You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महिला बुद्धिबळ वर्ल्ड कपची विजेती ठरलेली दिव्या देशमुख कोण आहे?
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
नागपूरची इंटरनॅशनल मास्टर दिव्या देशमुखनं फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकून विश्वचषक आपल्या नावावर केला आहे.
भारताच्याच कोनेरू हंपीला पराभूत करत तिने हा किताब आपल्या नावावर केला आहे.
तिने गेल्या 23 जुलैला फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक दिली होती. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.
जॉर्जियामधील बाटुमी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताच्याच कोनेरू हंपीने विजय मिळवला होता. त्यामुळे, या अंतिम लढतीत दोन्ही खेळाडू भारताच्याच होत्या.
उपांत्य लढतीतल्या दुसऱ्या फेरीत दिव्यानं चीनची माजी वर्ल्ड चॅम्पियन झोंगयी टॅन हिला हरवत फायनलमध्ये प्रवेश केला होता.
उपांत्य फेरीचा पहिला डाव बरोबरीत सुटल्यावर दिव्यानं पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना दबावाखाली न येता शानदार कामगिरी बजावली होती.
याबरोबरच दिव्या आता 2026 मध्ये होणाऱ्या महिला कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे तसंच तिनं आपला पहिला ग्रँडमास्टर नॉर्मही मिळवला आहे.
दिव्या देशमुख नेमकी कोण आहे?
दिव्या देशमुख ही मूळची नागपूरची असून तिचा जन्म 9 डिसेंबर 2005 ला झाला. तिचे वडील जितेंद्र आणि आई नम्रता हे दोघेही डॉक्टर आहेत. ती भवन्स सिव्हिल लाइन्स शाळेची विद्यार्थिनी असून लहानपणापासूनच ती बुद्धिबळ खेळण्यात पारंगत आहे.
इंटरनॅशनल मास्टर नॉर्म मिळवलेली दिव्या ऑगस्ट (2023) महिन्यात ज्युनिअर खेळाडूंमध्ये मुलींमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू बनली. त्यावेळी तिची रेटिंग 2472 झाली होती.
दिव्याला 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर, 2021 मध्ये महिला ग्रँडमास्टर, 2018 मध्ये महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आणि 2013 मध्ये महिला FIDE म्हणजेच इंटरनॅशनल चेस फेडरेशनकडून दिली जाणारी मास्टर पदवी मिळाली आहे.
दिव्याला बुद्धिबळ खेळायची आवड नेमकी कशी निर्माण झाली? याबद्दल दिव्याची आई नम्रता देशमुख यांनी 'बीबीसी मराठी'ला माहिती दिली.
नम्रता सांगतात, "दिव्या पाच वर्षांची होती तेव्हापासूनच बुद्धिबळ खेळते. पण, तिला सवय लावणं हे काही सोप्पं काम नव्हतं. दिव्याची मोठी बहिण बॅडमिंटन खेळायला जायची. त्यामुळे दिव्याही बॅडमिंटन खेळायचा प्रयत्न करायची. पण, रॅकेट तिच्यापेक्षा मोठं होतं. तिला ते सांभाळता येत नसत. त्यामुळे तिथेच जवळपास असलेल्या बुद्धिबळ अकदामीत दिव्याला प्रवेश दिला.
"बुद्धिबळ हा एकाग्रतेने खेळण्याचा खेळ आहे. त्यामुळे अगदी लहान वयात तिला हा खेळ खेळण्यासाठी खूप प्रोत्साहित करावं लागलं. पण, तिला हळूहळू सवय लागली आणि आता ती जागतिक स्तरावर पोहोचली त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो."
'खेळापेक्षा कपड्यांकडे लक्ष दिलं जातं'
दिव्यानं काही महिन्यांपूर्वीच खेळात तिला आलेला अनुभव सांगितला होता. तिनं नेदरलँडमध्ये झालेल्या टाटा स्टिल मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेबद्दल इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली होती. यात तिनं प्रेक्षकांकडून तिला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल लिहिलं होतं.
