लेकीचा पहिला वाढदिवस साजरा झाला आणि इमारत कोसळली, दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

फोटो स्रोत, Swapnali Tambe
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
मुंबईजवळील विरारमध्ये राहणारं जोईल कुटुंब मंगळवारी (26 ऑगस्ट) संध्याकाळी आपली लेक उत्कर्षाचा पहिला वाढदिवस साजरा करत होतं.
विरारच्या रमाबाई इमारतीत जोईल कुटुंबियांच्या राहत्या घरी वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू होतं. पहिलाच वाढदिवस असल्याने नातेवाईक, मित्रपरिवार असे अनेक लोक घरी जमले होते.
पण रात्री 12 वाजता रमाबाई अपार्टमेंट कोसळली आणि वर्षभराच्या उत्कर्षासह तिच्या आई-वडिलांचा यात मृत्यू झाला.
पावणेबारा वाजताच्या सुमारास अवघ्या काही सेकंदात एकामागोमाग एक मजले अगदी पत्त्यासारखे खाली कोसळले.
या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तर 9 जण जखमी आहेत.
'तिची नस धडधडत होती, पण ती गुदमरलेली होती'
विरार येथील विजय नगर परिसरातील चार मजली रमाबाई अपार्टमेंट 26 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 12 वाजताच्या सुमारास कोसळली.
या इमारतीत साधारण 12 खोल्या होत्या. यात राहणारी माणसं ढिगाऱ्याखाली अडकली. एनडीआरएफने साधारण 26 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजल्यानंतर शोधकार्य सुरू केलं. जवळपास 35 तास हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. आतापर्यंत ढिगाऱ्यातून 26 जणांना बाहेर काढण्यात आलं. यात 17 रहिवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 9 जण जखमी आहे.
याच इमारतीत जोईल कुटुंबियांनी 26 ऑगस्टच्या संध्याकाळी आपल्या लहान मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केला.
परंतु, यानंतर काही तासातच झालेल्या या दुर्घटनेत वर्षभराची उत्कर्षा आणि तिच्या पालकांचा मृत्यू झाला आहे. तर तिची आत्या विशाखा जोईल यात गंभीर जखमी झाली असून आयसीयूमध्ये आहे.

फोटो स्रोत, SharadBadhe\BBC
विरार पश्चिमेला राहणाऱ्या उत्कर्षाची आत्या स्वप्नाली तांबे या सुद्धा वाढदिवसासाठी गेल्या होत्या. त्या घरी पोहोचण्यापूर्वीच त्यांना या दुर्घटनेविषयी कळालं आणि त्या घटनास्थळी पोहचल्या.
बीबीसी मराठीशी बोलताना स्वप्नाली तांबे यांनी सांगितलं, "मी घटनास्थळी पोहचले. मी त्यांना शोधत होते. तितक्यात आम्हाला विशाखाची माहिती मिळाली. हाॅस्पिटलमधूनही फोन आला. मुलीची (उत्कर्षा) नस धडधडत होती, पण ती नाही वाचली. ती गुदमरली होती. तिची आई तर तेव्हाच गेली होती.
"उत्कर्षाचा पहिलाच वाढदिवस होता. मीही गेले होते. भरपूर लोक आले होते वाढदिवसाला. तिथे बाजूला त्यांनी रुमसुद्धा घेतला होता, तिथे डेकोरेशन केलेलं होतं. मी तेव्हा त्याला बोलले सुद्धा. त्यांच्या लाद्या अक्षरशः खाली होत होत्या. मी त्याला बोलले तुम्ही रुम चेंज करा आणि इथून निघा लवकर."
उत्कर्षाचे वडील विरारमध्येच इलेक्ट्रिशनचं काम करायचे. रेस्क्यू ऑपेरशनच्या शेवटच्या टप्प्यात अगदी 30 तासांनंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
'अचानक धुराचा लोट आला, वीज गेली'
रमाबाई अपार्टमेंटच्या तळमजल्यावर 48 वर्षीय मंगेश नरे पत्नी आणि 16 वर्षांच्या मुलीसह राहत होते.
मंगळवारी रात्री इमारतीचा एक स्लॅब कोसळल्याचं त्यांना जाणवलं आणि ते काही शेजाऱ्यांसह पाहायला गेले. पण यानंतर काही मिनिटातच इमारतीचा भाग खाली कोसळला आणि ते ढिगाऱ्याखाली अडकले. या दुर्घटनेतून ते थोडक्यात बचावले. त्यांच्या पायाला जखमा झाल्या आहेत.
मंगेश नरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "आम्ही फक्त बघायला गेलो. अगदी दोन मिनिटांत झालं. कोणालाच बाहेर पडता नाही आलं की काहीच नाही. माझ्या पायाला जखमा झाल्या. मला बाहेर खेचलं कोणीतरी. कोणी खेचलं काहीच आठवत नाही. धुराचा लोट होता. लाईट नव्हती. बेक्कार प्रसंग होता."

