सेरेब्रल पाल्सी: शरीराची हालचाल करता येत नसूनही गरिबांच्या मुलांसाठी घेतात शिकवणी

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

“प्रत्येक व्यक्ती आपलं असं एकच आयुष्य जगते, पण मी माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यासोबत प्रत्येक विद्यार्थ्याचं आयुष्य जगतेय.”

प्राजक्ता ऋषीपाठक यांचा आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन या वाक्यातून दिसून येतो.

प्राजक्ता यांना जन्मत:च सेरेब्रल पाल्सी हा आजार आहे. हा आजार असलेल्या व्यक्तीच्या शरीरातले स्नायू कमकुवत असल्याने शरीराची हालचाल करण्यावर परिणाम होतो.

प्राजक्ता या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतात. 2010 पर्यंत त्यांना रांगता येत होतं. पण त्यानंतर त्यांच्या शरीराची हालचाल जवळपास थांबली.

बी.ए. पर्यंत शिक्षण झालेल्या प्राजक्ता यांनी 2010 सालापासून घरगुती शिकवणी घ्यायला सुरुवात केली.

बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, “माझी आई खाली ओट्यावर बसून भाजी निवडत होती. तितक्यात 2 मुली ट्यूशन शोधत आल्या. आईनं विचारलं की तुम्ही कुठं चालल्या? तर त्या म्हणाल्या की, आम्ही ट्यूशन शोधायला चाललो. तेव्हा आई म्हणाली की, माझी मुलगी वरती असते. तिला विचारा ती तुम्हाला शिकवते का ते?”

दोन मुलींपासून सुरू झालेला हा प्रवास आतापर्यंत 30 विद्यार्थ्यांपर्यंत आला आहे. प्राजक्ता यांच्याकडे शिकवणीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक हे आर्थिक परिस्थिती कमकुवत असणारे आहेत.

यापैकी बहुतेक जणांचे वडील मजुरी, तर आई धुणी-भांडी करते. प्राजक्ता या मुलांना त्यांच्या वेळेनुसार शिकवतात आणि त्यांच्या ऐपतीनुसार त्यांच्याकडून फी घेतात.

प्राजक्ता सांगतात, “माझी फी पहिली ते चौथीसाठी 200 रुपये आहे. पाचवी ते नववीसाठी 300 ते 400 रुपये. पण, त्यांना 400 रुपये देणे शक्य नसल्यास आणि त्या कारणानं मुलं ट्यूशन बंद करत असल्यास 300 रुपये घेते. नववीची 500 रुपये, तर दहावीची फी 600 रुपये घेते.”

शिकवणीसाठी येणारे विद्यार्थी आणि प्राजक्ता मॅडम यांच्यातील नातं घट्ट झालंय. मुलंच प्राजक्ता यांचा बेड त्यांना हवा तसा खाली-वर करुन देतात. प्यायला पाणी घेऊन येतात.

मी आता 30 जणांची बहीण असल्याचं प्राजक्ता सांगतात.

विद्यार्थ्यांशी असलेल्या नात्याविषयी बोलताना त्या म्हणतात, “माझ्या आईची दोनदा शूगर लो झाली होती. ती जवळपास बेशुद्ध पडली होती. माझ्या विद्यार्थ्याला मी फोन केल्यावर त्यांनी अजून विद्यार्थी गोळा केले. एक विद्यार्थी वर चढून आला. माझ्या आईला या विद्यार्थ्यांनी रिक्षामध्ये घातलं. यावरुन विद्यार्थी माझी किती मदत करतात हे तुम्ही समजू शकता.”

प्राजक्ता यांनी त्यांचं पुढचं शिक्षण चालू ठेवलं आहे. यासाठी विद्यार्थ्यांकडूनच प्रेरणा मिळत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

प्राजक्ता सध्या ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत आहेत. त्या जळगावच्या ज्योतिष केंद्रामधून शिक्षण घेत आहेत.

