डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझासंदर्भात पोस्ट केलेल्या एआय व्हीडिओमागचा नेमका हेतू काय?

फोटो स्रोत, Getty Images
डोनाल्ड ट्रम्प त्यांची वक्तव्ये, प्रतिक्रिया, सोशल मीडिया पोस्ट यामुळे सतत चर्चेत असतात. त्यांचे अनेक मुद्दे वादग्रस्त असतात. गाझाच्या पुनर्उभारणीबाबत आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे तयार करण्यात आलेला व्हीडिओ पोस्ट करून ट्रम्प यांनी एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रूथ या सोशल मीडिया व्यासपीठाच्या अकाउंटवरून गाझासंदर्भातील हा एआय व्हीडिओ पोस्ट केला आहे. या व्हीडिओवर हजारो लोक प्रतिक्रिया देत आहेत.
गेल्या दोन वर्षांमध्ये गाझातील युद्धात जवळपास 48 हजार लोक मृत्यूमुखी पडले आहेत. ट्रम्प यांनी पोस्ट केलेल्या व्हीडिओवरून सोशल मीडियावर जोरदार वाद सुरू झाला आहे.
काही ऑनलाईन यूझर्सचं म्हणणं आहे की, हा व्हीडिओ गोंधळ वाढवणारा आहे. तर काहीजण त्याला एकप्रकारचं राजकीय व्यंग मानत असून, तो ट्रोलिंग करण्याचा एक रंजक मार्ग असल्याचं म्हणत आहेत.
बीबीसी व्हेरिफायनं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, हा व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यामागचे नेमके मनसुबे काय आहेत आणि त्याचं महत्त्वं का आहे?


व्हीडिओमध्ये काय आहे?
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)द्वारे तयार करण्यात आलेल्या या नाट्यमय व्हीडिओमध्ये गाझाच्या समुद्रकिनाऱ्याचं काल्पनिक दृश्य दाखवण्यात आलं आहे.
या व्हीडिओत सुरुवातीला दाखवण्यात आलं आहे की, गाझामध्ये एक बंदुकधारी व्यक्ती एका मुलावर बंदूक रोखून आहे आणि जवळच बसलेल्या एका माणसाकडून काहीतरी हिसकावून घेतो आहे. व्हिडिओच्या वर लिहिलं आहे, 'गाझा.'
यात गाझामध्ये झालेला विध्वंस, सशस्त्र लोक आणि मग इमारत बांधणाऱ्या मोठ्या मोठ्या मशीन दाखवण्यात आल्या. त्यानंतर एका अवशेषातून 'नव्या गाझा'चा काल्पनिक बीच दाखवण्यात आला आहे.
व्हीडिओमध्ये दिसतं की, इमारतींच्या ढिगाऱ्यातून काही मुलं समुद्र किनाऱ्याच्या दिशेनं जात आहेत. तिथे त्या अवशेषांच्या एका भागातून समुद्र किनाऱ्यावर बनलेल्या गगनचुंबी इमारती दिसत आहेत.
व्हीडिओतील दुसऱ्या दृश्यात एक गजबजलेला रस्ता दिसतो. रस्त्याच्या दोन्ही बाजुंना इमारती बनलेल्या आहेत. तिसऱ्या दृश्यात इलॉन मस्क समुद्रकिनाऱ्यावर काहीतरी खाताना दिसत आहेत.
व्हीडिओच्या पुढील भागात डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू समुद्रकिनाऱ्यावर आनंद घेताना दाखवण्यात आलं आहे. त्या दोघांच्या बरोबर मागच्या बाजूला 'ट्रम्प गाझा' लिहिलेलं दिसतं.
त्याचबरोबर व्हीडिओमध्ये एक आलिशान इमारतही दाखवण्यात आली आहे. त्यावर 'ट्रम्प गाझा' असं लिहिलेलं आहे.
व्हिडिओच्या एका भागात गाझामध्ये ट्रम्प यांचा भव्य पुतळा दाखवण्यात आला आहे. तसंच काही पुरुषांना अरब महिलांच्या पोशाखात नृत्य करताना दाखवण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, @realDonaldTrump/ Truth Social
याव्यतिरिक्त इलॉन मस्क यांना डॉलर उडवताना, मुलांना आकाशातून पडणारे डॉलर पकडताना दाखवण्यात आलं आहे.
एखाद्या मुद्द्यावर व्यंग किंवा टीका करण्यासाठी किंवा लोकांना आश्चर्यचकित करण्यासाठी नेहमी आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे व्हिडिओ तयार केले जातात.
याआधी गाझामध्ये सुरू असलेला विनाश आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे तयार करण्यात आलेल्या व्हीडिओमधून दाखवण्यात आला होता.
याच प्रकारचा एक फोटो पोस्ट करण्यात आला होता. त्यामध्ये इजिप्त आणि गाझाच्या सीमेवरील रफाहमध्ये मदत साहित्य नेत असलेले हजारो ट्रक दाखवण्यात आले होते. त्यावर लिहिण्यात आलं होतं - 'ऑल आईज ऑन रफाह.'
त्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती आणि गझामध्ये सुरू असलेला प्रचंड विध्वंस कमी करून दाखवण्याचा हा प्रयत्न असल्याचं म्हटलं गेलं होतं.

