Microsoft ची पन्नाशी, MS-DOS ते AI गेल्या 50 वर्षांत असं बदललं कम्प्युटर्सचं जग

फोटो स्रोत, Microsoft
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी
डेस्कटॉप वॉलपेपर, वर्ड, एक्सेल, सॉलिटेअर... या आणि अशा अनेक गोष्टी आपल्याला देणाऱ्या मायक्रोसॉफ्ट कंपनीला 50 वर्षं पूर्ण होतायत.
कम्प्युटर कोणत्याही ब्रँडचा असो, पण ऑपरेटिंग सिस्टीम ही बहुतेकदा Microsoft ची असते.
या गेल्या 50 वर्षांत फक्त मायक्रोसॉफ्ट कंपनीच नाही तर कम्प्युटिंगचं अख्खं जगच बदललं..
काय काय घडलं 1975 पासून 2025 पर्यंत? ही आहे मायक्रोसॉफ्टच्या पन्नाशीची गोष्ट.
4 एप्रिल 1975 बिल गेट्स आणि पॉल अॅलन या दोघांनी मिळून एका कंपनीची स्थापना केली. नावं होतं Micro-soft. Microprocessor चं Micro आणि Software चं Soft.
हा तो काळ होता जेव्हा पर्सनल कम्प्युटर्सचा अगदी जन्म होत होता आणि या दोघांचं स्वप्न होतं जगातल्या प्रत्येक घरात आणि प्रत्येक डेस्कवर कम्प्युटर पोहोचवण्याचं.
सॉफ्टवेअर ही एक लहानशीही इंडस्ट्री नव्हती त्याकाळात. त्यामुळं हे असं स्वप्न पाहणं, ही कल्पनाच वेडी होती.
MS-DOS चा जन्म
बिल गेट्स आणि पॉल अॅलन या दोघांनी Altair 8800 या अगदी सुरुवातीच्या मायक्रो-कम्प्युटरसाठी सॉफ्टवेअर तयार केलं.
70 च्या दशकात कम्प्युटर क्षेत्रात IBM चं वर्चस्व होतं. ते Mainframe Computers तयार करायचे आणि त्यांना या microcomputers च्या म्हणजे आकाराने लहान, घरांमध्ये - ऑफिसमध्ये वापरता येईल अशा कम्प्युटर्सच्या क्षेत्रात शिरायचं होतं.
त्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम तयार करण्याची संधी बिल गेट्स आणि पॉल अॅलन या दोघांना मिळाली.

फोटो स्रोत, Microsoft
यातून जन्म झाला MS - DOS चा. यातलं MS हा Microsoft चा शॉर्टफॉर्म होता. ही ऑपरेटिंग सिस्टीम IBM ला देताना या दोघांनी एक हुशारी केली. IBM ला ऑपरेटिंग सिस्टीम तर दिलीच, पण सोबतच ती इतरही कंपन्यांना विकता येईल असा 'Non-exclusive' करार केला.
परिणामी मायक्रोसॉफ्टला IBM चे स्पर्धक असणाऱ्या Compaq, HP - Hewlett-Packard सारख्या कम्प्युटर तयार कंपन्यांनाही ही ऑपरेटिंग सिस्टीम विकता आली.
यातून मायक्रोसॉफ्टला भरपूर फायदा झाला. पण ही ऑपरेटिंग सिस्टीम सामान्यांना वापरण्यासाठी किचकट होती.
अॅपल आणि मायक्रोसॉफ्टचा वाद
अॅपल कंपनीने जानेवारी 1984 मध्ये Apple Macintosh लाँच केला. हा पर्सनल कम्प्युटर आकाराने लहान होता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला ग्राफिक इंटरफेस होता.
माऊस - आयकॉन्स, ड्रॉप डाऊन मेन्य या सगळ्यामुळे MS - DOS सारखी कमांड देण्याची भानगडच नव्हती. गोष्टी सोप्या झाल्या होत्या.
हा मॅकिंटोश लाँच होण्याआधी मायक्रोसॉफ्टसोबत एक करार करण्यात आला होता वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीटसारखी प्रॉडक्टिव्हीटी सॉफ्टवेअर्स तयार करण्यासाठी.

