अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरित भारतीयांबद्दल 'या' 9 धक्कादायक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
डोनाल्ड ट्रम्प यांनी अनधिकृतपणे अमेरिकेत स्थलांतरित झालेल्यांबद्दल कडक भूमिका घेतली आहे. या स्थलांतरितांना त्यांच्या मायदेशी पाठवण्याचं महत्त्वाचं धोरण त्यांनी स्वीकारलं आहे.
अमेरिकेनं म्हटलं आहे की, अमेरिकेत जवळपास 18,000 भारतीय बेकायदेशीररित्या स्थलांतरित झाल्याचं त्यांना समजलं आहे.
गेल्या आठवड्यात नरेंद्र मोदी म्हणाले होते की, अमेरिकेत अनधिकृतपणे स्थलांतरित झालेल्या भारतीयांना मायदेशी परत घेतलं जाईल आणि 'मानवी तस्करीची' व्यवस्था मोडून काढण्यासाठी पावलं उचलली जातील.
"ही खूप सामान्य कुटुंबातील मुलं आहेत आणि त्यांना मोठी स्वप्नं आणि आश्वासनांची भुरळ घालण्यात येते," असं नरेंद्र मोदी त्यांच्या वॉशिंग्टन दौऱ्यात म्हणाले होते.
आता जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील ॲबी बडीमन आणि देवेश कपूर यांच्या नव्या शोधनिबंधात अनधिकृत भारतीय स्थलांतरितांची संख्या, त्यांचे वयोगट, अमेरिकेत प्रवेश करण्याच्या पद्धती, ठिकाणं आणि ट्रेंड्स या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
त्यातून समोर आलेले काही धक्कादायक निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत.
1. अमेरिकेत किती बेकायदेशीर भारतीय स्थलांतरित आहेत?
अमेरिकेच्या लोकसंख्येच्या 3 टक्के इतकं तिथल्या अनधिकृत स्थलांतरितांचं प्रमाण आहे. तर अमेरिकेतील 22 टक्के परदेशी जन्मलेले लोक बेकायदेशीर स्थलांतरित आहेत.
अर्थात त्यात बेकायदेशीर किंवा अधिकृत कागदपत्रे नसलेल्या भारतीय स्थलांतरितांची संख्या वादग्रस्त आहे. कारण त्यांची गणना करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींमुळे त्यासंदर्भातील अंदाज मोठ्या प्रमाणात बदलतात.
प्यू रिसर्च सेंटर अँड सेंटर फॉर मायग्रेशन स्टडीज ऑफ न्यूयॉर्कचा (CMS) अंदाज आहे की, 2022 पर्यंत जवळपास 7 लाख अनधिकृत भारतीय स्थलांतरित अमेरिकेत होते. त्यामुळे मेक्सिको आणि एल साल्वाडोरनंतर अनधिकृत स्थलांतरितांमध्ये भारतीय तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
त्याउलट मायग्रेशन पॉलिसी इन्स्टिट्यूटनुसार (MPI) ही संख्या 3 लाख 75 हजार इतकी आहे. त्यांच्या संख्येनुसार स्थलांतरितांच्या बाबतीत भारत पाचव्या क्रमांकावर आहे.
अमेरिकेच्या गृह विभागाच्या (DHS) अधिकृत आकडेवारीनुसार आणखी वेगळं चित्र समोर येतं. या विभागानुसार, 2022 मध्ये अमेरिकेत 2 लाख 20 हजार अनधिकृत स्थलांतरित भारतीय असल्याची नोंद झाली आहे.
अभ्यासानुसार, अनधिकृत स्थलांतरित भारतीयांच्या संख्येबाबतच्या विविध अंदाजांमध्ये असलेल्या प्रचंड फरकातून त्यांच्या खऱ्या संख्येविषयी असलेली अनिश्चितता अधोरेखित होते.


2. उच्चांकीवरून घसरलेली स्थलांतरितांची संख्या
अमेरिकेत असलेल्या एकूण अनधिकृत स्थलांतरितांमध्ये भारतीय स्थलांतरितांच्या संख्येचं प्रमाण खूप कमी आहे.
प्यू आणि सीएमएस यांचे अंदाज जर अचूक असतील, तर अमेरिकेत असणाऱ्या जवळपास दर चार स्थलांतरित भारतीयांपैकी एक भारतीय अनधिकृत आहे. स्थलांतराचा पॅटर्न लक्षात घेता असं असणं शक्य नाही, असं अभ्यासात म्हटलं आहे.
