सिंधू संस्कृतीमध्ये लोक गोमांस खात होते का?

डिसेंबर 2020 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, सिंधू संस्कृतीत राहणारे लोक गायी, म्हशी आणि बकऱ्यांच्या मांसाचं मोठ्या प्रमाणात सेवन करायचे.

सिंधू खोऱ्यात सापडलेल्या भांड्यांमधील अन्नाच्या अवशेषांवरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

केंब्रिज विद्यापीठाच्या पुरातत्व विभागातील पोस्ट-डॉक्टरेट संशोधक आणि सध्या फ्रान्समधील सीईपीएएम येथे पोस्ट-डॉक्टरेट फेलो असलेल्या अक्षयता सूर्यनारायण यांनी सिंधू खोऱ्यात राहणाऱ्या लोकांच्या आहाराच्या सवयींचा अभ्यास केला.

'लिपिड रेसिड्यूज इन पॉटरी फ्रॉम द इंडस सिविलायझेशन इन नॉर्थवेस्ट इंडिया' या शीर्षकाखाली अभ्यासाचे निष्कर्ष जर्नल ऑफ आर्कियोलॉजिकल सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

"सिंधू खोऱ्यात राहणाऱ्या लोकांवर सातत्याने अभ्यास होत असला तरी हे लोक कोणत्या प्रकारचं अन्न खायचे, कोणती पिकं घ्यायचे यावरून वादविवाद सुरू असतात."

"पण या संस्कृतीत घेतली जाणारी पिकं, तिथले प्राणी आणि त्यांनी वापरलेली भांडी यांचा सखोल अभ्यास केला तरच त्यांच्या खाण्याच्या सवयींचा अंदाज लागू शकतो."

या संस्कृतीत राहणारे लोक वापरत असलेल्या सिरॅमिक भांड्यांवर उरलेल्या चरबीच्या अवशेषांचं परीक्षण करून हे लोक कशाप्रकारचं अन्न खायचे हे आपण जाणून घेऊ शकतो.

याचा अभ्यास जगभरातील अनेक पुरातत्वशास्त्रज्ञ करत आहेत. त्याचप्रमाणे सिंधू संस्कृतीत सापडलेल्या मातीच्या भांड्यांचं परीक्षण करून असाच अभ्यास करण्यात आला आहे.

सिंधू संस्कृतीत घेतली जाणारी पिकं

सिंधू खोऱ्यात जवस, गहू, तांदूळ, ओट्स, चणे, वाटाणे याशिवाय तीळ, द्राक्ष, काकडी, वांगी, हळद, मोहरी, ताग, कापूस यांची लागवड केली जायची.

जनावरांच्या बाबतीत सांगायचं तर इथले लोक मोठ्या प्रमाणात गायी आणि म्हशी पाळायचे. येथे मोठ्या प्रमाणात प्राण्यांची हाडं आढळून आली आहेत.

यात 50 ते 60 टक्के हाडं गायी आणि म्हशींची आहेत. 10 टक्के हाडं शेळ्यांची आहेत. त्यामुळे सिंधू खोऱ्यात राहणारे लोक गोमांस आवडीने खायचे असा निष्कर्ष निघतो.

गायींच्या बाबतीत 3 - 3.5 वर्षं त्यांचं संगोपन केलं जायचं. दुधासाठी गायी पाळल्या जायच्या तर बैलांचा वापर इतर कामांसाठी केला जायचा. डुकरांची हाडंही सापडली असली तरी त्यांचा उपयोग पूर्णपणे ज्ञात नाही. याशिवाय हरीण, पक्षी आदींची हाडंही अल्प प्रमाणात आढळून आली आहेत.

मातीची भांडी कशी गोळा केली?

या अभ्यासासाठी, वायव्य भारतातील राखीगढी म्हणजेच सध्याच्या हरियाणा येथील आलमगीरपूर, मसुदपूर, लोहारी राघो, कनक, फर्माना यासारख्या सिंधू संस्कृतीच्या विविध ठिकाणांवरून मातीची भांडी गोळा करण्यात आली. त्यात सिंधू खोऱ्यातील ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांचा समावेश होतो.

एकूण 172 भांडी गोळा करण्यात आली. या संग्रहादरम्यान, भांड्यांच्या कडांकडे विशेष लक्ष देण्यात आलं. कारण अन्नपदार्थ शिवजताना ते भांड्यांच्या कडांना चिकटू नये यासाठी विशेष काळजी घेतली जायची.

नंतर या भांड्यांना 2-5 मि.मी. आकारात ड्रिल करून नमुने गोळा करण्यात आले. याचे जीवाश्म देखील गोळा केले गेले. नंतर, या नमुन्यांमधील लिपोप्रोटीन गोळा करून त्यांचं विश्लेषण करण्यात आलं.

