डॉ. हिम्मतराव बावस्कर : रुग्णसेवेच्या ध्यासापायी वडिलांच्या अंत्यसंस्काराला न जाणारं 'बॅरिस्टरचं कार्टं'

    • Author, रोहन नामजोशी
    • Role, बीबीसी मराठी

विंचूदंश हा कोकणातला नेहमीचा तरीही भीतीदायक प्रकार. या विंचवाच्या दंशामुळे अनेकांनी जीव गमावले होते. कोकणवासियांनी विंचवाच्या नांगीसमोर नांगी टाकल्याची अवस्था होती.

हिम्मतराव बावस्कर नावाच्या एका डॉक्टरांनी ही परिस्थिती बदलली. विंचूदंशाचं औषध शोधलं आणि ही समस्या कायमची सुटली. त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करत त्यांना 'पद्मश्री' पुरस्कार सरकारने दिला आहे. त्यांच्या कार्याविषयी आणि त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घेऊया.

हिंमतराव बावस्कर यांचा जन्म 3 मार्च 1951 ला औरंगाबाद येथील डेहेड गावात झाला. त्यांचे वडील फारसे शिकलेले नसले तरी आपल्या मुलांनी भरपूर शिकावं अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्यांना बॅरिस्टर म्हटलं जाई.

पुढे हिम्मतरावांनी आत्मचरित्र लिहिलं आणि त्याचं नाव 'बॅरिस्टरचं कार्टं' असंच ठेवलं होतं. त्यांचं बालपण खडतर होतं. ते पाच भावंडांमध्ये लहान होते. त्यांच्या शिक्षणाविषयी घरात कोणाला फारशी आस्था नव्हती. मात्र हिम्मतरावांना लहानपणापासूनच शिक्षणाची ओढ होती. त्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले, वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या आणि नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले.

वैद्यकीय महाविद्यालयातला काळही अतिशय खडतर होता. त्यांना न्यूनगंडाने पछाडलं. भरमसाठ अभ्यास, न्यूनगंड, अशा अनेक गोष्टींमुळे त्यांना नैराश्य आलं. ते दुसऱ्या वर्षीची परीक्षा न देताच घरी परतले. आईच्या पाठिंब्याने ते बरे झाले आणि वैद्यकीय क्षेत्रात त्यांना वाटचाल सुरू केली.

वैद्यकीय शिक्षणाच्या काळात डॉ. के. डी. शर्मा यांचा बावस्करांवर खूप प्रभाव असल्याचं ते लिहितात. पॅथॉलॉजी या विषयाची आवड निर्माण झाली. तसंच या काळात त्यांना संशोधनाचं महत्त्व उमगलं. हे संशोधन ग्रामीण भागात, ग्रामीण जनतेसाठी करायचं हे त्यांनी ठरवलं. या निश्चयाचं प्रतिबिंब त्यांच्या कार्यात दिसतं.

वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर त्यांना 1976 मध्ये बिरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरी मिळाली. या केंद्रातली परिस्थिती अतिशय वाईट होती. विंचूदंशाचं प्रमाण तिथे 30 ते 40 टक्के होतं.

लाल रंगाचा विंचू जहाल विषारी असतो. विंचूदंशामुळे रुग्णाचं हृदय कमकुवत होतं. फुप्फुसात पाणी भरतं आणि श्वास घेता येत नाही आणि परिणामी रुग्ण दगावतो.

हे सगळं होत असताना हिम्मतरावांकडे कोणतीही साधनं नव्हती. एक स्टेथेस्कोप आणि रक्तदाब मोजण्याचं मशीन इतक्याच साधनावर त्यांनी रुग्णावर उपचार करायला सुरुवात केली.

विंचूदंशाचे रुग्ण बरं करणं हा वसा त्यांनी घेतला. ते रात्र रात्रभर रुग्णाबरोबर राहत असत. रुग्णाची लक्षणं, आजाराचे प्रकार यावर त्यांचं सतत लक्ष असायचं.

विंचूदंशांवर ते संशोधन करतच राहिले. हिम्मतरावांनी त्यांची निरीक्षणं हाफकिन संस्थेला पाठवली. 1978 ही निरीक्षणं Lancet या जगप्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिकात छापून आली.

या काळात आपलं ज्ञान तितकंसं अद्ययावत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी MD (Medicine) या अभ्यासक्रमासाठी पुण्याच्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथेही त्यांनी आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली. तिथे त्यांनी अनेक गोष्टी नव्याने शिकले.

