शंकरबाबा पापळकर यांचे 'वझ्झर मॉडेल' काय आहे? ज्यासाठी मिळालं त्यांना पद्मश्री

“एकदा हॉस्पिटल मध्ये बेवारस प्रेत आलं होत. त्याला कुणी घ्यायला तयार नव्हत. बेवारस मृतदेहांसाठी महाराष्ट्र शासनाच धोरण आहे. मृतदेहाला पोलीस उचलतात आणि त्याच्यावर बेवारस लिहितात आणि टाकून देतात” या घटनेमुळे शंकर बाबा पापळकर यांनी अनाथांसाठी काम करण्याचा निर्णय घेतल्याचं ते सांगतात.

एसटी स्टॅंड, रुग्णालय अशा ठिकाणी जर कुणी 'बेवारस' बालक सापडलं तर त्या बालकाचं एक हक्काचं घर आहे ही जाणीव परतवाड्यातील शेकडो जणांच्या मनात रूजली आहे.

या मुलांना शंकरबाबांच्या अनाथाश्रमात नक्की जागा मिळेल याची कल्पना असल्यामुळेच जर समजा कुणी असं अनाथ बालक सापडलं तर ते वझ्झर आश्रमात आणलं जातं.

तिथे शंकरबाबा त्या मुलांची जीव लावून देखभाल करतात, त्यांचं संगोपन करतात. इतकंच नाही तर या मुलांना आपले नाव देखील देतात. याच शंकरबाबांना 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.

अमरावतीच्या जिल्ह्यातील परतवाडा इथे मूकबधिर, दिव्यांग आणि रस्त्यावर बेवारस पडलेल्या मुलांना पितृछत्र देणाऱ्या शंकर बाबा पापळकर यांच 'वझ्झर' आश्रम आहे.

संत श्री गाडगेबाबा यांच्या विचारांचा वारसा घेऊन शंकरबाबांनी जनसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीदवाक्य आयुष्यभर कसोशीने पाळलं. त्यांच्या याच कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे.

वझ्झर मॉडेल म्हणजे काय?

शंकरबाबा पापळकर यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1942 ला अमरावती जिल्ह्यातील परतवड्यात झाला ते धोब्याचा व्यवसाय करायचे. कालांतराने त्यांनी पत्रकारितेचाचा वसा घेतला. मात्र रस्त्यावरचे अनाथ, अपंग गतिमंद व दिव्यांग यांच्या वेदना त्यांना स्वस्थ बसू देत नव्हत्या.

त्यामुळं त्यांनी अशा वंचित घटकांसाठी संगोपन आणि पुनरुत्थानासाठी आपलं संपूर्ण जीवन व्यतित करण्याचं ठरवलं.

90 च्या दशकात त्यांनी वझ्झर या गावात आश्रमाची स्थापना केली. याठिकाणी अपंग, बेवारस, गतिमंद आणि अपंग मुलांचा सांभाळ करून भारतात एक रोल मॉडल तयार केलं.

याबाबत बोलताना ते म्हणतात की, "सुरवात झाल्यानंतर 200 मूल आश्रमात होती. शासकीय कुठलाही अनुदान न घेता हे आश्रम सुरू आहे. शासनाने त्यांना अनुदानित तत्वावरची मान्यता देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण आम्ही तो नाकारला होता. समाजाकडून जे दान मिळत त्यातुन आश्रमाचा कारभार चालतो. सोबतच शेगाव संस्थान, अंबादास पंथ बालगृहाचे संचालक प्रभाकर वैद्य यांच्याकडून मदत मिळत असते”

अनुदान न घेता, कुठलाही ग्रांट न घेता काम करायचं. या मुलांना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने कार्य करायचं. या मुलांना शंकरबाबांचे नाव द्यायचे, हे या मॉडेलचे प्रारूप असल्याचं शंकरबाबा सांगतात. हे मॉडेल आपण सरकारला देखील सादर केले आहे त्यावरुन अनेक जण काम करत असल्याचं शंकरबाबांनी माध्यमांना सांगितलं आहे.

आश्रमातल्या 30 मूकबधिर- गतिमंद मुलामुलींचे लग्न शंकर बाबांनी लाऊन दिले. तर 12 जण शासकीय सेवेत असून त्यांना जगण्याचा अधिकार मिळाला आहे.

शंकरबाबांनी या परिसरात मुलांच्या साहाय्याने वनराई फुलवली आहे. ही मुलंच या झाडांची देखभाल करतात.

