'माझ्या बायकोला आता सेक्सची आणि मला मृत्यूची भीती वाटतेय', ट्रम्प यांच्या निर्णयामुळे लाखो लोकांवर परिणाम

फोटो स्रोत, Mike Elvis Tusubira
- Author, डोर्कस वांगीरा
- Role, बीबीसी न्यूज
अमेरिकेकडून गरजू देशांना मिळणारी मदत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बंद केल्यापासून माईक इल्विस तुसूबिरा यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आहे.
एचआयव्हीसह जगणारे 35 वर्षांचे माईक युगांडा देशात मोटरसायकल टॅक्सी रायडर म्हणून काम करतात. एचआयव्हीसह जगणाऱ्या रुग्णांना जीवनदायी ठरणारी अँटी रेट्रेव्हायरल (ARV) ही औषधं ते घेतात.
ट्रम्प यांच्या निर्णयामुळे या औषधांचा पुरवठा बंद झाल्यानं माईक यांचं आयुष्य धोक्यात आलं आहे.
शिवाय, सुरक्षित लैंगिक संबंध ठेवता येत नसल्यानं आता पत्नीपासून वेगळं होण्याचीही वेळ त्यांच्यावर आली आहे.
त्यांची पत्नी एचआयव्ही निगेटिव्ह आहे. प्री-एक्सपोज़र प्रोफिलॅक्सिस (पीआरईपी) नावाचं एक औषध त्या घेतात.
एचआयव्हीच्या संसर्गाची लागण होण्याचा धोका असलेल्या रुग्णांना प्रतिबंधात्मक औषध म्हणून पीआरईपी दिलं जातं.
"हे औषध नसेल तर माझी पत्नी माझ्यासोबत राहणार नाही. याचाच अर्थ असा की माझा काडीमोड होणार," असं बीबीसीशी बोलताना माईक सांगत होते.

फोटो स्रोत, Getty Images
"कंडोम नाहीत, एचआयव्हीविरोधी लुब्रिकंट) नाही, पीआरईपी नाही, काहीच उपलब्ध नाही. अशा लग्नबंधनात एकमेकांसोबत आम्ही राहू शकत नाही. याचा अर्थ मला एकटंच रहायला हवं," असंही ते पुढे म्हणाले.
आत्तापर्यंत एचआयव्ही बाधित जोडप्यांसाठीची औषधं आणि गर्भनिरोधक साधनं युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (युएसएड) या संस्थेकडून येत होती.
त्याचा पुरवठा अचानक बंद केला गेला असल्याची माहिती माईक यांना सोशल मीडियावरून कळाली. आधी माहीत असतं तर निदान या गोष्टी साठवून ठेवता आल्या असत्या.


त्यांच्या पत्नीकडचं पीआरपीई औषध पूर्णपणे संपलं आहे. काही कंडोम्स अजनूही त्यांच्याकडं आहेत. पण ते किती दिवस पुरणार? शिवाय फक्त त्यावर अवलंबून राहणं त्यांच्या पत्नीसाठी धोक्याचं आहे.
"मी अंधारात चाललो आहे"
राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी मदत 90 दिवसांसाठी स्थगित करण्याचे आदेश दिले. त्यानंतर युएसएडच्या निधीतून काम करणाऱ्या संस्थांना काम बंद करायला सांगितलं गेलं.
पुढे काही मानवाधिकारी प्रकल्पांना यातून सूटही दिली गेली. मात्र तोपर्यंत माईक तुसूबिरा जिथून औषधं घेत होते त्या कंपाला राजधानीच्या उत्तरेकडं असलेल्या मार्पी दवाखान्यातला एचआयव्ही कार्यक्रम बंद पडला होता.
नेमकं काय सुरू आहे याबद्दल विचारण्यासाठी माईक यांनी त्यांच्या किसवा आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या समुपदेशकांनाही फोन केला.
