500 वर्षांपूर्वी एका मुस्लीम व्यक्तीनं शोधली होती अमरनाथची गुहा ?

    • Author, माजिद जहांगीर
    • Role, बीबीसी हिंदीसाठी
    • Reporting from, श्रीनगर

अमरनाथ यात्रा ही जरी हिंदू धर्मातील तीर्थयात्रा असली, तरी या यात्रेशी एक मुस्लीम कुटुंब अनेक पिढ्यांपासून जोडलं गेलेलं आहे.

अमरनाथची गुहा सुमारे 500 वर्षांपूर्वी सापडली होती आणि ती शोधण्याचं श्रेय एका मुस्लीम व्यक्तीला म्हणजे बुटा मलिक यांना दिलं जातं.

बुटा मलिक यांचे वंशज आजही बटकोट नावाच्या ठिकाणी राहतात आणि अमरनाथ यात्रेशी ते थेट जोडलेले आहेत.

याच कुटुंबातील गुलाम हसन मलिक सांगतात की, त्यांनी गुहेबद्दल जे ऐकलं आहे त्यानुसार ही गुहा त्यांचे पूर्वज बुटा मलिक यांनी शोधून काढली होती.

साधूंशी भेट अन् चमत्कार

ते म्हणतात, "हे ऐकायला अगदी पौराणिक कथेसारखं वाटतं. झालं असं की, आमचे पूर्वज बुटा मलिक हे मेंढपाळ होते. ते डोंगरावर मेंढ्या-शेळ्या चरायला घेऊन जायचे. तिथंच त्यांची एका साधूशी भेट झाली आणि त्यांच्यात मैत्री झाली."

मलिक यांच्या म्हणण्यानुसार, "एकदा त्यांना खूप थंडी वाजत होती, म्हणून ते त्या गुहेमध्ये गेले. तिथं थंडीपासून बचावासाठी साधूंनी त्यांना एक कांगडी (थंडीपासून बचावासाठीची टोपली) दिली. पण सकाळी उठून पाहिलं तर ती कांगडी सोन्याची झाली होती."

मलिक सांगतात की, जेव्हा बुटा मलिक गुहेतून बाहेर आले, तेव्हा त्यांना साधूंचा एक मोठा समूह भेटला, जो भगवान शिवाच्या शोधात फिरत होता.

ते सांगतात, "बुटा मलिक यांनी त्या साधूंना सांगितलं की, ते आत्ताच भगवान शिवांची प्रत्यक्ष भेट घेऊन आले आहेत आणि मग त्यांनी त्या साधूंना त्या गुहेकडे नेलं. जेव्हा सर्व साधू गुहेमध्ये पोहोचले, तेव्हा तिथं बर्फाचं एक भव्य शिवलिंग होतं आणि त्याच्यासोबत पार्वती आणि गणेश बसलेले होते. त्यावेळी तिथं अमरकथा सुरू होती."

मलिक सांगतात की, या घटनेनंतर अमरनाथ यात्रा सुरू झाली. मात्र, नंतर अनेक साधू गुहेजवळून उडी मारत प्राण त्याग करू लागले. त्यामुळे महाराजा रणजित सिंह यांच्या काळात ही यात्रा बंद करण्यात आली. मलिक सांगतात की, आमचं कुटुंब मुस्लीम असल्यानं आम्हाला पूजाविधींची माहिती नव्हती.

ते म्हणतात, "आम्हाला तर पूजाविधींची काहीच माहिती नव्हती. म्हणून आम्ही जवळच्या गणेश्वर गावातून पूजा करण्यासाठी काश्मिरी पंडितांना बोलावलं."

अमरनाथमध्ये तीन प्रकारचे लोक राहतात, काश्मिरी पंडित, मलिक कुटुंब आणि महंत. हे तिघं मिळून छडी मुबारकची परंपरा पूर्ण करायचे.

अमरनाथ यात्रेविषयी विधानसभेत एक विधेयकही मंजूर झालं होतं. त्यामध्ये मलिक कुटुंबाचाही उल्लेख आहे.

'नेहरूही काश्मीरला येत असत'

गुलाम हसन सांगतात की, जेव्हा नेहरू काश्मीरमध्ये यायचे, तेव्हा ते मलिक कुटुंबाची आठवण काढायचे.

पण पुढे जाऊन फारूक अब्दुल्ला यांच्या सरकारने आमचं सगळं महत्त्व संपवून टाकलं, असा आरोप त्यांनी केला.

ती कांगडी आता कुठे आहे, असं जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा मलिक सांगतात की, बुटा मलिक यांच्याकडून ती कांगडी त्या वेळच्या राजांनी घेतली होती आणि आता कुणालाही माहीत नाही, की ती कांगडी सध्या कुठे आहे.

ते म्हणतात, "त्याबद्दल माहिती मिळवायची खूप इच्छा होती. आम्ही खूप प्रयत्न केले. 'राजतरंगिणी'मध्येही आमच्या कुटुंबाचा आणि या पौराणिक कथेचा उल्लेख आहे."

पण नंतर बुटा मलिक यांची आठवण कधी काढली गेली नाही का?

'अमरनाथ'चा सन्मान करतात मुस्लीम बांधव

मलिक सांगतात, "बुटा मलिक यांचं निधन झालं आणि त्यानंतर त्यांचा दर्गा जंगलात बांधला गेला. त्यांच्याच नावावरून आमच्या गावाचं नाव बटकोट पडलं आहे. अमरनाथ यात्रेदरम्यान आम्ही मांस खाणं टाळतो, कारण आम्हाला माहिती आहे की, या काळात मांस खाणं योग्य नाही."

मलिक सांगतात की, अमरनाथ ही अशी तीर्थयात्रा आहे, ज्याचा काश्मीरमधील मुस्लीम समाजबांधव मनापासून सन्मान आणि आदर करतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)