समृद्धी महामार्ग अपघात : 7 महिन्यांनंतरही न्यायाची प्रतीक्षा, ‘आता मम्मी हा शब्द कायमचा बंद झालाय’

    • Author, नितेश राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

समृद्धी महामार्गावर 1 जुले 2023 रोजी विदर्भ ट्रॅवल्सला झालेल्या अपघाताच्या वेदना अजूनही ताज्याच आहेत.

अपघातात जीव गेलेल्या 25 जणांच्या कुटुंबियांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी सरकार विरोधात लढा उभारला आहे.

वर्ध्यातल्या महात्मा गांधी चौकात डिसेंबर 2023 पासून त्यांचं साखळी उपोषण सुरू आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या मदतीची अंमलबजावणी करावी, विदर्भ ट्रॅवल्सची मान्यता रद्द करावी, शासन स्तरावर चौकशी सुरू करावी, यासाठी मृतांचे कुटुंबीय आंदोलन करत आहेत.

समृद्धी महामार्गाच्या अपघातात बळी पडलेल्या 25 जणांचे कुटुंबीय या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

यातील बहुतांश कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. या दुर्घटनेत कुणी अख्ख कुटुंब गमावलंय तर एकाच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबाची वाताहात झाली आहे.

'घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात प्रथमेशची आठवण दडलीय'

त्या दुर्घटनेला सात महिने उलटून गेले, पण नातेवाईकांच्या वेदना अजूनही शमलेल्या नाही.

नीलिमा खोडे यांनी त्यांचा एकुलता एक मुलगा प्रथमेश या दुर्घटनेत गमावला. आता घरात त्या एकट्याच राहिल्या आहेत.

प्रथमेश पुण्यात नोकरी करत होता. मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच बंगळुरूच्या मोठ्या कंपनीची त्याला ऑफर होती.

“घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात त्याची आठवण दडलीय. पूजा करतानाची टाळी वाजवली की प्रथमेश धावत कापूर घेऊन यायचा. मी त्याला विचारायची की काय मागतो रे देवला, तर तो म्हणायचा माझ्या मम्मीला सुखी ठेव, हीच देवचरणी प्रार्थना करतोय, असं म्हणायचा.

दिवसभर मम्मी मम्मी करायचा आता मम्मी हा शब्द कायमचा बंद झाला,” अश्रुंना मोकळी वाट करत नीलिमा खोडे सांगत होत्या.

ज्या दिवशी अपघात घडला तेव्हा त्यादिवशी प्रथमेशची पुण्याला जायची इच्छा नव्हती.

पण आधीच तिकीट केल्याने फक्त 1400 रुपये वाया जाऊ नये म्हणून त्याने विदर्भ ट्रॅवल्स पकडली.

शहरातून चुकलेली बस त्याने सावंगी मेघेच्या टी-पॉइंट वरुण पकडली. पण हाच प्रवास त्याचा अखेरचा प्रवास ठरला.

प्रवासात प्रथमेशचं आईशी बोलणं झालं होत. संभाषणादरम्यान ट्रॅव्हल बस खूप वेगात असल्याचं त्याने आईला सांगितले होतं.

“तो म्हणाला मला खूप भिती वाटतेय. कारण ट्रॅवल्स खूप स्पीडने जातेय. तेव्हा मी म्हटलं तू झोपून जा. घाबरू नको. मी सकाळी फोन केला पण फोन बंद येत होता. तिकडे काय चाललंय याची मला काहीच कल्पना नव्हती.

अपघाताच्या दुसऱ्या दिवशी मला DNA साठी तिथं बोलावल. तिथे मला सांगितले की आता प्रथमेश आपल्यात नाहीये म्हणून. शेवटी मला त्याचा मृतदेह मिळाला, तेच शेवटचं पाहणं,” नीलिमा सांगतं होत्या.

प्रथमेशच्या मृत्यूने नीलिमा पुरत्या खचून गेल्या. कुटुंबात त्या एकट्याच उरल्या आहेत. आर्थिक परिस्थिती दयनीय आहे. त्या आता शिवणकाम करतात.

'मुलीच्या मृत्यूनंतर मी इतरांच्या घरी धुणीभांडी करतेय'

गुंफा राऊत यासुद्धा त्यापैकीच एक आहे. या अपघातात त्यांच्याही मुलीचा जीव गेला.

मुलगी साधना यांच्या मृत्यूंनंतर त्यांच्यावर घरोघरी धुणीभांडी करण्याची वेळ आली आहे.

मुलगी साधना यांच्याविषयी बोलताना गुंफा सांगतात, “मुलीचाच आधार होता. ती माझी मुलगी नाही तर मुलगा होता. माझा मुलगा गतिमंद आहे. माझी मुलगी हाच माझा सहारा होता. ती असती तर मला लोकांकडे धुणीभांडी करायची वेळ आली नसती."

गुंफा यांच्या पतीचं कॅन्सरमुळे निधन झालं. मुलीच्या मृत्यूनंतर त्यांचीही अवस्था बरी नसते. कुटुंबात त्या आणि त्यांचा गतिमंद मुलगा दोघेच उरले आहेत.

