बद्र याने काबासाठी तयार केलेला सुवर्ण दरवाजा मिळाला. हा दरवाजा तीनशे किलो सोन्याने बनवला होता.
काबाचे माजी संरक्षक शेख अब्दुल कादिर यांच्या कारकिर्दीत शाह अब्दुल्ला यांच्या आदेशानुसार काबाचे कुलूप बदलण्यात आले.

फोटो स्रोत, Getty Images
तत्कालीन राजकुमार खालिद अल फैसल यांनी काबाच्या साफसफाईच्या निमित्ताने शाह अब्दुल्ला यांच्या वतीने नवीन कुलूप आणि चावी शेख अब्दुल कादिर यांच्याकडे सुपूर्द केली होती.
शेख अब्दुल कादिर यांचे दीर्घ आजारानंतर निधन झाले, तेव्हा डॉ. सालेह बिन झैनुल आबेदिन अल शेबी या किल्लीचे नवीन संरक्षक बनले.
इतिहासात अनेक शासकांनी काबाचे कुलूप आणि चाव्या अनेकदा बदलल्या आहेत. परंपरेनुसार काबाच्या चाव्या कुराणातील आयत (श्लोक) कोरलेल्या पिशवीत ठेवल्या जातात.
अलीकडच्या काळात, काबाच्या संरक्षकाची जबाबदारी कुलूप उघडणे आणि बंद करणे एवढीच मर्यादित आहे.
तथापि, सौदी अरेबियाला भेट देणाऱ्या सरकारी पाहुण्यांसाठी, सौदी अरेबियाचे रॉयल ऑफिस, गृह मंत्रालय किंवा आपत्कालीन दल हे कुलूप चावीच्या मदतीने उघडू शकतात.
याव्यतिरिक्त, इस्लामिक कॅलेंडरच्या मोहरम महिन्याच्या प्रत्येक पंधराव्या दिवशी, शाही आदेशानुसार, चाव्याचे संरक्षक काबाचे दरवाजे उघडतात जेणेकरून काबाला स्नान घालता येईल.
काबाचं कुलूप आणि चावी
काबाचं सध्याचं कुलूप आणि चावी 18 कॅरेट सोनं आणि निकेलनं बनलेली आहे, तर काबाच्या आतील कॉरिडॉरचा रंग हिरवा आहे.
कुलूप आणि चावीवर कुराणातील आयतेही लिहिलेली आहेत.

फोटो स्रोत, HARAMAIN SHARIFAIN
तुर्कस्तानमध्ये एका संग्रहालयात 48 चाव्या आहेतस, ज्या काबा उघडण्यासाठी ओटोमन साम्राजच्या तत्कालीन राज्यपालांनी वापरल्या होत्या, तर सौदी अरेबियामध्ये शुद्ध सोन्याने बनवलेल्या या चाव्यांच्या प्रती ठेवलेल्या आहेत.
काबाच्या चावीचा लिलाव
12 व्या शतकात बांधलेल्या काबाच्या चावीचा 2008 मध्ये 1 कोटी 81 लाख डॉलर्समध्ये लिलाव करण्यात आला होता.
इस्लामिक जगतातील कलाकृतींच्या लंडनमधील लिलावादरम्यान अज्ञात व्यक्तीने ही चावी खरेदी केली होती.
काबाच्या ज्या चावीचा लिलाव झाला, ती लोखंडाची होती आणि 15 इंच लांबीची होती. त्या चावीवर लिहिलं होतं - 'हिला विशेषत्वाने अल्लाहच्या घरासाठी बनवण्यात आलंय.'
लंडनमध्ये लिलाव झालेल्या काबाची चावी ही एकमेव चावी आहे, जी खासगी मालकीची आहे.
याशिवाय काबाच्या 58 चाव्या वेगवेगळ्या संग्रहालयात आहेत.











