सॅम माणेकशाॅ यांनी पाकिस्तानला त्यांच्या सैनिकाला शौर्यपदक द्या, अशी शिफारस केली तेव्हा

    • Author, झुबैर आझम
    • Role, बीबीसी उर्दू

ब्रिगेडियर हरदेवसिंग कलेर यांची नजर ढाक्याकडे होती. रावळपिंडी येथील गॉर्डन कॉलेजमधून शिक्षण घेतलेले ब्रिगेडियर कलेर 1971 मध्ये भारतीय सैन्याच्या 95 माउंटन ब्रिगेडचे नेतृत्व करत होते.

त्याचवेळी भारतीय सैन्याने पूर्व पाकिस्तानवर आक्रमणाची तयारी पूर्ण केली होती. निवडणुकीत स्पष्ट विजय मिळवूनही अवामी लीगला सत्तेपासून दूर ठेवल्यानंतर पूर्व पाकिस्तानमध्ये गृहयुद्ध सुरू झालं होतं.

ब्रिगेडियर हरदेव सिंग यांना उत्तरेकडील आसाममधून पूर्व पाकिस्तानवर हल्ला करण्याचे आदेश देण्यात आले. पण आधी ढाका गाठलं पाहिजे असं त्यांचं मत होतं.

मात्र त्यांच्या योजनेतला पहिला अडथळा होता तो पूर्व पाकिस्तानच्या उत्तर सीमेवरील एक लहान लष्करी चौकी.

कमालपूर हा नकाशावर नुसता एक ठिपका होता. ब्रिगेडियर हरदेव सिंग यांच्याकडे मोठा तोफखाना तर होताच, शिवाय पायदळ आणि हवाईदल सोबतीला होतं. याशिवाय भारताने प्रशिक्षण दिलेल्या मुक्ती वाहिनीच्या दोन ते तीन बटालियन होत्या.

कमालपूरच्या छोट्या चौकीवर ताबा मिळवणं तसं काही तासांचं काम होतं. पण ही चौकी ताब्यात ठेवण्यासाठी पाकिस्तानी लष्कराचा एक तरुण अधिकारी कॅप्टन अहसान मलिक आपल्या 70 सैनिकांना आणि

तितक्याच अर्ध-प्रशिक्षित रेंजर्सना सोबत घेऊन गेले होते. ब्रिगेडियर हरदेव यांच्यासाठी हा टर्निंग पॉइंट ठरणार होता. कारण कॅप्टन अहसान मलिक यांच्याकडे भारतीय सैन्य आणि हवाई दलाला तोंड देण्यासाठी फक्त तीन मोर्टार होत्या.

ब्रिगेडियर हरदेव सिंग यांनी कमालपूर ताब्यात घेतलं असतं तर त्यांना ढाक्‍यात प्रवेश करणं सोपं झालं असतं.

कॅप्टन अहसान मलिक आणि ब्रिगेडियर हरदेव सिंग यांच्यातील ही चकमक महत्त्वाची आहे. कारण ती लढाईच्या कित्येक आठवडे आधी सुरू झाली होती आणि शेवटी तरुण पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याच्या शौर्याविषयी भारतीय लष्करप्रमुखाने गौरवोद्गार काढले होते.

भारतीय लष्कराची रणनीती

युद्धापूर्वी आगाऊ सुविधा तयार करण्याच्या उद्देशाने भारतीय सैन्याने युद्धापूर्वीच पूर्व पाकिस्तानच्या सीमेमध्ये घुसखोरी सुरू केली होती. मुक्ती वाहिनीने देखील हल्ले करण्यास सुरुवात केली होती.

चार वर्षांपूर्वीच लष्करात कमिशन मिळालेले कॅप्टन अहसान मलिक हे भारतीय सीमेपासून केवळ 3000 फूट अंतर असलेल्या चौकीवर तैनात होते.

खरं तर जून आणि जुलैमध्येच हल्ले सुरू झाले होते. पण 22 ऑक्टोबर 1971 रोजी भारतीय सैन्याने आणि मुक्तीवाहिनीने संयुक्तपणे या चौकीवर हल्ला केला.

