You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कॅनडातील ब्रॅम्पटनमध्ये हिंदू मंदिरावर हल्ला, पंतप्रधान ट्रुडो आणि तज्ज्ञांचं म्हणणं काय?
कॅनडातील ब्रॅम्पटन शहरातल्या एका हिंदू मंदिरातल्या भाविकांवर रविवारी हल्ला केला गेला. कॅनडात राहणारे भारतीय उच्चायुक्त मंदिरात गेले असताना हा हल्ला करण्यात आला. या हल्लाचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
कॅनडाच्या विरोधी पक्षांसोबतच पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. पण हल्ल्यामागे जबाबदार असलेल्यांचं नाव ट्रु़डो यांनी घेतलेलं नाही. तसंच, या प्रकरणात अजून कोणाच्याही अटकेचे आदेश दिलेले नाहीत.
"ब्रॅम्पटनमधे आज हिंदू मंदिरावर झालेली हिंसा स्वीकारार्ह नाही. आपापल्या धार्मिक श्रद्धा मोकळेपणाने आणि सुरक्षिततेने पाळण्याचा अधिकार प्रत्येक कॅनडियन नागरिकाला आहे,” असं त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं आहे.
कॅनडामध्ये हिंदू सभा मंदिरात झालेल्या घटनेला भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ‘अत्यंत चिंताजनक’ असं संबोधलं आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या जयशंकर यांना, भारत आणि कॅनडात मुत्सद्दी पातळीवर वाढलेल्या तणावावर प्रश्न विचारला गेला. या घटनेमुळे हा तणाव वाढेल का? असं त्यांना विचारल्यावर जयशंकर म्हणाले, ‘कॅनडात हिंदू मंदिरात जे झालं ते अत्यंत चिंताजनक आहे हे स्पष्टच आहे.’
“कट्टरवादी आणि फुटिरतावाद्यांनी सोमवारी ब्रॅम्पटन इथल्या हिंदू सभा मंदिरावर केलेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. या हिंसाचारात सहभागी असलेल्या लोकांना अटक होईल अशी आम्ही आशा करतो. कॅनडात असलेल्या भारतीय नागरिकांच्या संरक्षणाची आम्हाला अत्यंत काळजी आहे,” असं जयशंकर म्हणाले.
भारतीय उच्चायुक्तांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिलीय. “टोरंटोजवळच्या हिंदू सभा मंदिरासोबत 3 नोव्हेंबरला आम्ही एका कॅम्पचं आयोजन केलं होतं. तिथे भारतविरोधी लोकांनी हिंसा घडवून आणली. स्थानिक आयोजकांच्या सहयोगाने सुरू असलेल्या उच्चायोगाच्या नेहमीच्या कामाला अशा पद्धतीने सुरूंग लावणं फारच निराशाजनक आहे,” असं उच्चायुक्त म्हणाले.
कॅनडातील हिंसाचारावर भारतानं दिली प्रतिक्रिया
कॅनडातील ब्रॅम्पटन शहरातील हिंसाचारासंदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते श्री रणधीर जायस्वाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, "कॅनडातील ओंटारियो प्रांतातील ब्रॅम्पटन शहरात काल (3 नोव्हेंबर) हिंदू सभा मंदिरात कट्टरतावादी आणि विभाजनवाद्यांनी केलेल्या हिंसाचाराचा आम्ही निषेध करतो.
"आम्ही कॅनडा सरकारला आवाहन करतो की त्यांनी सर्व प्रार्थनास्थळांचं अशा प्रकारच्या हल्ल्यांपासून संरक्षण करावं. या हिंसाचारात सहभागी असलेल्यांवर कारवाई केली जाईल, अशी देखील आमची अपेक्षा आहे.
"कॅनडातील भारतीयांच्या सुरक्षा आणि सुरक्षिततेबद्दल आम्हाला प्रचंड चिंता वाटते. धमक्या, छळ आणि हिंसाचारामुळे आमच्या दूतावासातील अधिकाऱ्यांकडून भारतीय आणि कॅनेडियन नागरिकांना दिल्या जाणाऱ्या समान सेवा रोखल्या जाणार नाहीत."
दिवाळीत ट्रुडोही गेले होते मंदिरात
ब्रॅम्पटनमधलं हल्ला झालेलं मंदिर टोरंटोपासून जवळपास 50 किलोमीटर लांब आहे. हल्ल्यानंतर मंदिराच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात आलीय.
कॅनडाचे हिंदू संसद सदस्य चंद्रा आर्या यांनी मंदिरावर झालेल्या हल्ल्याचा आरोप खालिस्तान समर्थकांवर लावलाय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर त्यांनी हल्ल्याचा एक व्हीडिओही शेअर केलाय.