या बातम्याही वाचा:
- डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला देण्याची तयारी दाखवलेली F-35 फायटर जेट कशी आहेत?
- अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरित भारतीयांबद्दल 'या' 9 धक्कादायक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
- अमेरिकेबरोबर व्यापारात भेदभाव होतो या ट्रम्प यांच्या दाव्यात किती तथ्य?
- इलॉन मस्क 'हाय-प्रोफाइल' कार्यक्रमांमध्ये आपल्या मुलांना एवढी 'स्पेस' का देतात?

सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया
या व्हीडिओवर सर्व प्रकारच्या सोशल मीडिया वेबसाईट्सवर युजर्सकडून तीव्र टीका केली जाते आहे. काहीजणांनी हा व्हीडिओ आक्षेपार्ह आणि अपमानजनक असल्याचं म्हटलं आहे.
तर सोशल मीडियावरील काही यूझर्सने गाझाच्या विनाशासाठी हमास आणि इराणच्या इस्लामी राजवटीला दोषी ठरवलं आहे. तसंच काही व्हीडिओ शेअर केले आहेत.
एका यूझरनं हा व्हीडिओ शेअर करत लिहिलं, "हमास आणि इराणच्या इस्लामिक राजवटीआधी गाझा कसं होतं याची आठवण ट्रम्प यांचा व्हीडिओ करून देतो."
एका यूझरनं ट्रम्प यांच्या व्हीडिओला उत्तर देत आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे तयार करण्यात आलेला दुसरा व्हीडिओ पोस्ट केला आहे.
त्या व्हीडिओमध्ये उदध्वस्त झालेल्या गाझाच्या समुद्रकिनाऱ्यावर ट्रम्प, बायडन, नेत्यानाहू आणि इलॉन मस्क यांना दाखवण्यात आलं आहे. तसंच त्यांच्या पाठीमागे भूमध्य समुद्राचं लाल झालेलं पाणी दाखवण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, @1goodtern
टिकटॉकवर एक व्हीडिओ पोस्ट करण्यात आला आहे. इतर सोशल मीडिया व्यासपीठांवर देखील तो व्हायरल होतो आहे. त्यात एक मुलगी म्हणताना दिसते की, "आम्ही कधीही गाझा सोडणार नाही."
केर बीयर नावाच्या एका यूझरनं एक कार्टून पोस्ट करत लिहिलं आहे, "ट्रम्प गाझाच्या आर्टिफिशियल व्हीडिओला फसण्याचं कारण नाही."
काही अमेरिकन मतदारांनीदेखील यावर नाराजी व्यक्त केली आहे. बिल मॅडेन असेच एक मतदार आहेत.
त्यांनी लिहिलं आहे, "हा व्हीडिओ त्यांच्यासाठी आहे, ज्यांनी गाझामुळे कमला हॅरिस यांना मतदान केलं नाही. पण पुढे काय होणार आहे हे आम्ही सांगितलं होतं. मात्र त्या लोकांनी ऐकलं नाही."
काहीजणांनी व्हीडिओमध्ये ट्रान्स महिलांना दाखवण्यात आल्याबद्दल आक्षेप घेतला. ट्रम्प यांनी एलजीबीटीक्यू आणि ट्रान्स महिलांना जेंडर (लिंग) मानण्यास नकार दिला आहे. त्यांनी सांगितलं आहे की, अमेरिकेत फक्त दोनच लिंगांना मान्यता मिळेल.
एका यूझरनं म्हटलं आहे की, ट्रम्प यांना गाझाला जुगाराचा अड्डा बनवायचं आहे. काही जणांनी हा एक प्रोपगांडा व्हीडिओ असल्याचं म्हटलं आहे.
ट्रम्प यांची यामागचा हेतू काय?
सोशल मीडियावरील ट्रेंड्सचा वापर स्वत:च्या प्रचारासाठी करून घेण्यासाठी ट्रम्प ओळखले जातात. 2024 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रचार मोहिमेच्या काळात त्यांनी या गोष्टीचा जोरदार वापर केला होता.
त्यांनी लाईव्ह स्ट्रीमिंग आणि पॉडकास्टच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता.
याशिवाय, ट्रम्प समर्थक किंवा छोट्या नेत्यांनी ट्रम्पचे आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे तयार करण्यात आलेले व्हीडिओ शेअर केले होते. त्यांची ओळख पटलेली नाही.
याचप्रकारे एका काल्पनिक व्हीडिओमध्ये ट्रम्प आणि इलॉन मस्क यांना नृत्य करताना दाखवण्यात आलं होतं.
फेब्रुवारीच्या सुरुवातीला आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे तयार करण्यात आलेला असाच एक फोटो शेअर करण्यात आला होता.