(भारतीय स्थलांतरित हे अमेरिकेत सर्वाधिक वेगानं वाढणाऱ्या समुदायापैकी एक आहेत. 1990 मध्ये भारतीय स्थलांतरितांची संख्या 6 लाख होती. ती वाढून 2022 मध्ये 32 लाखांवर पोहोचली आहे.)
अमेरिकेच्या गृह विभागाच्या 2022 मधील अंदाजानुसार अमेरिकेतील अनधिकृत स्थलांतरित भारतीयांची संख्या 2016 मध्ये शिखरावर होती. त्यात घट होत ती 60 टक्क्यांनी कमी झाली आहे. आकडेवारीत सांगायचं तर 5,60,000 वरून कमी होत ती 2,20,000 वर आली आहे.
2016 मध्ये शिखरावर असलेली अनधिकृत भारतीय स्थलांतरितांची संख्या 2022 मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कमी कशी काय झाली? कपूर म्हणतात की, या आकडेवारीतून कोणतंही स्पष्ट उत्तर समोर येत नाही.
मात्र यासंदर्भात तर्कसंगत विश्लेषण असं असू शकतं की काहींना कायदेशीर मंजूरी मिळाली, तर इतर मायदेशी परतले. विशेषकरून कोरोनाच्या काळातील अडचणींमुळे ते परतले असावेत.
मात्र या अंदाजातून 2023 मध्ये अमेरिकेतील भारतीय स्थलांतरितांच्या संख्येत झालेली वाढ दिसून येत नाही. याचाच अर्थ प्रत्यक्षातील संख्या आता जास्त असू शकते.

फोटो स्रोत, Getty Images
सीमेवरील चकमकींमध्ये वाढ होत असली तरी अमेरिकन सरकारच्या अंदाजात 2020 ते 2022 या अमेरिकन आर्थिक वर्षादरम्यान अमेरिकेतील अनधिकृत भारतीय स्थलांतरितांच्या संख्येत कोणतीही स्पष्ट वाढ झाल्याचं दिसून येत नसल्याचं या अभ्यासात म्हटलं आहे.
सीमेवरील चकमकी किंवा घडामोडी म्हणजे मेक्सिको किंवा कॅनडाला लागून असलेल्या अमेरिकेच्या सीमेतून अमेरिकेत बेकायदेशीरपणे शिरण्याचा स्थलांतरितांचा प्रयत्न अमेरिकन यंत्रणांनी हाणून पाडला.
व्हिसा संपल्यानंतरदेखील अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या भारतीयांचं प्रमाण 2016 पासून 1.5 टक्क्यांवर स्थिर राहिलं आहे.
डिफर्ड ॲक्शन फॉर चाईल्डहूड अरायव्हल्स (Daca) लागू झालेल्या भारतीयांची संख्या देखील घटली आहे. 2017 मध्ये त्यांची संख्या 2,600 होती, ती 2024 मध्ये 1,600 वर आली आहे.
डिफर्ड ॲक्शन फॉर चाईल्डहूड अरायव्हल्स कार्यक्रम जे स्थलांतरित अमेरिकेत बालपणी आले होते त्यांना संरक्षण देतो.
थोडक्यात, अमेरिकेतील अनधिकृत स्थलांतरित भारतीयांची संख्या देखील वाढली आहे आणि एकूण स्थलांतरितांमधील त्यांचे प्रमाण देखील वाढले आहे.
म्हणजेच 1990 मध्ये ते 0.8 टक्के होते. त्यात वाढ होत 2015 मध्ये हे प्रमाण 3.9 टक्के झाले. तर 2022 मध्ये त्यात घसरण होत ते 2 टक्के झाले.
3. स्थलांतरितांच्या संख्येतील वाढ आणि स्थलांतराचे बदलते मार्ग
अमेरिकेच्या भूमीला दोन मुख्य सीमा आहेत.
अमेरिकेच्या दक्षिणेकडील मेक्सिकोला लागून असलेली सीमा अरिझोना, कॅलिफोर्निया, न्यू मेक्सिको आणि टेक्सास या अमेरिकेतील राज्यांना लागून आहे. याच सीमेवरून सर्वाधिक बेकायदेशीर स्थलांतरित अमेरिकेत शिरतात.
तर उत्तरेकडे अमेरिकेची सीमा कॅनडाला लागून आहे. ही सीमा अमेरिकेच्या 11 राज्यांमध्ये विस्तारलेली आहे.
2010 पूर्वी मेक्सिको आणि कॅनडा या दोन्ही सीमांवरून अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश करू पाहणाऱ्या भारतीयांची संख्या फारच कमी होती. ही संख्या कधीही 1,000 पेक्षा जास्त नव्हती.