या आश्रमात काही मुलं अशी आहेत की, ज्यांना अन्न आणि माती यातील फरक समजत नाही. काही मानसिकदृष्ट्या विकलांग, काहींना शारीरिक व्याधी आहेत तर काही कायमचे अंधारयात्री आहेत.

वझ्झर या आश्रमात 200 मुलं मुली होते. त्यातील 30 अनाथ मुलींची लग्न शंकर बाबांनी लावून दिली. तसेच 12 मुलांना शासकीय निकारी मिळवून दिली.

सध्या या आश्रमात 123 मुलं मुली आहेत. या सगळ्याना शंकरबाबांनी आपले नाव दिले, रहिवाशी दाखला दिला, जनधन योजनेचा लाभ दिला, त्यांची आजीवन काळजी घेण्याचा वसा त्यांनी घेतला.

शंकरबाबा यांच्याकडे घर नाही, ते या मुलांसोबत वझ्झर इथेच राहतात. तर मरेपर्यंत याच ठिकाणी ते राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

गाडगे बाबांच्या मार्गावर चालत हे काम उभं राहिलं

संत गाडगे बाबा यांच्या आदर्श स्थानी ठेऊन शंकरबाबांनी समाज कार्याची सुरुवात केली. गाडगे बाबांच्या कीर्तनातील विचारांचा मोठा प्रभाव त्यांच्या आयुष्यात झाला.

अगदी लहान असतांना 1954 बहिरम च्या यात्रेत शंकर बाबानी संत गाडगे बाबाना पाहिले. “आमच्या आईला संत गाडगे बाबा मुलगी मानायचे. आमची आई निरंतर गाडगे बाबांच्या भेटीला आवर्जून आम्हाला घेऊन जायची.

“माझी आणि गाडगे बाबांची अखेरची भेट 1956 ला अमरावतीच्या इर्विन हॉस्प्टील मध्ये झाली. त्यावेळी ते आजारी होते. त्यांनी मला पाहिल आणि घोंगडी, काडी दिली” शंकर बाबा सांगत होते.

गाडगे बाबांच्या मार्गावर चालत त्यांनी आश्रम परिसरात स्वछतेचा मूलमंत्र अमलात आणला. झाडे लावण्याचा उपक्रमही यातूनच पुढे आला. आश्रम परिसरात 15 हजार झाडे लाऊन त्याला जागवण्याच कार्य दिव्यांग, बेवारस मुलांच्या माध्यमातून सुरु असते.

पण अनाथ, बेवारस, दिव्यांग मुलांचा प्रश्न बिकट आहे. ते सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याच बाबाना वाटतं.

'दिव्यांगांना शिक्षण देत आहेत, पण पुनर्वसन किती जणांचं?'

ते म्हणतात “दिव्यांगाना शिक्षण देत आहेत. पण किती दिव्यांगांच पुनर्वसन होत, किती जणांना नोकरी लागते याची आकडेवारी सरकाकडे नाहीये”.

बेवारस आणि दिव्यांगांचे पुनर्वसन कसं होईल याकडे बाबांनी लक्ष दिले. पण कायद्यात 18 वर्षावरील मुलांना रिमांड मधून काढून टाकतात. यावर ठोस कायदा व्यायला पाहिजे असं त्यांना वाटतं. त्यांच्या आश्रमात वयाच्या 18 वर्षानंतरही मूल राहतात.

18 वर्षांनंतरच्या मुलांना मरेपर्यंत रिमांडला राहू द्या. त्यांचं संपूर्ण संवरक्षण 'वझ्झर' मॉडल प्रमाणे करा. आणि त्यांचं पुनर्सन फक्त पंतप्रधान मोदीच करू शकतात, असा त्यांना विश्वास आहे.

पद्मश्री स्वीकारणार असल्याचं शंकरबाबांनी स्पष्ट केलं आहे.

मला गृहमंत्रालयाने विचारलं की तुम्ही पुरस्कार स्वीकारणार का, तर मी त्यांना माझ्याकडून होकार कळवला आहे असं शंकरबाबांनी म्हटलं.

शंकरबाबा सांगतात की 18 वर्षं झाल्यानंतर ही मुलं कुठे जातील याची मला फार काळजी वाटते.

यापूर्वी त्यांना संत गाडगे बाबांच्या नावानं असणाऱ्या विद्यापीठाची डि.लीट स्वीकारली होती. शंकर बाबा पापळकर यांना हा पुरस्कार मिळाल्याने विविध क्षेत्रातून त्यांच्या अभिनंदन केलं जात आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)