दिव्या देशमुख : 19 व्या वर्षी बुद्धीबळ विश्वचषक जिंकणाऱ्या दिव्याचा प्रवास

नागपूरची इंटरनॅशनल मास्टर दिव्या देशमुखनं फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकून विश्वचषक आपल्या नावावर केला आहे.

भारताच्याच कोनेरू हंपीला पराभूत करत तिने हा किताब आपल्या नावावर केला आहे.

तिने गेल्या 23 जुलैला फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक दिली होती. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.

जॉर्जियामधील बाटुमी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताच्याच कोनेरू हंपीने विजय मिळवला होता. त्यामुळे, या अंतिम लढतीत दोन्ही खेळाडू भारताच्याच होत्या.

उपांत्य लढतीतल्या दुसऱ्या फेरीत दिव्यानं चीनची माजी वर्ल्ड चॅम्पियन झोंगयी टॅन हिला हरवत फायनलमध्ये प्रवेश केला होता.

उपांत्य फेरीचा पहिला डाव बरोबरीत सुटल्यावर दिव्यानं पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना दबावाखाली न येता शानदार कामगिरी बजावली होती.

याबरोबरच दिव्या आता 2026 मध्ये होणाऱ्या महिला कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे तसंच तिनं आपला पहिला ग्रँडमास्टर नॉर्मही मिळवला आहे.

'अजून बरंच काही साध्य करायचं आहे'

विजयानंतर दिव्या देशमुखनं दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, "मला आता बोलणं कठीण आहे. अजून बरंच काही साध्य करायचं आहे, ही फक्त सुरुवात आहे."

खरं तर बुद्धिबळाच्या पटावर भारतानं या विजयासह आणखी एक इतिहास रचला आहे.

FIDE वर्ल्ड कप फायनलमध्ये दिव्या देशमुख आणि कोनेरू हंपी या दोन भारतीय बुद्धिबळपटूंमध्ये लढत झाली.

थोडक्यात, कोणीही जिंकलं तरी विश्वचषक भारतातच येणार, हे आधीपासूनच निश्चित झालेलं होतं.

दोघींमध्ये शनिवारी (26 जुलै) रात्री झालेला पहिला गेम ड्रॉ राहिल्यानंतर कालचा (27 जुलै) दुसरा गेमदेखील अत्यंत महत्त्वाचा ठरला.

दिव्या आणि हंपी, या दोघींनाही कँडिडेट स्पर्धेत खेळण्याची आणि तिथून जागतिक विजेतेपद स्पर्धेचं तिकिट मिळवण्याची संधी मिळाली होती.

विशेष म्हणजे या विश्वचषक स्पर्धेत हरिका द्रोणावली आणि आर वैशाली यांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

गेल्या काही वर्षांत सातत्यानं भारतीय बुद्धिबळपटू अशी नवी शिखरं गाठत आहेत.

'मी आणखी चांगलं खेळू शकले असते...'

उपांत्य फेरीत विजय मिळवल्यानंतर "मी यापेक्षा खूप चांगलं खेळू शकले असते," असं दिव्यानं सांगितलं होतं.

"एका टप्प्यावर मी जिंकत होते, पण नंतर सगळंच जरा गुंतागुंतीचं झालं. माझ्याकडून मधल्या टप्प्यात थोड्या चुका झाल्या. ही लढत मी सहज जिंकायला हवी होती. परंतु, तिने इतका जोरदार प्रतिकार केला, की मला वाटलं हा डाव आता बरोबरीत सुटेल. शेवटी नशीब माझ्या बाजूने होतं," असंही ती म्हणाली होती.

"मला आता झोपेची खूपच गरज आहे," असं हसत हसत दिव्याने सांगितलं. "गेल्या काही दिवसांपासून मी खूप तणावात होते. आता मला फक्त झोप आणि जेवण हवं आहे."

या स्पर्धेत दिव्यानं चीनची दुसरी मानांकित झू जिनरवर मात केली होती आणि भारताच्या हरिका द्रोणावलीला उपांत्यपूर्व फेरीत हरवलं होतं.

दिव्या देशमुख नेमकी कोण आहे?

दिव्या देशमुख ही मूळची नागपूरची असून तिचा जन्म 9 डिसेंबर 2005 ला झाला. तिचे वडील जितेंद्र आणि आई नम्रता हे दोघेही डॉक्टर आहेत. ती भवन्स सिव्हिल लाइन्स शाळेची विद्यार्थिनी असून लहानपणापासूनच ती बुद्धिबळ खेळण्यात पारंगत आहे.

इंटरनॅशनल मास्टर नॉर्म मिळवलेली दिव्या ऑगस्ट (2023) महिन्यात ज्युनिअर खेळाडूंमध्ये मुलींमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू बनली. त्यावेळी तिची रेटिंग 2472 झाली होती.

दिव्याला 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर, 2021 मध्ये महिला ग्रँडमास्टर, 2018 मध्ये महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आणि 2013 मध्ये महिला FIDE म्हणजेच इंटरनॅशनल चेस फेडरेशनकडून दिली जाणारी मास्टर पदवी मिळाली आहे.

दिव्याला बुद्धिबळ खेळायची आवड नेमकी कशी निर्माण झाली? याबद्दल दिव्याची आई नम्रता देशमुख यांनी 'बीबीसी मराठी'ला माहिती दिली.

नम्रता सांगतात, "दिव्या पाच वर्षांची होती तेव्हापासूनच बुद्धिबळ खेळते. पण, तिला सवय लावणं हे काही सोप्पं काम नव्हतं. दिव्याची मोठी बहिण बॅडमिंटन खेळायला जायची. त्यामुळे दिव्याही बॅडमिंटन खेळायचा प्रयत्न करायची. पण, रॅकेट तिच्यापेक्षा मोठं होतं. तिला ते सांभाळता येत नसत. त्यामुळे तिथेच जवळपास असलेल्या बुद्धिबळ अकदामीत दिव्याला प्रवेश दिला.

"बुद्धिबळ हा एकाग्रतेने खेळण्याचा खेळ आहे. त्यामुळे अगदी लहान वयात तिला हा खेळ खेळण्यासाठी खूप प्रोत्साहित करावं लागलं. पण, तिला हळूहळू सवय लागली आणि आता ती जागतिक स्तरावर पोहोचली त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)