सिद्दीक सालिक त्यांच्या 'विटनेसेस टू सरेंडर' या पुस्तकात लिहितात की, या हल्ल्यात एका अधिकाऱ्यासह नऊ भारतीय मारले गेले. पुढचा हल्ला 14 नोव्हेंबरला करण्यात आला ज्यामध्ये भारतीय सैनिकही सामील होते.

अहसान मलिक यांनी पाकिस्तान लष्कराच्या हिलाल मासिकात लिहिलंय की, 15 नोव्हेंबरला त्यांचे काही सैनिक गस्तीसाठी बाहेर पडले, तेव्हा त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. अहसान मलिक यांच्या लक्षात आलं की चौकीवर कब्जा करण्याचा प्राथमिक प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आपल्या चौकीला भारतीय सैन्याने वेढा घातला आहे.

कमालपूरचे संरक्षण

सुरुवातीच्या अपयशानंतर ब्रिगेडियर हरदेव यांनी डावपेच बदलले. त्यांनी चौकीला पूर्णपणे वेढा घातला आणि तोफ गोळ्यांचा भडिमार सुरू केला.

मेजर जनरल सुखवंत सिंग यांनी त्यांच्या 'इंडियाज वॉर्स सिन्स इंडिपेंडन्स' या पुस्तकात लिहिलंय की, ब्रिगेडियर हरदेव यांनी दोन बटालियनच्या मदतीने चौकीला वेढा घातला.

सिद्दीक सालिक आपल्या पुस्तकात लिहितात की, "चौकीवर हल्ला करून पाकिस्तानी सैनिकांना मृत्यूच्या गळी उतरविण्यापेक्षा त्यांच्यावर मानसिक दबाव तयार करणं आणि त्यांना आत्मसमर्पण करायला लावणं हा ब्रिगेडियर हरदेव यांचा उद्देश होता."

मात्र, अहसान मलिक यांनी आपल्या चौकीत खंदक खोदून ते काँक्रीटने मजबूत केले. तसेच हे खंदक एकमेकांशी जोडले. संरक्षणाची ही क्लृप्ती ते व्हिएतनाम युद्धातून शिकले होते. या रणनीतीअंतर्गत चौकीभोवती टोकदार बांबूच्या साहाय्याने कुंपण बांधण्यात आलं जेणेकरुन कोणीही हल्लेखोर चौकीत सहज प्रवेश करू शकणार नाही. याशिवाय चेकपॉईंटच्या आजूबाजूला ग्रेनेड, माइन्स आणि अँटी-टँक साहित्य बसवण्यात आलं.

मोठ्या प्रमाणावर तोफगोळे पडूनही या बचावात्मक रणनीतीमुळे कॅप्टन अहसान मलिक आणि त्यांच्या जवानांना मानसिक दबाव सहन करावा लागला नाही. पुढे 21 नोव्हेंबर रोजी भारतीय सैन्याने मोठा हल्ला केला. यावेळी भारतीय सैन्याला मोठी जीवितहानी सहन करावी लागली. काही वेळाने दुसरा हल्लाही तसाच फसला.

अहसान मलिक यांच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी चौकीजवळ जे मृतदेह मोजले त्यात 28 जण होते. यात एक भारतीय कॅप्टन देखील होते. अहसान मलिक यांच्या म्हणण्यानुसार, आजार पसरण्याच्या भीतीने हे मृतदेह रात्री दफन करण्यात आले.

अहसान मलिक यांनी आतापर्यंत चौकी काबीज करण्याचा भारतीयांचा प्रयत्न हाणून पाडला होता, पण नंतर त्यांना चारही बाजूंनी वेढा घालण्यात आला होता.

त्यांची बटालियन, 31 बलुचचे कमांडिंग ऑफिसर, लेफ्टनंट कर्नल सुलतान, काही मैलांवर बटालियनच्या मुख्यालयात उपस्थित होते. त्यांनी भारतीय सैन्याचा वेढा तोडून कॅप्टन अहसान मलिकला मदत पाठवण्याचा प्रयत्न केला, परंतु हे प्रयत्न अयशस्वी झाले.

