'बेजबाबदार आई' म्हणून सोशल मीडियावर ट्रोलिंग, 33 वर्षांच्या आईची आत्महत्या; नेमकं काय घडलं?

राम्या यांचं बाळ पडल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, राम्या यांचं बाळ पडल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हीडिओवरील कमेंट्समुळे 33 वर्षांच्या राम्याला प्रचंड निराश केलं...इतकं की त्यांनी आपलं आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.

राम्या यांच्या हातून त्यांची नऊ महिन्यांची मुलगी चुकून खाली पडली, काही लोकांनी बाळाला वाचवलं. पण तो व्हीडिओ व्हायरल झाला आणि त्यावर अनेकांनी कमेंट्स करायला सुरूवात केली.

या सगळ्या कमेंट्स इतक्या नकारात्मक होत्या की, राम्या यांनी आपलं आयुष्यच संपवलं.

28 एप्रिल राम्या त्यांच्या मुलीसोबत खेळत होत्या. त्यावेळी चुकून त्यांची मुलगी चौथ्या मजल्यावरच्या बाल्कनीतून ग्राउंड फ्लोअरवच्या सनशेडवर पडली. सुदैवाने, या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लोकांनी तातडीने हालचाली केल्या आणि मुलीला वाचवलं.

हाच व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि ‘आईच्या हलगर्जीपणामुळे बाळ जवळजवळ मृत्यूच्या दारात पोहोचलं’ अशा आशयाच्या कमेंट्स अनेकांनी केल्या.

ती आपल्या बाळाला कसं वाढवायचं याची समज नसलेली आई आहे आणि बाळाविषयीचे वर्तन बेजबाबदारपणाचे आहे, असं म्हणत राम्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं.

हे प्रकरण इथेच थांबलं नाही. अगदी टीव्ही चॅनेल्सवरच्या चर्चेतही हा विषय आला. काही जणांनी अशा पालकांना अटक केली जावी, असंही म्हटलं.

राम्या यांच्या पालकांनी सांगितलं की, मुलीच्या जन्मानंतर त्या नैराश्याचा (पोस्ट पार्टम डिप्रेशन) सामना करत होत्या.

“आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर माझी मुलगी नैराश्यात होती.”

राम्याचे वडील वासुदेवन यांनी सांगितलं की, “दबावामुळे ती कोणाशीही बोलत नव्हती.”

पोस्टपार्टम डिप्रेशन हा नवमातांमध्ये दिसणारा मानसिक आजार आहे. यामध्ये तुम्हाला भास होतात, चिडचिड होते, रडू येतं, राग येतो.

राम्या यांच्या कुटुंबियांनी सांगितलं की, मुलीसोबत झालेल्या अपघातानंतर तर राम्या अजूनच निराश झाली. त्यातूनच सोशल मीडियावरील कमेंट्समुळे तिला अजूनच अपमानास्पद वाटलं, त्याचा तिच्यावर प्रचंड दबाव आला.

या सगळ्यापासून दूर जाण्यासाठी ती नवरा आणि दोन मुलांसह तिच्या मूळ गावी कोईंबतूरला गेली. पण त्याचा फार उपयोग झाला नाही.

या घटनेनंतर एका महिन्याच्या आतच तिने आत्महत्येचा निर्णय घेतला.

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

“सोशल मीडियामुळे झालेल्या या त्रासाचा तिच्यावर प्रचंड परिणाम झाला आणि तिने स्वतःचा जीव घेतला,” राम्या यांच्या एका नातेवाईकाने आपलं नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितलं.

“मीडियामधून लोक दररोज तिला फोन करायचे, तिच्या घरी यायचे आणि बाळाबद्दल विचारून त्रास द्यायचे. याचा तिला त्रास झाला,” असं त्यांनी सांगितलं.

“तुम्ही कोणीही असला तरी, तुमच्या मनात सहानुभूती असावी,” सबा खान यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटलं.

