घरातली मोठी मुलगी : ‘माझं लहानपण माझ्या धाकट्या बहीण भावंडांना सांभाळण्यातच गेलं’

- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी प्रतिनिधी
तिला सायकल चालवायची असते, एकदम जोरात, अगदी तिच्या मैत्रिणींसारखी. तिला त्यांच्याबरोबर ओरडत हुंदडत फिरायचं असतं. पण तिला तसं करता येत नाही, एखाद्या प्रौढ बाईसारखं वावरावं लागतं.
तिचं स्वतःच वय आहे फक्त 6 वर्षं. पण दररोज संध्याकाळी जेव्हा ती खेळायला खाली येते तेव्हा ती एकटी नसते, तिच्या पाठोपाठ, किंवा कधीकधी तर कडेवर असतो तिचा दीड वर्षांचा भाऊ.
तिला भावाकडे लक्ष ठेवावं लागतं, त्याला सोडून कुठे जाता येत नाही.
असं दृश्य माझ्या शेजारी-पाजारी, शहरात, गावाखेड्यात अनेकदा दिसतं. मोठ्या बहिणी लहान भावंडांना कडेवर घेऊन फिरत असतात. त्या स्वतःही फारशा मोठ्या नसतात पण तरीही मोठ्या माणसासारखं लहान मुलं सांभाळत असतात.
कदाचित हे चित्र जगभरात असंच असावं, त्यामुळेच सोशल मीडियावर #eldestdaughtersyndrome हा ट्रेंड फिरतोय.
'एल्डेस्ट डॉटर सिंड्रोम' असा अधिकृत मानसिक आजार नाहीये. पण अमेरिकेत, यूके आणि जगातल्या इतर देशांमध्ये महिला, मुली घरातली मोठी मुलगी असल्याने त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम झाला हे सांगत आहेत.
“आयुष्यभर त्याची सावली राहातेच तुमच्या आयुष्यात,” हिमांशी (बदललेलं नाव) म्हणते. हिमांशी एक गृहिणी आहे आणि लहान मुलांना ट्युशन शिकवते. तिला स्वतःची ओळख सांगायची नाहीये कारण तिच्याच शब्दात, “मी घरात मोठी आहे ना, मग मी कुटुंबाविषयी कधीच तक्रार करायला नको.”
हिमांशीला तीन धाकटी भावंडं आहेत.
“मला लहानपण असं लाभलंच नाही. माझं लहानपण लहान बहीण भावांना सांभाळण्यातच गेलं. लहानपणीच्या रम्य आठवणी वगैरे असतात ना, त्या मला नाहीतच. मला फक्त आठवतं ते लहान भावंडांची काळजी घेणं, त्यांचं सगळं करणं. आणि ते माझ्याकडून जणूकाही अपेक्षितच होतं. ती माझीच जबाबदारी होती. गैरसमज करू नका, माझं माझ्या आईवडिलांवर, भावंडांवर प्रेम आहे, पण लहानपणी मला जरा स्वातंत्र्य, आणि कमी जबाबदाऱ्या दिल्या असत्या, मलाही लहानपण जगू दिलं असतं तर चाललं असतं की…”
हिमांशीला वाटतं की घरातली मोठी मुलगी असल्याने तिला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागला, अनेकदा मन मारावं लागलं आणि तिची स्वप्नं अपूर्ण राहिलीत.
“मी घरातली मोठी आहे आणि त्यातही मुलगी आहे. माझं लग्न लवकर केलं गेलं. पण माझ्या धाकट्या बहिणीला पुढे शिकण्याची संधी मिळाली. ती सॉफ्टवेअर इंजिनिअर झाली. त्या शिक्षणामुळे तिला आता मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी मिळाली. मी माझं फक्त बी.कॉम करू शकले, लगेच लग्न झालं. मी माझ्या मनासारखं करियर करू शकले नाही.”
सोशल मीडियावर महिला हेही निदर्शनास आणत आहेत की घरातली मोठी मुलगी असल्याने त्यांना जसं वागवलं, त्यामुळे त्या बुजऱ्या झाल्या, त्यांचा आत्मविश्वास कमी झाला आणि अनेकदा त्यांना स्वतःसाठी काही करायचं असेल किंवा निर्णय घ्यायचा असेल तर त्यांना अपराधी वाटतं. त्या स्वतःला आनंदी करणारे निर्णय कधीच घेऊ शकत नाहीत.