विंचूदंशांच्या 51 रुग्णांच्या अभ्यासावर त्यांनी एक रिसर्च पेपर लिहिला आणि एका भारतीय वैद्यकीय नियतकालिकाला पाठवला. मात्र त्यातलं इंग्लिश चांगलं नाही म्हणून तो स्वीकारला नाही. तोच पेपर त्यांनी लॅन्सेटला पाठवला. काही बदल करून तो पेपर लॅन्सेटने 1982 मध्ये छापला.

अशा प्रकारे, Diagnostic cardiac premonitory signs and symptoms of red scorpion sting" या नावाने त्यांचं संशोधन प्रसिद्ध झालं.

पहिलं यश आणि वडिलांचं निधन

हिम्मतराव बावस्करांच्या संशोधनाला हवं तसं यश मिळत नव्हतं. अखेर Sodium Nitroprusside नावाचं औषध विंचूदंशावर त्यांनी वापरायचं ठरवलं. 1983 मध्ये आठ वर्षांचा एक मुलगा त्यांच्याकडे आला. या मुलावर त्यांनी हा प्रयोग करण्याचं ठरवलं. त्या मुलाच्या वडिलांनी हे औषध वापरायची परवानगी दिली. एक एक थेंब करत हे औषध बावस्करांनी त्या मुलाला दिलं. चार तासांनी मुलाच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि तो वाचला. हिम्मतरावांच्या आनंदाला पारावर उरला नाही.

मात्र त्याच दिवशी वडील गेल्याची तार आली. आता वडिलांच्या अंत्यसंस्काराला जावं की रुग्णाला पहावं असा पेच त्यांच्यासमोर होता. त्यांनी त्या मुलाजवळ रहायचं ठरवलं.

कदाचित त्यांच्या वडिलांनाही हेच पटलं असतं असं डॉ. बावस्करांना वाटलं. कारण वडिलांवर अंत्यसंस्कार करणारे अनेक होतो पण त्या मुलाची काळजी घेणारे हिम्मतराव एकमेव होते. म्हणून हिम्मतरावांनी हा मार्ग निवडला.

या घटनेनंतर हिम्मतरावांकडे विंचूदंशाच्या रुग्णांची रीघ लागली. त्यांनी एका महिन्यात 65 रुग्ण बरे केले. असं असलं तरी Sodium Nitroprusside हे औषध धोकादायक होतं. रुग्णाची सतत काळजी घ्यावी लागायची आणि त्यांच्याकडे अत्याधुनिक सोयीसुविधा नव्हत्या.

मग त्यांनी आणखी संशोधन करायला सुरुवात केली आणि Prazosin नावाचं औषध द्यायला सुरुवात केली. हे औषध प्रचंड प्रभावी ठरलं आणि त्यामुळे मृत्यूदर 40 टक्क्यावरून एका टक्क्यावर आला.

डॉ. हिम्मतराव बावस्कर त्यांच्या पत्नीबरोबर महाड येथे रुग्णसेवा करतात. डॉक्टरने तीन तास प्रॅक्टिस आणि चार तास वाचन, संशोधन केलं पाहिजे असं मत त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं होतं. त्यांचा हा प्रवास बॅरिस्टरचं कार्ट या आत्मचरित्रात सविस्तर सांगितला आहे.

कोरोना काळात रेमडिसिव्हिर विना उपचार

कोव्हिड काळातही डॉ. बावस्कर आणि त्यांच्या पत्नीने औषधोपचार चालू ठेवले. सुरुवातीच्या काळात लोकांच्या मनात प्रचंड भीती होती. कोरोनाचा पेशंट दरवाज्याबाहेरच ठेवायचा अशी लोकांची धारणा होती. त्यामुळे अनेक लोक भीतीनेच दगावल्याची माहिती हिम्मतरावांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली. या रोगामुळे कोण आपले आणि कोण परके हे कळल्याचंही ते सांगतात.

देशभरात रेमडिसिव्हिरचा तुटवडा असताना या औषधाशिवाय उपचार करण्याची किमया त्यांनी साधली. त्याचीही चर्चा झाली. त्यांचे PubMed या साईटवर 108 शोधप्रबंध प्रकाशित झाले आहेत. गेल्या 40 वर्षांचं कार्य आणि महाडकरांचं प्रेम याची परिणती या पुरस्कारात झाली, अशी प्रतिक्रिया त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)