वर्धा येथे साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात

फोटो स्रोत, Getty Images
96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून (3 फेब्रुवारी) पासून वर्ध्यात सुरू होत आहे.
जेष्ठ विचारवंत-लेखक न्या नरेंद्र चपळगावकर या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. मावळते अध्यक्ष भारत सासणे यांच्याकडून ते संमेलनाचा कार्यभार स्वीकारतील.
ज्या ठिकाणी हे संमेलन होणार आहे त्या जागेला राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी असे नाव देण्यात आले आहे.
संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाषामंत्री दीपक केसरकर, ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे हे प्रमुख पाहुणे आहेत.
शताब्दी वर्षानिमित्त विदर्भ साहित्य संघातर्फे हे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे संमेलन होत आहे. माजी खासदार दत्ता मेघे हे स्वागताध्यक्ष, तर विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते हे संमेलनाचे कार्याध्यक्ष आहेत.
साहित्य संमेलनांमध्ये होणारी पुस्तक विक्री आणि वाचकांची मागणी पाहता तसेच शेवटच्या दिवशी पुस्तक खरेदीला मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि वेळेअभावी अनेक वाचकांना हवी ती पुस्तके खरेदी करता येत नाहीत त्यावर उपाय म्हणून साहित्य संमेलनाच्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन संमेलनाच्या पूर्वसंध्येलाच करून ‘संमेलनात चार दिवसांचे ग्रंथ प्रदर्शन’ असा नवीन पायंडा वर्धा येथील 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून सुरू करण्यात आला आहे.
प्रमुख पाहुण्यांचं सूत कताई करणारा चरखा देऊन स्वागत
वर्ध्यातील गोपुरी येथील ग्रामोद्योग भांडारात हे चरखे तयार करण्यात आले आहेत. हा चरखा केवळ प्रतिकात्मक राहू नये त्यामुळे प्रत्यक्ष सूत कताई करणारा पेटी चरखा देण्यात येणार आहे.
शुक्रवारी (3 फेब्रुवारी) सकाळी साडे दहा वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर आहेत.
उद्घाटन आणि समारोपीय कार्यक्रमाला येणार्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा चरखा देऊन सत्कार करण्यात येणार आहे. परंतु, हा चरखा फक्त स्मृतिचिन्ह नसेल तर त्यावर सूत कताईही करता येणार आहे.
संमेलनातले कार्यक्रम
पहिल्या दिवशी कथाकथन, संमेलनाध्यक्षांच्या भाषणावर चर्चा, वैदर्भीय बोली आणि मृदगंध काव्यप्रतिभेवर परिसंवादाचे आयोजन केले आहे. ल
ेखकांची मते आणि लॅटिनेतर साहित्याची लोकप्रियता या विषयांवरही परिसंवाद होणार आहेत. निमंत्रितांच्या कवीसंमेलनाने कार्यक्रमाची सांगता होईल.
शनिवारी, 4 फेब्रुवारीला, ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना, समाज माध्यमांतील अभिव्यक्ती- एक उलट तपासणी, वैदर्भीय वाङ्मयीन परंपरा, मराठी अनुवादक, कृषिजीवनातील अस्थिरता आणि लेखन, मराठी साहित्यातील उद्यम व अर्थविषयक लेखन याविषयावर परिसंवाद होणार आहेत. त्याचबरोबर मुलाखती व मुक्तसंवादाबरोबरच एकांकिका पार पडणार आहे. निमंत्रितांच्या काव्यसंमेलनाने दुसऱ्या दिवसांची सांगता होईल.
रविवारी, 5 फेब्रुवारीला, रविवारी वाचन पर्याय आणि वाचक, गांधीजी ते विनोबाजी वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यातून, वंचित समाजाच्या साहित्यातून लोकशाहीचे चित्रण या विषयांवर परिसंवाद होणार आहेत.
अभंगधारा हा अभंगांचा कार्यक्रम व समारोप समारोहाने संमेलनाची सांगता होणार आहे. याच सोबत तीनही दिवशी कविकट्टे, गझलकट्टे, वाचन मंच, बालसाहित्य मंच व प्रकाशन मंच सुरूच असणार आहेत.
संमेलनातले वाद
या संमेलनाभोवती वाद तयार झाले आहेत. वर्ध्यातल्या गांधी आणि विनोबावादी विचारांच्या संघटनांनी इथे होणाऱ्या काही कार्यक्रमांना आक्षेप घेतला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
विनोबा जन्मस्थान ट्रस्ट, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, महाराष्ट्र सर्वोदय मंडळ आणि किसान अधिकार अभियान अशा संस्थांनी एकत्र येत एक पत्रक काढलं आहे, ज्यात म्हटलंय, “ रविवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी, 'मनोहर म्हैसाळकर सभामंडपात 'गांधीजी ते विनोबाजी : वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यातून' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादाचे अध्यक्ष डॉ.विनय सहस्त्रबुद्धे (दिल्ली) हे असून , त्यांचा सरळ संबंध गांधी विचारांची थेट विरोधी संघटना म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत आहे. गांधी विचारांची मांडणी जर गांधी विनोबांच्या विचारांचे विरोधक मांडतील तर ते विचाराशी न्याय्य होईल का ? हा साधा प्रश्न या आयोजकांना का पडला नसावा ! की तेच यांचे उद्दीष्ट आहे हे ही विचार करण्याची आज गरज आहे.”
या संस्थांचा असाही आक्षेप आहे की त्यांना या संमेलनाचं आमंत्रण देण्यात आलेलं नाही. या पत्रकात म्हटलंय, “या परिसंवादात गोवा,मुंबई,पुणे, नांदेड, नागपूर येथील बरेच विद्वान सहभागी होणार आहेत. ‘पण ज्या गांधी विनोबांच्या कर्मभूमीत हा अखिल भारतीय परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे, त्या सेवाग्राम-पवनार या परिसरातील गांधी-विनोबांच्या विचाराने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना, विचारवंतांना वा सेवाग्राम-पवनार आश्रमातील कार्यकर्त्यांना व विचारवंतांना परिसंवादात कोठेही स्थान तर देण्यात आलेलेच नाही, पण गांधी-विनोबांच्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना साहित्य संमेलनाचे साधे रीतसर सन्मानपूर्वक निमंत्रणही देण्यात आलेले नाही.”
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