हिमांशीला हे पटतं. मी स्वतःचे अनुभव सांगताना म्हणते, “मला जे हवं आहे त्याची ठाम मागणी मी कधीच करू शकत नाही. मी कायम इतर लोक माझ्याबद्दल काय विचार करतात हाच दबाव घेऊन वावरते. मला वाटतं की माझ्या कुटुंबाला निराश तर करणार नाही ना? माझी आता चाळिशी आलीय तरीही मला सतत हेच वाटतं की इतरांच्या लेखी मी इतकी महत्त्वाची नाहीये.”

श्रुतकिर्ती फडणवीस पुण्यातल्या काऊन्सिलर आहेत. याबद्दल अधिक बोलताना त्या म्हणतात, “घरातली मोठी मुलं असतील तर त्यांच्यात एक गुण साधारणपणे आढळतो तो म्हणजे इतरांना खुश करण्याची वृत्ती. त्याखेरीज ते आदर्शवादी असतात. ते स्वतःवरच परफेक्ट असण्याचा खूप दबाव टाकतात. स्वतःला चुका करण्याची संधी देत नाहीत आणि अनेकदा स्वतःवर अवाजवी टीका करतात.“
श्रुतकिर्ती न्युरोटिसीझमचा उल्लेख करतात. “म्हणजे तुम्ही रिलॅक्स होऊच शकत नाही.”
त्यांच्यामते ही घरातली मोठी मुलं या मानसिक अवस्थेत (आजार नव्हे!) अनेकदा असतात. “ही मुलं त्यांच्या भावनांचं व्यवस्थापन करण्याऐवजी दाबून टाकतात.”
कधीकधी यामुळेच अतिटोकाचं पाऊल उचललं जाऊ शकतं. “अशा वेळेस घरातलं मोठं भावंड एकतर बंडखोर बनतं आणि कोणाचं ऐकत नाही किंवा सगळ्या अपेक्षा सोडून हताश होतं. अशी मोठी भावंडं सामाजिकदृष्ट्या एकाकी होतात आणि त्यांचा भावनांक कमी होतो.”
श्रुतकिर्ती यांना वाटतं की घरात मोठं भावंड असणाऱ्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावरही याचा परिणाम होऊ शकतो. “सर्वात मोठं मुल हे आईवडिलांसाठीही एक एक्सपेरिमेंटच असतं. त्यामुळे पालक त्यांच्यावर जास्त दबाव टाकतात, जास्त जबाबदाऱ्या टाकतात. त्यावेळी आईवडिलांनाही माहीत नसतं की मुल कसं वाढवायचं. त्यामुळे पालक स्वतःकडून असलेल्या अपेक्षा, ज्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत त्या मुलांवर लादत जातात. यालाच जनरेशनल ट्रॉमा म्हणतात. दुसऱ्या किंवा तिसऱ्या मुलांपर्यंत पालकही रिलॅक्स झालेले असतात. पण पहिल्या मुलीला/मुलाला सगळं सहन करावं लागतं.”
पण भारतासारख्या पुरुषप्रधान विचारांचा पगडा असलेल्या समाजात घरातली मोठी मुलगी वयाने लहान जरी असेल तरी तिला लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी पार पाडावी लागते.
भारताच्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे – 5 नुसार बालविवाह आणि घरकाम या ही दोन प्रमुख कारणं मुलींच्या शाळा सोडण्यामागे आहेत.
सरकारच्या 2021-22 च्या आकडेवारीप्रमाणे माध्यमिक पातळीवर मुलींचं शाळा सोडण्याचं प्रमाण 12.3 टक्के इतकं आहे.
या शैक्षणिक पातळीवर मुलांचं शाळा सोडण्याचं प्रमाणही जवळपास सारखंच असलं तरी त्याची कारणं वेगळी आहेत.
रंजना गवांदे ग्रामीण भागात महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या वकील आहेत. त्या म्हणतात, “घरकाम करायला आणि धाकटी भावंड सांभाळायला ग्रामीण भागात अनेक मुली शाळा सोडतात. गरीब कुटुंबात आई वडील दोघं काम करत असतात. घरातली लहान मुलं सांभाळायला कोणी नसतं. त्यामुळे अगदी पाच-सहा वर्षांच्या लहान मुलीही त्यांच्या भावंडांना सांभाळत आहेत, कडेवर घेऊन फिरत आहे हे चित्र सर्रास दिसतं.”

