सीरियात असद समर्थकांकडून हल्ला, 14 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू

फोटो स्रोत, Reuters
- Author, जारोस्लाव लुकिव्ह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
सीरियात बंडखोरी झाल्यानंतर पलायन केलेले राष्ट्रपती बशर अल-असद यांच्या समर्थकांनी देशाच्या पश्चिम भागात अचानक घातपाती हल्ला केला.
यामध्ये इंटेरियर मिनिस्ट्रीच्या 14 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून 10 जखमी झाले असल्याची माहिती नवीन बंडखोरांच्या नेतृत्वाखालील प्रशासनानं दिली.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी टार्टोसच्या भूमध्य बंदराजवळ हा हल्ला झाला.
राजधानी दमास्कसच्या जवळील सयदनाया तुरुंगातील भूमिकेबाबत एका अधिकाऱ्याला अटक करण्यासाठी सुरक्षा दल गेले असता सुरक्षा दलावर हल्ला करण्यात आला.
गेल्या दोन आठवड्यांपूर्वीच इस्लामी हयात तहरीर अल-शाम (HTS) गटाच्या नेतृत्वाखालील बंडखोर सैन्यानं असाद यांची सत्ता उलथवून लावली आहे.
मंगळवारी (24 डिसेंबर) झालेल्या चकमकीत तीन सशस्त्र लोकांचाही मृत्यू झाल्याचं युकेमधील सिरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्सनं (SOHR) सांगितलं.
काही वेळानंतर सुरक्षा दलांना अधिक कुमकही पुरवण्यात आली, असंही त्यांनी नमूद केलं.
सीरियाच्या अधिकाऱ्यांनी होम्स शहरात रात्रभर कर्फ्यू लागू केला होता, असे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. मात्र, एका अलावाइट धार्मिक स्थळावर हल्ला झाल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे हा कर्फ्यू लावण्यात आला होता.
सीरियाच्या मंत्रालयानं सांगितलं की, हा खूप जुना व्हिडिओ असून नोव्हेंबरमध्ये बंडखोरांनी अलेप्पो इथं केलेल्या हल्ल्याच्यावेळचा हा व्हिडिओ आहे. हा हिंसाचार अनोळखी लोकांनी केला आहे.
SOHR च्या म्हण्यानुसार होम्समध्ये एका आंदोलकाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.


टार्टोस आणि लताकिया या दोन शहरांसह असदचे मूळ गाव करदाहा इथंही आंदोलनं झाली.
अलावाइट्स अल्पसंख्याक असून असद कुटुंब सुद्धा या समाजातून येतं. तसेच याआधीही अनेक राजकीय आणि लष्कारातील उच्चभ्रू लोकही याच समाजातील होते.
एचटीएसच्या नेतृत्वाखाली सीरियाच्या इशान्य भागात पडलेली बंडखोरीची ठिणगी संपूर्ण देशात पसरली आणि असद कुटुंबाच्या 50 वर्षांपेक्षा जास्त काळाच्या राजवटीचा अंत झाला.

असद आणि त्याच्या कुटुंबाला रशियाला पळून जावं लागलं. त्यानंतर सीरियातील धार्मिक आणि वांशिक अल्पसंख्याकांच्या हक्कांचं आणि स्वातंत्र्याचं आम्ही संरक्षण करू, असं आश्वासन एचटीएसनं दिलं.
युनायटेड नेशन्स, युनायटेड स्टेट्स, युरोपियन युनियन आणि युनायटेड किंग्ड्म इत्यादींनी एचटीएसला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे.
मंगळवारी 'ख्रिसमस ट्री' जाळल्याबद्दल देशभरात आंदोलनं झाली. त्यामुळे आता अल्पसंख्याकांचं संरक्षण करण्याचं आव्हान नवीन बंडखोर सरकारसमोर उभं राहिलंय.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











