जेव्हा रविंद्रनाथ टागोरांची चित्रं हिटलरने ‘बुद्धीभ्रष्ट करणारी’ म्हणत परत पाठवली...

    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

ती एकूण पाच चित्रं होती. त्यात पक्ष्यांच्या आणि माणसांची चित्रं होती. त्यात एक लाल रोबमध्ये असलेल्या मुलीचंही चित्र होतं.

ही चित्रं रविंद्रनाथ टागोरांची होती. ती शाई आणि पाण्याच्या रंगाने काढली होती. ही चित्रं बर्लिनच्या एका संग्रहालयात ठेवली होती. त्यांनी जर्मनीला 1930मध्ये ही पेंटिग्स भेट दिली होती.

सात वर्षांनी नाझींनी ही चित्रं तिथून काढून टाकली. काही चित्रं तिथे ठेवण्यालायक नाहीत तर काही चित्रं नाशवंत होती, असं कारण त्यासाठी दिलं गेलं.

हिटलर हा स्वत: एक अयशस्वी कलाकार होता. आधुनिक काळातील कला ही बुद्धीभ्रष्ट झाल्याचं लक्षण आहे, असं त्याचं मत होतं. या रागातून त्याने जर्मनीच्या संग्रहालयातून वॅन गॉग सह 16000 पेटिंग्स काढून टाकण्याचा निर्णय घेतला.

ही कला रसातळाला गेली आहे, अशा शब्दांत नाझींनी त्याची संभावना केली.

नाझींनी वाळीत टाकलेली कला

टागोरांच्या चित्राला अशी वागणूक का दिली गेली हे अद्यापही न उलगडलेलं कोडं आहे. कलेच्या इतिहासकारांच्या मते नाझींसाठी टागोरांच्या चित्राचा अपमान करणं सोपं होतं कारण ती चित्रं आधुनिकतेकडे झुकली होती. हिटलर एकदा म्हणाला होता, “जो कोणी आकाशाचा रंग हिरवा देतो आणि शेताचा रंग निळा देतो त्याची नसबंदी करायला हवी.”

टागोरांनी 1921,1926, आणि 1930 मध्ये जर्मनीला भेट दिली होती. त्यांची दोन डझनाहून अधिक पुस्तकं जर्मन भाषेत उपलब्ध आहेत.

“जेव्हाही ते बोलायला उभे रहायचे, तेव्हा त्या सभागृहात प्रचंड गर्दी व्हायची. वर्तमानपत्रात त्यांच्याविषयीच्या बातम्या सतत छापून येत असत. ज्या लोकांना हॉलमध्ये प्रवेश मिळायचा नाही त्यांच्यात भांडणं होत असत.” लेक मार्टिन कँम्पचेन सांगतात. त्यांनी टागोरांची अनेक पुस्तकं जर्मन भाषेत आणली आहेत.

स्थानिक प्रसारमाध्यमं त्यांना पूर्वेकडचा विद्वान असं म्हणायचे, तसंच संत, योगी पुरुषही म्हणायचे.

1930 मध्ये टागोरांची 300 छायाचित्रं असलेलं प्रदर्शन युरोपात भरलं होतं. त्यांची 100 पेक्षा अधिक पेंटिंग्स पॅरिसमध्ये दाखवली गेली. बर्लिनच्या नॅशनल गॅलरीत असलेली अनेक पेंटिंग्स मग लंडनमध्ये गेली.

1937 पर्यंत टागोर यांची चित्रं बर्लिनच्या बॉर्क क्राऊन प्रिंस पॅलेसमध्ये ठेवली होती. हाही नॅशनल गॅलरीचाच भाग होता.

इतिहासकार कोन्सॅटिन वेन्झाल्फ यांच्या मते जेव्हा हिटलरने हा सगळा प्रकार सुरू केला तेव्हा 15 ऑक्टोबर 1937 पासूनची एक यादी आहे. त्यात टागोरांची चित्रं होती. ती एका ठिकाणी ठेवण्यात आली. तिथे प्रवेश करणं तितकंसं सोपं नव्हतं.

त्यानंतर काय झालं हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

1941-42 मध्ये कालबाह्य झालेल्या पेंटिग्सची एक यादी तयार करण्यात आली होती. त्यात नाझींच्या काळात गहाळ झालेल्या चित्रांचा उगम शोधण्याचा प्रयत्न झाला होता. त्यात मास्क, पोट्रेट, गर्ल, मास्क आणि टू बर्ड्स अशी या पेंटिग्सची नावं होतं.

जी चित्रं जप्त करण्यात आली त्यात कलाकारांची नावं मुळाक्षरांप्रमाणे लावण्यात आली. तसंच काही अक्षरं चिन्हं म्हणून वापरण्यात आली.

