MPSC निकाल: सातत्य, चिकाटी, आणि प्रश्नपत्रिकांचं अवलोकन, MPSC चे टॉपर्स सांगतायेत त्यांच्या यशाचं रहस्य

    • Author, रोहन नामजोशी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

“मला जे यश मिळालं आहे त्याने झालेला आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. मी सातारा जिल्ह्यातली आहे. मी कॉम्प्युटर इंजिनिअर असून 2015 पासून मी या परीक्षांची तयारी करते आहे. सध्या सहायक निबंधक म्हणून काम करते आहे. आता मी उपजिल्हाधिकारी होणार आहे. हा प्रवास मोठा होता पण खूप समृद्ध करणारा होता.”

एमपीएससीच्या परीक्षेत महाराष्ट्रातून पहिल्या आलेल्या पूजा वंजारी यांनी या शब्दात बीबीसी मराठीकडे भावना व्यक्त केल्या.

पूजा यांनी मह्तप्रयत्नानंतर हे यश मिळवले आहे. त्यांचे वडील शेतकरी आहेत. त्यांनी कायमच शिक्षणाला पाठिंबा दिला आहे.

लग्न ठरल्यावर काही मुलीचं अधिकारी होण्याचं स्वप्न भंगतं. मात्र पूजा यांच्या सासर आणि माहेरच्यांनी त्यांना सतत प्रोत्साहन दिलं.

कोरोनाच्या काळात परीक्षा पुढे गेल्याने लग्नाची तारीख पुढे ढकलली गेली. मात्र तरीही 2021 मध्ये त्यांच्या लग्नाची आणि प्रिलिमची तारीख एकच आली. त्या वर्षीची परीक्षा त्यांना देता आली नाही. तरीही त्यांनी प्रयत्न सोडले नाही.

या काळात लग्नापेक्षा परीक्षेला सासरच्यांनी आणि माहेरच्यांनी दिल्याचं पूजा आवर्जून सांगतात.

सातत्य आणि चिकाटी ही त्यांची यशाची गुरुकिल्ली असल्याचं त्या सांगतात. “माझी बहीणही एमपीएससीतून अधिकारी आहे. माझा एक चुलत भाऊसुद्धा अधिकारी आहे. त्यामुळे माझ्या घरात शिक्षणाचं आणि एकूणच परीक्षांचं वातावरण होतं. मी फक्त एक वर्षं पुण्याला होते. त्यानंतर मी अभ्यास घरीच केला. लग्नानंतरही माझ्या नवऱ्याने मला माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला. त्यामुळे हे यश माझ्या एकटीची नाही.”

मुलाखत हा या परीक्षेतील महत्त्वाचा टप्पा असतो. मात्र कितीही तयारी केली तर मुलाखत चांगली झाली नाही असंच वाटत राहतं असं पूजा सांगतात. आता त्या उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत होतील.

प्रश्नपत्रिकेचं अवलोकन महत्त्वाचं

याच परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कुणाल उमप यांनी प्रश्नपत्रिकेच्या अवलोकनाचं महत्त्व बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

कुणालही इंजिनिअर असून त्यांच्या घरात अनेक अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांनीही या वाटेवर जाण्याचं ठरवलं.

2016 पासून त्यांचा हा प्रवास सुरू आहे. अनेकदा अपयश आलं तरी त्यांनी जिद्द सोडली नाही. बॅक अप म्हणून त्यांनी इंजिनिअरिंग केलं खरं मात्र त्यांचा खरा रस अधिकारी होण्यातच होता.

“मला पोलीस सेवेत जायची फार इच्छा होती. त्याला सहाय्यभूत ठरावं म्हणून नुकतीच लॉ ची पदवीही घेतली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलात माझा प्रिलिम मेन्सचा स्कोर चांगला असूनसुद्धा शारीरिक चाचणीत गडबड झाल्याने माझा नंबर थोडक्यात हुकला. ते अपयश माझ्या मनाला खूप लागलं. तरीही मी धीर सोडला नाही.”

“इतक्या वर्षाच्या प्रवासात माझ्या परीक्षेच्या स्कोरमध्ये सुधारणा होत गेली त्यामुळे हा प्रवास सुरू ठेवला. सुरुवातीला मी प्रश्नपत्रिकांकडे फारसं लक्ष दिलं नाही. नंतर मला त्याचं महत्त्व कळलं.

संपूर्ण परीक्षा वस्तूनिष्ठ असल्याने प्रश्नपत्रिकांचं अवलोकन अतिशय महत्त्वाचं आहे. मुलाखतीसाठी मी प्रश्न काढून ठेवले होते. चालू घडामोडींवर सतत लक्ष ठेवलं.” कुणाल सांगत होते.

‘घरून अभ्यास केल्यावरही यश’

माण तालुक्यातल्या सोनल सूर्यवंशी यांनीही या परीक्षेत यश मिळवलं आहे. 2020 पासून त्या या परीक्षेची तयारी करत होत्या. त्यांचं शिक्षण नवोदय विद्यालयातून झालं आहे.

शिक्षणाच्या निमित्ताने त्या बराच काळ घराबाहेर होत्या. मात्र त्यांनी तयारीला सुरुवात केली आणि कोव्हिडची लाट आली.

त्यामुळे त्यांना घरी परत यावं लागलं. त्यामुळे घरून अभ्यास करणं जास्त आव्हानात्मक होतं असं त्या बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या.

“2019 मध्ये इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मी लगेच परीक्षांची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात मी मुलाखतीपर्यंत पोहोचली. सहा मार्कांनी माझं पद हुकलं. त्या अपयशातून मी धडा घेतला आणि आणखी जोमाने कामाला लागले.

मला वाटतं की मुख्य परीक्षेत प्रश्नपत्रिका सोडवणं आणि उजळणी अतिशय महत्त्वाची आहे. मी गटविकास अधिकारी पदावर असल्याने आणि ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असल्याने मला मुलाखतीतही ते प्रश्न विचारले गेले. त्याचाही मला फायदा झाला,” त्या सांगत होत्या.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2022 साली घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी काल (18 जानेवारी) जाहीर केली. मुलांमधून विनायक पाटील यांनी तर मुलींमधून पूजा वंजारी यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

23 संवर्गातील 613 पदांसाठी ही जाहिरात घेण्यात आली होती. आतापर्यंतची ही सर्वाधिक मोठी भरती होती. या यादीत एकूण 1830 उमेदवारांचा समावेश आहे. ही यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)