ना लंच ब्रेक, ना डिनर ब्रेक; जगातील सर्वात जास्त वेळ म्हणजे 13 तास चालणारी परीक्षा कशी होते?

विद्यार्थी

फोटो स्रोत, BBC/Hosu Lee

फोटो कॅप्शन, प्रदीर्घ काळ परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सेऊल हॅनबिट स्कूल फॉर ब्लाईंडमधील विद्यार्थी असलेला हान डोंग-ह्यून याचा समावेश आहे
    • Author, ह्योजुंग किम
    • Role, बीबीसी कोरियन

नोव्हेंबर महिन्यात, एका कुख्यात कॉलेज प्रवेश परीक्षेसाठी दक्षिण कोरिया जणूकाही गोठतो.

कमी आवाज व्हावा म्हणून दुकानं बंद होतात, विमानांची उड्डाणं कमी केली जातात. इतकंच काय विद्यार्थ्यांसाठी सकाळच्या वाहतुकीचा वेगदेखील कमी केला जातो.

परीक्षा देणारे विद्यार्थी दुपारनंतर शाळेतून बाहेर पडताना सुटकेचा निश्वास सोडतात आणि बाहेर वाट पाहत असलेल्या कुटुंबियांची गळाभेट घेतात.

मात्र, प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेसाठी इतका प्रदीर्घ वेळ लागेलच असं नाही. संध्याकाळ झाल्यानंतर आणि नंतर अंधार पडल्यानंतरदेखील काही विद्यार्थी परीक्षा केंद्रात उपस्थित असतात.

परीक्षा देणाऱ्यांमध्ये सामान्य विद्यार्थ्यांशिवाय अंध विद्यार्थीदेखील असतात. अंध विद्यार्थी सर्वसाधारणपणे सुनेउंग या राष्ट्रीय कॉलेजच्या प्रवेश परीक्षेच्या सर्वात प्रदीर्घ आवृत्तीची 12 तासांपर्यंत परीक्षा देतात.

गुरुवारी (13 नोव्हेंबर) दक्षिण कोरियातील जवळपास 5 लाख 50 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले. संख्येचा विचार करता, ही 7 वर्षांमधील सर्वाधिक संख्या होती. सुनेउंग, हे कोरियन भाषेत कॉलेज स्कॉलिस्टिक ॲबिलिटी टेस्टचं (सीएसएटी) संक्षिप्त रूप आहे.

या विद्यार्थ्यांना विद्यापीठात प्रवेश मिळेल की नाही, त्यांना रोजगाराच्या संधी मिळतील की नाही हे या परीक्षेवर अवलंबून असतं. इतकंच नाही तर त्यांचं उत्पन्नाचं साधन, राहण्याचं ठिकाण आणि भविष्यातील नातेसंबंधांवरदेखील या परीक्षेचा प्रभाव पडू शकतो.

निवडलेल्या विषयांनुरूप विद्यार्थ्यांना कोरियन भाषा, गणित, इंग्रजी, सामाजिक किंवा नैसर्गिक विज्ञान, एक अतिरिक्त परदेशी भाषा आणि हांजासह (कोरियात वापरण्यात येणारी पारंपारिक चीनी अक्षरं) जवळपास 200 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात.

सकाळपासून रात्रीपर्यंत चालते परीक्षा

बहुतांश विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आठ तास चालते. सुनेउंग परीक्षा सकाळी 8:40 वाजता सुरू होते आणि जवळपास 17:40 वाजता संपते.

अर्थात, ज्या विद्यार्थ्यांना दृष्टीची गंभीर समस्या आहे, त्यांना सामान्य वेळेच्या तुलनेत 1.7 वेळ अधिक दिला जातो.

याचाच अर्थ, जर अशा विद्यार्थ्यांनी अतिरिक्त परदेशी भाषेच्या सेक्शनचा पेपर दिला तर ही परीक्षा पूर्ण होण्यास 13 तास लागतात.

यादरम्यान विद्यार्थ्यांना लंच किंवा डिनर ब्रेक दिला जात नाही. पूर्ण वेळ परीक्षा सुरू असते.