2010 पासून मात्र चित्र बदललं आहे. तेव्हापासून अमेरिका-मेक्सिको सीमेवरील अमेरिकन यंत्रणांना अमेरिकेत बेकायदेशीरपणे शिरणाऱ्या प्रत्येक प्रयत्नात भारतीय सापडले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
2024 या आर्थिक वर्षात अमेरिकेच्या उत्तर सीमेतून अमेरिकेत बेकायदेशीरपणे शिरणाऱ्या भारतीयांच्या संख्येत 36 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत त्यात फक्त 4 टक्क्यांची वाढ झाली आहे.
कॅनडातून अमेरिकेत प्रवेश करणं हे भारतीयांसाठी अधिक सुलभ ठरलं आहे. कारण कॅनडात अमेरिकेच्या तुलनेत व्हिजिटर व्हिसाच्या प्रक्रियेसाठी लागणारा कालावधी कमी आहे.
त्याचबरोबर 2021 पासून अमेरिकेत बेकायदेशीरपणे शिरण्याच्या प्रयत्नांमध्ये वाढ झाली होती. मेक्सिकोला लागून असलेल्या अमेरिकेच्या सीमेतून अमेरिकेत शिरण्याचे प्रयत्न 2023 मध्ये शिखरावर पोहोचले होते.
"हे फक्त भारतीयांपुरतंच मर्यादित नाही. जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर अमेरिकेत येऊ पाहणाऱ्या स्थलांतरितांच्या मोठ्या संख्येचा तो एक भाग आहे. एकप्रकारे तेव्हा अमेरिकेत स्थलांतरित होणाऱ्यांची मोठी लाटच आली होती आणि भारतीयदेखील त्याचा एक भाग होते," असं कपूर यांनी बीबीसीला सांगितलं.
4. बेकायदेशीर भारतीय स्थलांतरित अमेरिकेत कुठे राहतात?
या अभ्यासात असं आढळलं आहे की, कॅलिफोर्निया (1,12,000), टेक्सास (61,000), न्यू जर्सी (55,000), न्यूयॉर्क (43,000) आणि इलिनॉईस (31,000) या अमेरिकेन राज्यांमध्ये सर्वाधिक स्थलांतरित भारतीय राहतात. याच राज्यांमध्ये अनधिकृत भारतीय स्थलांतरितांची संख्यादेखील सर्वाधिक आहे.
ओहायो (16 टक्के), मिशिगन (14 टक्के), न्यू जर्सी (12 टक्के) आणि पेनसिल्व्हेनिया (11 टक्के) या अमेरिकेतील राज्यांमधील एकूण अनधिकृत स्थलांतरितांमध्ये भारतीयांचं प्रमाण लक्षणीय आहे.
दरम्यान, टेनेसी, इंडियाना, जॉर्जिया, विस्कॉन्सिन आणि कॅलिफोर्निया या अमेरिकन राज्यांमध्ये अनधिकृत भारतीय स्थलांतरितांची संख्या 20 टक्क्यांहून अधिक आहे.
"हे असं असण्यामागचं कारण या राज्यांमध्ये मिसळून जाणं आणि तिथल्या भारतीय वंशाच्या व्यवसायात काम मिळवणं सोपं आहे. उदाहरणार्थ गुजराती-अमेरिकन व्यक्तीकडे स्थलांतरित गुजराती माणूस काम करतो किंवा पंजाबी-शीख अमेरिकन व्यक्तीकडे स्थलांतरित पंजाबी-शीख व्यक्ती काम करतो," असं कपूर म्हणाले.
5. अमेरिकेत स्थलांतर करणारे भारतीय कोण आहेत?
अमेरिकेतील इमिग्रेशन व्यवस्था सीमेवर ताब्यात घेतलेल्या ज्या लोकांना मायदेशात छळ होण्याची भीती वाटत असते त्यांना विश्वासार्ह "गंभीर आरोग्य तपासणी" (fear screenings) करण्याची परवानगी देते.
जे लोक या निकषात बसतात ते न्यायालयात आश्रय मागू शकतात. त्यामुळे सीमा ओलांडण्याचे प्रकार वाढण्याची भीती वाढण्याबरोबरच आश्रय मागणाऱ्या अर्जांमध्ये देखील वाढ होते.
अमेरिकेतील प्रशासकीय आकडेवारीतून अमेरिकेत आश्रय घेऊ पाहणाऱ्या भारतीयांचा वयोगट आणि इतर माहिती अचूकपणे समोर येत नाही. मात्र अमेरिकेत बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या न्यायालयातील नोंदींमधून काही गोष्टी समोर येतात.