"माझे समुपदेशक तेव्हा एका गावात होते. ते आता केंद्रात काम करत नाहीत असं त्यांनी सांगितलं," असं माईक पुढं सांगत होते.
माईक यांना एक मूल आहे. 2022 मध्ये त्यांना एचआयव्ही असल्याचं निदान झालं होतं. त्यांच्या रक्तातली विषाणुंची संख्या किती आणि त्याच्या रोगप्रतिकारक शक्तीची ताकद किती आहे हे सांगणारी एक तपासणी त्यांना करता आलेली नाही.

फोटो स्रोत, Getty Images
"मी आता अंधारात चालल्यासारखा जात आहे. माझा व्हायरल लोड कमी झाला आहे की नाही मला माहीत नाही. मानसिक आघात बसल्यासारखं वाटत आहे," माईक म्हणतात.
ज्याला तिथल्या स्थानिक भाषेत बोडा-बोडा म्हणतात, त्या मोटरबाईक टॅक्सी चालकाचं काम त्यांच्या कुटुंबाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी पुरेसं नाही, असं त्यांना वाटतं.
"औषधं खासगी औषधालयात मिळतील असं काही लोक सांगत होते. पण माझ्या बोडा-बोडा चालकाच्या कामातून मिळणारे पैसे त्यासाठी पुरेसे नाही. उपचार सुरू ठेवण्यासाठी पैसे कुठून आणायचे ते मला माहीत नाही," माईक पुढे सांगत होते.
युगांडाची आरोग्य व्यवस्था
युएसएडकडून निधी मिळणाऱ्या इतर सामाजिक संस्थांच्याही सेवा बंद झाल्याचा फटका त्यांना बसला आहे.
त्यांच्या पत्नीसाठी पीआरईपीच्या गोळ्या मार्पीतल्या एका सामाजिक संस्थेमार्फतच येत होत्या. शिवाय, त्यांचा पाच वर्षांचा मुलगा गरीब मुलांसाठी उभारलेल्या एका संस्थेच्याच शाळेत जात होता. तिथेच त्याला जेवणंही मिळत असे.
"माझा मुलगा आता शाळेत जात नाही," ते म्हणाले.
युगांडा देशाची आरोग्य व्यवस्था ही मोठ्या प्रमाणावर देणग्या आणि निधींवर अवलंबून आहे. एचआयव्ही/ एड्ससाठी खर्च करण्यात येणारा 70 टक्के पैसा अशा निधींमधूनच येतो.
युएसएडकडून निधी मिळणाऱ्या आफ्रिकेतल्या पहिल्या 10 देशांच्या यादीत युगांडा हा देश येतो.
अमेरिकेच्या सरकारी आकडेवारीनुसार, युगांडाला 2023 मध्ये युएसएडकडून 29.5 कोटी डॉलर्स एवढा निधी मिळाला होता. नायजेरिया (36.8 कोटी डॉलर्स) आणि टान्झानिया (33.7 कोटी डॉलर्स) या देशानंतर तिसरा सर्वात जास्त निधी युगांडाला मिळाला.
युगांडामधल्या मलेरिया, क्षयरोग आणि कुष्ठरोग कार्यक्रमांनाही युएसएडकडूनच मदत मिळते. शिवाय, बाल आणि माता आरोग्य सेवा आणि आपत्कालिन सेवांसाठीही निधी पुरवला जातो.

अमेरिकेनं हा निधी थांबवल्यामुळे हजारो आरोग्य कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला आहे.
डॉ. शामिराह नाकिटो रिच आऊट एमबुया (रॉम) या धर्मदाय सामाजिक संस्थेत एचआयव्हीसह जगणाऱ्या रुग्णांना चिकित्सक आणि मानसिक आधार देण्याचं काम करतात.
कंपालाच्या किसेनी भागातल्या दाटीवाटीतल्या झोपटपट्टीत असलेल्या आरोग्य केंद्रात त्या रॉमकडून त्यांच्या सेवा पुरवत असत.