“सोशल मीडियावरील तीव्र टीकेनंतर ती प्रचंड निराश झाली होती. त्यातूनच राम्याने आत्महत्या केली, या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस अधिकारी डी राजशेखरन यांनी म्हटलं.

राम्याची परिस्थिती कशी होती?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

राम्या आणि तिचा नवरा वेंकटेश हे दोघेही व्यवसायाने इंजिनिअर होते. ते 37 वर्षांचे होते.

दोघेही जण एका आयटी कंपनीत काम करत होते. पाच वर्षांपूर्वी त्यांना पहिला मुलगा झाला होता. हे त्यांचं दुसरं बाळ होतं.

राम्याचे वडील तांदळाचा व्यवसाय करायचे. ती एका पारंपरिक कुटुंबात वाढली होती.

या अपघातातून बाळ बचावल्यानंतर कुटुंबाने एक विशेष पूजाही केली होती.

आपल्या कुटुंबाची काळजी घेत, दुसऱ्या मुलाकडे लक्ष देणं राम्यासाठी कठीण बनलं होतं, असं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

अगदी लहानपणापासून राम्याला तिच्या दोन्ही बहिणींचा लळा होता. त्यांना जराही दुखापत झाली, तर राम्या तातडीने उपचार करायची; हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची.

“ती अतिशय धीट होती,” राम्याच्या एका नातेवाईकाने नाव न उघड करण्याच्या अटीवर सांगितलं.

“सोशल मीडियावरील कमेंट्समुळे ती स्वतःचा जीव देईल असा विचारही आम्ही केला नव्हता,” असं त्यांनी सांगितलं.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार पोस्टपार्टम डिप्रेशन हा भारतातील निदान आणि उपचार न होणाऱ्या आजारांपैकी आहे.

चेन्नईमधील इग्मोर वुमन आणि चिल्ड्रेन हॉस्पिटलच्या संचालक डॉ. कलैवानी यांनी म्हटलं की, “मुलाच्या जन्मानंतर 30 टक्के महिलांमध्ये मानसिक अस्थिरता दिसून येते. बाळाच्या जन्मानंतर त्या तणावग्रस्त होतात. याची लक्षणं म्हणजे भावनिक चढ-उतार, सौम्य स्वरूपाचं नैराश्य, रडू येणं ही असतात. जर ही लक्षणं दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिली तर त्याला पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतात.

केवळ 1-2 टक्के महिलांमध्ये हे डिप्रेशन दिसून येतं. पण सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ ही परिस्थिती राहणं हे मात्र अतिशय दुर्मिळ आहे.”

अनिशा रफी

फोटो स्रोत, Psychiatrist Anisha Rafi

फोटो कॅप्शन, अनिशा रफी

गरोदरपण, बाळंतपण या काळात महिला अनेक शारीरिक, भावनिक आणि मानसिक बदलांमधून जात असतात.

“तिच्यावर या सगळ्या प्रकरणाचा काय भावनिक परिणाम झाला असेल याची कल्पनाही करता येत नाही. सर्वांनी तिला बरं वाटेल असं बोलणं अपेक्षित होतं. पण दुर्दैवाने सगळ्यांनी तिच्या मातृत्वाबद्दल भाष्य केलं,” दोन मुलांची आई असलेल्या विमला यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं.

“कोणालाही आपल्या मुलाला इजा पोहोचेल अशा वातावरणात ठेवायला आवडत नाही. मूल गादीवरून खाली पडलं, पाळण्यात त्याला लागलं किंवा चालताना अडखलं तरी आईला त्रास होतो. हे आईपण असतं.

"सोशल मीडियावरच्या कमेंट्समुळे एका मुलाला आपण आईपासून दूर केलं,” कोईमतूरमधील अमृता यांनी म्हटलं.

