NDTV आणि अदानी समुह व्यवहार : वाचा संपूर्ण घटनाक्रम

    • Author, अलोक जोशी
    • Role, ज्येष्ठ पत्रकार

अदानी ग्रुप ने एनडीटीव्ही मध्ये 30 शेअर घेतल्याच्या प्रकरणात प्रश्नोत्तरांचा सिलसिला अद्यापही थांबलेला नाही. 25 ऑगस्टला एनडीटीव्हीने संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि एक जाहीर निवेदन दिलं होतं की सेबीच्या एका जुन्या निर्णयामुळे अदानी एनडीटीव्हीमधले शेअर खरेदी करू शकत नाही.

एनडीटीव्हीचे संस्थापक राधिका आणि प्रणॉय रॉय यांच्यावर 2020 पासून शेअर खरेदी करण्यासाठी आणि विकण्यासाठी बंदी घातली आहे.

त्यामुळे ते लोक अदानी समूह ते शेअर्स ट्रान्सफर करू शकणार नाही. त्याच आधारे अदानी एनडीटीव्हीवर ताबा मिळवू पाहत होते.

ही सगळी प्रक्रिया एनडीटीव्हीवर अदानी समुहाने ताबा मिळवू नये यासाठीचे प्रयत्न आहे. आता अदानी ग्रुप ने एक ताजं निवेदन जारी केलं आहे.

पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार आरआरपीआर ही कंपनी सेबीच्या आदेशाअंतर्गत येत नाही. त्यासाठी व्हीसीपीएल ला शेअर ट्रान्सफर करण्यासाठी कोणतीही बंदी नाही.

अदानी ग्रुपच्या मते वॉरंट एक्सरसाईज वीसीपीएल ने जारी केला आहे. तो एका कंत्राटाच्या अंतर्गत येतं. आरआरपीआर वर ते बंधनकारक आहे आणि त्यांना या कराराच्या अटींचं पालन करणं बंधनकारक आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी एनडीटीव्हीमध्ये 30 टक्के शेअर घेऊन हा समूह विकत घेत असल्याची घोषणा केली होती.

न्यूज एजन्सी रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार RRPR चे प्रमोटर राधिका रॉय आणि प्रणव रॉय यांनी त्यांच्या ताब्यात असलेले कंपनीचे शेअर्स अदानी समुहाकडे वर्ग करता येणार नसल्याचं म्हटलंय.

2020 पासून एका प्रकरणात सेबीनं राधिक रॉय आणि प्रणव रॉय यांच्यावर शेअर्सच्या खरेदी-विक्रीची बंदी घातली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेले शेअर्स त्यांना वर्ग करता येणार नसल्याचं त्यांनी शेअर मार्केट नियामकांना कळवलं आहे.

सेबीच्या या ऑर्डरनुसार 26 नोव्हेंबर 2022 पर्यंत राधिका रॉय आणि प्रणव रॉय यांच्यावर ही बंदी असणार आहे.

सेबीनं केलेल्या चौकशीत रॉय दांपत्यानं इनसाईट ट्रेडिंग करून एनडीटीव्हीच्या शेअर्समधून चुकीच्या पद्धतीने नफा कमावल्याचं स्पष्ट झालं होतं.

"पण, हे कारण देऊन एनडीटीव्ही त्यांचं आधिग्रहण लांबवण्याचा प्रयत्न करू शकते, त्यांना ते टाळता येण्याची शक्यता कमी आहे," असं लीगल एक्सपर्ट प्रिथा झा यांना वाटतं. त्यांनी रॉयटर्सकडे त्यांचं हे मत व्यक्त केलं आहे.