2001 पासून अमेरिकेत आश्रय मागणाऱ्या भारतीयांमध्ये पंजाबी भाषिक लोकांची संख्या सर्वाधिक आहे. पंजाबीनंतर हिंदी भाषिक (14 टक्के), इंग्रजी (8 टक्के) आणि गुजराती (7 टक्के) भाषिक लोकांचा क्रमांक आहे.
2001-2022 या आर्थिक वर्षांदरम्यान या लोकांनी अमेरिकेत आश्रय मागणारे 66 टक्के अर्ज केले आहेत. यातून पंजाब आणि त्याच्या शेजारील हरियाणा या राज्यांमधून सर्वाधिक स्थलांतरित येत असल्याचं दिसून येतं.
भारतातून येणाऱ्या पंजाबी भाषिक लोकांचा आश्रय अर्ज मंजूर होणाचा दर सर्वाधिक म्हणजे 63 टक्के होता. त्याखालोखाल हिंदी भाषिकांचा (58 टक्के) क्रमांक लागतो. त्या तुलनेत फक्त एक चतुर्थांश गुजराती भाषिकांच्या आश्रय अर्जांना मंजूरी मिळाली.
6. आश्रय मागणाऱ्यांच्या संख्येत वाढ का होते आहे?
ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंटनं (OECD) गोळा केलेल्या अमेरिकन आकडेवारीतून असं दिसतं की अमेरिकेत आश्रय मागणाऱ्या भारतीयांच्या अर्जांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे.
फक्त दोनच वर्षात ही संख्या तब्बल दहापटीनं वाढली आहे. 2021 मध्ये अशा अर्जांची संख्या जवळपास 5,000 होती. तर 2023 मध्ये ती 51,000 वर पोहोचली आहे.
अमेरिकेतील ही वाढ नाट्यमय असली, तरी अशाच प्रकारचा ट्रेंड कॅनडा, युके आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये देखील दिसून आला आहे. तिथे देखील आश्रय मागणाऱ्या सर्वात मोठ्या गटांमध्ये भारतीय आहेत, असं अभ्यासात म्हटलं आहे.
कपूर यांना वाटतं की, छळ होण्याच्या वस्तुनिष्ठ भीतीपेक्षा आश्रय देणाऱ्या व्यवस्थेशी खेळण्याचाच हा एक मार्ग आहे. कारण त्या प्रक्रियेला वर्षानुवर्षे लागतात.

फोटो स्रोत, Getty Images
आश्रय मागणाऱ्यांमधील पंजाबी भाषिकांची मोठी संख्या लक्षात घेता, पंजाबात असं काय घडलं आहे की त्यामुळे या गोष्टीला चालना मिळाली आहे हे स्पष्ट नाही. 2017-2022 या कालावधीत तिथे काँग्रेसचं सरकार होतं, तर 2022 पासून तिथे आम आदमी पार्टीचं सरकार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या दुसऱ्या कारकिर्दीत अमेरिकेत आश्रय मागणाऱ्या अर्जांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षाचा पदभार स्वीकारल्याच्या पहिल्या आठवड्यातच, स्थलांतरितांसाठीचं एक महत्त्वाचं ॲप बंद करण्यात आलं. ते ॲप स्टोअर्सवरून देखील हे ॲप काढण्यात आलं.
त्यामुळे जवळपास 3,00,000 प्रलंबित अपॉईंटमेंट रद्द करण्यात आल्या. त्यामध्ये अमेरिकेत आश्रय मागण्यासाठी आधीच प्रक्रियाधीन असलेल्या अर्जांचाही समावेश आहे.
7. अमेरिकेत आश्रय घेऊ पाहणाऱ्यांमुळे भारताबद्दल काय लक्षात येतं?
अमेरिकेतील आकडेवारीवरून असं दिसतं की अमेरिकेत आश्रय घेऊ पाहणारे बहुतांश भारतीय पंजाबी आणि गुजराती भाषिक आहेत. ही भारतातील श्रीमंत राज्ये आहेत. त्यामुळे तिथून येणारे नागरिक स्थलांतराच्या मोठा खर्चाचा भार उचलू शकतात.
त्याउलट, भारतीय मुस्लीम आणि उपेक्षित समुदाय तसंच माओवादी हिंसाचार, काश्मीर यासारख्या संघर्षग्रस्त भागातील लोक क्वचितच अमेरिकेत आश्रय घेण्यासाठी अर्ज करतात, असं अभ्यासात म्हटलं आहे.
