कोनेरु की दिव्या? पहिला गेम ड्रॉ झाल्यानंतर उत्सुकता वाढली, भारतीय महिलांचं बुद्धिबळात वर्चस्व कसं निर्माण झालं?

    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

बुद्धिबळाच्या पटावर भारतानं आणखी एक इतिहास रचला आहे. FIDE वर्ल्ड कप फायनलमध्ये दिव्या देशमुख आणि कोनेरू हंपी या दोन भारतीय बुद्धिबळपटूंमध्ये लढत होते आहे. म्हणजे कोणीही जिंकलं तरी विश्वचषक भारतातच येणार आहे.

दोघींमध्ये शनिवारी रात्री झालेला पहिला गेम ड्रॉ राहिल्यानंतर आता आजचा दुसरा गेम अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. आजही बरोबरीत सुटल्यास सोमवारी टायब्रेकरने विजेती निवडली जाईल.

या पार्श्वभूमीवर भारतीय महिलांनी बुद्धिबळात कसं वर्चस्व मिळवलं हे जाणून घेऊ.

दिव्या आणि हंपी, या दोघींनाही कँडिडेट स्पर्धेत खेळण्याची आणि तिथून जागतिक विजेतेपद स्पर्धेचं तिकिट मिळवण्याची संधी मिळाली आहे.

विशेष म्हणजे या विश्वचषक स्पर्धेत हरिका द्रोणावली आणि आर वैशाली यांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. गेल्या काही वर्षांत सातत्यानं भारतीय बुद्धिबळपटू अशी नवी शिखरं गाठत आहेत.

2024 साली भारताच्या डी गुकेश वर्ल्ड चॅम्पियन म्हणजे जगज्जेता बनला होता तर 2023 मध्ये प्रज्ञानानंदनं वर्ल्ड कपचं उपविजेतेपद मिळवलं होतं. 2024 सालीच 45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्येही भारतानं खुल्या आणि महिला अशा दोन्ही विभागात सुवर्णपदकं मिळवली होती.

इतकंच नाही, तर क्रिकेडवेड्या भारतात आता बुद्धिबळपटूंना प्रोत्साहन देणं, त्यांचं कौतुक करणं, सोशल मीडियावर त्यांच्याविषयी चर्चा रंगणं अशा गोष्टी अधिकाधिक घडू लागल्या आहेत.

"भारत ज्या रितीनं ऑलिम्पियाड जिंकला तेव्हाच बुद्धिबळाच्या पटावरच आपलं निर्वाद वर्चस्व सिद्ध केलं होतं. सध्याचा वर्ल्ड चॅम्पियन भारताचा आहे. आता महिला वर्ल्डकपमध्ये दोन्ही भारतीय आहेत. दिवसेंदिवस भारताचं बुद्धिबळ खेळातील वर्चस्व वाढत आहे," असं ज्येष्ठ बुद्धिबळपटू आणि विमेन इंटरनॅशनल मास्टर भाग्यश्री ठिपसे सांगतात.

भारतीय महिलांचंही बुद्धिबळात वर्चस्व

2002 साली अवघ्या 15 वर्षांची असताना हंपी भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर बनली.

भारताकडे आता हम्पी, हरीका, तानिया सचदेव या खूप अनुभवी खेळाडूंसोबतच दिव्या, वैशाली, वंतिका अग्रवाल या तरुण खेळाडू आहेत. ऑलिम्पियाडमध्येही त्यांनी चांगली कामगिरी केली आणि त्यांचं रेटींगही सुधारलं आहे.

त्यामुळेच बुद्धिबळाच्या पटावर भारतीय पुरुषांप्रमाणेच भारतीय महिलांचंही देखील वर्चस्व स्थापित होत असल्याचं ठिपसे यांना वाटतं.

त्या सांगतात, "महिलांच्या बाबतीत बुद्धिबळाच्या पटावर चीनचं वर्चस्व होतं. पण, आता ते भारतानं मोडीत काढलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण, दिव्या आणि हम्पी यांनी सेमिफायनलमध्ये चीनच्या दोन्ही खेळाडूंना हरवलं आहे."

हम्पी किंवा दिव्या दोघींपैकी कोणीतरी चांगला खेळ खेळून वर्ल्ड चॅम्पियन होतील हे निश्चित आहे. पण, याचवेळी आणखी महिला खेळाडूंनी पुढे यायला हवं असं आवाहनही त्या करतात.

"दिव्या, हम्पी या सगळ्या मुली वयाच्या पाचव्या वर्षांपासून खेळत आल्या. तेव्हा कुठं आता त्यांना यश मिळताना दिसतंय. त्यांची इतक्या वर्षांची मेहनत, आई-वडिलांचे त्याग, मुलांनी केलेले कष्ट त्यामुळे त्या या स्तरावर येऊन पोहोचल्या आहेत.