ब्रेल लिपी वाचणारा विद्यार्थी

फोटो स्रोत, BBC/Hosu Lee

फोटो कॅप्शन, ब्रेल लिपी वाचण्यासाठी सातत्यानं बोटं ब्रेलच्या प्लेटवर घासावी लागतात आणि ते विद्यार्थ्यांसाठी वेदनादायक असतं.

मात्र इतक्या प्रदीर्घ वेळेसाठी ब्रेल टेस्ट पेपरचं बंडलदेखील महत्त्वाची भूमिका बजावतं.

प्रत्येक वाक्य, संकेत आणि ग्राफचं ब्रेलमध्ये रूपांतर केलं जातं, तेव्हा प्रत्येक टेस्ट बुकलेट सहा ते नऊ पट जाडजूड होते.

अंध विद्यार्थ्यांसाठीच्या सेऊल हॅनबिट स्कूलमध्ये शिकणारा 18 वर्षांचा हान डोंग-ह्यूनदेखील यावर्षी सुनेउंग परीक्षा देतो आहे.

शिक्षण मंत्रालय आणि कोरिया इंस्टिट्यूट फॉर करिकुलम अँड इव्हॅल्युशनच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी संपूर्ण देशाभरातून अशा 111 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

त्यात 99 जण दृष्टीची कमी समस्या असणारे आणि 12 जण दृष्टीची गंभीर समस्या असणारे होते. डोंग ह्यून त्यातीलच एक आहे.

ब्रेल लिपीमुळे लांबलचक असते प्रश्नपत्रिका

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

डोंग-ह्यून जन्मापासून पूर्ण अंध आहे आणि त्याला प्रकाशाची अजिबात संवेदना नाही.

7 नोव्हेंबरला बीबीसीनं त्याच्या शाळेतच त्याची भेट घेतली. त्यावेळेस त्याचे हात ब्रेल लिपीमध्ये छापलेल्या जुन्या प्रश्नपत्रिकांवरून वेगानं फिरत होते.

परीक्षेच्या फक्त एक आठवड्याआधीच, तो त्याच्या सहनशक्ती आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करत होता. डोंग-ह्यून ब्रेल प्रश्नपत्रिका आणि स्क्रीन-रीडिंग कॉम्प्युटरच्या मदतीनं परीक्षा देणार आहे.

तो म्हणाला, "खूप जास्त वेळ चालत असल्यानं ही परीक्षा खूपच थकवणारी आहे. मात्र यासाठी दुसरा कोणतीही विशेष पद्धत नाही. मी फक्त अभ्यासाचं वेळापत्रक पाळतो आणि माझी काळजी घेतो. हाच एक मार्ग आहे."

डोंग-ह्यून म्हणाला की विशेषकरून कोरियन भाषेचा सेक्शन त्याच्यासाठी कठीण असतो.

या सेक्शनमध्ये एकूण 16 पानं असतात. मात्र ब्रेल लिपीमुळे ती जवळपास 100 पानांची असतात.

स्क्रीन-रीडिंग सॉफ्टवेअर असूनदेखील, बोलण्यात आलेली माहिती ऐकताच गायब होते. मात्र लिहिलेलं टेक्स्ट पुन्हा वाचता येतं. त्यामुळेच डोंग-ह्यूनला सर्व माहिती लक्षात ठेवावी लागते.

त्याच्यासाठी गणितदेखील सोपं नाही.

विद्यार्थी

फोटो स्रोत, BBC/Hosu Lee

फोटो कॅप्शन, जियोंग-वानसारख्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेस ब्रेल डिस्प्ले उपकरणांचा वापर करणं बंधनकारक असतं.

त्याला फक्त बोटांच्या आधारे ब्रेल लिपीमध्ये रुपांतरित करण्यात आलेले गुंतागुंतीचे ग्राफ आणि टेबल समजून घ्यायचे असतात.

तरीदेखील त्याचं म्हणणं आहे की आता पूर्वीपेक्षा परीस्थिती चांगली आहे. आधी विद्यार्थ्यांना जवळपास सर्व गणिती गणना मनातच कराव्या लागायच्या.

