'हरियाणाच्या मतदार यादीत ब्राझिलियन मॉडेलचा फोटो,' राहुल गांधी यांनी केलेला आरोप भाजपने फेटाळला

फोटो स्रोत, Rahul Gandhi
राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेत हरियाणाच्या मतदानावेळी मतचोरी झाल्याचा आरोप केला आहे. एक प्रेझेंटेशन दाखवून त्यांनी हे आरोप केले आहेत.
6 नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातले मतदान आहे. त्या आधी राहुल गांधींनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेची चांगलीच चर्चा होत आहे.
राहुल गांधी यांनी आज बुधवार (5 नोव्हेंबर) रोजी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांचा एक व्हीडिओ दाखवला. त्यात सैनी म्हणताना दिसतात, "आम्ही हरियाणामध्ये विजयाबाबत पूर्णपणे खात्री बाळगतो... सर्व तयारी पूर्ण झाली आहे."
यावर राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला आणि म्हणाले, "जेव्हा सर्व एक्झिट पोल आणि संकेत काँग्रेसच्या विजयाच्या दिशेने सूचित करत होते, तेव्हा हे 'इंतजाम' म्हणजे नक्की काय?"
राहुल गांधी यांनी एका प्रेझेंटेशनदरम्यान एका महिलेचा फोटो दाखवला आणि आरोप केला की तिने हरियाणातील 10 बूथवर 22 वेळा मतदान केले आहे.
त्यांनी म्हटलं, "हा एक केंद्रीय कट आहे. जिच्याबद्दल मी बोलतोय ती महिला ब्राझीलियन मॉडेल आहे. हे केंद्रीकृत कटाचे पुरावे आहेत. अशा 25 लाख लोकांपैकी हे एक उदाहरण आहे. एक ब्राझीलियन व्यक्ती हरियाणाच्या मतदार यादीत कशी?"
राहुल गांधी यांनी प्रश्न केला की हे कसं शक्य झालं? हे निवडणूक प्रक्रियेतल्या फसवणुकीकडे बोट दाखवतं.
तथापि, राहुल गांधी यांच्या या आरोपांवर निवडणूक आयोगाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारच्या पत्रकार परिषदेत ब्राझीलच्या महिलेचं नाव हरियाणाच्या मतदार यादीत असल्याचा दावा केला.
भाजपाने राहुल गांधींचे दावे खोटे असल्याचं म्हटलं आहे. राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेच्या नंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी पत्रकार परिषद घेतली. रिजिजू म्हणाले की, "विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा आपलं अपयश लपवण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे."
त्यांनी पुढे म्हटलं, "आज त्यांनी (राहुल गांधींनी) बिहार सोडून हरियाणाची गोष्ट सांगितली आहे. यावरून स्पष्ट होतं की बिहारमध्ये काही उरलेलं नाही, म्हणून लक्ष विचलित करण्यासाठी हरियाणाचा मुद्दा पुढे आणत आहेत."
भाजपने आरोप फेटाळले
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या 'मत चोरी'च्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेबाबत माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री सैनी म्हणाले, "राहुल गांधी देशाची दिशाभूल करण्याचं काम करत आहेत... काँग्रेसने देशाला सतत मागे ढकलण्याचं काम केलं आहे."

फोटो स्रोत, Rahul Gandhi
ते पुढे म्हणाले, "काँग्रेसकडे आता कोणताच मुद्दा राहिलेला नाही. ते खोटं बोलून देशाची दिशाभूल करत आहेत."
प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींच्या आरोपांबाबत पीटीआयच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, "राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्या हातात ताकद आहे, त्यांनी लढायला हवं, विरोधी पक्षातील लोकांना सांगायला हवं, त्यांनी निवडणूक आयोगाची कोंडी करायला हवी, कायदेशीर कारवाई करायला हवी."
प्रशांत किशोर पुढे म्हणाले, "ते जे प्रश्न उपस्थित करत आहेत, त्याला निवडणूक आयोगाने उत्तर द्यायला हवं."
त्यांनी असंही स्पष्ट केलं की, "बिहारच्या निवडणुकीत हा मुद्दा नाही, इथे स्थलांतर, भ्रष्टाचार आणि शिक्षण हेच मुद्दे आहेत."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