ब्रिगेडियर हरदेव यांनी 27 नोव्हेंबरच्या रात्री पुन्हा एकदा पोस्ट ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळीही त्यांना अपयश आलं.

जनरल नियाझी आणि अमेरिकन पत्रकार

दरम्यान, पूर्व पाकिस्तानातील लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल अमीर अब्दुल्ला नियाझी यांनी कमालपूरपासून काही मैल दक्षिणेस बक्षीगंज येथील 31 बलुच बटालियनच्या मुख्यालयाला भेट दिली. त्यांच्यासोबत डॅन सदरलँड नामक एक अमेरिकन पत्रकारही होता.

कॅप्टन अहसान मलिक यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी जनरल नियाझींना वायरलेसवरून माहिती दिली की, त्यांच्याकडचा दारूगोळा आता संपू लागला आहे. प्रत्युत्तरादाखल जनरल नियाझींनी त्यांना मदत पाठवण्याचे आश्वासन दिले.

जेव्हा अमेरिकन पत्रकाराला सांगण्यात आलं की भारतीय सैन्य कमालपूरवर हल्ला करत असून त्यांचे काही सैनिक मारले गेले आहेत, तेव्हा त्याने सैनिकांचे मृतदेह पाहण्याची मागणी केली. हे मृतदेह पाहण्यासाठी त्याला सात मैल उत्तरेकडील कमालपूर चौकीवर जावं लागणार होतं. आणि या चौकीला भारतीय सैन्याने वेढा घातला आहे अशी माहिती त्याला मिळाली.

डॅन सदरलँडने त्याला चौकीवर जायचंच आहे असा आग्रह धरला. त्या रात्री जनरल नियाझी निघून गेल्यावर कॅप्टन अहसान मलिकला यांना धान्य आणि दारूगोळा देण्यासाठी बटालियन कमांडर मेजर अयुब बाहेर पडले. त्यांच्यासोबत सदरलँडही होता.

हे लोक कमालपूरपासून काही अंतरावर असतानाच भारतीय लष्कर आणि मुक्ती वाहिनीने त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. अशा परिस्थितीत मोठी खळबळ माजली आणि मेजर अयुब चौकीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले. पण सदरलँडला त्याची पर्वा नव्हती. कॅप्टन अहसान मलिक यांच्या म्हणण्यानुसार, सदरलँडला चौकीच्या परिसरात शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला पण हा प्रयत्न अयशस्वी झाला.

दुसऱ्या दिवशी कळलं की गोळीबार सुरू झाल्यावर सदरलँड आपला जीव वाचवण्यासाठी जवळच्या शेतात लपून बसला आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत बक्षीगंजला परतला.

धान्य आणि दारूगोळ्याचा तुटवडा

ब्रिगेडियर हरदेव सिंग यांचा संयम सुटत चालला होता. दुसरीकडे, भारतीय हायकमांडने प्रश्न विचारायला सुरुवात केली होती. इतकं मोठं संख्याबळ असताना देखील एक लहान चौकी ताब्यात घ्यायला इतका वेळ का लागतोय असं विचारलं जाऊ लागलं.

30 नोव्हेंबरच्या आसपास कमालपूरवर दुसरा हल्ला झाला. यावेळी कॅप्टन अहसान मलिक यांनी भारतीय जवानांना जवळ येऊ दिलं. भारतीय जवान चौकीजवळ येताच त्यांनी त्यांच्यावर अचानक गोळीबार केला. हल्ला परतवून लावल्यानंतर सुमारे 20 मृतदेहांची मोजणी करण्यात आली.

मेजर जनरल सुखवंत सिंग यांच्या म्हणण्यानुसार, "चौकीवरील हल्ल्यादरम्यान भारतीय बटालियन कमांडरजवळ एक काउंटर-मोर्टार शेल पडला आणि चार जवानांच्या चिंधड्या उडल्या. त्यामुळे भारतीयांना माघार घ्यावी लागली, त्यानंतर कमांडिंग ऑफिसर बदलले होते."

