पुतिन-किम जोंग भेटीची अमेरिका आणि युरोपला भीती का वाटतेय?

    • Author, फ्रांसिस माओ
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांनी नुकताच रशिया दौरा केला.

त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची व्हॅस्टोचनी कॉस्मोड्रोम या अंतराळ केंद्रात भेट घेतली.

एका भव्य पार्टीमध्ये दोघांनी रशियन वाईन प्यायली. दोन्ही देशांच्या समृद्धीसाठी त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

तिथून निघण्यापूर्वी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मॉडेल रायफल भेट म्हणून दिल्या.

रशियाच्या पूर्व भागात किम आणि पुतिन यांच्या भेटीची छायाचित्रे दोन्ही देशांमधील जवळचे संबंध स्पष्टपणे दर्शवतात.

हा दौरा अजून संपलेला नाही. उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते परत येण्यापूर्वी अनेक दिवस बंदरे, विमान कारखाने आणि इतर लष्करी तळांना भेट देणार आहेत.

या दौऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय जगतात प्रचंड खळबळ उडाली आहे.

अंतराळ केंद्र वास्टोचनी कॉस्मोड्रोमवर पोहोचण्यापूर्वी किम यांनी 40 तास ट्रेनने प्रवास केला आणि पाश्चिमात्य देशांना संशयात ठेवले.

याशिवाय, दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होणार हे देखील स्पष्ट झाले नाही. तर गेल्या आठवड्यातच अमेरिकेने उत्तर कोरिया रशियाला शस्त्रे देऊ शकते अशी भीती व्यक्त केली होती.

याकडे धोक्याची घंटा म्हणून पाहिले जात आहे.

पुतिन-किम भेट महत्त्वाची का?

किम यांची ट्रेन स्पेस सेंटरमध्ये पोहोचल्यावर पुतिन यांनी स्वागत पार्टीचे आयोजन केले होते. रेड कार्पेटवर त्यांचे स्वागत करण्यात आले.

कॅमेऱ्याच्या फ्लॅशमध्ये दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केले आणि ते फोटो लगेचच सरकारी माध्यमांमध्ये प्रसारित झाले.

माध्यमांची शक्ती दोन्ही नेत्यांना बरोबर माहिती आहे. त्यामुळे त्यांनी त्यांची भेट लोकांसमोर जास्तीत जास्त मोठी कशी दाखवता येईल याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातंय.

शेफिल्ड विद्यापीठातील उत्तर कोरियावरचे तज्ज्ञ सारा सन सांगतात, "या राजवंशाभोवती पिढ्यानपिढ्या एक मिथक निर्माण झाले आहेत. जेव्हा देशांतर्गत प्रेक्षक टेलिव्हिजन पाहतात किंवा वर्तमानपत्रे वाचत असतात, तेव्हा ही एक क्षुल्लक भेट आहे असे वाटू नये. यासाठी पुरेपूर तयारी केली जाते.”

किमच्या यांच्या परदेशी दौऱ्यातून उत्तर कोरिया हा जागतिक पातळीवर एक महत्त्वाचा देश आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही सारा सांगतात.

या दोन्ही नेत्यांच्या भेटीच्या तासाभरापूर्वीच प्योंगयांगने दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती. सर्वोच्च नेत्याच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच असे घडले.

कॅमेऱ्यासमोरील दिखाऊपणाशिवाय या बैठकीचा कुठलाही ठोस निकाल निघेल हे वाटत नाही असं विश्लेषकांना वाटत आहे.

“या नेत्यांमध्ये दोन प्रकारचे कार्यक्रम आहेत - एक म्हणजे भव्य आणि भव्य स्वागत. जे खास परदेशी प्रेक्षकांसाठी डिझाइन केलेले आहे आणि दुसरे म्हणजे बंद दारांमागील करार. जे महत्वाचे राहतील," असं सोलमधील कूकमिन विद्यापीठात उत्तर कोरियावर संशोधन करणारे फ्योडोर टर्टिटस्की सांगतात.

आतापर्यंत रशिया आणि उत्तर कोरियात शस्त्रास्त्र कराराचा कोणताही मागमूस आढळला नाही. त्यामुळे अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांमध्ये आणखी चिंता निर्माण झाली आहे.