"आता आणखी महिला खेळाडू पुढे यायला हवेत. जेव्हा खेळाडूंची संख्या जास्त असेल तेव्हा आपण आपला बुद्धिबळाचा वारसा पुढे नेऊ शकतो," असंही त्या म्हणाल्या.

दक्षिण भारतात बुद्धिबळाचा प्रसार

बुद्धिबळाचा जन्म भारतात झाला, पण आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धात्मक बुद्धिबळामध्ये मात्र रशिया, युरोप, अमेरिकेचं वर्चस्व असायचं.

ते चित्र विश्वनाथ आनंदनं बदललं जगज्जेता बनून भारतही बुद्धिबळाच्या पटावर चांगली कामगिरी करू शकतो हे दाखवून दिलं होतं. त्यानंतर स्पर्धात्मक बुद्धिबळाकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलत गेला.

आनंदकडून प्रेरणा घेत भारतीय बुद्धिबळपटूंची एक अख्खी पिढी उभी राहिली. विश्वविजेता गुकेशही त्यापैकीच एक आहे.

दक्षिणतेल्या राज्यांनी या खेळाला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. त्यामुळे दक्षिणेतील बुद्धिबळपटू जास्त दिसतात. गुकेश, आर प्रज्ञानंद, वैशाली, हम्पी, हरीका यांसारखे मोठे खेळाडू हे दक्षिणेतील आहेत.

विशेषतः तामिळनाडूसारख्या राज्यात शाळाशाळांमध्ये बुद्धिबळाचा प्रसार झाला आहे. पालकही मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन देताना दिसतात.

दिव्याच्या ओपनिंगमुळे हम्पीला ताण येणार तर नाही ना?

"हम्पी 38 वर्षांची खेळाडू आहे. त्यामुळे तिच्याकडे अनुभव जास्त आहे. तसेच दिव्या ही हम्पीपेक्षा निम्म्या वयाची आहे. तिच्याकडे अनुभव कमी आहे. पण, तिनं कमी वयात खूप स्पर्धा जिंकल्या आहेत."

"आता या दोघींमध्ये होणारी फायनलमध्ये फक्त दिव्याची ओपनिंग ही हम्पीसाठी चिंताजनक ठरू शकते अशी भीती" भाग्यश्री ठिपसे यांना वाटते.

त्या म्हणतात, "हम्पी ही अनुभवी, शांत खेळाडू आहे. कारण, बुद्धीबळ खेळायला ज्ञान आणि क्षमता महत्वाची नाही, तर मानसिक स्थिती महत्वाची आहे. हम्पी खेळताना फार नियंत्रित असते."

पण, "यावेळी दिव्या तुलनेत कमी पडली असं वाटत नाही. तिनं खंबीरपणे तिची कामगिरी दाखवली आहे. दिव्यानं या वर्ल्डकपमध्ये खेळताना प्रत्येकवेळी वेगवेगळ्या प्रकारची ओपनिंग वापरली आहे. ओपनिंग खेळायला तिच्याकडे खूप सरप्राईज्ड एलिमेंट आहेत. त्यामुळे असं सरप्राईज्ड ओपनिंग समोर आलं की सुरुवातीला ताण येतो."

"दिव्याच्या अशा ओपनिंगमुळे हम्पीला ताण तर येणार नाही अशी भीती वाटते. पण, हम्पीचा अनुभव, तिचं स्वतःवरचं नियंत्रण चांगलं आहे. दिव्या डायनॅमिक खेळते, तर हम्पी सॉलिड खेळते. दोघींचेही खेळ बघता नक्की फायनलमध्ये काय होईल हे आता सांगता येणं कठीण आहे."

"दिव्या आतापर्यंतच्या खेळामध्ये जिंकतच आली आहे. तिनं पटापट सगळे टप्पे पार केले आहेत. आताच झालेल्या फिडेच्या खासगी टूर्नामेंटमध्येही तिनं सर्वात जास्त रेटींग असलेल्या खेळाडूला हरवलं आहे. तसेच हम्पीनं सुद्धा दिव्याचं कौतुक केलं आहे. त्यामुळे दिव्यामध्ये आत्मविश्वास अधिक दिसतो", असंही त्या म्हणतात.

माहिती आणि सुविधांमध्ये सुधारणा

1980-90 च्या दशकात भारतात कोचिंगचा आणि माहितीचाही अभाव होता, असं ठिपसे नमूद करतात.

"तेव्हाची आणि आताची तुलना होऊ शकत नाही. कारण, दोन्ही काळातील आव्हानं वेगवेगळी आहेत. आधी बुद्धिबळाच्या इतक्या स्पर्धा व्हायच्या नाहीत. भाग घ्यायची संधी मिळायची नाही. आधी चेस लिटरेचर मिळायचं नाही.