“राम्या सोशल मीडियावरील कमेंट्समुळे दुखावली गेली असणार आणि पोस्ट पार्टम डिप्रेशनसोबतच या गोष्टीमुळे आलेल्या ताणामुळे तिनं आत्महत्या केली असेल," असं अनिशा रफी यांनी म्हटलं. त्या कोईंबतूरमधील मानसोपचारतज्ज्ञ आहे.

राम्याने काही आठवडे सोशल मीडियापासून दूर राहिला हवं होतं. तिला सर्वांनी काही काळ सहानुभूती द्यायला हवी होती.

“अशावेळी संबंधित व्यक्तीच्या पाठीशी उभं राहणं, त्यांच्यावर लक्ष ठेवणं, त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असतं,” असं त्या सांगतात.

राम्याच्या कुटुंबियांनी सांगितलं की, आम्ही अजूनही सायबर त्रासाबद्दल कोणतीही तक्रार केली नाही.

“लोकांनी युट्यूब, फेसबुकवर कमेंट्स केल्या, पण आम्हाला नेमक्या कोणी कमेंट्स केल्या आहेत हे माहीत नसल्यामुळे आम्ही अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार कशी दाखल करणार?” तिच्या कुटुंबीयांनी म्हटलं.

राम्याचा नवरा वेंकटेश आणि तिचे वडील वासुदेवन यांनी या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिला.

“जेव्हापासून आमच्या बाळाला वाचवलं गेलं, तेव्हापासून माध्यमं सातत्याने फोन करत आहेत. त्याचा आम्हाला त्रास होतोय. राम्याच्या जाण्याने आम्ही प्रचंड दुःखी आहोत आणि आम्हाला कोणाशीही बोलण्याची इच्छा नाहीये,” त्यांनी म्हटलं.

सायबर छळ

राम्याच्या मृत्यूनंतर सायबर छळाबद्दलची चर्चा सुरू झाली. जसंजसं इंटरनेटचा प्रसार वाढत आहे, तसंतसं भारतात ही समस्या वाढत आहे.

मध्य प्रदेशमधील 16 वर्षांचा मुलगा प्रियांशू यादव...त्याने काही महिन्यांपूर्वी वेगवेगळे कपडे आणि मेकअप करून सोशल मीडियावर रिल्स पोस्ट केले. पण त्यानंतर झालेल्या ट्रोलिंगमुळे त्याने आत्महत्या केली.

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

केरळमधील पहिला ट्रान्सजेंडर बॉडी बिल्डर प्रवीण नाथ याने फेसबुकवर आपल्या जोडीदारापासून विभक्त होत असल्याची पोस्ट केली. ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आल्या, त्यानंतर त्याने आत्महत्या केली.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2022 या वर्षांत महिलांविरोधात सायबर छळाच्या एकूण 9,821 तक्रारी दाखल झाल्या होत्या.

मायक्रोसॉफ्टने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार इंटरनेट वापरणाऱ्या दहापैकी चार जण हे सायबर छळाला बळी पडलेले असतात.

इंटरनेट युजर्सपैकी 38 टक्के जणांनी सायबर छळाला बळी पडल्याची तक्रार केली आहे. त्यांपैकी बहुतांश जण तरुण आहेत.

सायबर छळ, सार्वजनिकरित्या नालस्ती का केली जाते?

धरणी या कोईमतूरमधल्या कुमारगारू महाविद्यालयात मानसशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत.

त्या सांगतात, “सायबर छळ, सोशल मीडियावर सार्वजनिकरित्या नालस्ती हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे.”

हे समजावून सांगताना त्या म्हणतात, “पॅरासोशल रिलेशनशिपमध्ये एखाद्या व्यक्ती किंवा प्रसंगावर मालकी सांगत आपले विचार लादले जातात. त्यातूनच आपली समाजातील उपस्थिती दर्शवण्यासाठी सायबर छळासारखे प्रकार होतात.”

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

मानसिक आजारावर औषधं आणि उपचार उपलब्ध आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेऊ शकता.