मात्र 2016 पासून अंध विद्यार्थ्यांना 'हांसोन' नावाच्या ब्रेल नोटटेकरचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

तो म्हणाला, "ज्याप्रकारे दृष्टी असणारे विद्यार्थी पेन्सिलनं लिहितात, त्याचप्रकारे, आम्ही ब्रेल लिपीमध्ये हांसोनवर ते नोंदवतात. जेणेकरून स्टेप बाय स्टेप प्रक्रिया लक्षात यावी."

18 वर्षांचा ओ जोंग-वोन, या परीक्षेला बसणाऱ्या हॅनबिट स्कूल फॉर द ब्लाईंडमधील आणखी एक विद्यार्थी आहे. त्यानं सांगितलं की दिवसातील सर्वात कठीण वेळ दुपारनंतरची असते.

संध्याकाळची वेळ सर्वात कठीण

जोंग-वोन म्हणाला, "दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत सर्व काही ठीक असतं. मात्र संध्याकाळी 4 किंवा 5 वाजेच्या सुमारास, इंग्रजी आणि कोरियन इतिहासादरम्यानचा वेळ सर्वात कठीण असतो."

तो म्हणाला, "डिनरसाठी कोणताही ब्रेक नसतो. सर्वसाधारणपणे ज्या वेळेस आम्ही जेवतो, त्यावेळेस आम्ही प्रश्न सोडवत असतो. त्यामुळे आणखी थकवा येतो. मात्र तरीदेखील मी प्रश्न सोडवत राहतो, कारण मला माहित आहे की शेवटी काहीतरी करून दाखवल्याचं समाधान मिळणार आहे."

जोंग-वोनला अधिक थकवा येतो, कारण त्याला एकाच वेळी हात आणि ऐकण्याच्या क्षमतेवर पूर्ण लक्ष केंद्रित करावं लागतं.

तो म्हणाला, "मी जेव्हा बोटांनी ब्रेल लिपी वाचतो आणि त्याचबरोबर ऑडिओद्वारे माहिती घेतो. तेव्हा ती दृष्टी असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत कितीतरी अधिक थकवणारी गोष्ट असते."

मात्र विद्यार्थ्यांना वाटतं की, परीक्षा खूप वेळ चालते ही सर्वात कठीण बाब नाही. त्यांच्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान अभ्यासाच्या सामग्रीपर्यंत पोहोचण्याचं आहे.

लोकप्रिय पाठ्यपुस्तकं आणि ऑनलाइन लेक्चर अंध मुलांच्या आवाक्याबाहरेची असतात.

ब्रेल लिपीतून फार थोडी माहिती उपलब्ध आहे आणि धडे किंवा माहिती ऑडिओमध्ये रुपांतरित करण्यासाठी टेक्स्ट फाईल्स आवश्यक असतात. मात्र त्या मिळणं खूप कठीण असतं.

अनेकदा तर एखाद्याला संपूर्ण पुस्तक हातानं टाईप करावं लागतं. कारण त्यानंतरच अंध विद्यार्थ्यांना ते वापरता येतं किंवा त्याचा अभ्यासासाठी वापर करता येतो.

ऑनलाइन लेक्चर हीदेखील आव्हानात्मक बाब असते. कारण अनेक शिक्षक स्क्रीनवर व्हिज्युअल नोट्स, रेखाचित्र आणि ग्राफिक्सचा वापर करत शिकवतात. ते निव्वळ ऑडिओद्वारे ऐकून समजून घेणं शक्य नसतं.

अभ्यासाची साधन-सामग्री मिळण्यास होणारा विलंब हे मोठं आव्हान

सरकारद्वारे तयार करण्यात आलेल्या ईबीएस प्रिपरेशन बुक्सच्या ब्रेल लिपीतील आवृत्त्या येण्यास होणारा विलंब, ही सर्वात मोठ्या अडचणींपैकी एक आहे. राष्ट्रीय परीक्षेशी निगडीत असलेलं तेच अभ्यासाचं मुख्य साधन असतं.

या विलंबामुळे इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत अंध विद्यार्थ्यांना अनेक महिन्यांनी अभ्यासासाठी लागणारी साधन-सामग्री मिळते.

जोंग-वोन म्हणाला, "इतर विद्यार्थ्यांना जानेवारी ते मार्चदरम्यान ईबीएसची पुस्तकं मिळतात. मग ते पूर्ण वर्षभर त्यावरून अभ्यास करतात. आम्हाला मात्र ब्रेल फाईल्स ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात मिळतात. तोपर्यंत परीक्षेला फक्त काही महिनेच शिल्लक राहिलेले असतात."