प्रेक्षक आमचा खेळ गांभीर्यानं घेत नसून महिला खेळाडूंच्या बाबतीत प्रेक्षक कसे वागतात हे तिनं सांगितलं होतं. तिनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, "पुरुष खेळाडू खेळतात तेव्हा त्यांच्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचं काम प्रेक्षक करत होते. पण, महिला खेळाडू खेळत होते तेव्हा बहुतांश प्रेक्षक मी कशी दिसते? मी कपडे कोणते घातले आहेत? मी केस बांधले आहेत का? मी कशी वावरते? याची चर्चा करत होते."
तिनं पुढे म्हटलं होतं, "मी बुद्धिबळ कशी खेळत होते, यासोबत त्या प्रेक्षकांना काहीही देणं-घेणं नव्हतं. मी जेव्हा मुलाखत देत होते तेव्हाही मी पाहिलं की लोक माझ्या खेळाबद्दल जाणून न घेता माझ्या शरीराकडे, माझ्या कपड्यांकडे, केसांकडे पाहत होते.
"मी खेळ कसा खेळले आणि मला काय अडचणी आल्या हे जाणून घेणाऱ्यांची संख्या खूपच कमी होती."
या पोस्टची चर्चा झाल्यानंतर तिनं ती पोस्ट इन्स्टाग्रामवरून हटवली होती.
दिव्याची आतापर्यंतची दमदार कामगिरी
दिव्याने मोठ्या स्पर्धांमध्ये नेहमीच चमकदार कामगिरी केली आहे. तिने तीन बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये वैयक्तिक सुवर्णपदकं जिंकली.
त्याशिवाय आशियाई अजिंक्यपद, वर्ल्ड युथ आणि वर्ल्ड ज्युनियर स्पर्धांमध्येही तिने अनेक जेतेपदे मिळवली आहेत.
दिव्यानं 2023 मध्ये अल्माटी येथे झालेली आशियाई महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकली होती.
त्याचबरोबर टाटा स्टील इंडिया आणि शारजा चॅलेंजर्ससारख्या रॅपिड स्पर्धांतील तिच्या यशस्वी कामगिरीमुळे ती विविध टाइम फॉरमॅटमध्येही तितकीच सक्षम असल्याचं दिसून आलं आहे.
तिने 2024 मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या 45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. वर्ल्ड टीम रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धेच्या ब्लिट्झ विभागात तिचा परफॉर्मन्स रेटिंग 2600 पेक्षा जास्त होता.
2012 मध्ये दिव्याने आपलं पहिलं राष्ट्रीय जेतेपद जिंकत अंडर-7 चॅम्पियनशिप जिंकली. त्यानंतर 2014 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील डर्बनमध्ये अंडर-10 आणि 2017 मध्ये ब्राझीलमध्ये अंडर-12 वर्ल्ड युथ टायटलवरही तिने आपलं नाव कोरलं.
दिव्या 2021 मध्ये वुमन ग्रँडमास्टर झाली. ती विदर्भातील पहिली आणि भारतातील 22वी महिला ग्रँडमास्टर ठरली.
2023 मध्ये दिव्या देशमुख इंटरनॅशनल मास्टर झाली. त्यानंतर 2024 मध्ये जगातील नंबर एक अंडर-20 महिला खेळाडू म्हणून तिने वर्ल्ड ज्युनियर गर्ल्स अंडर-20 चॅम्पियनशिप जिंकली. तिने जबरदस्त खेळ करत 11 पैकी 10 गुण मिळवत ही स्पर्धा जिंकली.
2024मध्ये ऑलिम्पियाडमधील महिलांच्या स्पर्धेत सर्व 11 डाव खेळलेली दिव्या ही एकमेव भारतीय होती.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)