जम्मू काश्मीरमधील ढगफुटीमुळे 48 जणांचा मृत्यू, आतापर्यंत काय काय माहिती समोर?

जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमधील चाशोटी या भागात ढगफुटी झाली, त्यात 48 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

किश्तवाडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बीबीसी प्रतिनिधी माजिद जहांगीर यांना सांगितले की आतापर्यंत 48 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

किश्तवाड जिल्हा रुग्णालयाचे सीएमओ राजेंद्र कुमार यांनी सांगितले की, आतापर्यंत 35 मृतदेह त्यांच्यापर्यंत पोहचले आहेत. त्यापैकी 11 मृतदेहांची ओळख पटली आहे.

ANI वृत्तसंस्थेनुसार घटनास्थळावर फ्लॅश फ्लड म्हणजेच अचानक आलेल्या पुराची स्थिती निर्माण झाली आहे. ही जागा मचैल माता यात्रेचा स्टार्टिंग पॉइंट आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी ओमर अब्दुल्ला यांच्यासोबत बोलून परिस्थितीचा आढावा घेतला.

एजन्सीने किश्तवाडचे उपायुक्त पंकज शर्मा यांच्याकडून माहिती घेतल्याचे सांगितले आहे.

किश्तवाड जिल्हाधिकारी कार्यालयाने बीबीसी हिंदीला माहिती दिली आहे की किमान 70 जणांना ब्लॉक आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी सांगितले की, किश्तवाडच्या चाशोटी भागात ढगफुटीच्या घटनेत सुमारे 100 लोक जखमी झाले आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले की "जम्मू काश्मीरमधीळ किश्तवाडमध्ये ढगफुटीमुळे अनेक जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त अत्यंत दुःखदायक आहे. मी शोकाकुल परिवारासोबत आहे. बचावकार्य सुरळीतपणे पार पडावे अशी मी आशा करते."

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी किश्तवाडच्या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. गरजूंना आवश्यक ती मदत केली जाईल असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी केले आहे.

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे की त्यांनी किश्तवाड क्षेत्रात झालेल्या घटनेची माहिती गृहमंत्री अमित शाह यांना दिली आहे.

अब्दुल्लाह म्हणाले, ढगफुटीनंतर प्रभावित क्षेत्रातून अधिकृत माहिती येण्यास वेळ लागत आहे. बचावकार्यासाठी सर्व गोष्टींची जुळवाजुळव केली जात आहे.

अमित शाह यांनी म्हटले, किश्तवाडमध्ये झालेल्या ढगफुटीच्या घटनेनंतर त्यांनी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. स्थानिक प्रशासन बचावकार्य करत आहे. NDRF ची टीम घटनास्थळावर पोहचली आहे. आमचे स्थितीवर लक्ष आहे.

हेल्पलाइन नंबर जाहीर

जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री कार्यालयाने मदत कक्ष आणि नियंत्रण कक्ष क्रमांक जारी केले आहेत.

तसेच, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी होणारा 'अॅट होम' हा चहापानाचा कार्यक्रम रद्द केला आहे. याशिवाय, स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सकाळी सांस्कृतिक कार्यक्रम न घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

स्थानिक आमदार सुनील कुमार शर्मा म्हणाले, "मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. यात्रा अजूनही सुरू आहे त्यामुळे तिथे खूप गर्दी होती."

दुसरीकडे, राष्ट्रपती, पंतप्रधान, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, एलजी कार्यालय आणि केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्याकडून अशी विधाने आली आहेत, ज्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे.

बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हांनी ट्विट केले की, किश्तवाडच्या चाशोटी भागात झालेल्या ढगफुटीच्या घटनेमुळे मी दुःखी आहे. पीडित कुटुंबांप्रति माझ्या सहवेदना आहेत. जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो.

सुरक्षा दल, पोलीस, NDRF आणि SDRF हे तत्परतेनी बचावकार्य कार्य करत आहेत. बचावकार्य जलदगतीने व्हावे आणि प्रभावित क्षेत्रांना सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी आदेश देण्यात आले आहेत.

केंद्रीय राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ट्विट केले की, ढगफुटीमुळे गंभीर नुकसान झाल्याची शक्यता आहे. प्रशासन अलर्टवर आहे आणि बचावकार्यासाठी पथकं रवाना झाली आहेत.

पुढे त्यांनी म्हटले, परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे आणि घटनास्थळावर आरोग्य सेवांची व्यवस्था केली जात आहे. आवश्यक ती सर्व मदत केली जाईल.

स्थानिक आमदार सुनील कुमार शर्मा यांनी म्हटले की मोठे नुकसान झाले असल्याची शक्यता आहे. परंतु अद्याप नेमकी संख्या उपलब्ध नाहीये. सध्या तीर्थयात्रा सुरू होती त्यामुळे परिसरात गर्दी होती.

आतापर्यंत काय माहिती हाती आली?

PTI या वृत्तसंस्थेनी एक व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे ज्या पाण्याचा मोठा लोंढा येताना दिसत आहे. जम्मूचे विभागीय आयुक्त रमेश कुमार यांनी ANI ला सांगितले की आज सकाळी ( 14 ऑगस्ट) 11.30 वाजता आम्हाला माहिती मिळाली की किश्तवाडच्या चाशोटी भागात ढगफुटीची घटना घडली आहे. स्थानिक प्रशासन आणि बचावपथके युद्धपातळीवर काम करत आहेत. ते म्हणाले, सर्व मेडिकल टीम सक्रिय करण्यात आल्या आहेत.

केंद्रीय राज्य मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे की अतिरिक्त बचाव पथकांना घटनास्थळावर पोहचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. ते म्हणतात की, रस्ते वाहून गेले आहेत आणि हवामान इतके खराब आहे की हेलिकॉप्टरचा वापर करता येणे शक्य नाही. मी केंद्र सरकारच्या संपर्कात आहे.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी म्हटले, की ते स्थानिक प्रशासनासोबत संयुक्तरीत्या बचावकार्य केले जात आहे.

जितेंद्र सिंह म्हणतात, आम्ही राष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये मीडिया ब्रिफिंग करत होतो, त्याच वेळी मला जम्मू-काश्मीर विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्यांचा (संजय कुमार शर्मा) इमरजन्सी संदेश मिळाला. ते किश्तवाडचे या भागाचे आमदार देखील आहेत.

जितेंद्र सिंह म्हणाले, ते घाबरलेले होते, त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या विभागात ढगफुटीची भीषण घटना घडली आहे. सध्या सुरू असलेल्या मचैल माता यात्रेचा हा मार्गदेखील आहे. या घटनेची व्याप्ती मोठी आहे आणि यात मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)