एचआयव्ही आणि क्षयरोगाचे दररोज साधारणपणे 200 रुग्ण त्यांच्याकडे येत असत. मात्र, अमेरिकेने काम थांबवण्याचे आदेश दिल्यानंतर रॉमसाठी काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं.
किसेनीमधल्या क्षयरोग विभागात आता शांतता पसरली आहे. तिथला अनाथ आणि गरीब मुलांसाठीचा विभागही बंद करण्यात आला आहे.
"आम्ही 90 दिवस संपण्याची वाट पहात आहोत. या जबरदस्तीच्या सुट्टीसाठी मी तयार नव्हते," बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या.
"हे इतकं अचानक आलं. मला हातातलं कामही पूर्ण करता आलं नाही. आम्ही एकदम काम करणंच थांबवलं," त्या पुढे सांगत होत्या.
युगांडाचा आरोग्य विभाग पर्यायी मार्गांच्या शोधात
हे अडथळे दूर करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधत असल्याचं युगांडाच्या आरोग्य विभागानं सांगितलं.
जे कर्मचारी देशासाठी पुढं येऊन स्वयंसेवक म्हणून काम करू इच्छितात त्यांनी आरोग्य विभागाला संपर्क करावा, असं आवाहन डॉ. डिआना आटवाईन यांच्याकडून करण्यात आलंय. आरोग्य विभागातल्या त्या वरिष्ठ पदावरच्या अधिकारी आहेत.
आफ्रिकेच्याच दक्षिणकडं असणाऱ्या मालावी या देशातही युएसएडकडून चालवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांवर गदा आली आहे.
या देशाला 2023 मध्ये युएसएडच्या आरोग्य बजेटमधून 15.4 कोटी डॉलर्स मिळाले होते. सर्वात जास्त निधी मिळणाऱ्या आफ्रिकेतल्या देशांच्या यादीत मालावीचा नंबर दहावा होता.
मालावीमधल्या मुझुझू शहरातल्या एचआयव्हीच्या सेवा पुरवणाऱ्या एका महत्त्वाच्या दवाखान्याच्या दाराला कुलूप घालण्यात आलं आहे.
तिथल्या ॲम्बुलन्स, गाड्या जागीच उभ्या आहेत. माक्रो मुझुझू क्लिनिक ओस पडलंय. दवाखान्याच्या दाराला टाळं लावून आणि आतले दिवे बंद करून कर्मचारी 18 दिवसांपुर्वीच घरी गेलेत.

28 जानेवारीला अमेरिकेनं एआरव्हीसारखी महत्त्वाची औषधं पुरवण्याची परवानगी दिली. मात्र, त्याचं वितरण करण्यासाठी लागणारे कर्मचारीच निघून गेल्यामुळे नवं आव्हान उभं राहिलंय.
अनेक ठिकाणी काम करण्याची परवानगी परत मिळाली असली तरी गोंधळ तसाच राहिला आहे. आपण कोणतं काम करू शकतो आणि कोणतं काम बंद करायला सांगितलं आहे हेच कर्मचाऱ्यांना माहीत नाही.
अतुल गांवडे हे युएसएडचे माजी जागतिक आरोग्य सहाय्यक प्रशासक आहेत. एक्स (आधीचं ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी सांगितलंय की युएसएडमधल्या कर्मचाऱ्यांची 90 टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा घाट ट्रम्प यांच्या प्रशासनानं घातला आहे.
त्यामुळे युएसएडमधल्या कर्मचाऱ्यांची संख्या 14,000 वरून 294 वर येणार आहे. त्यातील फक्त 12 कर्मचारी आफ्रिकेत काम करतील.
मालावीमधल्या 30 पेक्षा जास्त सामाजिक संस्थांवरही निधी स्थगित झाल्याचा गंभीर परिणाम होत आहे.