“कॅनडाच्या खलिस्तानी लोकांनी आज हद्द पार केलीय. कॅनडात हिंसक खलिस्तानवाद किती खोलवर रुजलाय आणि हाताबाहेर गेलाय हेच या हल्ल्यावरून दिसून येतं,” असं ते म्हणालेत.
“अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली खलिस्तानवाद्यांना कॅनडात सूट मिळतेय यात काही आश्चर्य नाही. कॅनडियन हिंदू लोकांना त्यांच्या समाजाच्या सुरक्षिततेसाठी एकत्र येऊन स्वतःचे हक्क मिळवले पाहिजेत. त्यांच्या नेत्यांना प्रश्न विचारले पाहिजेत,” असंही ते पुढे म्हणाले.
गेल्या आठवड्यातच दिवाळीच्या मुहुर्तावर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ पोस्ट केला होता. त्यात त्यांनी गेल्या काही महिन्यात कॅनडातल्या तीन मंदिरांत जाऊन आल्याचं सांगितलं. व्हीडिओमध्ये ट्रुडो ब्रॅम्पटनमधल्या मंदिरात लोकांसोबत दिवाळी साजरी करताना आणि लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसतायत.
काय आहे कॅनडाच्या विरोधी पक्षाचं म्हणणं?
कॅनडाच्या विरोधी पक्ष नेत्यांनीही हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केलाय. कन्झर्वेटिव्ह पार्टीचे नेते पियर पॉलिवेअर कॅनेडाचे विरोधी पक्ष नेते आहेत.
त्यांनी एक्सवर प्रतिक्रिया दिली आहे. “ब्रॅम्पटनमध्ये हिंदू मंदिरातल्या भाविकांवर झालेल्या हिंसेचं समर्थन होऊच शकणार नाही. कॅनडामध्ये सगळ्यांना त्यांच्या धार्मिक रिती परंपरा पाळण्याची मोकळीक आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो. माझ्या देशवासियांना एकत्र करून मी ही अव्यवस्था संपवणार आहे,” असं त्यांनी लिहिलंय.
ट्रुडो सरकारवर टीका करणारे पीपल्स पार्टी ऑफ कॅनडाचे नेते मॅक्सिम बर्निअर यांनीही या हल्ल्याचा व्हीडिओ शेअर केलाय.
“खलिस्तानी शीख ब्रॅम्पटनच्या हिंदू मंदिरातल्या भाविकांवर हल्ला करतायत. याचा ताण घ्यायची गरज नाही; कारण विविधता हीच आपली ताकद आहे,” असं म्हणत त्यांनी पंतप्रधान ट्रुडो यांना टोमणा मारलाय.
ट्रुडो यांच्या स्थलांतरितांच्या धोरणांवर बर्निअर नेहमी टीका करतात. कॅनडातल्या शीख खलिस्तानवाद्यांवरून ते सरकारवर नेहमीच ताशेरे ओढतात.
भारत कॅनडामधला वाद
गेल्या वर्षी जून महिन्यात खलिस्तान समर्थक हरदीप सिंह निज्जर यांची कॅनडातल्या व्हँकुव्हर जवळ बंदुकीने गोळी मारून हत्या करण्यात आली होती. कॅनडाचे पंतप्रधान यांनी या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप लावला.
या आरोपांवरून भारत आणि कॅनडामधले संबंध इतके नाजूक झाले की दोन्ही देशांनी एकमेकांच्या देशातले राजदूत परत बोलावून घेतले.
शीख खलिस्तानी नेता गुरपतवंत सिंग पन्नू यांचा हत्येचा कट उधळून लावल्याचा दावा अमेरिकेने केल्यानंतर हे प्रकरण आणखी तापलं.
ही दोन्ही प्रकरण एका मोठ्या कारस्थानाचा भाग आहेत, असं कॅनडा सरकारचं म्हणणं आहे. पन्नू यांच्या जवळ अमेरिका आणि कॅनडा अशा दोन्ही देशांचं नागरिकत्व आहे. ते निज्जर यांचे सहकारी होते.
न्यूयॉर्कमध्ये राहणारे पन्नू ‘सिख फॉर जस्टिस’ या संस्थेचे संस्थापक आणि वकील आहेत. भारत सरकारने त्यांना 2020 मध्ये ‘आतंकवादी’ घोषित केलंय.
वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकन वृत्तपत्रात 14 ऑक्टोबरला एक बातमी प्रकाशित झाली होती.