गुंफा म्हणतात “अपघाताच्या दिवशी उसणे पैसे घेऊन नातेवाईकांसोबत सिंदखेड राजाला गेलो. माझ्या मुलीचा मृत्यू पहिला तर तो एकदम काळा कोळसा होता. ना हात होता, ना पाय. माझी एकुलती एक मुलगी होती. मला तिचाच आधार होता आता नाही राहिला”

घरातली कामं आटोपली की खोडे आणि राऊत उपोषणात सहभागी होतात.

1 जुलै 2023ची काळ रात्र

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असलेल्या एका खासगी बसला 1 जुलै 2023 रोजी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला.

अपघात घडला त्यावेळी बसमध्ये 33 प्रवासी होते. त्यामधील 25 प्रवासी झोपेतच मृत्यूमुखी पडले. इतर 8 प्रवासी अपघातातून बचावले.

अपघात झाली ती खासगी बस (वाहन क्रमांक MH 29 BE 1819) ही नागपूरहून पुण्याच्या दिशेने जात होती.

बुलडाण्यातील सिंदखेड राजाजवळ बसचा टायर फुटून ती चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली. पुढे ती एका खांबाला जाऊन धडकली. यानंतर फरपटत एका छोट्या पुलावर जाऊन आदळली.

या धडकेत बसचा डिझेल टँकवर आघात होऊन टँकर फुटला आणि बसने पेट घेतला.

विदर्भ ट्रॅव्हल्सचे मालक विरेंद्र देर्ना यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2020 मध्ये ही बस त्यांनी खरेदी केली होती.

"बस नवीनच होती. त्याची कागदपत्रंही अद्ययावत आहेत. त्याचा चालक दानिश हा पण अनुभवी होता. दानिशच्या म्हणण्यानुसार, गाडीचा टायर फुटून अपघात झाला. त्यानंतर आग लागून गाडीतील ज्वलनशील पदार्थांनी पेट घेतल्याने हा प्रकार घडला आहे," असं विरेंद्र देर्ना यांनी तेव्हा सांगितलं.

आंदोलकांच्या मागण्या काय आहेत?

आंदोलनकर्त्यांच्या दोन प्रमुख मागण्या आहेत.

एक म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आर्थिक मदतीची केलेल्या घोषणेची पूर्तता.

दुसरी म्हणजे SIT चौकशी तात्काळ लागू करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि विदर्भ ट्रॅवल्सची मान्यता रद्द करण्यात यावी.

बीबीसी मराठीशी बोलताना वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कार्डिले म्हणाले की, “यांच्या मागण्या आम्ही वरिष्ठ स्तरावर पोहचवल्या आहे. SIT ची मागणी येत्या काही दिवसात लागू होईल. ड्रायव्हर आणि ट्रॅवल्स मालकावर यापूर्वीच कारवाई झाली आहे."

पण समृद्धी महामार्गावरील अपघातांचं सत्र थांबत नाहीये. त्यावर प्रशासनाकडून उपयोजना करण्यात आल्याचं अमरावतीचे प्रादेशिक परिवहन अधिकारी आर. गित्ते म्हणाले आहेत.

समृद्धी महामार्गावर प्रवास करताना कारसाठी ताशी 120 किमी वेग तर, बस आणि ट्रकसाठी ताशी 80 किमी वेगमर्यादा ठेवण्यात आली आहे, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

“वेगमर्यादा पाळली नाही तर वन्यप्राणी आडवे येऊन वाहन कंट्रोल करणं अवघड जातं. आतापर्तांत सर्वाधिक अपघात म्हणजेच जवळपास 80 टक्के अपघात हे टायर बस्टमुळे झाले आहेत. त्यामुळं टायरमध्ये नेहमी नायट्रोजन हवा भरणे आणि नियमित त्याची तपासणी केली पाहिजे," असं गित्ते म्हणाले.

समृद्धीवरील अपघात टाळण्यासाठी आणखी उपाययोजना केल्या जात असल्याचं गित्ते सांगतात.

रात्रीच्या वेळी ड्रायव्हरची मद्यप्राशन चाचणी केली जातेय. विशेषत: बस आणि ट्रक ड्रायव्हरची कसून तपासणी होत आहे. पण समृद्धी महामार्गावर काही उणिवा आहेत, त्याकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचं ते सांगतात

बीबीसीशी अधिक बोलताना गित्ते म्हणतात “सध्या 'रोड हिप्नोसिस'मुळे हे घडतंय. साधारण दीड ते दोन तासानंतर चालकाच्या मेंदूची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे 10 मिनिटांचा ब्रेक घेऊन चहा पाणी करायला पाहिजे."

“समृद्धी रस्त्याच्या बाजूला चहा पिण्याच्या सुविधा फारशा दिसून येत नाही. अशावेळी बसमध्ये दोन ड्रायव्हर असावेत. एकाने काहीवेळ विश्रांती घ्यावी. त्यामुळे रोड हिप्नोसिसचे प्रकार कमी होतील," असं गित्ते यांना वाटतं.

समृद्धी महामार्गावर 1 जुले 2023ला झालेल्या भीषण अपघाताला आता 7 महिने पूर्ण झालेत. गेल्या एक महिन्यापासून 25 मृतांच्या नातेवाईकांचं साखळी उपोषण सुरूय. पण त्याकडे कुणी ढुंकूनही पाहायला तयार नाही.

अधिकारी वेळ मारून नेणारी उत्तर देत आहेत. पण, खरा प्रश्न हा आहे की आश्वासन देणारे नेते आंदोलकांच्या मागण्यांकडे कधी लक्ष देणार आहेत?

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)