विद्यार्थी

फोटो स्रोत, BBC/Hosu Lee

फोटो कॅप्शन, सुनेउंग परीक्षेच्या तयारीसाठी हान डोंग-ह्यून आणि जियोंग-वान खूप आधीपासून स्क्रीन रीडर आणि ब्रेल लिपीच्या आधारे तयारी करत आहेत.

तो म्हणाला, "परीक्षेच्या 90 दिवस आधीपर्यंत ब्रेल लिपीतील सामग्री पूर्ण झालेली नव्हती. मी वारंवार विचार करायचो की प्रकाशनाची प्रक्रिया थोडी वेगवान झाली पाहिजे."

ईबीएस परीक्षेसाठी ब्रेल लिपीतून अभ्यासाची सामग्री तयार करणाऱ्या राष्ट्रीय विशेष शिक्षण संस्थेनं बीबीसीला सांगितलं की प्रत्येक पुस्तकाच्या प्रक्रियेला किमान तीन महिने लागतात. कारण त्यांना संबंधित सूचनांचं पालन करायचं असतं.

संस्थेनं हेदेखील सांगितलं की "अंध विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडचणी किंवा व्यत्यय येऊ नये म्हणून ते सामग्री वेगवेगळ्या खंडांमध्ये तयार करून उपलब्ध करून देण्यासारखे अनेक प्रयत्न करत आहेत."

'धैर्याची परीक्षा'

कोरियन ब्लाईंड युनियननं सांगितलं की ते प्रदीर्घ काळापासून हा मुद्दा अधिकाऱ्यांसमोर मांडत आहेत. तसंच सर्व पाठ्यपुस्तकांच्या ब्रेल लिपीतील आवृत्त्या वेळीच उपलब्ध करून देण्याच्या मागणीसंदर्भात घटनात्मक याचिका दाखल करण्याची योजना बनवत आहेत.

या विद्यार्थ्यांसाठी सुनेउंग ही फक्त कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्याचीच परीक्षा नाही. तर इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे जी मेहनत घेतली आहे आणि आव्हानांना तोडं दिलं आहे, त्याची ती साक्ष आहे.

जोंग-वोन यानं ही परीक्षा म्हणजे 'धैर्याची परीक्षा' असल्याचं म्हटलं.

तो म्हणाला, "धैर्य नसल्यास आयुष्यात काहीही करता येत नाही. मला वाटतं की हा वेळ म्हणजे, माझा आत्म-संयम अधिक मजबूत करण्याची प्रक्रिया आहे."

वर्गातील विद्यार्थी

फोटो स्रोत, BBC/Hosu Lee

फोटो कॅप्शन, अंध विद्यार्थ्यांसाठी सुनेउंग परीक्षा 12 तासांहून अधिक वेळ असू शकते.

त्याचे शिक्षक कांग सियोक-जू प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना ही परीक्षा देताना पाहतात. ते म्हणतात की अंध विद्यार्थ्यांमध्ये असलेलं धैर्य 'अत्यंत कौतुकास्पद' असतं.

ते म्हणाले की, "ब्रेल लिपी वाचणं म्हणजे उभार असणाऱ्या बिंदूंना बोटांनी स्पर्श करणं. असं करताना सातत्यानं घर्षण झाल्यामुळे हातांना वेदना होऊ लागतात. मात्र हे विद्यार्थी तासनतास असं करत असतात."

कांग यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना सांगितलं की त्यांनी नाराज होण्याऐवजी किंवा पश्चाताप करण्याऐवजी केलेल्या प्रयत्नांचा अभिमान बाळगावा.

ते म्हणाले, "ही परीक्षा म्हणजे असं ठिकाण आहे, जिथे तुम्ही पहिल्या इयत्तेपासून ते आतापर्यंत शिकलेली प्रत्येक गोष्ट एकाच दिवसात पणाला लावता. अनेक विद्यार्थी नंतर निराश होतात. मात्र मला वाटतं की त्यांनी त्यांच्या परीनं पूर्ण प्रयत्न केले, हेच त्यांनी लक्षात ठेवावं."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)