भारताचे गृह मंत्री अमित शाह यांनी कॅनडामधल्या खलिस्तानवाद्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले असं सुत्रांच्या सांगण्यावरून या बातमीत लिहिलं होतं. अमित शाह यांचं नाव वॉशिंग्टन पोस्टला आपणच सांगितलं असल्याचं कॅनडा सरकारमधल्या एका अधिकाऱ्याने कबुल केलं.
कॅनडाच्या उप परराष्ट्र मंत्र्यांनी केलेल्या या आरोपावर भारतानं कडक प्रतिक्रिया दिली होती. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत गृह मंत्री अमित शाह यांच्यावर लावलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं.
तज्ज्ञांचं मत काय?
भारत आणि कॅनडामधल्या ताज्या वादावर वरिष्ठ वकील आणि राज्यसभेचे सदस्य कपिल सिब्बल यांनी युट्यूबवर त्यांच्या 'दिल से विद कपिल सिब्बल' या कार्यक्रमात काही तज्ज्ञांशी चर्चा केलीय.
या कार्यक्रमात माजी राजदूत विवेक काटजू यांनी दोन देशांतल्या बिघडलेल्या संबंधांसाठी कॅनडा सरकारला जबाबदार धरलंय. “एका उच्चायुक्ताला कोणत्याही गुन्ह्याशी जोडणं आणि त्यांची चौकशी करण्यासाठी त्यांच्यावरची राजकीय सूट कमी करा असं म्हणणं बरोबर नाही. माझ्या पाहण्यात असं कधीही आलेलं नाही,” अशी प्रतक्रिया त्यांनी दिली.
काटजू पुढे म्हणाले, “अमेरिकेजवळ असलेले पुरावे कॅनडाच्या कोर्टात दाखवले जाऊ शकतात की नाही याबद्दल मला माहिती नाही. पण कॅनडाजवळ निश्चितच त्यांचे स्वतः चे कोणतेही पुरावे नाहीत.”
"अमेरिकेने पुरावे दिलेत. कॅनडा आणि अमेरिका दोन्ही देशातली प्रकरणं वेगवेगळी आहेत. कॅनडाकडे असलेल्या इंटेलिजन्स रिपोर्टचं भारताने पुराव्यात रूपांतर करावं असं त्यांचं म्हणणं आहे. असं कोण करतं?”
कॅनडाने काश्मीरमध्ये काम करणाऱ्या भारतीय संरक्षण आणि गुप्तचर सेवांमध्ये काम करणाऱ्या लोकांना व्हिसा दिला नाही. अनेक वर्षांपूर्वी या लोकांनी एका भारतीय मिशनवर कॅनडात काम केलेलं आहे, अशीही माहिती काटजू यांनी दिली.
'भारतीय राजदूत कॅनडात करत होते ते काम परराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्यांच्या कामाचाच एक भाग होता,' असं परराष्ट्र सेवेतले माजी अधिकारी भास्वती मुखर्जी यांचं म्हणणं आहे.
“कॅनडाने भारताचे उच्चायुक्त म्हणून काम केलेल्या विनोद वर्मा यांच्यावर ‘पर्सन ऑफ इंटरेस्ट’ चा आरोप लावला. नंतर विनोद वर्मा यांनी इतर राजदूतांसोबत कॅनडात सुरू असलेल्या भारतीय वंशाच्या लोकांच्या भारतविरोधी कामांची माहिती भारत सरकारला दिली असं म्हटलं गेलं,” असं मुखर्जी कपिल सिब्बल यांना सांगत होते.
“नेदरलँडमध्ये राजदूत म्हणून काम करत असताना मीही हेच केलंय हे सांगताना मला काहीही वाटत नाही. कॅनडियन, डच, ब्रिटिश, अमेेरिकन किंवा कोणत्याही देशाचे भारतात राहणारे राजदूतही हे सांगताना मागे पुढे पाहणार नाहीत. एक राजदूत म्हणून आमचं हेच काम असतं,” असं ते म्हणाले.
1989 मध्येही भारतीय राजदुतांना कॅनडा सोडावं लागलं होतं, त्याची आठवण काँग्रेस नेते आणि संसद सदस्य मनीष तिवारी यांनी करून दिली. कॅनडा या जुन्या दिवसांकडे जातो आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.
“दुर्दैवाने भारताच्या सुरक्षेबद्दल कॅनडाला काळजी दिसत नाही. काही लोक याला कॅनडाच्या येत्या निवडणुकीशी जोडतायत. ट्रुडो सरकार फार चांगलं काम करत नाही, असंही म्हटलं जातंय,” असं ते म्हणाले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)