ज्योतिषशास्त्रातील प्रवीण, विशारद आणि भास्कर परीक्षाही उत्तीर्ण झाल्याचं त्या सांगतात.

प्राजक्ता त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाचं संपूर्ण श्रेय आई-वडिलांना देतात. त्या अपंग असूनही पालकांनी त्यांना शिकवलं याचं त्यांना कौतुक वाटतं. 2011 साली प्राजक्ता यांच्या वडिलांचं निधन झालं.

प्राजक्ता सांगतात, “आजकाल आपण कितीही म्हटलं की मुलगा आणि मुलगी समान आहे. तर तसं मुलगा आणि मुलगी अजून पण समान नाहीये. आजही मुलीला शिकवायचा विचार आला की, लोक विचार करतात की मुलाला शिकवायचं की मुलीला? त्यात मी अपंग असतानाही आणि मुलगी असतानाही मला पालकांनी शिकवलं हे खरंच खूप महान काम आहे.”

प्राजक्ता यांच्या आई विजया ऋषीपाठक यांनी वयाची साठी ओलांडलीय. प्राजक्ता यांची चांगली काळजी घेता यावी म्हणून ‘सेकंड चान्स’ घेतला नसल्याचं त्या सांगतात.

विजया सांगतात, “ट्यूशन घ्यायला लागल्यापासून माझं तिचं नातं फक्त जेवायला देण्यापुरतं. कारण तिला माझ्याकडे काही मागायला, बोलायला, भांडायला वेळच मिळत नाही. ती तिच्या तिच्या कामामध्ये व्यस्त असते. प्लस ती शिक्षण पण घेते.”

विजया यांना त्यांच्या 'प्राजू'चा खूप अभिमान वाटतो. याही परिस्थितीत प्राजक्ता आपल्याकडे एक रुपयाही मागत नाही, असं त्या सांगतात.

“तिच उलट माझी 4 बिलं भरते. ट्यूशनमधून थोडेफार पैसे मिळतात. आम्हाला काही पेन्शन नाहीये.”

अभिनेत्री माधुरी दीक्षितचं नाव घेताच प्राजक्ता यांचा चेहरा चांगलाच खुलतो. त्यांना माधुरीला भेटण्याची इच्छा आहे.

“माधुरी दीक्षितला असं स्पर्श करुन भेटायचं आहे. व्हीडिओ कॉलवर नाही भेटायचं. तिला भेटायची फार म्हणजे इतकी इच्छा आहे की, ती मी शब्दामध्ये व्यक्तच करू शकत नाही. तिचं नाव घेतलं तरी मला इतका आनंद होतो की तिला भेटल्यावर काय सांगू मी तुम्हाला आता,” प्राजक्ता सांगतात.

शिकवणीसाठी येणारे विद्यार्थी प्राजक्ता मॅडमच्या भोवती गोळा होऊन माधुरीचं गाणं गातात, तेव्हा प्राजक्ता यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा असतो.

वाचनानं वैचारिक क्षमता सुधारते, त्यामुळे पुस्तकं हेच आपले खरे मित्र असल्याचं प्राजक्ता यांचं मत आहे. एखाद्या आजारानं ग्रस्त असलेल्या व्यक्तींना 3 गोष्टी करायला त्या आवर्जून सांगतात.

“त्या व्यक्तीनं प्रथम आपलं वाचन वाढवलं पाहिजे. मानसशास्त्राचा अभ्यास करायला पाहिजे आणि नकारात्मक विचार सोडून सकारात्मक दृष्टिकोनातून बघणं शिकायला पाहिजे.”

आपल्या विद्यार्थ्यांनी त्यांची त्यांची स्वप्नं पूर्ण करावीत, ही प्राजक्ता यांची इच्छा आहे. तर, केवळ अपंग आहे म्हणून समाजानं आमच्याकडे संशयाच्या नजरेनं का पाहावं? असा त्यांचा सवालही आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)