फोटो स्रोत, Getty Images
1985 मध्ये मायक्रोसॉफ्टने Windows 1.0 लाँच केल्यावर अॅपलला धक्का बसला कारण यातल्या अनेक गोष्टी मॅक ऑपरेटिंग सिस्टीमसारख्या होत्या.
Word, Excel and PowerPoint आणि Windows 2.0 लाँच झाल्यानंतर चिडलेल्या अॅपलने मायक्रोसॉफ्टवर थेट खटला दाखल केला.
दरम्यान 1986 मध्ये मायक्रोसॉफ्टची शेअर बाजारात नोंदणी झाली आणि ही पब्लिक कंपनी झाली.
पुढच्या काही वर्षांमध्ये मायक्रोसॉफ्टने त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये सुधारणा केल्या आणि 1995 मध्ये लाँच झालेल्या Windows 95 ने मायक्रोसॉफ्टचं आणि PCs चं जग बदललं.
तेव्हापासून आजवर ऑपरेटिंग सिस्टीम मार्केटवर या कंपनीचा सर्वाधिक वाटा आहे. Windows 98, XP सोबत पीसी आणि मायक्रोसॉफ्ट घराघरांत पोहोचले.

फोटो स्रोत, Microsoft
1997 मध्ये स्टीव्ह जॉब्स अॅपलमध्ये परतले, पण कंपनीची परिस्थिती चांगली नव्हती. अॅपल दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना जगाला धक्का देत मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स यांनी आपली स्पर्धक असणाऱ्या अॅपलमध्ये 150 मिलीयन डॉलर्सची गुंतवणूक केली.
स्टीव्ह जॉब्स यांनी त्यावेळी म्हटलं होतं - 'Bill, thank you. The world's a better place.'
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
विंडोज फोन, टॅब्लेटचं अपयश
महागडी सॉफ्टवेअर्स तयार करण्यापेक्षा लोकांची Productivity कार्यक्षमता वाढवणारे सॉफ्टवेअर विकसित करण्यावर मायक्रोसॉफ्टचा भर होता. त्यातूनच त्यांना लोकप्रियता मिळाली.
पण टेक्नॉलॉजीतल्या प्रत्येक आघाडीवर ते पहिले होते, वा यशस्वी होतेच, असं नाही.
म्हणजे 90 च्या दशकात इंटरनेटचा झपाट्याने विकास होत असताना मायक्रोसॉफ्ट काहीसं पिछाडीवर होतं.
Netscape हा इंटरनेट ब्राऊजर लोकप्रिय झाल्यानंतर मायक्रोसॉफ्टचा Internet Explorer आला. पण नंतर मात्र त्यांनी स्पर्धकांना मागे टाकलं.
याहूने Rocketmail ही ईमेल सेवा मार्च 1997 मध्ये विकत घेतली, तर मायक्रोसॉफ्टने डिसेंबर 1997 मध्ये Hotmail.com विकत घेतलं. सहा वर्षांनी या हॉटमेलची जागा outlook.com ने घेतली.
मोबाईल फोन्सच्या बाबतीतही मायक्रोसॉफ्टची अशीच गाडी चुकली. मार्केटमध्ये एरिक्सन, नोकिया, ब्लॅकबेरीचा दबदबा होता.

फोटो स्रोत, Getty Images
50 वर्षांच्या काळात मायक्रोसॉफ्टचे तीनच CEO झाले आहेत. बिल गेट्स, स्टीव्ह बामर (Steve Balmer) आणि सत्या नाडेला.
2000 साली बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टची धुरा स्टीव्ह बामर यांच्याकडे सोपवली आणि त्यांनी अनेक गोष्टी बदलल्या. पुढच्या 15 वर्षांत मायक्रोसॉफ्टने अनेक क्षेत्रात diversification केलं.
2001 मध्ये त्यांनी Xbox लाँच केला.
Flight Simulator सारखे व्हीडिओ गेम्स, Encarta CD Encyclopedia, माऊस - कीबोर्डसारखं हार्डवेअर, Zune MP3 प्लेयर, Azure ऑनलाईन वेब होस्टिंग यासारख्या अनेक गोष्टी मायक्रोसॉफ्टने आणल्या.
विंडोज फोन्स, Surface नावाचे टॅब्लेट्स आणि कम्प्युटर्स लाँच करण्यात आले. पण अझूर आणि Xbox वगळता इतर गोष्टी सपशेल आपटल्या.
विकीपीडियासमोर Encarta टिकला नाही. तर अॅपलच्या आयपॉड्ससमोर Zune चा निभाव लागला नाही. टॅब्लेट्सच्या मार्केटमध्येही Apple iPad ने बाजी मारली.

