दर्शना पवार : राहुल हांडोरेनं पोलिसांना सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं

- Author, मानसी देशपांडे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Reporting from, पुणे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेतून परिक्षेत्र वन अधिकारी (RFO) पदाची परीक्षा उत्तीर्ण होत, महाराष्ट्रात सहाव्या आलेल्या दर्शना पवारची हत्या झाल्याची घटना नुकतीच घडली.
दर्शना पवारच्या हत्येचं गूढ उलगडलं आहे. दर्शनाच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी तिचा मित्र राहुल हांडोरे याला 21 जून 2023 रोजी रात्री उशिरा मुंबईतून अटक केली.
राहुल सध्या पोलीस कोठडीत असून न्यायालयाने त्याला 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दर्शना आणि राहुल दोघंही 12 जूनपासून बेपत्ता होते.
18 जून रोजी पुण्यातील राजगडाच्या पायथ्याजवळ दर्शनाचा मृतदेह सापडला. पण राहुल मात्र बेपत्ता होता. पोलिसांनी पाच पथकांची नेमणूक करुन त्याचा शोध सुरू केला होता.
अखेर 21 जूनला राहुलला मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्टेशनवरून अटक करण्यात आली. आता दर्शनाच्या हत्या प्रकरणाचं गूढ उलगडू लागलं असून, त्यातील माहितीही समोर येऊ लागलीय.
दर्शना आणि राहुलमध्ये राजगडावर नेमकं काय झालं, याची माहिती बीबीसी मराठीला मिळाली आहे. त्यासंदर्भातील हा सविस्तर वृत्तांत.
12 जून 2023 चा दिवस
पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये 12 जून रोजी सकाळी 8.30 च्या सुमारास राहुल आणि दर्शना दुचाकीवरुन राजगडाकडे जाताना दिसतात, तर 10.30 च्या सुमारास राहुल एकटाच परत येताना दिसतो.
त्यानंतर राहुल बेपत्ता झाला आणि 18 जून रोजी दर्शनाचा मृतदेह राजगड्याच्या पायथ्याजवळ सापडला.
बीबीसीला मिळालेल्या माहितीनुसार, राजगड्याच्या पायथ्याजवळ राहुल आणि दर्शनामध्ये लग्नाच्या मुद्द्यावरून वाद झाला आणि त्यानंतर राहुलने दर्शनावर धारदार शस्त्राने वार केले.
"लग्न या विषयावरुन त्यांच्यामध्ये राजगडाजवळ वाद झाला. त्यांच्यात झटापट झाली. त्यानंतर त्याने कटर काढलं आणि त्याने तिच्यावर वार केले. त्यानंतर तिच्यावर दगडाने हल्ला केला," अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध करण्याच्या अटीवर बीबीसी मराठीला दिली.
पोलिसांच्या मते, "दर्शनाची हत्या करण्याच्या उद्देशानेच राजगडावर गेल्याचं राहुल मान्य करत नाहीय. तिथे झालेल्या वादामुळे राग आल्यामुळे त्याच्या हातून हे कृत्य घडल्याचं राहुलने सांगितलं."
दर्शना पवार : MPSC परीक्षेत राज्यात सहावी
26 वर्षीय दर्शना पवार हिचा मृतदेह पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील राजगडाच्या पायथ्याजवळ 18 जून 2023 रोजी सापडला होता.
दर्शना पवार मूळची अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी होती.
दर्शना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून परिक्षेत्र वन अधिकारी (RFO) पदाची परीक्षा उत्तीर्ण होत महाराष्ट्रात सहावी आली होती.
परीक्षेत पास झाल्यानंतर ती सत्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात आली होती. पण 10 जूनपासून तिचा कुटुंबीयांशी संपर्क तुटला.
अखेर तिची राजगड किल्ल्यावर हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं.
यानंतर फरार असलेला तिचा मित्र राहुल हांडोरे याला चार दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली.

पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?
बेपत्ता झाल्यावर तब्बल सहा ते सात दिवसांनंतर दर्शनाचा मृतदेह सापडला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वेल्हे तालुक्यातील गुंजवणी गावातील स्थानिकांमध्ये काहीतरी कुजल्यासारखा वास येत असल्याची कुजबूज सुरू झाली. स्थानिकांनी पोलीस पाटलांनी कळवलं आणि त्यानंतर ही माहिती वेल्हे पोलिसांपर्यंत आली.
जिथून वास येत होता, तिथे शोध घेतल्यावर एक मृतदेह सापडला.
वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक मनोज पवार यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, “रविवारी (18 जून) राजगडाच्या पायथ्याशी कुजलेला वास येत असल्याची माहिती मिळाली. शोध घेतल्यावर एक मृतदेह सापडला. मृतदेहाजवळ काही वस्तूही सापडल्या. त्यामध्ये फोन, बॅग अशा गोष्टींचा समावेश होता. सिंहगड पोलीस हद्दीत एक मिसिंग पर्सन तक्रार दाखल होती. त्यावरुन नातेवाईकांशी संपर्क साधला त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली."
वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी सांगितलं की, दर्शना पवार यांच्या मृतदेहाचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला आहे.
मनोज पवार यांनी तेव्हा दिलेल्या माहितीनुसार, "पोस्टमार्टममध्ये डोक्यावर जखम असल्याचे पुरावे समोर आले आहेत. तसंच, शरीरावर जखमाही आढळल्या आहेत. या प्राथमिक अहवालावरुन तिची हत्या झाली असावी, असं स्पष्ट होतंय. त्यामुळे आम्ही अज्ञात व्यक्तीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे."
MPSC ची तयारी करणारा राहुल हांडोरे
दर्शना जशी एमपीएससीची तयारी करत होती, तसा 28 वर्षांचा राहुलही एमपीएससीची तयारी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तो गेली 4-5 वर्ष एमपीएससीची तयारी करत होता.
राहुल त्याच्या लहान भावाबरोबर पुण्यातील कर्वेनगर भागात भाड्याच्या खोलीत तो राहत होता. त्याने बीएस्सी पदवी घेतली होती.
एबीपी माझानं दिलेल्या वृत्तानुसार, राहुल हा मूळचा नाशिक जिल्हातल्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शाहवाडी गावाचा आहे. त्याच्या घरची परिस्थिती सर्वसामान्य असून त्याचे वडील पेपर वाटपाचं काम करतात.

राहुल गेल्या काही वर्षांपासून पुण्यात त्याच्या भावासोबत राहत होता. त्याचा भाऊ सुद्धा जुजबी काम करुन रोजगार मिळवत होता.
डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत राहुल पैसे कमवायचा
पुणे पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आरोपी राहुल हासुद्धा MPSC ची तयारी करत होता. पुण्यात गेल्या काही वर्षांपासून तो पार्टटाईम जॉब करून परीक्षा देत होता. सध्या तो वेगवेगळ्या फूड डिलिव्हरी सर्व्हिसेससाठी पार्टटाईम जॉब करत होता."
राहुल एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी स्थानिक अभ्यासिकांमध्ये जायचा. त्याला काही मोजके मित्र होते. तो डिलिव्हरीचे काम सांभाळत आपल्या अभ्यासात व्यस्त असायचा.
2023 सालची एमपीएससीची प्रिलिमिनरी परिक्षा त्याने दिली होती. या परीक्षेत यश मिळण्याची त्याला अपेक्षा होती.
राहुललं असं पकडलं
आरोपी असलेल्या राहुल हांडोरेला पोलिसांनी 21 जूनला रात्री उशीरा मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्टेशनवरून अटक केली.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल म्हणाले, "आरोपी राहुल फरार झाल्यानंतर सतत रेल्वेने फिरून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करत होता.
रेल्वेने तो पश्चिम बंगालसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरला. अधून मधून घरच्यांशी तो संपर्क साधत होता. अखेर मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्थानकावर त्याला अटक करण्यात आली."
दर्शना आणि राहुलची ओळख कशी झाली?
पत्रकार परिषदेत पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दर्शना आणि राहुल यांची लहानपणापासून ओळख आहे.
दर्शनाच्या मामाचं घर आणि राहुलचं घर हे समोरासमोर असल्याने त्यांची पूर्वीपासून ओळख होती. त्यानंतर ते पुण्यातही संपर्कात असावेत असा अंदाज आहे.
पण दर्शनाच्या आईने माध्यमांशी बोलताना मात्र राहुल आणि दर्शनाची मैत्री असल्याचं नाकारलं आहे.
"दोघांमध्ये साधी मैत्रीही नव्हती. ती फक्त अभ्यासाविषयी त्याच्याशी दोन शब्द बोलायची. त्याने तिचा घात केला," असं दर्शनाच्या आईने म्हटलं.

कुटुंबीयांनी काय म्हटलं?
राहुलच्या अटकेची माहिती मिळताच यावर दर्शनाच्या आईची प्रतिक्रिया समोर आली आहे.
"माझी मुलगी तर गेली, पण इतर 10 मुलींचं असं होऊ नये," असं दर्शनाच्या आईने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं.
दर्शनाची आई म्हणाली, "माझ्या मुलीची हत्या त्याने केली. तो आता राहिलाच नाही पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. माझी मुलगी तर गेली, इतर 10 मुलींचं असं होऊ नये. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षाच व्हावी.
"दोघांमध्ये साधी मैत्रीही नव्हती. ती फक्त अभ्यासाविषयी त्याच्याशी दोन शब्द बोलायची. त्याने तिचा घात केला," असं आईने म्हटलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








