इंग्लंडहून परतलेल्या उच्चशिक्षित दांपत्याला 14 कोटींचा गंडा घालणाऱ्या तिघांना अटक; काय घडलं?

फोटो स्रोत, Adv. Vijay Thombare
- Author, शताली शेडमाके
- Role, बीबीसी मराठी
- Author, प्राची कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठीसाठी
पुण्यातील एक उच्चशिक्षित आणि इंग्लंडहून परतलेले दांपत्य भोंदूबाबाच्या नादी लागले. त्यामुळे त्यांना तब्बल 14 कोटींचे नुकसान सोसावे लागले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तीन आरोपींना नाशिक येथून अटक करण्यात आली आहे.
हे प्रकरण राज्यभर चांगलंच गाजलं. संबंधित दांपत्याच्या मुली या आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार करुन त्यांना बरे करुन देतो असे सांगून त्यांना लुबाडण्यात आले. तसेच मानसिक त्रास देखील सहन करावा लागला.
इंग्लंडमध्ये 12 वर्ष राहिलेलं आणि आयटी क्षेत्रात उच्च पदावर काम केलेलं हे दांपत्य आपल्या दोन विकलांग मुलींच्या उपचारासाठी 'माऊली' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेदिका पंढरपूरकर आणि भोंदूबाबा दीपक खडकेच्या नादी लागलं.
अंगात एक महाराज संचारतात असा दावा करत वेदिका पंढरपूरकरने मुलींचे आजार बरे करण्याचं आश्वासन दिले आणि त्यासाठी तब्बल 14 कोटी रुपये उकळले.
याप्रकरणी भोंदूबाबा दीपक खडके, मांत्रिक वेदिका पंढरपूरकर, तिचा पती कुणाल पंढरपूरकर, तिची आई आणि भाऊ अशा पाच जाणांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'आयुष्यभराची कमाई गेली'
पीडित कुटुंबीयांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, एका भजनी मंडळात या दांपत्याची कुटुंबीय आणि मांत्रिक दीपक खडके यांची ओळख झाली. खडके याने कुटुंबाची ओळख वेदिका पंढरपूरकरशी करून दिली. मुलींचे आजारपण आपण कायमचे दूर करू शकतो असा विश्वास त्यांनी संबंधित कुटुंबीयांना दिला.

फोटो स्रोत, Adv. Vijay Thombre
'माझ्या अंगात एक महाराज संचारतात त्यामुळे मी मुलींचा आजार बरा करू शकते,' असे वेदिका पंढरपूरकरने सांगितले.
उपचारासाठी पैसे लागतील असे कळल्यानंतर हे पैसे उभे करण्यासाठी पीडित कुटुंबीयांना आपली सर्व मालमत्ता विकावी लागली. इंग्लंडमध्ये असलेले घर देखील त्यांना विकावे लागले. यातून त्यांनी पैसे उभे केले. ते पंढरपूरकर आणि खडकेंनी दैवी चमत्काराच्या नावावर दांपत्याकडून उकळले.
'आरोपींनी विकत घेतला बंगला'
संबंधित कुटुंबीयांचे यांचे वकील अॅड. विजय ठोंबरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, इंग्लंडमधील आयटी कंपनीत उच्च पदावर काम करणारे एक आयटी इंजिनिअर आणि त्यांच्या पत्नी या दोघांनी 2018 मध्ये आपल्या दोन विकलांग मुलींच्या संगोपनासाठी भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
या दांपत्याकडून मिळालेली रक्कम वेदिकाने स्वतःच्या खात्यात वळवून घेतली आणि कोथरूडमधील एका सोसायटीत आलिशान बंगला खरेदी केला.

फोटो स्रोत, Getty Images
मांत्रिकांवर विश्वास ठेवून या दांपत्याने एकेक करून सर्व मालमत्ता त्यांच्या खात्यात वर्ग केली आणि आपलं सर्वस्व गमावलं.
- पहिल्यांदा बँक खात्यातील रक्कम, एलआयसी, म्युच्युअल फंड, प्रॉव्हिडंट फंडमधील पैसे वेदिकाच्या खात्यावर वळवले.
- नंतर इंग्लंडमधील घर आणि फार्महाऊस विकून मिळालेली रक्कमही तिच्या ताब्यात घेतली.
- त्यानंतर पुण्यातील फ्लॅट्स, गावाकडचं घर आणि शेतजमीन विकून ते पैसे कुटुंबाने मांत्रिकांच्या नावावर केले.
- शेवटी राहत्या घरावर लोन घेऊन या कुटुंबाने ते पैसे मांत्रिकांना दिले.
या कुटुंबीयांनी RTGS द्वारे केलेल्या सर्व व्यवहारांचे पुरावे पोलिसांकडे दिले आहेत. आज हे दांपत्य आपल्या दोन मुलींसह भाड्याच्या घरात राहते आणि उपचारासाठी पैशांचीही गरज आहे, असे कुटुंबीयांच्या वकिलांनी सांगितले.

