You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोनालिसाच्या हसण्यामागे 'शास्त्र' आहे? काय आहेत या चित्रातल्या गूढ गोष्टी?
मोनालिसाचं चित्र हे जगातील सर्वात प्रसिद्ध चित्रांमध्ये मोडतं. हे चित्र रेखाटलंय प्रतिभासंपन्न चित्रकार लिओनार्डो दा विंची याने. एक कलाकार असण्यापलीकडे, लिओनार्डो अनेक क्षेत्रात तज्ञ होता.
त्याला ज्ञानाची भूक होती. चित्रकलेच्या पलीकडे जाऊन अनेक क्षेत्रांबद्दल जाणून घ्यायची त्याला तगमग होती. त्याला शरीरशास्त्र, गणित, प्रकाशशास्त्रात रस होता.
कला आणि विज्ञान यात त्याने कधीच फरक केला नाही.
त्याने शवागारात जे पाहिलं तेच त्याच्या चित्रांमध्ये दिसून आलं. लिओनार्डोच्या चित्रांचं विश्लेषण करणं तसं अवघड आहे, कारण त्याच्या चित्रांमधून त्याची विलक्षण प्रतिभा कळून येते.
मात्र शरीररचनेविषयी असलेल्या त्याच्या औस्तुक्यातून त्याने मोनालिसाचा चेहरा रेखाटला हे जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही ज्या नजरेतून ते चित्र पाहता त्या नजरेतून ते पाहणार नाही.
त्याने आपल्या ज्ञानाचा वापर चित्रातली प्रत्येक गोष्टीत केल्याचं दिसून येतं.
मोनालिसाचे डोळे
तुम्हाला असं कधी वाटलंय का, की तुम्ही ज्या दिशेने जाता त्या दिशेने मोनालिसाचे डोळे तुमचा पाठलाग करतात?
याचं कारण आपण समजून घेऊ. आपण ज्या व्यक्तीकडे पाहत असतो त्या व्यक्तीच्या डोळ्यातील म्हणजेच विरुद्ध दिशेच्या व्यक्तीच्या डोळ्यातील बुबुळ सरळ दिसत असतात.
मात्र ती सरळ आणि असमान नसतात. मोनालिसाच्या भ्रमामागे हेच कारण आहे. ते कारण इतकं लोकप्रिय आहे की त्याला 'मोनालिसा इफेक्ट' म्हणतात. पण, हा भ्रम नाही. हे पूर्णपणे ऑप्टिक्सवर आधारित आहे.
आता मोनालिसाचं प्रसिद्ध स्मितहास्य बघू. जर तुम्ही सरळ मोनालिसाकडे पाहिलं तर असं दिसतं की, ती हसत नाहीये. पण तेच तिच्याकडे एका बाजूने पाहिलं तर ती हसल्यासारखं वाटते.
चित्रात मोनालिसाच्या ओठांच्या कोपऱ्यात 'फुमाटो' नावाची अस्पष्ट बाह्यरेखा वापरली. प्रकाशशास्त्रात पारंगत असलेल्या लिओनार्डोला समजलं होतं की, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे सरळ पाहतो तेव्हा आपली दृष्टी तीक्ष्ण असते.
मग मोनालिसा नक्की स्मितहास्य करते आहे का?
खरं तर मोनालिसाचं चित्र आपल्या डोळ्यांना फसवणारं आहे. चित्रात मोनालिसाच्या ओठांच्या कोपऱ्यात खालच्या दिशेने अतिशय नाजूक अशी रेषा रेखाटून हा परिणाम साधला आहे. म्हणजे मोनालिसा या चित्रात हसत नाहीये.
चित्रात स्पष्ट बघायचं तर तिच्या ओठांचे कोपरे धूसर झाल्यासारखे दिसतात. यामुळे ओठांचा आकार बदलतो. त्यामुळे ती हसताना दिसते. यातूनच तिच्या ओठांची हालचाल आणि हसण्याचा आभास होतो.
चेहऱ्याचे भाव बदलतात का?
कला समीक्षक आणि इतिहासकार एस्टेल लोवेट यांच्या मते, "मोनालिसाच्या चेहऱ्यावर स्पष्ट रेषा नाहीत, सर्व काही अस्पष्ट आहे. यामुळे तिच्या चेहऱ्यावर हालचाल झाल्यासारखी वाटते."
तसेच, ती तुमच्याकडे पाहत असल्यासारखं वाटत असलं तरी तसं नाहीये. चित्र वेगळ्या दिशेने रेखाटलं असल्याने तिची नजर फिरताना दिसते. तसेच, ती तीन रूपात दिसते.
ऑक्सफर्ड विद्यापीठातील कला इतिहासातील एमेरिटस संशोधन प्राध्यापक मार्टिन केम्प म्हणतात, "मला वाटतं की लोकांना जर लिओनार्डो काय करतोय हे समजलं असतं तर त्याला आनंद झाला असता.
शरीर एका बाजूला झुकलेलं आहे आणि मोनालिसाची नजर सरळ असल्याने चित्र खूप ठळक दिसतं असं मला वाटतं."
बऱ्याच स्त्रियांच्या चित्रांमध्ये त्यांची नजर थेट आणि स्पष्ट दिसत नाही. कारण चित्र रेखटताना स्त्रियांनी पुरुषांच्या डोळ्यात बघणं शिष्टाचाराला धरून नव्हतं.
त्यामुळे त्यांची नजर झुकलेली दिसते. मात्र लिओनार्डोने ती परंपरा मोडली असल्याचं मार्टिन केम्प म्हणतात.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)