फोटो स्रोत, SharadBadhe\BBC
ते पुढे सांगतात, "माझ्या परिवाराला जेव्हा मी बघायला आलो. तेव्हा ते ओरडत होते. त्यांना वाटलं मी ढिगाऱ्याखाली आहे. मी वाचलो आणि ते ही सुखरुप आहेत. तेवढच आहे. बाकी आमचं आता काही नाही."
"काय झालं आम्हाला काहीच समजलं नाही. वीज वगैरे सगळं एकाच टायमला ठप्प झालं. पाच जण आम्ही अडकलो होतो. एकाने आम्हाला बाहेर खेचलं काय माहिती नाही. पण मी वाचलो गणपती बाप्पाची कृपा." हे सांगताना ते भावनिक झाले.
बचावकार्यासाठी वाट करण्यासाठी चाळीतली घरं पाडली
या इमारतीच्या भोवती म्हणजे अगदी जवळ चाळीतली बैठी घरं होती.
इमारत कोसळल्यानंतर ढिगारा मोठा झाला आणि त्याखाली अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी, ढिगारा उचलण्यासाठी गाडी होती आणि त्यासाठी वाट करावी लागणार होती.

फोटो स्रोत, SharadBadhe\BBC
चाळीतली घरं पाडावी लागू नयेत म्हणून आधी प्रयत्न झाले, पण शेवटी लोकांच्या जीवाला प्राधान्य देत काही घरं पाडावी लागल्याचं प्रशासकीय अधिकारी सांगतात.
वसई-विरार महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हिरवडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "हा सगळा परिसर दाटीवाटीचा आहे. इमारतीच्या भोवती चाळी आहेत. त्याक्षणी लोकांचे जीव वाचवणं फार गरजेचं होतं त्याकरता ती वाट करावी लागली. त्यात काही चाळी घरं काढावी लागली. त्याही अनधिकृत होते."
'अनधिकृत इमारत, एकाला अटक'
ही इमारत साधारण 14 वर्षं जुनी होती असं मंगेश नरे या रहिवाशाने सांगितलं. मात्र, आम्हाला इमारत धोकादायक आहे अशी कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

फोटो स्रोत, SharadBadhe\BBC
तर महानगरपालिकेने मे 2025 मध्ये इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची नोटीस बजावल्याचं अतिरिक्त आयुक्त संजय हिरवडे यांनी सांगितलं.
ते म्हणाले, "महानगरपालिकेने पाहणी करून पालिकेला ती धोकादायक वाटल्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची नोटीस संबंधितांना दिली होती. त्यांनी ते करून घेतलं नाही हे दुर्देव आहे. संबंधित विकासक आणि जागा मालकाविरुद्ध पालिकेने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. अटकही झालेली आहे. बिल्डींगच अनधिकृत आहे. ती धोकादायक होती."
दुर्घटनेनंतर प्रशासनाने आम्हाला कायमस्वरुपी राहण्यासाठी सुविधा करावी अशी मागणी आता रहिवासी करत आहेत.
मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर
दरम्यान, या दुर्घटनेबाबत जलसंपदा आणि आपत्ति व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी 'एक्स'वर पोस्ट करून हळहळ व्यक्त केली आहे.
या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "मुंबईतील विरार परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 17 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली."

फोटो स्रोत, SharadBadhe\BBC
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
"बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) सह सर्व बचाव यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहेत.
काही नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी हीच प्रार्थना", असंही त्यांनी म्हटलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