NDTVच्या शेअर्सवर अदानी समुहाने असा मिळवला ताबा

अदानी समुहाने एनडीटीव्हीच्या शेअर्सचा मोठा हिस्सा विकत घेतला आहे. अदानी समुहाने एनडीटीव्हीमध्ये एक मोठा हिस्सा खरेदी केला आहे आणि आता अजून 26% शेअर्स खरेदी करण्यासाठी एक खुली ऑफर जाहीर केली आहे

प्रणय रॉय, राधिका रॉय आणि NDTV व्यवस्थापनाच्या इच्छेविरुद्ध अदानी समूह या कंपनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे. याला होस्टाईल टेकओव्हर असं म्हणतात.

यातील कोणतीही बाब योग्य असू शकते. पहिल्या दोहोंमध्ये सांगण्याच्या पद्धतीत फरक आहे किंवा तांत्रिकदृष्ट्या अर्ध्याहून अधिक हिस्सेदारी न घेता कंपनी विकत घेतली असं म्हणणं बरोबर नाही, कदाचित.

पण दुसरी गोष्ट खरी मानली, जसं NDTVच्या सीईओ सुपर्णा सिंह यांनी आपल्या सहकाऱ्यांना मेल लिहून सांगितले आहे, तर हे चित्र काहीसं वेगळं दिसतं.

फरक एवढाच आहे की, अदानी समूह एनडीटीव्हीवर कब्जा करण्यासाठी किंवा एनडीटीव्हीच्या शेअर्सचा 50 टक्क्यांहून अधिक हिस्सा खरेदी करण्यासाठी कंपनीच्या विद्यमान प्रवर्तकांशी बोलणी करून परस्परसहमतीने करत आहे किंवा त्यांच्यावर बळजबरी करण्यात येत आहे.

23 ऑगस्टपूर्वी NDTVच्या प्रमोटर्सकडे (मालक) किती शेअर्स होते?

अदानी यांची घोषणा होण्यापूर्वी NDTV च्या प्रमोटर्सकडील शेअर्स खालीलप्रमाणे होते.

प्रणय रॉय : 15.94%

राधिका रॉय : 16.32%

RRPR (प्रणय आणि राधिका रॉय यांच्या संयुक्त मालकीची कंपनी) : 29.18%

NDTV च्या प्रमोटर्सकडील एकूण वाटा : 61.45%

सध्या राधिका रॉय आणि प्रणव रॉय यांच्याकडे व्यतिरिक्तरित्या 16+16 म्हणजेच 32 टक्के शेअर्स आहेत.

23 ऑगस्ट रोजी काय घडलं?

23 ऑगस्ट रोजी अदानी एंटरप्राईजेसच्या मालकीच्या AMG मीडिया नेटवर्क्सने विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडचं (VCPL) अधिग्रहण केलं.

NDTV ने 2009 मध्ये विश्वप्रधान कंपनीकडून 350 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं.

या कर्जातील करारानुसार, VCPL या कर्जाचं रुपांतर RRPR च्या 99.99 टक्के इक्विटीमध्ये करू शकत होतं, असं काही बातम्यांमध्ये छापून आलं आहे.

23 ऑगस्ट 2022 ला VCPL ने त्यांच्या या अधिकाराचा वापर केला. यामार्फत त्यांना RRPR च्या मालकीचा NDTV मधील 29% टक्के वाटा आपल्या नावे करता आला.

NDTV च्या प्रमोटर्सची प्रतिक्रिया काय?

NDTV च्या प्रमोटर्सनी अदानी यांच्या वरील कृतीविरोधात कायद्याची मदत घेण्याचे संकेत दिले आहेत.

SEBI च्या नियमांनुसार, 15 टक्क्यांपेक्षा शेअर्सची खरेदी ही ओपन ऑफर क्लॉजच्या दिशेने जाते. याचा अर्थ, NDTVचे विद्यमान शेअरधारक अदानी यांना आपला वाटा निर्धारित मूल्याने विकण्याचा पर्याय निवडू शकतात. किंवा त्यांची इच्छा असल्यास ते कायमही ठेवू शकतात.

अदानी यांच्याकडे आता NDTVची 29% मालकी असल्याने ओपन ऑफरची प्रक्रिया त्यांच्यासाठी खुली झाली आहे. त्यामुळे त्यांनी उरलेल्या 26 टक्के वाट्यासाठी ओपन ऑफर दिली आहे.