मेजर जनरल सुखवंत सिंग लिहितात की, "सततच्या हल्ल्यांमुळे आणि वाताहत झाल्यामुळे भारतीय सैन्याचं मनोबल खचलं. हायकमांडला ब्रिगेडियर हरदेव यांच्या क्षमतेवर शंका येऊ लागली होती."

सिद्दीक सालिक यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे की, "दोन आठवड्यांच्या लढाईनंतर खरी समस्या उद्भवली. दारूगोळा आणि अन्नाचा तुटवडा पडला होता आणि अहसान मलिकला पुरवठा करण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले होते."

अशा परिस्थितीत, अन्न आणि दारूगोळा वाचवणं अहसान मलिकसाठी आवश्यक होतं. म्हणून त्यांनी वस्तू शक्य तितक्या दिवस टिकतील याची खात्री करण्यासाठी काही उपाययोजना केल्या.

सिद्दीक सालिक यांच्या म्हणण्यानुसार, "जखमी सैनिक आणि स्वयंसेवकांना आवश्यक वैद्यकीय उपचारही पुरवता आले नाहीत. कारण चौकीवर एकच नर्सिंग असिस्टंट होता, जो फक्त मलमपट्टी करू शकत होता आणि वेदनांवर औषध देऊ शकत होता."

सिद्दीक सालिक यांच्या पुस्तकानुसार, आता अहसान मलिकच्या चौकीवर प्रत्येक सैनिकाकडे 75 गोळ्या, लाइट मशीन गनचे 200 राउंड आणि 22 मोर्टारचे गोळे शिल्लक होते.

शरणागतीचा संदेश

4 डिसेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू झालं. त्या दिवशी जेव्हा कमालपूरवर दोन हेलिकॉप्टर उडत होते. तेव्हा पाकिस्तानी सैनिकांनी वाटलं की मदत आली आहे. सिद्दीक सालिक लिहितात की 'त्यांचे थकलेले चेहरे आशेने उजळले.' पण ही आशा फार काळ टिकली नाही.

ही भारतीय लष्कराची हेलिकॉप्टर होती, जी उंचावरून चौकीची सविस्तर तपासणी करत होती. दुसरीकडे दारूगोळ्याचा तुटवडा पडल्याने कॅप्टन अहसान मलिक यांनी विनाकारण गोळ्यांचा वापर करू नये, असा आग्रह धरला.

भारतीय जवानांनाही आता याची जाणीव झाली होती.

त्या दिवशी दुपारी भारतीय लष्कराच्या वतीने एक पांढरा झेंडा घेऊन बंगाली व्यक्ती आली आणि संदेश दिला की, शस्त्र खाली ठेऊन मानवी जीव वाचवा अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहा.

संदेशात लिहिलं होतं, 'गेल्या काही दिवसांपासून तुम्ही शस्त्रास्त्रं आणि साहित्य मिळवण्याचा खूप प्रयत्न केला होता. याची आम्हाला माहिती आहे आणि तुमचे हे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. हा पुरवठा आमच्या हाती आला आहे. तुमची चौकी रद्द झाली असून आम्ही ती ताब्यात घेऊ शकतो. मात्र जीवित हानीपासून वाचवण्यासाठी हा संदेश तुम्हाला पाठवला जात आहे. कालपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झालं आहे आणि तुमचे सहकारी सैनिक तुमच्यापासून अनेक मैल दूर आहेत."

या संदेशावर पाकिस्तानी सैनिकांनी गोळ्या झाडून प्रत्युत्तर दिलं. काही वेळातच चार भारतीय मिग विमाने पोस्टवर बॉम्बफेक करण्यासाठी दाखल झाली. काही वेळाने आणखी एक हवाई बॉम्बस्फोट करण्यात आला, त्यानंतर शस्त्र खाली ठेवण्या्चा दुसरा संदेश पाठवण्यात आला.

मेजर जनरल सुखवंत सिंग यांच्या म्हणण्यानुसार, संदेशात लिहिलं होतं की, 'तुम्ही आमच्या पहिल्या संदेशाकडे लक्ष दिलं नाही. सद्सदविवेक बुद्धी वापरण्याची ही शेवटची विनंती आहे. काही काळापूर्वीच तुम्ही स्फोट पाहिला आहे. जर तुम्ही शस्त्र ठेवण्याचं ठरवलं तर मी तुम्हाला खात्री देतो की, शौर्याने लढा दिलेल्या कोणत्याही सैनिकासारखाच सन्मान तुम्हाला दिला जाईल.'