उत्तर कोरिया युक्रेनमधील रशियाच्या लढाईसाठी शस्त्रे देऊ शकेल, अशी सध्या कुजबूज सुरू आहे.

उत्तर कोरियाला रशिया मदत करेल?

रशिया उत्तर कोरियाच्या अंतराळ कार्यक्रमात आणि उपग्रहाच्या उद्देशाने मदत करू शकतो, असे पुतिन यांनी आतापर्यंत संकेत दिले आहेत.

दोन्ही नेते ज्या ठिकाणी भेटले त्याच्या निवडीवरून काही गोष्टी स्पष्ट होतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मॉस्कोपासून दूर असलेल्या अंतराळ केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही नेत्यांनी लांबचा प्रवास केला.

पण स्पेस सेंटरमधील बैठक पुतिन यांच्यासाठी महत्त्वाची इमेज निर्माण करते, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

या वर्षी प्योंगयांग आपले दोन गुप्तचर उपग्रह अवकाशात पाठवण्यात अपयशी ठरले आहे. याचा अर्थ त्याचे तंत्रज्ञान खूप मागे आहे. त्या क्षेत्रात किम यांना रशियाच्या मदतीची आवश्यकता आहे.

पण दोन्ही देशांत नेमका काय करार होऊ शकतो हे स्पष्ट झालेलं नाही.

अमेरिकेला कोणता धोका?

उत्तर कोरियाकडे अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेले आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे जे अमेरिकेपर्यंत पोहोचू शकते, असा दावा केला जात आहे.

पण सध्या हे शक्य नाही कारण हवेत असताना ते नष्ट होण्यापासून संरक्षण करण्याचे तंत्रज्ञान उत्तर कोरियाने अद्याप विकसित केले नाही.

ज्या तंत्रज्ञानाने ते त्यांचे उपग्रह सुरक्षित ठेवतात त्याच तंत्रज्ञानाने त्यांची क्षेपणास्त्रे कशी सुरक्षित ठेवायची हे रशिया आणि अमेरिकेला माहीत आहे.

पण रशियाने हे तंत्रज्ञान उत्तर कोरियाला दिल्यास अमेरिकेवर हल्ला होऊ शकतो.

प्रोफेसर ईस्ले म्हणतात की स्पेस सेंटरमधील ही बैठक जणू "पुतिन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांची खिल्ली उडवत आहेत."

ते म्हणाले, "उत्तर कोरियावरील निर्बंध आणखी कडक करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य राष्ट्रांसाठी ही आणखी एक धोक्याची घंटा आहे."

रशियाशी उत्तर कोरियाचा किती व्यापार?

दक्षिण कोरियाच्या अंदाजानुसार शस्त्रास्त्रांच्या देवाणघेवाणीवर दोन्ही नेत्यांमध्ये उत्साह दिसत असला तरी दोन्ही देशांमधील व्यापार जवळजवळ शून्य आहे.

उत्तर कोरिया जवळजवळ 95 % व्यापार चीनसोबत होतो आहे. त्यामुळे या बैठकीतून काही ठोस तोडगा निघेल असं वाटत नाही कारण याआधीची 2019 मधील बैठक अनिर्णित होती.

गेल्या चार वर्षांत किमची ही पहिलीच भेट आहे.

या भेटीवर बारीक नजर ठेवणाऱ्यांचे म्हणणे आहे की पुतिन यांनी त्यांचे भव्य पद्धतीने स्वागत केले.

ही बैठक व्लादिवोस्तोक येथे ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीदरम्यान देखील करता आली असती. ज्यामध्ये चीन आणि दक्षिण कोरियाचे नेते आधीच सहभागी झाले आहेत.

पण पुतिन यांनी किम यांना वेगळ्या प्रकारे लक्ष देण्याचे ठरवले आणि पूर्ण आदराने,त रेड कार्पेट, एक फॅन्सी डिनर, एक बँड आणि किमला भेटण्यासाठी वॉक-इन केले.

टर्टिटस्कीच्या म्हणण्यानुसार, हे किमबद्दल आदराचे सूचक आहे. तसंच हा पाश्चिमात्य देशांना संदेश देण्यासाठी आणि त्यांना सस्पेन्समध्ये ठेवण्यासाठी आहे.

पण या नात्यात दोन्ही पक्ष शेवटी काय करतात याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)