त्याचा अर्थ अमेरिकेत आश्रय घेऊ पाहणारे बहुतांश भारतीय लोक हे आर्थिकदृष्ट्या स्थलांतरित आहेत. ते भारताच्या गरीब किंवा संघर्षग्रस्त प्रदेशातून आलेले नाहीत.
अमेरिकेपर्यंत जाण्याचा प्रवास कठीण आहे. मग तो लॅटिन अमेरिकेतून केलेला असो की कॅनडातून 'बनावट' विद्यार्थी म्हणून केलेला असो, या प्रवासाला भारतातील दरडोई उत्पन्नाच्या 30-100 पट खर्च येतो.
त्यामुळे ज्यांच्याकडे विकण्यासाठी किंवा गहाण ठेवण्यासाठी मालमत्ता आहे त्यांना तो शक्य होतो, असं अभ्यासात म्हटलं आहे.
त्यामुळे पंजाब आणि गुजरात या भारतातील श्रीमंत राज्यांमधून अमेरिकेत सर्वाधिक अनधिकृत स्थलांतर होतं, याचं आश्चर्य नाही. या राज्यांमध्ये शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जमिनीच्या किमती खूपच जास्त आहेत.
"अगदी बेकायदेशीरपणे अमेरिकेत स्थलांतर करण्यासाठीदेखील खूप पैसे लागतात," असं अभ्यासात म्हटलं आहे.
8. भारतीयांच्या बेकायदेशीर स्थलांतरामागचं कारण काय?
अमेरिकेत आश्रय मागणाऱ्या अर्जांमध्ये वाढ होण्याचा संबंध भारतात 'लोकशाहीचं हनन' होण्याशी जोडला जाऊ शकतो, मात्र अभ्यासकाचं म्हणणं आहे की याचा स्थलांतराशी संबंध नाही.
पंजाब आणि गुजरात या राज्यांना स्थलांतराचा प्रदीर्घ इतिहास आहे. या राज्यांमधून स्थलांतरित फक्त अमेरिकेलाच नाहीत, तर युके, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये देखील जात आहेत.
परदेशात गेलेल्या भारतीयांकडून दरवर्षी मायदेशी मोठी रक्कम पाठवली जाते. 2023 मध्ये भारतात 120 अब्ज डॉलर परदेशातील भारतीयांकडून पाठवण्यात आले.
परदेशात स्थलांतर करण्यास गरीबी नाही, तर परदेशात मिळणाऱ्या अधिक उत्पन्नातून चांगलं आयुष्य जगण्याच्या आकांक्षेमुळं चालना मिळते. यामागे 'सापेक्ष वंचितपणा' हे कारण आहे.
कारण परदेशात जाऊन इतरांना मिळालेल्या यशाची बरोबरी करण्याची भारतातील कुटुंबांची इच्छा असते, असं अभ्यासात म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
लोकांमधील या भावना आणि दृष्टीकोनामुळे स्थलांतरासाठी असलेल्या मोठ्या मागणीचा फायदा भारतातील दलाल आणि एजंटांच्या एका समांतर उद्योगानं घेतला आहे.
या अभ्यासात म्हटलं आहे, "भारत सरकारनं या मुद्द्याकडं दुसऱ्या दृष्टीकोनातून पाहिलं आहे. बेकायदेशीर स्थलांतरितांच्या बाबतीत लोकांनी इतर देशात जाण्यापेक्षा त्यांना मायदेशी स्वीकारणं ही अधिक ओझ्याची बाब आहे."
9. किती भारतीयांना हद्दपार करण्यात आलं?
2009 ते 2024 या कालावधीत जवळपास 16,000 भारतीयांना अमेरिकेतून हद्दपार करण्यात आलं आहे, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे.
ट्रम्प यांच्या कार्यकाळात हा मुद्दा ऐरणीवर आला असला, तरी याआधी देखील यासंदर्भात कारवाई होत होती.
यात ओबामा यांच्या कार्यकाळात दरवर्षी सरासरी 750 जणांना, ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात सरासरी 1,550 जणांना आणि जो बायडन यांच्या कार्यकाळात सरासरी 900 जणांना दरवर्षी अमेरिकेतून हद्दपार करण्यात आलं आहे.
अमेरिकेतून हद्दपार करण्यात आलेल्या भारतीय स्थलांतरितांच्या संख्येत 2023 ते 2024 या आर्थिक वर्षात वाढ झाली आहे. मात्र 2020 मध्ये उच्चांकी संख्येत म्हणजे जवळपास 2,300 भारतीयांना अमेरिकेतून हद्दपार करण्यात आलं होतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











