'इंडिया आऊट' म्हणणारे मोहम्मद मुइज्जू मालदीवचे राष्ट्राध्यक्ष, भारत-चीन संबंधांवर काय परिणाम?

मोहम्मद मुइज्जू

फोटो स्रोत, REUTERS

    • Author, एजे गोक्सेदेफ़
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

मालदीवमध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोहम्मद मुइज्जू विजयी झाले आहेत. मावळते राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी पराभव स्वीकारला आहे.

17 नोव्हेंबरला मालदीवचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून मोहम्मद मुइज्जू शपथ घेतील. तोपर्यंत इब्राहिम सोलिह हे काळजीवाहू अध्यक्ष म्हणून काम पाहतील.

मोहम्मद मुइज्जू हे चीनचे समर्थक मानले जातात, तर इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या कार्यकाळात भारतासोबत मालदीवचे संबंध दृढ झाले होते.

असं मानलं जात होतं की, अनेक कारणांमुळे चीन आणि भारत हे दोन्ही देश मालदीवमधील निवडणुकांवर बारीक लक्ष ठेवून आहेत,

मोहम्मद मुइज्जू यांना 54 टक्के मते मिळाली. मालदीवची राजधानी माले या शहराचे महापौर असलेल्या मोहम्मद मुइज्जू यांनी आपल्या निवडणूक प्रचारात 'इंडिया आउट'ची घोषणा केली होती.

यापूर्वीचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलीह यांच्याकडे भारताचे खंदे समर्थक म्हणून पाहिलं जात होतं. 2018 पासून इब्राहिम हे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भारताला प्राधान्य देण्याची भूमिका घेतली होती आणि त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर 'इंडिया फर्स्ट' नीतीचा अवलंब करत असल्याची टीकाही केलेली होती.

इब्राहिम सोलिह

फोटो स्रोत, REUTERS

फोटो कॅप्शन, 9 सप्टेंबर रोजी झालेल्या मतदानात इब्राहिम सोलिह यांनी मतदान केले.

मालदीवचे भारताशी पूर्वीपासूनच सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध आहेत.

मालदीव दीर्घकाळापासून भारताच्या प्रभावाखाली आहे. मालदीवमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवून भारत हिंदी महासागराच्या मोठ्या भागावर नजर ठेवत असल्याचं मानलं जातं.

चीनसाठी मालदीव महत्वाचा का आहे?

45 वर्षीय मोहम्मद मुइज्जू हे प्रोग्रेसिव्ह अलायन्सचे आहेत आणि ते चीनशी चांगले संबंध ठेवण्याचे समर्थक आहेत.

हिंद महासागरातील मालदीवचे स्थान सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. चीन आपल्या नौदलाचा झपाट्याने विस्तार करत आहे आणि मालदीवमध्ये आपली पोहोच वाढवण्याचे प्रयत्न करत आहे. मालदीवमध्ये चीनचा प्रभाव कमी करण्याचा भारत नेहमीच प्रयत्न करत असतो.

यासोबतच आखाती देशांमधून होणारी तेलाची वाहतूक देखील मालदीवमार्गेच होत असल्याने, चीनसाठी हा देश अत्यंत महत्वाचा आहे.

गेल्या दहा वर्षांत भारताने मालदीवला दोन हेलिकॉप्टर आणि एक लहान विमान दिलं आहे.

2021 मध्ये मालदीवच्या लष्कराने असं सांगितलं होतं की, भारतीय सैन्याचे 75 अधिकारी मालदीवमध्ये राहतात आणि भारतीय विमानांचे संचालन आणि देखभाल करतात.

विरोधकांची 'इंडिया आऊट' मोहीम

यानंतरच मालदीवमधल्या विरोधी पक्षांनी त्यांच्या देशात ‘इंडिया आऊट’ नावाची एक मोहीम सुरू केली आणि मालदीवमधून भारतीय सैनिकांना माघारी पाठवण्याची मागणी जोर धरू लागली.

इब्राहिम सोलिह यांच्या आधी, प्रोग्रेसिव्ह पार्टी (PPM) चे अब्दुल्ला यामीन हे 2013 ते 2018 पर्यंत मालदीवचे राष्ट्राध्यक्ष होते.

त्यांच्या कार्यकाळात मालदीव चीनच्या जवळ गेला आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या 'बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह'चा भाग मालदीवने स्वीकार केला.

यामीन सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात असून 11 वर्षांची शिक्षा भोगत आहेत. त्यांना निवडणूक लढविण्यासही मज्जाव करण्यात आला होता.

निकाल लागल्यानंतर मोहम्मद मुइज्जू यांच्या घराबाहेर शेकडो पीपीएम समर्थक जमले आणि त्यांनी विजयाचा आनंद साजरा केला.

कोण आहेत मोहम्मद मुइज्जू ?

1978 मध्ये जन्मलेल्या मोहम्मद मुइज्जू यांनी इंग्लंडच्या लीड्स विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पीएचडी केली आहे. 2012 मध्ये ते राजकारणात आले आणि मंत्री झाले.

 विरोधी आघाडीचे उमेदवार मोहम्मद मुइज्जू

फोटो स्रोत, Getty Images

यामीन सत्तेवर आल्यावरही, मुइज्जू हेच मंत्री राहिले आणि मालेला आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडणारा 20 करोड अमेरिकन डॉलर्सचा एक महत्वाचं पूलही त्यांनी उभारला.