त्यात T हे अक्षर एक्सचेंजसाठी V हे विकल्या गेलेल्यासाठी आणि नष्ट केलेल्यासाठी X असं अक्षर देण्यात आलं होतं.

टागोरांची दोन चित्रं एक्सचेंज केली होती आणि दोन चित्रं नष्ट करण्यात आली. त्यांच्या पाचव्या पेंटिंगचा ठावठिकाणा लागला नाही.

टागोरांची तीन चित्रं त्यांना 1939 मध्ये परत करण्यात आली. तिथल्या मंत्रालयाकडून त्यांचा पत्ता विचारण्यात आला होता. महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेला ते जिवंत होते.

कला इतिहासकार आर. शिवा कुमार यांनी टागोरांच्या कामावर बरंच संशोधन केलं आहे. त्यांच्या मते टागोरांना त्यांची तीन चित्रं परत करण्यात आली. दोन चित्रं गहाळ झाली.

नाझींच्या या वागणुकीमुळे संपूर्ण जगाला हादरा बसला.

म्युनिकच्या Pinakothek der Moderne museum चे मुख्य संग्राहक ऑलिव्हर केस यांनी मला सांगितलं की जी दोन पेंटिग्स हरवली. त्यांच्या पैकी एक चित्र The Bavarian State Painting Collections येथे 1964 पासून ठेवण्यात आलं आहे.

डोक्याची अर्धी सावली असलेलं एक पेंटिंग अतिशय साधं आणि आध्यात्मिक होतं आणि ते नाझी लोकांनी ‘कालबाह्य’ ठरवलेल्या पेंटिगचा नमुना होता.

“माझ्या मते जर्मनीत असलेलं ते त्यांचे एकमेव पेंटिंग आहे,” डॉ. केस सांगतात. तसंच दुसरं पेंटिंग एका लिलावात 1996 साली एका खासगी संग्राहकाला विकल्याचंही त्यांनी सांगितलं.

“इतर तीन पेंटिग टागोरांना परत केली आणि ती हरवली,” ते पुढे सांगतात.

प्रा. शिवा कुमार यांना ही चित्रं विश्व भारती विद्यापीठात पाहिल्याचं आठवतं. टागोरांनी या विद्यापीठाची स्थापना केली होती. ते पश्चिम बंगाल मधील शांतिनिकेतन शहरात आहे.

निलांजन बंडोपाध्याय रवींद्रनाथ टागोरांचं संग्रहालय चालवतात. त्यांनी मला सांगितलं की त्यांना ते पेंटिंग्स पाहिल्याचं आठवत नाही. त्याचे काही फोटो असतील तर मदत होईल, असं ते म्हणाले.

टागोरांनी त्यांच्या साठीनंतर पेंटिंग करायला सुरुवात केली. 1941 मध्ये त्यांचं निधन झालं. मात्र त्याच्या दहा वर्षं आधीपर्यंत त्यांनी 2300 कलाकृती निर्माण केल्या.

“त्यांना कायमच चित्र काढायला आवडायचं. ते त्यांच्या कथांचीही चित्रं काढायचे. 1928 मध्ये त्यांनी पहिलं चित्र काढलं,” प्रा. शिवा कुमार सांगतात.

टागोर बंगाली भाषेतील महान कलाकार होते. ते कवी, कादंबरीकार, शिक्षक, तत्वज्ज्ञ, संगीतकार होते. ते प्राण्यांची चित्रं, त्रिमितीय आकृत्या, स्त्रियांची चित्रं, पोट्रेट, निसर्गचित्रं, काढायचे. त्यांच्या चित्रांमध्ये सच्चेपणा होता. ते अगदी खऱ्याखुऱ्या माणसांसारखे दिसायचे.

कलेच्या इतिहासकारांच्या मते टागोरांची चित्रं Art Nouveau या कलाप्रकारामुळे जगापर्यंत पोहोचली. Art Nouveau ही एक कला चळवळ होती. त्यात लोककलेचं मोठ्या प्रमाणात चित्रण असायचं.

“स्वातंत्र्य हा त्यांच्या कलेचा भाग होता. 1930 च्या दशकात. अमेरिका आणि युकेमध्ये आधुनिक कला फारशी पोहोचली नव्हती. जेव्हा ते जर्मन लोकांना दाखवण्यात आलं तेव्हा त्यांची तुलना स्वप्नवत काम करणाऱ्यांशी आणि अभिव्यक्तीदर्शक कलाकारांशी करण्यात आली,” प्रा. शिवा कुमार म्हणाले. मात्र शेवटी नाझींनी ती पेंटिंग्स वाळीत टाकली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)