कथित अवैध स्थलांतरितांना घेऊन अमेरिकेचं लष्करी विमान पंजाबमध्ये दाखल

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सौतिक बिस्वास आणि समायरा हुसैन
- Role, बीबीसी न्यूज प्रतिनिधी, नवी दिल्ली आणि अमृतसर
अमेरिकेचं एक लष्करी विमान पंजाबमध्ये उतरलं आहे. यामध्ये बेकायदेशीरीत्या अमेरिकेत प्रवेश केलेले किंवा कागदपत्रांविना तेथे राहाणारे सुमारे 100 लोक आहेत. मंगळवार 4 फेब्रुवारी रोजी हे विमान अमेरिकेच्या टेक्ससमधून निघाले आणि दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये पोहोचले.
कागदपत्रांविना देशात राहाणाऱ्या परदेशी नागरिकांना परत पाठवण्याची मोहीम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केली आहे. यामध्ये 18,000 भारतीय नागरिक असावेत असं अमेरिकेचं म्हणणं आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेबद्दल 'जे योग्य ते करा', असं आश्वासन दिल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे.
माघारी आलेल्या या लोकांसाठी विशेष व्यवस्था केल्याचं आणि त्यांना योग्यप्रकारे वागवलं जाईल असं पंजाबमधील संबंधित यंत्रणेनं म्हटलं आहे. भारतीय वायूसेनेच्या अमृतसर येथील इमारतीबाहेर पत्रकारांनीही गर्दी केली होती.
माघारी पाठवण्यात आलेल्या 104 भारतीयांची वेगवेगळी छाननी करण्यात येईल आणि त्यांची ा पंजाब, हरियाणा, गुजरात, छत्तीसगड, उत्तर प्रदेश अशी त्यांच्या राज्यात पाठवणी करण्यात येईल.
कागदपत्रांविना अमेरिकेत राहाणाऱ्या लोकांना त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी ट्रम्प लष्करी विमानांचा वापर वाढवत आहेत.
अर्थात अशी माघारी पाठवण्याची मोहीम भारतासाठी नवीन नाही. 2024 च्या अमेरिकन आर्थिक वर्षात 1000 पेक्षा जास्त अशा भारतीयांना चार्टर आणि व्यावसायिक विमान उड्डाणांद्वारे भारतात पाठवण्यात आलं होतं.
गेल्या ऑक्टोबर महिन्यातही अमेरिकेच्या इमिग्रेशन आणि कस्टम्स इन्फर्मेशन विभागानं योग्य कागदपत्रं नसणाऱ्या 100 भारतीयांना मायदेशात परत पाठवलं होतं.
ते विमानही पंजाबमध्ये उतरलेलं होतं, मात्र त्यातले लोक कोणत्या गावांतले होते याची अचूक माहिती पुरवण्यात आली नव्हती.
अमेरिकेत बहुतांश स्थलांतर पंजाब आणि हरियाणामधून होत असल्याचं दिसतं, त्यानंतर गुजरातचा नंबर लागतो.
अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाचे सहाय्यक मंत्री रॉयस बर्नस्टेन मरे ऑक्टोबरमध्ये म्हणाले होते, गेल्या काही वर्षांमध्ये बेकायदेशीररित्या अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या भारतीयांना पकडण्यात आल्यामुळे माघारी पाठवण्यात येणाऱ्या भारतीयांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
मेक्सिको आणि कॅनडाच्या सीमेवरुन हे लोक अमेरिकेत येतात, असा त्यांच्या बोलण्याचा संदर्भ होता.
अमेरिकेने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार 2018 ते 2023 या काळामघ्ये 5477 भारतीयांना माघारी पाठवण्यात आले. 2020मध्ये 2300 पेक्षा जास्त लोकांना भारतात परत पाठवण्यात आलं.
अर्थात कागदपत्रांविना अमेरिकेत राहाणाऱ्या भारतीयांच्या आकड्याबद्दल एकमत नाही.


प्यू रिसर्च सेंटरच्या नव्या माहितीनुसार अमेरिकेत मेक्सिको आणि एल साल्वाडोरनंतर बेकायदेशीररित्या राहाणाऱ्या लोकांत भारताता नंबर लागतो. 2022 मध्ये अशा भारतीयांची संख्या 7,25,000 असावी असं ही संस्था सांगते.
तर अशा भारतीयांची संख्या 3,75,000 असावी असं मायग्रेशन पॉलिसी इन्स्टिट्यूट सांगते. अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपैकी 22 % लोक परदेशात जन्मलेले आणि 3% लोक बेकायदेशीररित्या राहात आहेत.
योग्य कागदपत्रांविना राहाणारे आणि ज्यांना मायदेशात परत जाण्याची सूचना करण्यात आली आहे असे नोव्हेंबर महिन्यात 14.4 लाख लोक होते असं अमेरिकेचं म्हणणं आहे. यात होंडुरास, ग्वाटेमाला, एल साल्वाडोर, मेक्सिको यांचा समावेश आहे. त्यांचे प्रत्येकी 2 लाख लोक मायदेशी पाठवल्या जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
या यादीत चीनमधील 37,908 आणि भारताचे 17,940 लोक होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये परतल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थलांतरीत किंवा त्यांच्या भाषेत 'घुसखोर' असलेल्यांवर निशाणा साधला.
त्यांनी अमेरिका-मेक्सिकोच्या सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. त्यासाठी लष्कराला सीमा बंद करण्याचे आदेशही देण्यात आले.
जन्मतः मिळणाऱ्या नागरिकत्वाचा अधिकार रद्द करण्याचा विचार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. या अधिकारामुळं अमेरिकेत जन्मलेल्या कुणालाही थेट अमेरिकेचं नागरिकत्व मिळतं. याला लगेचच न्यायालयात आव्हानही देण्यात आलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











