AI ने शास्त्रज्ञांना 10 वर्षांत न सुटलेलं कोडं 2 दिवसांत सोडवलं

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एका संशोधनासाठी लंडनच्या इम्पीरियल कॉलेजचे प्रोफेसर जोस. आर. पेनाडेस आणि त्यांच्या टीमनं तब्बल दहा वर्ष घालवली आहेत.
    • Author, टॉम गेरकन
    • Role, बीबीसी

सध्या जिकडे तिकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चर्चा आहे. याच एआय टूलमुळे दहा वर्षांपासून न सुटणारी समस्या दोन दिवसांत सुटलेली आहे.

एका संशोधनासाठी लंडनच्या इम्पिरिअल कॉलेजचे प्रोफेसर जोस. आर. पेनाडेस आणि त्यांच्या टीमनं तब्बल दहा वर्ष घालवली.

काही सुपरबग्स (बॅक्टेरियाचे असे स्ट्रेन जे अनेक प्रकारच्या प्रतिजैविकांना प्रतिरोधक असतात) अँटीबायोटिक्सच्या विरोधात प्रतिरोधी का होतात? याचा अभ्यास ते करत होते.

त्यांनी गुगलनं बनवलेल्या एआय टूल "को सायंटास्टी"ला आपल्या संशोधनासंबंधी एक प्रश्न विचारला.

अशा प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी तयार झालेल्या गुगलच्या या टूलनं 48 तासांत उत्तर दिलं. हेच उत्तर शोधण्यासाठी प्रोफेसर आणि त्यांच्या टीमला गेली अनेक वर्ष मेहनत करावी लागली.

प्राध्यापक पेनाडेस यांनी बीबीसीसोबत बोलताना सांगितलं की, "आमचा रिपोर्ट अजून प्रकाशित झालेला नाही. तरीही एआय टूलनं हे उत्तर दिलं. हे बघून मला आश्चर्य वाटलं."

"मी एकासोबत शॉपिंग करत होतो. त्यांना म्हणालो की मला एक तासासाठी एकटं सोडा. मला ही गोष्ट समजून घ्यायची आहे."

ग्राफिक्स
ग्राफिक्स

"मी गुगलला मेल केला की आपल्याकडे माझ्या कॉम्प्युटरचा अक्सेस आहे का? पण, गुगलने स्पष्टपणे नकार दिला."

हे संशोधन पूर्ण करण्यासाठी दहा वर्षांचा कालावधी लागला. यापैकी अधिक वेळ हा सिद्धांत सिद्ध करण्यातच गेला, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

एआयने आधीच असं गृहितक दिलं असतं तर आमची अनेक वर्षांची मेहनत वाचली असती, असंही ते म्हणाले.

काय आहे सुपरबग्सचं कोडं?

प्राध्यापक जोस आर. पेनाडेस सांगतात, माझ्या रिसर्च कॉपीपेक्षा एआयने बनवलेली रिसर्च कॉपी चांगली होती. त्यांनी फक्त एकच गृहितक सिद्ध करून दाखवलं असं नाही.

तर या टूलनं आणखी चार गृहितक दिले होते. यापैकी एक गृहितक असं होतं की यावर आम्ही कधीही विचार केला नव्हता. आता आम्ही त्यावर काम करायला सुरुवात केली आहे.

धोकादायक बॅक्टेरिया सुपरबग्स कसे होतात आणि त्यावर अँटीबायोटिक्सचा प्रभाव कसा कमी होतो? हे समजून घेण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.

सुपरबग वेगवेगळ्या विषाणूंपासून एकप्रकारचं शेपूटच तयार करतात त्यामुळे एका व्यक्तीच्या शरीरातून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात सहज प्रवेश करता येतो.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्राध्यापक जोस आर. पेनाडेस सांगतात, माझ्या रिसर्च कॉपीपेक्षा एआयने बनवलेली रिसर्च कॉपी चांगली होती.

प्राध्यापक पेनाडेस सांगतात, या संशोधनाचे गृहीतक हे त्यांच्या टीमनं शोधून काढले. तसेच आतापर्यंत ते कुठेही प्रकाशित किंवा शेअर केले नाही.

त्यामुळे त्यांनी या नवीन एआय टूलला समजून घेण्यासाठी एका गृहितकाचा वापर केला. यानंतर एआय टूलने त्यांना काही गृहितकं दिली.

यामध्ये प्राध्यापक पेनाडेस यांचं संशोधनाचं जे गृहितक होतं तेच एआयचं पहिलं गृहितक होतं. म्हणजे सुपरबग्स एक प्रकारची शेपटासारखी साखळी तयार करून एकाच्या शरीरातून दुसऱ्या शरीरात पसरतात हे एआय टूलनं सांगितलं होतं.

यामुळे संशोधनावर किती परिणाम झाला?

एआयवर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजूंनी चर्चा होत असतात. यामुळे विज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती होईल असं एआय समर्थकांना वाटतं. पण, याच एआयमुळे नोकऱ्या जाण्याची भीतीही अनेकांच्या मनात आहे.

याबद्दल प्राध्यापक पेनाडस सांगतात, लोकांची ही भीती समजू शकतो. पण, यावर गांभीर्यानं विचार केल्यास एआय एक महत्त्वाचं टूल असल्याचं लक्षात येतं.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एआयचा भविष्यात खूप फायदा होणार आहे, असं प्राध्यापक पेनाडस सांगतात.

आमच्या टीममध्ये काम करणाऱ्यांना विश्वास आहे की एआयचा भविष्यात खूप फायदा होणार आहे. एआय विज्ञानाला पूर्णपणे बदलवून टाकेल हा विश्वास मलाही आहे.

या टूलचा एक भाग बनलोय त्याचा मला आनंद आहे. मला असं वाटतंय की मी कोणासोबत तरी चॅम्पियन लीगचा सामना खेळतेय इतका आनंद होत आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.