32 वर्षांच्या इडाह सीमफुकवे बंडा उदरनिर्वाहासाठी शेती करतात. त्यांना मॅक्रो क्लिनिकमधून 2017 पासून एआरव्हीची औषधं मिळत होती.
अनेक सामाजिक संस्था या क्लिनिकच्या माध्यमातून एचआयव्ही कार्यक्रम चालवत होत्या.
इडाह आणि त्यांची नणंदही अशा औषधांवर अवलंबून होत्या. आता प्रार्थना करत राहण्याशिवाय काहीच हातात नसल्याचं इडाह म्हणतात.
"मालावीवासी म्हणून आम्हाला प्रार्थना केली पाहिजे. आमच्यापैकी ज्यांची श्रद्धा आहे ते एक दार बंद करून दुसरं उघडणाऱ्या देवाची वाट पहात आहेत," बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या.
इडाह यांना तीन मुलं आहेत. तीन आठवडे इतकाच एआरव्ही औषधांचा साठा त्यांच्याकडे आहे. हे व्यवस्थेचं अपयश असल्याचंही त्या सांगत होत्या.
"मालावी देश मदतीवर खूप अवलंबून आहे. आम्ही आळसावलेले आहोत. आमचा वेळ वाया घालवतो आणि दुसऱ्या देशांनी मदत करावी म्हणून वाट पहात बसतो. आमच्या स्वतंत्र मार्ग शोधायला हवेत हा धडा यातून घेऊया," त्या म्हणाल्या.
नैसर्गिक आपत्तीही कारणीभूत
पण जगातल्या सगळ्यात गरीब आणि मदतीवर अवलंबून असणाऱ्या देशासाठी हे लगेच मिळवणं अवघड आहे. वर्ल्ड बँकेनुसार, मालावी देशाला अनेक वर्ष पडणारा दुष्काळ, सततची वादळं आणि अनियमित पाऊस अशा नैसर्गिक आपत्तींचा धोका असतो.
अशा पद्धतीचे अडथळे सतत येत असतील तर आरोग्य सेवा पुरवणं हे व्यवस्थेसमोर फार मोठं आव्हान असतं. गेली अनेक दशकं आफ्रिकेत सार्वजिक आरोग्य पुरवण्यात अमेरिकेचा सिंहाचा वाटा आहे.
त्याचं एक उदाहरणम म्हणजे, 2003 साली अमेरिकनं आणलेला जागतिक पातळीवर एचआयव्ही प्रसार रोखण्यासाठीचा कार्यक्रम. युएस प्रेसिडेन्ट्स इमरजन्सी प्लॅन फॉर एड्स रिलिफ (पेपफार) या प्रकल्पानं २५ कोटी लोकांचे प्राण वाचवलेत.
आफ्रिका सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (आफ्रिका सीडीसी) या संस्थेच्या प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे, युएसएडकडून आफ्रिकेला आत्तापर्यंत 800 कोटी डॉलर्सची मदत मिळाली आहे.
"यातला 72 टक्के पैसा आरोग्यावर खर्च झाला आहे," जीन कासेया यांनी बीबीसी न्यूसडेशी बोलताना मागच्या महिन्यात सांगितलं.
या निधीला पर्याय शोधणं हे अत्यंत अवघड काम असल्याचं आरोग्य तज्ज्ञ म्हणत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
काही आफ्रिकन देशातल्या सरकारांनी मदतीवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी ठोस पावलं उचललेलीही दिसतात. एचआयव्हीवरचा 60 टक्के खर्च केनिया हा देश आता स्वतः उचलतो. तसंच, दक्षिण आफ्रिका 80 टक्के खर्च स्वतः करतो.
पण कर्जाचं ओझं, नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक आघात सोसणाऱ्या काही कमी उत्पन्न देशांसाठी स्वयंपूर्ण होणं अगदीच अशक्य आहे.