फोटो स्रोत, Adv. Vijay Thombre
"मुलींवरील प्रेमापोटी आम्ही विश्वास ठेवला, पण ज्यांना माऊली म्हटलं त्यांनीच घात केला," असं पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे.
अॅड. ठोंबरे पुढे म्हणाले, "मुलींचा दुर्धर आजार कायमचा बरा करण्याच्या नावाखाली भोंदूबाबा दीपक खडके, मांत्रिक वेदिका पंढरपूरकर आणि तिचा पती कुणाल, तिची आई आणि भाऊ अशा चार-पाच जणांनी मिळून माझ्या पक्षकाराची तब्बल 14 कोटींनी फसवणूक केली आहे. इतकं करुनही मुलींच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याचं लक्षात आल्याने अखेर माझ्या पक्षकारांनी पोलिसांत धाव घेतली.
"3 नोव्हेंबरला माझ्या पक्षकारांनी तक्रार दाखल केली, सध्या पोलीस तपास सुरू आहे. मात्र, त्यानंतर मांत्रिक महिलेच्या काही भक्तांकडून संबंधित कुटुंबीयांनी तक्रार मागे घेण्याबाबत धमकावलं जात आहे. या दांपत्याच्या दोन्ही मुलींना उपचाराची गरज असून सदर रक्कम त्यांना परत मिळणं खूप महत्त्वाचं आहे. आम्ही याप्रकरणी न्यायालयात दाद मागणार आहोत," असे ठोंबरे यांनी सांगितले.
'आगतिकता माणसाला अनेकवेळा अंधश्रद्धेकडे ढकलते'
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर याविषयी बोलताना म्हणाले, "या प्रकरणातील आरोपीला तत्काळ अटक होणं आवश्यक आहे. दैवी शक्तीचा दावा करुन ही फसवणूक करण्यात आली आहे त्यामुळे, आरोपींवर जादूटोणा विरोधी कायदा लावणंही आवश्यक आहे. जादुटोणा विरोधी कायद्यांतर्गत दक्षता अधिकारी म्हणून तरतूद आहे, जिथे प्रत्येक पोलीस ठाण्याचा पीआय सुद्धा अशा गोष्टींची दखल घेऊ शकतो. त्या-त्या भागातील भोंदूबाबांची, बुवांची चौकशी करु शकतो."
पुढे ते म्हणाले, "पुण्यासारख्या शहरात असे राजरोसपणे दरबार भरवून लोकांना फसवलं जातंय. यावरुन पोलीस ठाण्यात दक्षता अधिकाऱ्यांची यंत्रणा योग्यरीत्या कार्यरत न झाल्याचं दिसून येतं. ही यंत्रणा कार्यरत होणं, शासनानं त्याची योग्यरित्या जाहीरात करणं आवश्यक आहे."
"तिसरं म्हणजे, सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येण्याचा भाग झाल्या आहेत. त्यांना शिक्षणामध्ये चिकित्सा करायला शिकवलं जात नाहीये. दैनंदिन जीवनातील समृद्धी, तंत्रज्ञान वापरणं, उत्पन्न मिळवणं हे काय ते आहे. परंतु, चिकित्सक वृत्तीनं प्रश्न विचारण्याचा भाग गहाळ असतो. अशावेळेस शिक्षणातून अशा प्रकारांबाबत जागरुकतेविषयीचं महत्त्व पटवून देण्याची गरज आहे," असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, CNR / Nitin Nagarkar
हे सामाजिक स्वरुपाचे गुन्हे आहेत, त्यामुळे अशा गोष्टींना बळी न पडणं, आणि त्याच्यासाठीची मानसिकता तयार करणं हे अत्यंत महत्वाचं असल्याचं मत हमीद दाभोलकरांनी व्यक्त केलं.
तर, अंनिसच्या सदस्य आणि अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या सहसंपादक अॅड. मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, "आगतिकता माणसाला अनेकवेळा अंधश्रद्धेकडे ढकलते. बरेचदा आपली फसवणूक झालीय, हे त्यांना मधल्या टप्प्यावर समजतं. असे प्रकार घडत असताना आपण फसवले जातोय का, अशी जाणीव होताच मदत मिळवणं गरजेचं आहे."
"दुसरं म्हणजे राज्यात जादूटोणा विरोधी कायदा आहे, तरीही असे प्रकार घडतात. असे बाबाबुवा आपल्या आजूबाजूला असल्याचं सहज दृष्टीस पडतं, तरीही असे प्रकार हे का थांबवले जात नाहीत? गुन्हा घडल्यावरचं अंमलबजावणी होते, पण उघड-उघड लोकांचं शोषण होत असल्याचं दिसूनही पोलीस ठाण्यातील दक्षता अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात असल्याचं दिसत नाही.
"कायदा होऊन 12 वर्ष होऊन गेली आहेत, परंतु त्यासंदर्भातील नियम अजूनही तयार करण्यात आलेले नाहीत. शासनाने त्याबाबतीतले नियम त्वरित तयार करणं आवश्यक आहे," असे मुक्ता दाभोलकरांनी म्हटले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