अदानी यांची ओपन ऑफर नेमकी काय?

अदानी यांनी प्रतिशेअर 294 रुपये इतकी ओपन ऑफर दिली आहे. ही रक्कम NDTV च्या सध्याच्या शेअरच्या किंमतीपेक्षा 20 टक्क्यांनी कमी आहे.

त्यामुळे ही ऑफर शेअरहोल्डर मान्य करण्याची शक्यता कमी आहे. पण जर ओपन ऑफर यशस्वी ठरली तर अदानी यांच्याकडे NDTV चे 55.18 टक्के शेअर येतील. तसं घडल्यास कंपनीवर अदानी यांचं पूर्ण नियंत्रण राहील.

NDTVच्या स्पष्टीकरणाचा अर्थ

NDTVच्या सीईओंनी दिलेलं स्पष्टीकरण सत्य मानलं तर हे प्रकरण बळजबरीचं आहे.

एक लक्षात घ्या, अदानी समूहाकडून घोषणा होण्याच्या एक दिवस आधी एनडीटीव्हीने स्टॉक एक्स्चेंजला लिखित स्वरुपात सांगितले होते की, प्रणय रॉय आणि राधिक रॉय त्यांची होल्डिंग कंपनी असलेल्या आरआरपीआरच्या माध्यमातून राखलेला हिस्सा विकत आहेत का, असा प्रश्न एका वर्तमानपत्राच्या पत्रकाराने त्यांना विचारला.

कंपनीने त्या पत्रकाराला आणि एक्स्चेंजना कळविले की, ही अफवा निराधार आहे आणि राधिक आणि प्रणय रॉय यांनी कंपनीतील हिस्सा विकण्याविषयी वा कंपनीच्या मालकीचा हक्क बदलण्याविषयी कोणशीही काहीही बोलणी केली नाही आणि ना अशी काही बोलणी सुरू आहेत.

या दोघांकडे स्वतंत्रपणे आणि आरआरपीआर होल्डिंगच्या माध्यमातून कंपनीच्या पेडअप कॅपिटलचा एकूण 61.45% हिस्सा आहे.

कंपनी विकल्या जाण्याच्या किंवा त्यातील हिस्सा विकल्या जाण्याच्या प्रकरणांमध्ये अशा प्रकारचा खुलासा करण्यात काहीही नवीन नाही. या संदर्भातील सर्वांत पहिली बातमी स्टॉक एक्स्चेंजचला देण्यात यावी, असा नियम आहे. त्यामुळे ही बोलणी होत असतील तरी या संदर्भात काहीही स्पष्ट उत्तर दिलं जाऊ शकत नाही.

पण बहुतेक प्रकरणांमध्ये कंपन्या म्हणतात की, शेअरबजारातील शक्याशक्यतांवर त्या कोणतेही भाष्य करणार नाहीत. अशा प्रकारे स्पष्ट भाषेत केलेलं खंडन क्वचितच समोर येतं.

पण, असं खंडन केल्याच्या एका दिवसानंतरच अदानी समुहाकडून औपचारिक घोषणा करण्यात आली की, एएमएनएल ही त्यांची कंपनी अप्रत्यक्ष पद्धतीने एनडीटीव्हीमध्ये 29.18% हिस्सा खरेदी करत आहे आणि त्याचप्रमाणे अजून 26% पर्यंत शेअर्स खरेदी करण्यासाठी ओपन ऑफर म्हणजे खुला प्रस्ताव देत आहे.

आरआरपीआर म्हणजे राधिका रॉय प्रणय रॉय म्हणजे कंपनीचे संस्थापक प्रमोटर आहेत.

कंपनीतर्फे जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की, एएमजी मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी असलेल्या व्हीसीपीएलकडे आरआरपीआर होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडचे व्हाउचर्स आहेत आणि त्यांची पूर्ता केल्यावर या उपकंपनीला या कंपनीमध्ये 99.99% हिस्सा मिळू शकतो.

