नागपूर : 8 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला 6 दिवसांनंतर अटक, पोलिसांनी असा घेतला शोध

लैंगिक अत्याचार

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

नागपुरात रविवारी 15 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास 8 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार झाला होता. आरोपीला मुली ओळखत नसल्याने कोणीही बघितलं नसल्याने आरोपीला शोधण्यात अडचणी येत होता. अखेर सहा दिवसानंतर पोलिसांनी आरोपीला शोधलं असून त्याला अटक करण्यात आली आहे.

गणपत जयपूरकर या 56 वर्षाच्या आरोपीनं आठ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याचं कबूल केलं.

या 8 वर्षीय चिमुकलीवर तिच्याच 5 वर्षांच्या बहिणीसमोर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.

अल्पवयीन पीडित मुलीचे कुटुंब मूळचे भंडाऱ्यातील आहे. गेल्या चार वर्षांपासून ते नागपुरातल्या पारडी भागात राहतात. सध्या ते एका झोपडीवजा पत्र्याच्या घरात राहतात.

पीडित मुलीचे आई-वडील हे दोघेही दिवसभर मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचे पोट भरतात. त्यातूनच आपल्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाचा भारही उचलतात. मात्र, आपल्या लहानग्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे हे कुटुंब सध्या धक्क्यात आहे.

पोलिसांनी आरोपीला कसं शोधलं?

दोन्ही चिमुकल्या लहान असल्यानं त्यांना आरोपीची ओळख नीट सांगता येत नव्हती. तसेच वस्तीतल्या लोकांनी त्याला नीट बघितलेलं नव्हतं. त्यामुळे आरोपीला शोधण्यात पोलिसांना अडचण येत होती.

पीडित मुलगी आणि तिच्या छोट्या बहिणीनं सांगितल्यानुसार पोलिसांनी स्केच तयार केलं होतं. त्याचाही फार फायदा झाला नाही. शेवटी पोलिसांनी परिसरातील सगळे सीसीटीव्ही चेक केले.

यामध्ये या परिसरात बलात्कार झाला त्यावेळी एक लाल सीट असलेली गाडी जाताना दिसली. पण गाडीचे नंबर प्लेट आणि इर तपशील सीसीटीव्ही दिसत नव्हतं.

पण पोलिसांनी वेगवेगळे असे सीसीटीव्ही चेक करून एका फुटेजमध्ये चाक, दुसऱ्यात नंबर प्लेट असं करून आरोपीला ट्रॅक केलं.

त्यानंतर दुर्गा नगर परिसरातून शुक्रवारी रात्री आरोपीला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने बलात्कार केल्याचं कबूल केलं, अशी माहिती पारडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाट यांनी दिली

घटना कशी घडली?

नागपूर पोलिसांनी या घटनेसंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, "मुलींना सुट्टी असल्यानं या दोन्ही बहिणी घरासमोरच शेजारच्या एका मुलीसोबत खेळत होत्या. त्यांचे आई-वडील मजुरीला गेले होते. रविवारी (15 सप्टेंबर) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती त्यांच्या घरी आली.

"या व्यक्तीने 'घरी कोणी आहे का', अशी विचारणा केली. त्यानंतर, मी तुमच्या वडिलांच्या मित्रांचा मित्र आहे, असं सांगून ती व्यक्ती थेट त्यांच्या घरात शिरली. त्यामुळे, दोन्ही मुली आपल्या घरात गेल्या. त्यानंतर घरात शिरलेल्या त्या व्यक्तीनं दोघींपैकी मोठ्या असलेल्या 8 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला.

"यावेळी तिची 5 वर्षांची लहान बहीण तिथेच होती. पण, तिला याबद्दल इतकं काही समजत नसल्यानं ती काहीच करू शकली नाही. लैंगिक अत्याचारानंतर ही मुलगी रडू लागली. तिला शांत करण्यासाठी आरोपीने तिच्या हातात 20 रुपये दिले आणि ती व्यक्ती निघून गेली," अशी माहिती पोलिसांनी दिली.

महिला अत्याचार

फोटो स्रोत, Getty Images

पुढे पोलिसांनी असं सांगितलं की, "पीडित मुलीनं आई-वडील सायंकाळी साडेपाच वाजता घरी आल्यानंतर तिला दुखत असल्याचं आईला सांगितलं. तसेच घडलेली घटनाही आईला सांगितली. मुलीच्या कपड्यावर रक्ताचे डाग सुद्धा होते. त्यामुळे, लगेच आई-वडिलांनी पारडी पोलीस ठाण्यात धाव घेतली."

सध्या पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुलीची वैद्यकीय चाचणी केली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

तसेच तिच्या गुप्तांगाला जखम झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत, असं पारडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाट यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितलं.

मुलीच्या सांगण्यावरून पोलिसांनी तयार केलं आरोपीचं स्केच

पीडित मुलगी आणि तिच्या बहिणीला आरोपीचं नाव माहिती नाही. त्यामुळे आरोपीला शोधण्यात पोलिसांना अडचण येत आहे. पण, दोन्ही बहिणींनी 'एक सावळे आणि लाल लाल डोळे असलेले काका घरी आले होते,' असं वर्णन आई-वडिलांना आणि पोलिसांनीही सांगितलं.

त्यांनी सांगितलेल्या वर्णनावरून पोलिसांनी आरोपीचं स्केच तयार केलं.

आरोपी त्या परिसरात आला तेव्हा त्यानं एका व्यक्तीला पीडित मुलीच्या घराचा पत्ता विचारला होता. पत्त्याची विचारपूस झालेल्या व्यक्तीनं सुद्धा आरोपीचं वर्णन सांगितलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

त्यानुसार, आरोपी हा 40-42 वर्ष वयाचा असून त्याने संबंधित घटनेवेळी टी-शर्ट पँट घातलेला होता. तसेच तो मराठी बोलत होता. हा आरोपी तिच्या आई-वडिलांच्या कामावरचा, ओळखीतला किंवा निकटवर्तीयांमधीलच असू शकतो, असा संशय पोलिसांना होता.

राज्य महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे यांनीदेखील अल्पवयीन पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्यासोबत बीबीसी मराठीनं संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, "लवकरात लवकर आरोपीला पकडण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. पण, अशा प्रकारच्या घटना फारच दुर्दैवी आहेत.

अशा घटना घडू नये यासाठी सामाजिक जबाबदारी म्हणून आपल्याला समाजामध्ये जनजागृती करणं गरजेचं आहे. पोलीस लवकरच आरोपीचा शोध घेऊन त्याला कठोर शिक्षा करतील असा माझा विश्वास आहे", असंही आभा पांडे म्हणाल्या.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)