NDTV तून राजीनाम्यानंतर रवीश कुमार म्हणतात, ‘चिमणीचं घरटं कुणीतरी पळवलं, पण तिच्यासमोर संपूर्ण आसमंत’

ज्येष्ठ पत्रकार आणि एनडीटीव्ही इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक रवीश कुमार यांनी एनडीटीव्हीचा राजीनामा दिला आहे.

रवीश कुमार यांचे प्राइम टाइम, रवीश की रिपोर्ट, हम लोग, देस की बात हे टेलिव्हिजन न्यूज शो प्रसिद्ध आहेत.

एनडीटीव्हीची मालकी अदानी समूहाकडे आल्यानंतर एनडीटीव्हीच्या संचालक मंडळातून प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांनी राजीनामा दिला आहे.

त्यानंतर आता रवीश कुमार यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. रवीश कुमार हे गेल्या दोन दशकांपासून एनडीटीव्हीशी संलग्न आहेत. त्यांना पत्रकारितेसाठी रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आहे.

राजीनामा दिल्यानंतर रवीश यांनी त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. त्यावर त्यांनी आज 24 मिनिटांचा एक व्हीडिओ जारी केला आहे.

त्यात त्यांनी त्यांच्या राजीनाम्याबद्दल सांगताना त्यांची भूमिका स्पष्ट केलीय.

“आज की शाम ऐसी शाम है जहाँ चिड़िया को अपना घोंसला नज़र नहीं आ रहा. शायद कोई और उसका घोंसला ले गया. मगर उसके सामने एक खुला आसमान ज़रूर नज़र आ रहा है," असं म्हणत त्यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

आजची संध्याकाळ अशी संध्याकाळ आहे जिथं चिमणीला तिचं घरटं दिसत नाहीये. बहुतेक तिचं घरटं कुणीतरी घेऊन गेलं आहे. पण चिमणीसमोर संपूर्ण आकाश मोकळं आहे, असा त्याचा अर्थ आहे.

या व्हीडिओत रवीश यांनी त्यांना सतत कसा लोकांचा पाठिंबा मिळत राहिला याची कहाणी सांगितली आहे. सध्याच्या मीडियाच्या स्थितीवरसुद्धा त्यांनी भाष्य केलं आहे.

रवीश कुमार कोण आहेत?

रवीश कुमार यांना एनडीटीव्ही इंडिया या वृत्तवाहिनीचा प्रमुख चेहरा मानलं जातं.

रवीश यांना जेव्हा 2019 मध्ये रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता तेव्हा मॅगसेसेच्या वेबसाइटने म्हटलं होतं की "गेल्या काही वर्षांत भारतामध्ये स्वतंत्र पत्रकारितेचं अवकाश कमी होत चाललं आहे."

मॅगसेसेनी म्हटलंय "रवीश कुमार हे सामाजिक मुद्द्यांना उचलून तथ्यांसहित, वस्तूनिष्ठपणे सभ्य शब्दांत आपले विचार आपल्या शोमधून मांडतात."

"रवीश हे आपल्या न्यूजरुमला जनतेची न्यूजरूम संबोधतात आणि ते सर्व स्तरातील लोकांशी संवाद साधतात."

"जर तुम्ही जनतेचा आवाज झाला तर तुम्ही पत्रकार आहात अशी व्याख्या रवीश कुमार करतात आहे,"असं वर्णन मॅगसेसे पुरस्काराच्या संकेतस्थळावर आहे.

राधिका रॉय आणि प्रणव रॉय यांचा राजीनामा

NDTVची संपूर्ण मालकी आता अदानी समुहाकडे आली आहे. सेबीला आता त्या संदर्भातली माहिती देण्यात आली आहे.

मंगळवारी 29 नोव्हेंबरला कंपनी सेक्रेटरी परिणीता भुतानी यांनी सेबीला पत्र लिहिलं.त्यात एनडीटीव्हीची होल्डींग कंपनी असलेल्या आरआरपीआरएचच्या संचालक मंडळातून राधिका रॉय आणि प्रणव रॉय यांनी राजीनामा दिल्याचं कळवण्यात आलं आहे.

परिमाणी एनडीटीव्हीचे प्रमोटर राधिका रॉय आणि प्रणव रॉय यांची आता कंपनीवरची मालकी संपुष्टात आली आहे. पण अजूनही रॉय दांपत्याकडे 32.26 टक्के शेअर्स आहेत.

यामुळे मालकी संपुष्टात येऊनही रॉय दांपत्य NDTVच्या शेअर होल्डर्समध्ये त्यांचं स्थान राखून आहेत. कमी समभागधारक ठरल्यामुळे आता त्यांच्या म्हणण्याला मात्र तिथं फारसं स्थान नसेल.

राधिका रॉय आणि प्रणव रॉय यांंच्या राजीनाम्यानंतर अदानी समुहाकडून सुदिप्ता भट्टाचार्य, संजय पुगलिया, सेंथिल चेंगलवरायन यांची तात्काळ आरआरपीआरएचच्या डायरेक्टरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संजय पुगलिया ज्येष्ठ पत्रकार आहेत. टीव्ही क्षेत्रात काम करण्याचा मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे. वेगवेगळ्या राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांच्या संपादकपदी आणि ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांनी काम केलं आहे.

एनडीटीव्ही अदानी समुहाकडे

गेल्या काही दिवसांपूर्वी एनडीटीव्हीमध्ये 30 टक्के शेअर घेऊन हा समूह विकत घेत असल्याची घोषणा केली होती.

2020 पासून एका प्रकरणात सेबीनं राधिक रॉय आणि प्रणव रॉय यांच्यावर शेअर्सच्या खरेदी-विक्रीची बंदी घातली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेले शेअर्स त्यांना वर्ग करता येणार नसल्याचं त्यांनी शेअर मार्केट नियामकांना कळवलं होतं.

सेबीच्या या ऑर्डरनुसार 26 नोव्हेंबर 2022 पर्यंत राधिका रॉय आणि प्रणव रॉय यांच्यावर ही बंदी होती. ती संपताच त्यांनी आरआरपीआरएचच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे.

23 ऑगस्ट रोजी अदानी एंटरप्राईजेसच्या मालकीच्या AMG मीडिया नेटवर्क्सने विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडचं (VCPL) अधिग्रहण केलं.

NDTV ने 2009 मध्ये विश्वप्रधान कंपनीकडून 350 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. या कर्जातील करारानुसार, VCPL या कर्जाचं रुपांतर RRPR च्या 99.99 टक्के इक्विटीमध्ये करू शकत होतं, असं काही बातम्यांमध्ये छापून आलं होतं.

23 ऑगस्ट 2022 ला VCPL ने त्यांच्या या अधिकाराचा वापर केला. यामार्फत त्यांना RRPR च्या मालकीचा NDTV मधील 29% टक्के वाटा आपल्या नावे करता आला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)