कंपनीने आपल्या या अधिकाराचा वापर करून व्हाउचर्सना 99.5% शेअर्समध्ये परिवर्तीत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच आरआरपीआर होल्डिंग्जवर आता व्हीसीपीएलचं पूर्ण नियंत्रण असेल. त्यांनी 0.49% शेअर्स का सोडले हे समजणे कठीण आहे.

आरआरपीआर होल्डिंग्जकडे एनडीटीव्हीचे 29.18% शेअर्स आहेत. म्हणजे या व्यवहाराने एनडीटीव्हीमधील हा हिस्सा आता अदानी समुहाचा झाला आहे.

आरआरपीआरचा फुल फॉर्म आहे राधिका रॉय प्रणय रॉय. म्हणजे कंपनीचे संस्थापक प्रवर्तक दांपत्य. या व्यतिरिक्त या दोघांकडे प्रत्येकी 16 टक्के हिस्सा आहे.

पण, एनडीटीव्हीच्या व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की, एनडीटीव्ही, राधिका आणि प्रणय यांच्यासाठी आजच्या घटना अनपेक्षित आहेत. हे संपादन त्यांच्या सहमतीविना वा त्यांना माहिती न देता झालेले आहे. याचा आधार 2009-10 मध्ये झालेला एक कर्ज करार आहे.

कंपनीचे असंही म्हणणे आहे की, ती पुढील प्रक्रियेसंदर्भात माहिती गोळा करत आहे आणि त्यात कायदेशीर आणि नियामक पर्यायांचाही समावेश असू शकतो.

रिलायन्सशी संबंध

या प्रकरणात अजून एक पेच आहे. अदानी समूहाने व्हीसीपीएल या नावाच्या कंपनीच्या माध्यमातून एनडीटीव्हीमध्ये हिस्सा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीने 2009-10 मध्ये एनडीटीव्ही वा त्यांच्या प्रवर्तकांना कर्ज दिले होतं.

या कर्जाला जामीन म्हणून आरआरपीआरचा हिस्सा त्या कंपनीकडे गहाण ठेवण्यात आला होता. किंवा हे कर्ज इक्विटीमध्ये बदलण्याचा अधिकार त्यात समाविष्ट होता.

पण, एनडीटीव्ही किंवा त्यांच्या प्रवर्तकांनी अदानी समुहाकडून कोणतंही कर्ज घेतलेलं नव्हतं. जेव्हा या कर्जाचा व्यवहार झाला होता तेव्हा व्हीसीपीएल अंबानी परिवाराशी किंवा रिलायन्स इंडस्ट्रीजशी संबंधित कंपनी होती.

म्हणजे कर्ज अंबानींनी दिलं होतं आणि वसूली करताना अदानी समोर आले. त्यामुळे मंगळवारी जे काही घडले ते अनपेक्षित असल्याचं एनडीटीव्ही सांगत आहे.

बातम्यांमागील बातम्या देणाऱ्या न्यूजलाँड्री या वेबसाइटने 14 जानेवारी 2015 रोजी एक बातमी लिहिली होती. मुकेश अंबानी यांच्या कंपन्या केवल राघव बहल यांच्या नेटवर्क 18 याच कंपनीला नव्हे तर एनडीटीव्हीलाही आपलं कर्जदार करत आहे. याच बातमीमध्ये विश्वप्रधान कमर्शिअल प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यालयाचा पत्ताही नमूद केला होता.

पण, तो नंतर बदलला. पण याच पत्त्यावर सध्या मुंबईत नेटवर्क 18 च्या वाहिन्यांचे कामकाज चालतं. याच पत्त्यावर अजून एका कंपनीचे कामकाज चालतं. या कंपनीचे नाव आहे शिनानो रिटेल प्रायव्हेट लिमिटेड.