या विश्लेषणात भांड्यातील अन्न शाकाहारी होतं की मांसाहारी याची माहिती मिळते. त्यानंतर संशोधकांनी फॅटी ऍसिडचं विश्लेषण केलं आणि ते कोणत्या प्राण्याचे आहेत हे निर्धारित केलं.

अभ्यासाचा निष्कर्ष

अभ्यासाअंती, या भांड्यांमध्ये दुग्धजन्य पदार्थ, रवंथ करणाऱ्या प्राण्यांचे मांस आणि वनस्पती शिजवल्या गेल्याचे समोर आलं.

ग्रामीण आणि शहरी भागातील भांड्यामध्ये फारसा फरक नव्हता. याशिवाय विविध कामांसाठीही या भांड्यांचा वापर करण्यात आला आहे.

या प्रदेशात मोठ्या संख्येने रवंथ करणारे सस्तन प्राणी असले तरी, या भांड्यांमध्ये दुग्धजन्य पदार्थांचा थेट वापर फारच दुर्मिळ आहे.

यापूर्वी, गुजरातमध्ये आढळलेल्या भांड्याचं परीक्षण केलं असता, त्यात मोठ्या प्रमाणात दुग्धजन्य पदार्थांचा वापर केल्याचे उघड झालं होतं (या अभ्यासाचे परिणाम वैज्ञानिक अहवालात प्रसिद्ध झाले होते).

त्यानंतर, विविध सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि वेगवेगळ्या हवामानात आहाराच्या सवयींमध्ये कसे बदल होत गेले हे शोधण्यासाठी अभ्यास केला जाऊ शकतो.

पण त्यासाठी त्या त्या काळातील भांडी लागतील असं अक्षयता सूर्यनारायण सांगतात.

त्या सांगतात की, दक्षिण आशियाई प्रदेशात सापडलेले जीवाश्म आणि उत्खननात सापडलेल्या इतर जीवाश्मांचं परीक्षण केल्यास आपल्याला प्रागैतिहासिक दक्षिण आशियाई खाद्य सवयींची विविधता समजू शकते.

सिंधू संस्कृतीच्या काही खुणा

अक्षयता यांनी आपल्या अभ्यासात सिंधू संस्कृतीची काही माहिती दिली आहे. सिंधू संस्कृती ही सर्वांत जटिल प्रागैतिहासिक संस्कृतींपैकी एक होती.

ही संस्कृती सध्याच्या पाकिस्तान, वायव्य भारत, पश्चिम भारत आणि अफगाणिस्तानमध्ये पसरली होती.

ही संस्कृती मैदानी प्रदेश, वाळवंट, जंगल आणि समुद्रकिनारा अशा विविध भूप्रदेशांमध्ये पसरली होती.

इ.स.पू 2600 इ.स.पू 1900 च्या मध्यापर्यंत परिपक्व हडप्पा संस्कृतीचा उदय झाला. याच काळात शहरांच्या आकाराच्या पाच मोठ्या वसाहती निर्माण झाल्या.

मणी, बांगड्या, वजन करण्यासाठी मापं या गोष्टी सिंधू संस्कृतीच्या काळात सर्वांत महत्त्वाचं प्रतीक मानल्या जायच्या. त्यांनी वस्तुविनिमयाचं एक अतिशय विस्तृत जाळं उभारलं होतं.

ग्रामीण भागातही अत्यंत मौल्यवान वस्तू उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने हे जाळं उभारलं होतं. सिंधू संस्कृतीच्या काळात ग्रामीण भागावर शहरी भागाचं वर्चस्व होतं असं म्हणता येणार नाही. त्यांच्यातील संबंध मुख्यत्वे आर्थिक होते.

पण इसवी सन 2100 नंतर सिंधू खोऱ्याचा पश्चिम भाग हळूहळू ओस पडत गेला.

त्याऐवजी पूर्वेकडील भागात वस्ती वाढू लागली. सिंधू खोऱ्यातील नागरी संस्कृतीचं वैशिष्ट्य असलेले लेखन, शिक्के आणि वजनाची साधनं नंतरच्या हडप्पा कालखंडात दिसत नाहीत.

याच काळात सिंधू खोऱ्याचं शहरी स्वरूप बदललं आणि अधिक ग्रामीण वसाहती विकसित झाल्या.

यामागे विविध कारणं असली तरी सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे कमी झालेलं पर्जन्यमान. इ.स.पू 2150 मध्ये अस्तित्वात आलेली ही संस्कृती अनेक शतकं तग धरून राहिली.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)