उद्भवलेल्या परिस्थितीवर तातडीनं काही तोडगा काढला नाही तर जागतिक आरोग्य संकटात येईल असा इशारा आमरेफ हेल्थ आफ्रिका या आफ्रिका खंडातल्या सर्वात महत्त्वाच्या सामाजिक संस्थेनं दिला आहे.
"आफ्रिकन देशांच्या सरकारांना आणि आफ्रिका सीडीसीला त्यांचे स्वतःचे निधी उत्पन्न करण्याचे मार्ग शोधायला हवेत. या देशांवर असलेलं कर्ज पाहता आत्ता ते निव्वळ अशक्य आहे," संस्थेच्या सीईओ गितीन्जी गिताही बीबीसीला सांगत होत्या.
हे आव्हान फक्त आफ्रिकेपुढचं नाही, असंही त्या पुढे सांगत होत्या. "हवामान बदलामुळे साथरोगात वाढ होताना दिसत आहेत. तसंच, मानव-पर्यावरण यांच्यातलाही संघर्ष वाढत आहे. यामुळे संपूर्ण जगातच असुरक्षितता पसरते आहे," त्या पुढे म्हणाल्या.
जगावर एचआयव्हीचा परिणाम
2023 मध्ये जगभरात एड्समुळे 6,30,000 लोकांचा मृत्यू झाला. तर 15 लाख लोकांना एचआयव्हीची लागण झाली.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, एचआयव्हीमुळे सर्वात जास्त प्रभावित झालेल्या देशांमधला संसर्ग दर कमी होत आहे. मात्र, युएसएडने निधी देणं बंद केल्यामुळे हा दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
"अमेरिकन सरकारने त्यांचं योगदान काढून घेतलं तर पुढच्या 5 वर्षांत एड्समुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये 63 लाखांची भर पडेल असा अंदाज आहे," विनी ब्यानिमा या संयुक्त राष्ट्र संघाच्या एड्स कार्यक्रमाच्या प्रमुख बीबीसी आफ्रिका डेली पॉडकास्टच्या या आठवड्याच्या कार्यक्रमात बोलताना सांगत होत्या.
"87 लाख लोकांना नव्यानं संसर्ग होईल आणि पालकांचा एड्समुळे मृत्यू झाल्याने 34 लाख मुलं अनाथ होतील. मी अशुभ बोलत आहे असं नाही. पण समोर दिसणारे आकडे लोकांना सांगणं हे माझं काम आहे," त्या पुढे म्हणाल्या.

फोटो स्रोत, Getty Images
एचआयव्हीचे उपचार मध्येच थांबवल्याचे परिणाम गंभीर असतात असा इशारा मेडिसिन्स सान्स फ्रॉन्टिअर्स (एमएसएफ) ही संस्थाही देते.
"एचआयव्हीची औषधं रोज घ्यावी लागतात. नाहीतर त्याविरोधातला प्रतिकार विषाणूमध्ये येतो किंवा उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांमुळे मृत्यूही ओढावू शकतो," टॉम इलमन, एमएसएफचे दक्षिण आफ्रिकेतले कर्मचारी एका निवेदनात म्हणालेत.
युंगाडामधले माईक तुसूबिरा यांना भविष्याबद्दलच्या उदासिनतेनं ग्रासलं आहे. 30 दिवस पुरतील एवढीच एआरव्ही औषधं त्यांच्याकडे आहेत. त्यानंतर कंपाला सोडून गावी जाऊन रहायचा त्यांचा विचार आहे.
"तिथं निदान गोष्टी सोप्या होतील. माझा मृत्यू झाला तर मला तिथंच पुरलं जाईल. इथं राहिलो तर कंपाला मधल्या लोकांना त्रास होईल. एआरव्ही सेवांशिवाय इथं राहण्यात काही अर्थ नाही," ते म्हणतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











