इंट्रोव्हर्ट-एक्स्ट्रोव्हर्ट: तुमचं व्यक्तिमत्त्व अंतर्मुखी आहे की बहिर्मुखी, आपण तसे का बनतो?

    • Author, टॉम स्टॅफोर्ड
    • Role, बीबीसी फ्युचर

तुम्हाला शनिवारची रात्र एखाद्या गर्दी असलेल्या बारमध्ये घालवायला आवडेल की एखाद्या चांगल्या पुस्तकाच्या सानिध्यात? तुमच्यासाठी आदर्श सुट्टी म्हणजे मित्रांच्या मोठ्या ग्रुपबरोबर अॅडव्हेंचर स्पोर्ट्स करणं आहे की, मोजक्या मित्रांबरोबर एखाद्या निवांत शांत ठिकाणी वेळ घालवणं? कदाचित तुमचं याबाबतचं उत्तर अगदी स्पष्ट असेल.

कदाचित तुम्हाला एखादा पर्याय अगदी आवडेल आणि दुसरा बिल्कुल आवडणार नाही. तसंच कदाचित या दोन्ही टोकाच्या परिस्थितीत मध्येच कुठंतरी तुम्हाला आनंद सापडेल.

तुमचं उत्तर काहीही असलं तरी, आपल्या भावनांची उत्पत्ती ही तुमचा मेंदू या सगळ्याला कसा प्रतिसाद देत असतो, यावर अवलंबून असतं.

आपण सगळेच अंतर्मुख (introverts) आणि बहिर्मुख (extroverts) याच्या मध्येच कुठेतरी असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थिती या आपल्यात एका किंवा वेगळ्या प्रकारच्या भावना निर्माण करत असतात.

बहिर्मुख ही संकल्पना 20 व्या शतकाच्या सुरुवातीला मानसोपचारतज्ज्ञ कार्ल युंग यांच्या माध्यमातून प्रसिद्ध झाली. त्यानंतर संपूर्ण जगावर या संकल्पनेचा प्रभाव पडला.

त्याचं कारण म्हणजे एक तर ती अगदीच सामान्य असेल किंवा त्याचा सगळीकडं खूपच गाजावाजा झालेला असेल. ("extravert" या शब्दाचं खरं स्पेलिंग आता अगदी दुर्मिळ वापरलं जातं. पण मानसशास्त्रात अजूनही त्याचा वापर केला जातो.)

हे एवढं संवेदनशील प्रकरण आहे की, काहींनी तर अंतर्मुख लोकांची काळजी कशी घ्यावी आणि त्यांच्यातील विशेष कौशल्ये कशी जोपासावी यावर पुस्तकंही लिहिली आहेत.

पण या सर्वानंतरही एक मूलभूत प्रश्न कायम राहतो. व्यक्ती बहिर्मुखी कशामुळं बनते? याबाबतीत आपण सगळे वेगळे कसे आहोत, आणि बहिर्मुखी लोकांमध्ये नेमकं असं काय साम्य असतं की ते एकमेकांसारखे असतात?

एखादी व्यक्ती बाह्यमग्न कशी बनते?

आता ब्रेन स्कॅनद्वारे मेंदूच्या आतील खोलवरच्या क्रियांची नोंद करता येते आणि अनुवांशिक प्रोफायलिंगच्या माध्यमातून मेंदूद्वारे वापरल्या जाणाऱ्या रासायनिक सिग्नलिंगंच्या मागं नेमकं असणारे कोड समजू शकतात. त्यामुळं दशकांपूर्वीच्या या प्रश्नाची उत्तरं मिळणं शक्य होऊ शकतं.

1960 च्या दशकात मानसोपचारतज्ज्ञ हॅन्स आयसेंक यांनी एक प्रभावी प्रस्ताव मांडला तो म्हणजे बहिर्मुखी लोक हे त्यांच्या उत्साहाच्या किंवा उत्तेजनेच्या कमी पातळीवरून ओळखले जातात.

उत्तेजना म्हणजे शारीरिक अर्थानं अशी पातळी ज्यात आपलं शरीर आणि मन सतर्क असतं आणि प्रतिसाद देण्यास तयार असतात.

हे आपल्या सर्वांच्या बाबतीत दिवसभरात बदलत असते (उदाहरणार्थ मी झोपेतून उठण्यासाठी सहसा कॉफीचे काही कप घेतो) आणि वेगवेगळ्या परिस्थितीतही बदलतो (उदाहरणार्थ गर्दीच्या काळात सायकलिंग केल्यास तुम्ही कायम सतर्क राहता. त्यामुळं तुम्ही उत्तेजित राहता, तर लेक्चरचं उबदार सभागृह तुमच्या उत्तेजना कमी करतात).

आयसेंक यांचा सिद्धांत असा होता की, बहिर्मुखी लोकांमध्ये उत्तेजनेची पातळी तुलनेनं कमी असते. त्याचा परिणाम म्हणजे इतरांप्रमाणे काहीही न करता आनंदी राहण्यासाठी त्यांना काही प्रमाणात अधिकचे परिश्रम करावे लागतात. त्यामुळं नवे अनुभव आणि जोखीम यासाठी त्यांना कंपनी म्हणजे कोणाची तरी साथ आवश्यक असते.

त्याउलट जास्त अंतर्मुख लोकांना अशा गोष्टींमुळं अधिक उत्तेजित वाटू लागतं ज्या इतरांना आनंददायी किंवा आकर्षक वाटत असतात. त्यामुळं ते महत्त्वाचे मुद्दे, अपेक्षित वातावरण आणि एकांत याबाबत अगदी शांतपणे समरस होताना दिसतात.