सुखवंत सिंग लिहितात की, या संदेशाचे उत्तर देतानाही गोळ्या झाडल्या.

'मी तुम्हाला आता जास्त वेळ देऊ शकत नाही'

कॅप्टन अहसान मलिक यांना आता निर्णय घ्यायचा होता. संपत चाललेला त्यांचा दारूगोळा आता पूर्ण संपणार होता. त्यांना मदत किंवा पुरवठा करण्याचे सर्व मार्ग भारतीय लष्कराच्या ताब्यात होते.

पळून जाण्याचा प्रयत्न सुद्धा यशस्वी होताना दिसत नव्हता. कारण चौकीच्या संरक्षणातून बाहेर पडताच ते भारतीय सैनिकांच्या ताब्यात येणार होते. सर्वात जवळचं बटालियनचं मुख्यालय अनेक मैल दूर होतं आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्याकडे कोणतंही वाहन नव्हतं.

सुखवंत सिंग लिहितात की, अशा परिस्थितीत कॅप्टन अहसान मलिक यांनी त्यांचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सुलतान यांच्याशी संपर्क साधला, पण त्यांना मदत मिळू शकली नाही कारण आता भारतीय सैन्याने बक्षीगंजवरही हल्ला केला होता.

दरम्यान आता भारतीय लष्करप्रमुखांचा संयम सुटला. त्यांनी पुन्हा एकदा चौकीवर हवाई बॉम्बफेक केल्यानंतर कॅप्टन अहसान मलिकला तिसरा आणि अंतिम संदेश पाठवला. त्यात लिहिलं होतं की, 'आता मी तुम्हाला आणखी वेळ देऊ शकत नाही. तुम्ही एखादा दूत घेऊन आलात तर बरं होईल. मी तुम्हाला वचन देतो की तुमचं कोणतंही नुकसान होणार नाही.'

सुखवंत सिंग लिहितात की, 'परंतु या तिसऱ्या संदेशालाही गोळीबाराने प्रत्युत्तर देण्यात आलं. यामुळे भारतीय लष्करप्रमुख संतप्त झाले आणि त्यांनी रात्री चौकीवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला.'

हा गोळीबार कमालपूर चौकीचा शेवटचा प्रतिसाद होता. संध्याकाळी सातच्या सुमारास कॅप्टन अहसान मलिक पांढरा झेंडा घेऊन चौकीतून बाहेर आले आणि त्यांनी शरणागती स्वीकारली.

त्यांनी आपल्या लेखात लिहिलंय की, 'दारूगोळा संपला होता. भारतीय लष्कराला प्रत्युत्तर देण्यासाठी एकही गोळी शिल्लक नव्हती. 21 दिवस कोणत्याही मदतीशिवाय लढा दिल्यानंतर आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.'

मात्र हा आत्मसमर्पणाचा निर्णय आपण भारतीय लष्कराच्या संदेशाला प्रतिसाद म्हणून नाही तर आपल्या कमांडरच्या सूचनेनुसार घेत असल्याचं स्पष्ट केलं.

'तुमचे बाकीचे सैनिक कुठे आहेत?'

सुखवंत सिंग लिहितात की, 'कॅप्टन अहसान मलिकने 21 दिवसांचा वेढा घालूनही 140 जणांची ब्रिगेड धाडसाने रोखली होती. यावर भारतीय लष्करप्रमुख जनरल सॅम माणेकशॉ यांनी त्यांना अभिनंदनाचा संदेश पाठवला.'

जनरल सॅम माणेकशॉ यांना 'सॅम बहादूर' या नावाने ओळखलं जायचं. त्यांनी भारतीय सेनेच्या फॉर्मेशन कमांडरला सूचना दिली होती की, कमालपूरचं रक्षण करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांशी सन्मानाने वागा.