"आम्ही आपापसात बोलून काही गोष्टी सोडवत होतो. पुस्तकातून गेम बघून डेटा तयार करणं अवघड होतं. तेव्हा कोचिंग पण नव्हतं. तेव्हाचे खेळाडू स्वतः शिकले, खेळले आणि आता त्यांनी कोचिंग सुरू केली."

आता सगळंच बदललं आहे. आता इंटरनेट, इंजिन, कॉम्पुटर यामुळे बुद्धिबळ खेळावर एक वेगळा परिणाम झाला आहे, असं त्या सांगतात.

"आता मोठ्या प्रमाणात डेटा उपलब्ध आहे. दर आठवड्याला तीन हजार गेम मिळतात. हे गेम सगळ्यांना खेळायला उपलब्ध असतात. पण, आताच्या परिस्थितीनुसार आव्हानंही वेगळी आहेत.

"इंजिन जेव्हा ही बेस्ट मूव्ह आहे असं सांगतं तेव्हा ती का आहे याचं अनालिसिस करता आलं पाहिजे. कोणता गेम योग्य आहे यासाठी तितका वेळ देऊन त्याचं अनालिसिस करता आलं पाहिजे."

कोव्हिडच्या काळात खेळाचा प्रसार

कोव्हिड लॉकडाऊनपासून अधिक खेळाडू बुद्धिबळाकडे आकर्षित होताना दिसले.

भाग्यश्री ठिपसे सांगतात, "लोकांना घरबसल्या करता येण्यासारखी ही ॲक्टीव्हिटी होती. यामध्ये खेळ खेळता येत होता, शिकता येत होतं. आपण स्वतःचं मनोरंजनसुद्धा करू शकत होतो.

"इतर खेळ खेळायला मैदानात जावं लागतं. पण, बुद्धिबळ ऑनलाईन सहज खेळता येतो. त्यामुळे कोव्हिडच्या काळात बुद्धीबळाचा प्रचार प्रसार झाला. नव्यानं खेळाडू या खेळाकडे आकर्षित झाले. आता

"ऑनलाईन पोर्टल्स जिथं जाऊन तुम्ही खेळू शकता. विदेशी खेळाडूसोबत तुम्ही खेळू शकता."

सरकार आणि स्पॉन्सर्सची भूमिका

बुद्धिबळपटूंना आधी सरकारी पातळीवरूनही फारसं सहाय्य मिळू शकत नसे, असं भाग्यश्री सांगतात.

"परदेशात खेळायला जायचं म्हटलं तर विमानाचा खर्च मिळाला तर मिळायचा नाहीतर तो पण स्वतःच्या खिशातून करायला लागत होता. तुम्ही स्पर्धा खेळताना आर्थिक पाठबळ मिळणं गरजेचं असतं.

आता परिस्थिती सुधारली असली, तरी आणखी बदल होण्याची गरज आहे, असं त्या सांगतात.

"खेळाडूंना आकर्षित करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पॉन्सरशीप मिळायला हवी, सरकारनं त्यांच्या कोचिंगसाठी खर्च करायला हवा, असंही त्या म्हणतात."

पुरुष खेळाडूपैकी गुकेशला स्पॉन्सरशीप मिळाली आहे. पण, महिला खेळाडूंना स्पॉन्सरशीपचा अभाव आहे, याकडे त्या लक्ष वेधतात.

"महिला बुद्धिबळपटूंना जास्तीत जास्त स्पॉन्सरशिप मिळायला हवी. सरकारनं दिव्याच्या खेळाची दखल घेऊन तिला सुद्धा आर्थिक मदत करावी. कारण, ती फक्त 19 वर्षाची आहे. अजून बराच काळ ती बुद्धीबळाच्या पटावर कामगिरी करणार आहे. ती वर्ल्ड चॅम्पियन होऊ शकते", असंही त्या सांगतात.

जमेची बाजू म्हणजे गुकेश, दिव्या, प्रज्ञानानंद, वैशाली या सर्वांनी अगदी तरुण वयात हे यश कमावलं आहे. त्यामुळे ते पुढची अनेक वर्ष बुद्धिबळाच्या पटावर भारताचा ध्वज फडकावत राहतील असं भाग्यश्री ठिपसे यांना वाटतं.

त्या सांगतात, "सगळ्या मोठ्या खेळाडूंच्या रेटिंगची तुलना केली तर भारताचे खेळाडू चांगले आहेत. इतर देशातील खेळाडूं वयानं थोडे मोठे आहेत. पण, आपले सगळे खेळाडू हे तरुण आहेत. पुढची अनेक वर्ष बुद्धीबळाच्या पटावर भारताचं नाव गाजवणार आहेत."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)