2021 मध्ये मुइज्जू हे मालेचे महापौर बनले. महापौर निवडणुकीत त्यांच्या पक्षाने मिळवलेला हा पहिलाच विजय होता.

चीनचे कर्ज आणि गुंतवणूक

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मालदीवने चीनकडून मोठे कर्ज घेतले आहे. राजधानी मालेला आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडणारा पूलही चिनने केलेल्या गुंतवणुकीमधूनच बांधला गेलेला आहे.

2016 मध्ये, मालदीवने त्यांचं एक बेट चीनला 50 वर्षांसाठी केवळ 40 लाख डॉलर्समध्ये भाड्याने दिलं आहे. मालदीवने चीनच्या 'वन बेल्ट वन रोड' योजनेला उघड पाठिंबा दिला आहे.

मालदीववर चीनचे सुमारे एक अब्ज डॉलरचे कर्ज असून, चीनने तेथील पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली असल्याचं मानलं जातं.

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मुइज्जू यांचा विजय मालदीवला चीनच्या जवळ आणू शकतो. मात्र, सध्याच्या परिस्थितीत मालदीव भारत आणि चीन या दोन देशांमध्ये समतोल निर्माण करण्याचा प्रयत्न करेल, असं विश्लेषकांचं मत आहे.

बीबीसीचे प्रतिनिधी दिलनवाज पाशा यांच्याशी बोलताना जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ज्ञ मुस्तफा कमाल पाशा म्हणतात, "या निवडणुकीच्या निकालानंतर मालदीव लगेच चीनच्या जवळ जाणार नाही, भारताचीही तेथे गुंतवणूक आहे जी मालदीव दुर्लक्षित करू शकत नाही."

मुइज्जू यांनी 'इंडिया आउट'चा नारा दिला होता.

याबाबत बोलताना प्राध्यापक पाशा म्हणतात, "त्यांना मालदीवमध्ये तैनात भारतीय सैनिकांना परत पाठवायचे आहे, परंतु भारतीय गुंतवणूक मात्र हवी आहे.

अशा परिस्थितीत निवडणुकीत आश्वासन दिल्यामुळे ते भारतीय सैनिकांना परत पाठवण्याच्या दिशेने पावलं उचलू शकतात, पण मालदीवमधील भारताचा प्रभाव लगेच कमी होईल असा त्याचा अर्थ नाहीये."

मालदीवमध्ये भारताची गुंतवणूक

गेल्या काही वर्षांत, भारताने दोन अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची कर्जे आणि मदत देऊन चिनी गुंतवणुकीची बरोबरी करण्याचा प्रयत्न मालदीवमध्ये केलेला आहे, पण मालदीवमधील बरेच लोक भारताच्या हेतूकडे संशयाने पाहतात. भारत तेथे अप्रत्यक्षपणे उपस्थित असल्याचं टीकाकारांचं म्हणणं आहे.

त्यांची दुसरी चिंता म्हणजे भारत आणि चीन यांच्यातील वाढत्या तणावाचा मालदीववर परिणाम होऊ शकतो अशी भीती त्यांना वाटत आहे.

मालदीव

फोटो स्रोत, @PPM_HULHUMALE

फोटो कॅप्शन, मालदीवमध्येही भारतविरोधी मोहीम सुरू आहे

वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठात शिकवणारे मालदीव प्रकरणांचे तज्ज्ञ अजीम झहीर म्हणतात की, "मालदीवमध्ये अशी तीव्र भावना आहे की भारतासह कोणत्याही देशाशी आपले मजबूत धोरणात्मक संबंध असू नयेत."

मोक्याच्या ठिकाणी आहे मालदीव

चीन आणि भारत या दोन्ही देशांना हिंदी महासागरात आपापली ताकद वाढवायची आहे. मालदीव आणि श्रीलंका यांसारख्या देशांचे सामरिक स्थान त्यांना भारत आणि चीनशी 'वाटाघाटी' करण्यास मदत करतं.

प्राध्यपक पाशा म्हणतात की, "चीनला साहजिकच हिंद महासागरात आपली ताकद वाढवायची आहे आणि त्यांना यासाठी मालदीववर नियंत्रण हवं आहे.

जर चीन मालदीवमध्ये त्यांच्या नौदलाचं अस्तित्व प्रस्थापित करू शकला, तर ग्वादरनंतर त्याचा हिंदी महासागरात एक दुसरा मजबूत तळ तयार होईल."

प्राध्यापक पाशा म्हणतात की, "श्रीलंका आणि मालदीव सारखे छोटे देश त्यांच्या सामरिक स्थितीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करतात आणि वेळोवेळी बाजू बदलत राहतात.

#मालदीवमध्ये चीन समर्थक उमेदवाराचा विजय झाल्याने चीनला फायदा होऊ शकतो, पण त्याचा भारतावर लगेच वाईट परिणाम होईल असं म्हणणं घाईच ठरेल.

भारतानेही मालदीवमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. मालदीव सरकारने तिथे तैनात केलेल्या भारतीय सैनिकांना परत पाठवले तरी भारताची गुंतवणूक तिथेच राहील. सध्याच्या परिस्थितीत मालदीव भारत आणि चीन यांच्यात संतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न करेल."

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)