ब्रिगेडियर हरदेव सिंग यांनाही त्यांच्या ब्रिगेडशी लढणाऱ्या अधिकाऱ्याला भेटायचं होतं. जेव्हा ते चौकीवर पोहोचले, तेव्हा त्यांना पाहून आश्चर्य वाटलं की, जोरदार तोफखान्याचा भडिमार आणि हवाई हल्ले करूनही काँक्रीटच्या पुलाच्या बॉक्सला तडाही गेला नव्हता.

अहसान मलिक लिहितात की, 'भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्याने त्यांना विचारलं की तुमचे बाकीचे जवान कुठे आहेत कारण त्यांच्यासमोर फक्त 60 आणि नऊ जखमी सैनिक होते. तर अर्धे अर्ध-प्रशिक्षित रेंजर्स आणि काही अप्रशिक्षित स्वयंसेवक होते.

अहसान मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं की, आम्ही 21 दिवसांपासून वेढ्यात आहोत. कोणीही चौकी सोडलेली नाही. हे ऐकून भारतीय अधिकारी आश्चर्यचकित झाले कारण त्यांना वाटलं की किमान पाकिस्तानी सैनिकांची एक संपूर्ण बटालियन या चौकीवर उपस्थित असेल.

अहसान मलिक यांच्या म्हणण्यानुसार, "भारतीय लष्करी अधिकाऱ्यांना हे बंकर पाहायचे होते. पण जेव्हा ते बंकरमध्ये जाऊ लागले तेव्हा त्यांनी पाकिस्तानी सैनिकांना आधी आत जायला सांगितलं. कारण तिथे एखादा भूसुरुंग असेल याची त्यांना भीती होती."

काही दिवसांनंतर, जमालपूरमध्ये अहसान मलिक यांचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सुलतान आणि हरदेव सिंग यांच्यात पत्रांची देवाणघेवाण झाली.

कमालपूर चौकीने शरणागती पत्करल्यानंतर 11 दिवसांनी ब्रिगेडियर हरदेव सिंग ढाक्याच्या जवळ पोहोचले. तिथे पोहोचणारे ते पहिले वरिष्ठ भारतीय लष्करी अधिकारी होते. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी कमांडर जनरल ओमिद अब्दुल्ला नियाझी देखील कॅप्टन अहसान मलिक यांच्या सारख्याच परिस्थितीचा सामना करत होते.

1971 मध्ये भारतीय पत्रकार करण थापर यांनी भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल सॅम माणेकशॉ यांना प्रश्न विचारला की, "तुम्ही कॅप्टन अहसान मलिक नावाच्या पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याला त्यांच्या शौर्याने प्रेरित होऊन खरोखरच अभिनंदनाचा संदेश पाठवला होता का?"

याला उत्तर देताना सॅम माणेकशॉ म्हणाले, 'हे खरं आहे. अहसान मलिक ज्या चौकीवर होते ती जिंकण्याचा आमचा प्रयत्न होता. आम्ही खूप प्रयत्न केले पण तिसऱ्या प्रयत्नापर्यंत आम्हाला यश आलं नाही. तो खूप शौर्याने लढला म्हणून मी त्याला पत्र लिहिलं.'

ते पुढे म्हणाले, "जेव्हा मी युद्धानंतर पाकिस्तानात गेलो तेव्हा मी माझ्या पाकिस्तानी समकक्षांना सांगितलं की, ती व्यक्ती खूप शूर आहे आणि तिला शौर्यपदक मिळालं पाहिजे."

किरण थापर यांनी विचारलं की, 'मग अहसान मलिक यांनी पदक मिळालं का? यावर सॅम माणेकशॉ म्हणाले, मला माहिती नाही.'

कॅप्टन अहसान सिद्दिकी मलिक यांना पुढे जाऊन स्टार जराट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नंतर ते सैन्यातून कर्नल म्हणून निवृत्त झाले. ते कदाचित एकमेव असे सैनिक होते ज्यांच्या शौर्याचा गौरव त्यांच्या विरोधी सैन्याच्या प्रमुखाने केला होता आणि त्यांना पदक देण्याची शिफारस केली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)