या कंपनीचे 100% हिस्सा रिलायन्स इंडस्ट्रिअल इन्व्हेस्टमेंट अँड होल्डिंग्ज लिमिटेडकडे होती. ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचा एक भाग आहे.

रिलायन्स समूहाची एक कंपनी असलेल्या रिलायन्स व्हेंचर्स लिमिटेडने 2009-10 मध्ये शिनानो रिटेलला 403.85 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते.

हे अनसिक्युअर्ड लोन होते. त्याच वर्षी शिनानोने तेवढ्याच रकमेचं कर्ज विश्वप्रधान म्हणजेच व्हीसीपीएलला दिलं. त्याच वर्षी आरआरपीआर होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅलेन्स शीटमध्ये तेवढ्याच रकमेचे कर्ज मिळाल्याची नोंद आहे.

हे कर्ज कुणाकडून मिळाले आहे, याची या ठिकाणी नोंद नाही. पण 2014 मध्ये आयकर विभागाने इतर एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात लिखित जबाब दिला होता की, त्यांनी आरआरपीआर होल्डिंग्जकडे निनावी स्रोतांकडून आलेल्या रकमेची माहिती आरआरपीआर होल्डिंगला मिळाली आहे. याचा आढावा घेतल्यावर हे स्पष्ट होते की, ही रक्कम रिलायन्समधून निघाली आणि शिनानो आणि विश्वप्रधान मार्गे आरआरपीआरपर्यंत पोहोचली.

अदानी समूहाची काय इच्छा आहे?

नेटवर्क-18 ला मिळालेल्या कर्जाचीही अशीच काहीशी कथा आहे. या व्यवहाराने संस्थापक प्रवर्तक राघव बहल यांचा सगळा हिस्सा एका सकाळी अचानक रिलायन्स इंडस्ट्रीजचा झाला. त्या वेळीसुद्धा अशाच प्रकारे कर्ज इक्विटीमध्ये बदलण्यात आलं होतं.

आता तसाच प्रकार एनडीटीव्हीसोबतही होत आहे. विश्वप्रधानची मालकी बदलण्याची बातमी कोणाकोणाकडे होती, हे माहीत नाही.

एनडीटीव्हीचं म्हणणे आहे की, कर्जाला इक्विटीमध्ये बदलण्याचा किंवा वॉरंटची अंमलबजावणी करण्याचा निर्णय एनडीटीव्हीच्या संस्थापकांना माहिती न देता, इच्छेविरुद्ध किंवा कोणत्याही प्रकारची बोलणी न करता घेण्यात आला आहे.

26% हिश्शासाठी विश्वप्रधान, एएमपीएल आणि अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडकडून जी ओपन ऑफर आली आहे, तीसुद्धा औपचारिकताच वाटत आहे. कारण एनडीटीव्हीचा शेअर मंगळवारी 369.75 रुपयांवर बंद झाला आणि ओपन ऑफरचा भाव आहे 294 रुपये. म्हणजे कंपनीला या ओपन ऑफरमधून खूप जास्त शेअरर्स कदाचित मिळणार नाहीत.

असंही होऊ शकतं की, अदानी समूह आरआरपीआर होल्डिंग्जमध्ये 99.5% हिस्सा घेऊनही या व्यवस्थापनाशी तडजोड करून हीच माणसं कंपनी चालवत राहतील हा प्रयत्न करू शकतात. म्हणजे त्यांना केवळ गुंतवणूकदार म्हणूनच कंपनीमध्ये सहभागी होऊ इच्छितात.

पण राघव बहल आणि रिलायन्सच्या व्यवहारातून धडा घ्यायचा झाला तर तो हाच आहे की, अशा प्रकारचा आनंद जास्त काळ टिकणं, जवळजवळ अशक्य आहे.

पण, एनडीटीव्ही आता हे प्रकरण न्यायालय वा नियामकांकडे घेऊन जाईल का? आणि तसे झाले तरी त्यांना कायदेशीर मदत मिळेल का, हेही पाहावं लागेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)