बहिर्मुख लोकांना डोपामाईनच्या कार्याशी संलग्न करण्याचा सिद्धांत अलीकडेच नव्यानं मांडण्यात आला आहे. डोपामाईन हे असं रसायन असतं जे मेंदूमध्ये कार्याबाबत महत्त्वाची भूमिका बजावतं. बहिर्मुख लोकांमध्ये डोपामाईन यंत्रणा किती सक्रिय आहे यानुसार फरक असू शकतो.

यामुळं बहिर्मुख लोकांद्वारे प्रदर्शित केल्या जाणाऱ्या वर्तनाबाबत एक स्पष्ट व्याख्या मिळू शकते. तसंच याला मेंदूच्या अशा कार्याशीही जोडलं जातं, ज्याबाबत इतर अनेक कारणांमुळं आपल्याला खूप काही माहिती असते.

'इन्ट्रोव्हर्ट विरूद्ध एक्स्ट्रोव्हर्ट'

अॅमस्टरडॅम विद्यापीठाचे संशोधक मायकल कोहेन यांच्या नेतृत्वातील संशोधकांनी 2005 मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका पेपरमध्ये या संकल्पनांची चाचणी घेतली. त्यांनी चाचणीतील सहभागी झालेल्या लोकांची ब्रेन स्कॅनिंग सुरू असताना त्यांना जुगार खेळण्यास सांगितलं.

ते स्कॅनरमध्ये जाण्यापूर्वी सहभागी असलेल्या प्रत्येकानं 'पर्सनालिटी प्रोफाईल' भरलं तसंच अनुवांशिक विश्लेषणासाठी लाळेचे नमुनेही दिले. डेटाद्वारे केलेल्या विश्लेषणाच्या आधारे अंतर्मुख आणि बहिर्मुख सहभागी व्यक्तींची मेंदूची क्रिया वेगवेगळी कशी असते हे समोर आलं.

जेव्हा ते जुगार खेळत होते त्यावेळी मेंदूच्या दोन महत्त्वाच्या भागांमध्ये अधिक बहिर्मुख असलेल्या गटानं अधिक मजबूत प्रतिसाद दिला.

हे दोन भाग म्हणजे अॅमिगडिला आणि न्यूक्लिअस अॅक्युम्बेन्स. अॅमिगडिला भावनिक उत्तेजनांवर प्रक्रिया करण्यासाठी ओळखलं जातं. तर न्यूक्लिअस अॅक्युम्बेन्स हा मेंदूच्या रिवार्ड सर्किटरीचा महत्त्वाचा भाग आहे. तसंच डोपामाईन यंत्रणेचाही भाग आहे.

या चाचणीच्या तथ्यांवरून हे स्पष्ट झालं की, बहिर्मुख लोक हे काहीसा आश्चर्यकारक प्रतिसाद देत असतात.

कोहेन यांच्या शास्त्रज्ञांनी जेव्हा सहभागी स्वयंसेवकांच्या अनुवांशिक प्रोफाईल पाहिल्या तेव्हा त्यांना मेंदूच्या रिवार्ड प्रणालीच्या कामाच्या बाबतीत आणखी एक फरक आढळून आला.

ज्या स्वयंसेवकांची जनुके डोपामाईन प्रणालीची प्रतिसादक्षमता वाढवण्यासाठी ज्ञात होते त्यांच्यामध्ये जुगारात जिंकल्यानंतर उत्तेजकतेमध्ये वाढ झाली होती.

मेंदूचा भिन्न प्रतिसाद

तर आपण सगळे अशाप्रकारे भिन्न का आहोत? या कोड्याचा एक भाग आपण पाहुयात.

जेव्हा जुगारात यश मिळतं तेव्हा बहिर्मुख असलेल्यांचा मेंदू अधिक जोरकसपणे प्रतिसाद देतो. त्यामुळं साहजिकच त्यांना साहसी खेळ किंवा लोकांना भेटणं, कार्यक्रमांत सहभागी होणं अधिक आवडत असणार.

या फरकाचा एक भाग अनुवांशिक आहे. त्याचा परिणाम म्हणजे, आपली जनुकं आपल्या आपल्या मेंदूला आकार देतात आणि त्याचा विकास करतात. दुसऱ्या निकषांवरून स्पष्ट होतं की, डोपामाईन कार्यप्रणालीची यात महत्त्वाची भूमिका असते.

उदाहरणार्थ- जी जनुकं डोपामाईनवर नियंत्रण ठेवतात ती लोक किती आनंद घेतील याचा अंदाज वर्तवत असतात. इतर तथ्यांवरुन असं लक्षात येतं की, बहिर्मुख लोकांच्या शिकण्यात कसा फरक असतो. त्यांच्या प्रतिक्रियाशील डोपामाईन प्रणालीमुळं त्यांची संवेदनशीलताही उच्च पातळीवर असते.

आपला मेंदू ज्याप्रकारे प्रतिक्रिया देत असतो त्यानुसार आपले प्राधान्यक्रम ठरत असतात. कदाचित हे थोडं जैविक मानसशास्त्र आपल्या सर्वांना मदत करू शकतं, मग ते अंतर्मुख असो की बहिर्मुख. इतरांना आपल्यातील वेगळ्या गोष्टी का आवडू शकतात याची परवानगी देऊन ही मदत करता येईल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)