फोटो स्रोत, Getty Images
त्यामध्ये उदध्वस्त झालेल्या गाझाच्या रस्त्यावर एका मुलाबरोबर दोन जण जात असल्याचं दिसतात. त्यावर लिहिलं होतं, 'व्हॉट नेक्स्ट?' (पुढे काय?)
यानंतर ट्रम्प यांनी त्यांच्या कल्पनेतील गाझाचा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे तयार करण्यात आलेला व्हीडिओ पोस्ट केला. हा व्हीडिओ हजारो जणांनी शेअर केला.
याप्रकारच्या कॉन्टेंटला 'रेज बेट' असं म्हटलं जातं. म्हणजेच प्रतिक्रिया देण्यासाठी चिथावणी देणं.
अर्थात ट्रम्प यांनी हा व्हीडिओ पोस्ट केल्यापासून आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र असं मानलं जातं आहे की हा एक प्रकारचा 'रेज बेट' असू शकतो.
सोशल मीडियाचा अल्गोरिदम असा असतो की भावना, प्रतिक्रिया आणि शेअरिंग याच्या आधारे एखादी गोष्ट व्हायरल झाली तर त्याला आणखी ऑनलाइन प्रोत्साहन मिळतं.
ते कॉन्टेंट लोकांना प्रतिक्रिया देण्यासाठी चिथावणी देणं. मग भलेही ते सकारात्मक असो, की नकारात्मक असो.
त्यामुळे ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतं आणि प्रेक्षकांची संख्या वाढल्यामुळे जाहिरातींचं प्रमाण वाढतं आणि त्यातून सोशल मीडिया कंपन्यांचा नफादेखील वाढतो.
गाझाबद्दलची ट्रम्प यांची योजना
ट्रम्प यांनी यापूर्वी गाझासंदर्भात एक योजना सादर केली होती. ते म्हणाले होते की, त्यांना 'गाझाला मध्यपूर्वेतील रिवेरा' (सुट्टी घालवण्याची सुंदर जागा) बनवायचं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांचा पदभार स्वीकारल्यानंतर, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू हे त्यांची भेट घेणारे पहिले परदेशी पाहुणे होते, असं म्हटलं. या दोघांमधील द्विपक्षीय चर्चेनंतर ट्रम्प यांनी पत्रकारांसमोर त्यांची योजना जाहीर केली होती.
ट्रम्प म्हणाले की, "पॅलेस्टाईनच्या लोकांना गाझामध्ये परत जायचं आहे, कारण त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. गाझाची पुनर्बांधणी होईपर्यंत तिथल्या रहिवाशांना दुसऱ्या ठिकाणी पाठवलं पाहिजे. जेणेकरून अमेरिकेला गाझावर नियंत्रण ठेवता येईल आणि या उदध्वस्त झालेल्या पॅलेस्टिनी प्रदेशाची उभारणी पुन्हा करता येईल."

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणाले, "जमिनीच्या त्या तुकड्यावर अधिकार मिळवणं, त्याचा विकास करणं, हजारो नोकऱ्या निर्माण करणं, ही खूपच जबरदस्त गोष्ट असेल. प्रत्येकालाच हा विचार आवडतो."
मात्र आखाती देशांनी ट्रम्प यांचा हा प्रस्ताव नाकारला. तर पॅलेस्टिनी राजदूतांनी हा प्रस्ताव हास्यास्पद असल्याचं म्हटलं.
ट्रम्प यांच्या या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रसंघ, मानवाधिकार संघटनांसह आंतरराष्ट्रीय समुदायाकडून विरोध करण्यात आला. हा प्रस्ताव 'वांशिक उच्चाटण' करण्याचा प्रयत्न असल्याचे आरोप करण्यात आले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