फोटो स्रोत, Getty Images
सप्टेंबर 2013 मध्ये मायक्रोसॉफ्टने फिनलंडची नोकिया कंपनी विकत घेतली. Windows ऑपरेटिंग सिस्टीम असणारे नोकिया फोन्स बाजारात आले, आणि दणकून आपटले. दोनच वर्षांनी मायक्रोसॉफ्टने भरपूर तोटा करत आपली मोबाईल फोन्स सेवा बंद करून विकून टाकली.
हे सगळं सुरू असताना दुसरीकडे ऑपरेटिंग सिस्टीम्स आणि इंटरनेट एक्स्प्लोरर बाबतही मायक्रोसॉफ्टसमोर अडचणी उभ्या राहिल्या होत्या. 2009 मध्ये मायक्रोसॉफ्टने Bing हे नवीन सर्च इंजिन लाँच केलं.
गुगल क्रोमने आघाडी घेतली आणि इंटरनेट एक्स्प्लोरर मागे पडला. विंडोज विस्टामधल्या उणीवाही यूझर्सना त्रास देत होत्या. सततच्या अपडेट्मुळे विंडोजची खिल्ली उडवली जात होती.
2011 मध्ये Skype ही व्हीडिओ कम्युनिकेशन्स सेवा मायक्रोसॉफ्टने विकत घेतली. फोनवरून व्हीडिओ कॉलिंग उपलब्ध नव्हतं त्या काळात ही सेवा प्रचंड लोकप्रिय होती.
मे 2025 मध्ये स्काईप बंद होतंय. आणि हे सगळे युजर्स मायक्रोसॉफ्टच्याच टीम्सकडे वळवले जातील. ही सेवा मायक्रोसॉफ्टने 2017 मध्ये सुरू केली आणि कोव्हिड काळात ती लोकप्रिय झाली.
मायक्रोसॉफ्टची धुरा सत्या नाडेलांकडे
मायक्रोसॉफ्टचे चांगले दिवस संपले असं वाटत असतानाच 2014 मध्ये सत्या नडेला यांनी कंपनीची सूत्रं हाती घेतली.
त्यांनी Github हा सॉफ्टवेअर डेव्हलपर्स वापरत असलेला प्लॅटफॉर्म विकत घेतला. याच GitHub copilot चा पुढे Microsoft 365 Copilot आणि Azure झाला.
आज ही Amazon Web Services नंतरची दुसऱ्या क्रमांकाची क्लाऊड सर्व्हिस आहे आणि मायक्रोसॉफ्टच्या एकूण उलाढालीपैकी 56% हिस्सा या ऑनलाईन सर्व्हिसेसमधून येतो.
मायक्रोसॉफ्टची इमेज बदलण्यासाठी सत्या नडेलांनी आणखी काही गोष्टी केल्या. LinkedIn आणि Minecraft चा ताबा घेत त्यांनी पुन्हा तरूण वर्गाला स्वतःशी जोडलं.
सॉफ्टवेअर विक्रीपासून सुरुवात केल्यानंतर आता कंपनीने आपल्या Office 365 आणि Xbox Live या सेवांसाठी सबस्क्रिप्शन मॉडेल आणलंय.
AI च्या क्षेत्रात मायक्रोसॉफ्टने सगळ्यांच्या आधी हालचाली करत OpenAI सोबत करार केला. ChatGPT तयार करणाऱ्या या कंपनीत 14 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. मायक्रोसॉफ्टने विकसित केलेल्या Copilot या AI मध्ये ChatGPT ची models ही योगदान देतात.
या सगळ्यांमुळे मायक्रोसॉफ्ट कंपनी 50 वर्षांनंतरही काळाशी जुळवून घेत टिकून राहिलेली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव न्यूजरूमचे प्रकाशन.)












