वैष्णो देवी मार्गावरील भूस्खलनातील मृतांची संख्या 30 वर; यात्रा स्थगित

फोटो स्रोत, Reuters
जम्मू-काश्मीरमध्ये वैष्णो देवी मार्गावर झालेल्या भूस्खलनातील मृतांची संख्या 30 झाली आहे. खराब हवामान आणि पावसामुळे बिघडणाऱ्या स्थितीचा अंदाज घेऊनच आपल्या तीर्थयात्रेचे नियोजन करण्यात यावे असे वैष्णो देवी मंदीर संस्थानाने सांगितले आहे.
बीबीसी प्रतिनिधी माजिद जहांगीर यांनी सांगितले की बुधवारी दुपारी 12 वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता, त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले.
भूस्खलनामुळे नुकसान झालेल्या तवी पुलाची जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी पाहणी केली.
अब्दुल्ला यांनी माध्यमांना सांगितले की "भूस्खलनमुळे 30 जणांचा मृत्यू झाला आहे. ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. मी याची माहिती पंतप्रधान मोदींना दिली आहे. पंतप्रधानांनी बचावकार्यासाठी तत्परतेने सहकार्य केले याबद्दल त्यांचे आभार. पुढे देखील मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले आहे."
बिघडलेल्या हवामानाची सूचना देऊन देखील भाविकांना ट्रॅकवरुन हटवण्यात आले नसल्याच्या गोष्टीवर अब्दुल्ला यांनी आश्चर्य व्यक्त केले.
भूस्खलनामुळे किमान 20 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. ते म्हणाले की ही घटना अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. मृतांची ओळख पटली असून त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे पाठवण्याची तयारी करण्यात आली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना वैष्णो देवी संस्थानाकडून लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
या घटनेनंतर वैष्णो देवी यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बिघडलेल्या हवामानामुळे जम्मूतील सर्व शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
काल काय घडलं?
27 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरमधील कठुआ या ठिकाणी 22 जवानांची सुटका करण्यात आली होती.
हिमाचल प्रदेशात चंदीगड-मनाली महामार्गाला मोठे नुकसान झाले असून पंजाबमधील शाळा 30 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

फोटो स्रोत, ANI
वैष्णो देवी मार्गावर पाच जणांचा मृत्यू
वृत्तसंस्थेनी दिलेल्या माहितीनुसार जम्मूतील वैष्णो देवी मार्गावर भूस्खलनामुळे पाच जणांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाले आहे.
कटऱ्याचे जिल्हाधिकारी पीयूष धोत्रा यांनी ANI ला सांगितले की बचावकार्य सुरू आहे. पाच मृतदेहांना कम्युनिटी हेल्थ सेंटरवर आणण्यात आले आहे. 10-11 जण जखमी असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे.

फोटो स्रोत, Indian Army
भारतीय सेनेच्या व्हाईट नाइट कॉर्प्सने ट्विटरवर माहिती दिली आहे की तीन बचाव पथके कटरा आणि आजूबाजूच्या भागात पोहचली आहेत. एक पथक अर्धकुंवारी आणि कटरातील लोकांना मदत करत आहे.
कटराहून ठकरा कोटकडे जाणाऱ्या भूस्खलन झाले आहे, त्या ठिकाणी मदत करण्यासाठी दुसरे पथक पोहचले आहे तर तिसरे पथक जोरियातील दक्षिण भागात बचावकार्य करत आहे.
जम्मूचे विभागीय आयुक्त राकेश कुमार यांनी सांगितले की वैष्णो देवी यात्रा आणि शिवखोडी यात्रा स्थगित करण्यात आली आहे. त्या ठिकाणी भूस्खलन झाले आहे. 8-9 जखमींना वाचवण्यात यश आले असून त्या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे.
गृहमंत्री अमित शाह आणि ओमर अब्दुल्ला यांनी काय म्हटले?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले की जम्मू काश्मीरमध्ये वैष्णो देवी मार्गावर भूस्खलनामुळे झालेले मृत्यू अत्यंत दुःखद आहेत. या बाबतीत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. स्थानिक प्रशासन बचावकार्य करत आहे. त्या ठिकाणी NDRF च्या टीम पोहचल्या आहेत.
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे की "माता वैष्णो देवी मार्गावर भाविकांच्या मृत्यूचे बातमी ऐकून अतीव दुःख झाले. मी पीडित कुटुंबाच्या प्रति संवेदना व्यक्त करतो. ईश्वराला प्रार्थना करतो की दिवंगत आत्मांना शांतता लाभो."
अब्दुल्ला यांनी सांगितले की जम्मू एअर पोर्ट बंद असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना पोहचता आले नाही. बुधवारी सकाळी जम्मू येथे पोहचून परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
22 जवान आणि 3 नागरिकांची सुटका
कठुआ या ठिकाणी बचाव पथकाने 25 जणांची सुटका केली आहे. त्यात 22 जवान आणि 3 नागरिकांचा समावेश आहे. पीटीआय सोबत बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले की उशिरा रात्री आम्हाला कळलं की पाण्याची पातळी वाढली आहे. या ठिकाणी पुलाशी जोडला गेलेला भाग वाहून गेला आहे आणि त्यामुळे CRPF चे जवान अडकले आहेत. SDRF, NDRF आणि लष्कराने बचावकार्य करत या जवानांची सुटका केली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