भारतीय पालक याकडे चांगली गृहिणी होण्याचं प्रशिक्षण म्हणून बघतात असंही रंजना यांना वाटतं.
“या मुली लहानपणीच मोठ्या होतात आणि जबाबदाऱ्या निभवायला लागतात. त्यांना आधीपासून शिकवलं जातं की स्वतःच्या आनंदाचा त्याग करायचा.”
आमीर सुलताना चंदीगढमधल्या पंजाब विद्यापीठात जेंडर स्टडीज विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.
त्यांच्यामते मध्यमवर्गीय घरातही मोठ्या मुलींकडे काही ना काही जबाबदाऱ्या असतातच
“या मुली शाळा सोडणार नाहीत, पण तरी शाळा सुटल्यावर धाकट्या भावंडांकडे लक्ष ठेवणं, त्यांना जेवायला घालणं अशी काम असतात. घरातलं मोठं भावंड जर मुलगा असेल तर त्याच्यावर लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी नसते. अशा वेळी जर घरात धाकटी मुलगी असेल तर ती घरातली कामं करेल आणि मोठ्या भावाला स्वयंपाक करून खायला घालेल,” त्या म्हणतात.
अशात घरातल्या मुलींना, विशेषतः मोठ्या मुलींना साधे साधे हक्क मिळत नाहीत या गोष्टीकडे आमीर लक्ष वेधतात.
“त्यांच्यावर घरकामाचा ताण असतो, त्याचे कष्ट पडतात. परत जर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर सहसा मोठ्या मुलीचं लग्न लवकर केलं जातं. म्हणजे तिला पुढच्या शिक्षणाच्या, चांगल्या नोकरीच्या संधी आपोआपच नाकारल्या जातात. तिला समानता मिळत नाही. तिला व्यवस्थित जेवताही येत नाही कारण तिच्यावर जबाबदारी असते लहान बहीण भावंडांना जेवायला घालण्याची. आयुष्यभर तिच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि तिची जशी काळजी घेतली जायला हवी, तशी घेतली जात नाही.”
आमीर म्हणतात की घरातल्या सगळ्या मुलांची काळजी घेणं आणि त्यांना समान संधी, प्रेम देणं ही पालक म्हणून आपली जबाबदारी असते.
“जेव्हा आपण घरात आणि समाजातही मुलींनाही समान वागणूक आणि आदर द्यायला शिकू, पुढचं सगळं सोपं होईल. मी समजू शकते की गरीब कुटुंबांना, जिथे आईवडील दोघे कामावर जातात त्यांना लहान मुलं सांभाळाण्यासाठी पाळणाघर किंवा तत्सम सेवा परवडू शकत नाहीत. त्यामुळेच घरातल्या मोठ्या मुलीवर ही जबाबदारी येते. पण या सरकार काही संस्था उभारू शकतं जिथे अशा कुटुंबातल्या लहान बाळांची काळजी घेतली जाईल आणि मोठी मुलगी शाळेत जाऊ शकेल. मुलींच्या शिक्षणासाठी आणखी काही पावलं उचलता येतील आणि ज्या कुटुंबातल्या मुली उच्च शिक्षण घेत आहेत त्यांना काही विशेष लाभ देता येईल.”
तज्ज्ञांना असंही वाटतं की घरातल्या कामांच्या जबाबदारीचं योग्य विभाजन आणि मुलग्यांनाही घरकाम करायला लावलं तर एक समान कुटुंबव्यवस्था तयार होऊ शकेल.
अर्थात याला वेळ लागेल, पण घरात ही समानता आली, मुलींवरचं ओझं थोडं कमी झालं तर माझ्या बिल्डिंगमध्ये राहाणारी ती सहा वर्षांची चिमुरडी तिला हव्या तितक्या वेगाने सायकल चालवू शकेल, तिच्या कानात जाणारं वारं अनुभवू शकेल आणि स्वतःचं बालपण आनंदाने जगू शकेल.











