You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ट्रम्प यांच्या आयोवातील विजयी सुरुवातीमुळे त्यांचा पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाचा मार्ग मोकळा?
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारी मिळू शकते अशा चर्चांना सुरुवात झाली आहे.
आयोवा कॉकसमध्ये विजय मिळवत ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीतील पहिली पायरी यशस्वीपणे ओलांडली आहे.
त्याचबरोबर या शर्यतीत ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या विवेक रामास्वामी यांनी माघार घेत प्रचार अभियान थांबवलं आहे. तसंच त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच पाठिंबाही दर्शवला आहे.
अमेरिकेत यावर्षी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीतील पुन्हा एकदा माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दबदबा राहू शकतो, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
आयोवामधील विजय ऐतिहासिक
आयोवामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी मिळवलेला विजय हा ऐतिहासिकदृष्ट्या मोठा होता. त्यांनी आयोवामधील 99 पैकी एक सोडून सर्व ठिकाणी सर्वाधिक मते मिळवली.
आयोवामध्ये यापूर्वी कोणत्याही उमेदवाराला 12 गुणांपेक्षा मोठा विजय मिळवता आला नव्हता. पण ट्रम्प यांचं मताधिक्य मोठं असल्याचं पाहायला मिळालं.
जवळपास सर्व मतांच्या मोजणीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांना 51%, डेसेंटिस यांना 21% आणि निकी हेली यांना 19% मते मिळाल्याचं स्पष्ट झालं.
डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता त्यांचं व्यक्तिमत्व आणि 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' या त्यांच्या मोहिमेच्या प्रभावामुळं त्यांच्या विजयाचा अंदाज आधीच वर्तवला जात होता.
ट्रम्प यांचे कमबॅक?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विजयाचं व्यापक महत्त्व देखील आहे. त्यांनी महिला, पुरुष, वृद्ध, तरुण सर्वांचा पाठिंबा मिळवला.
त्याचबरोबर कट्टर उजव्या विचारसरणीच्या मतदारांबरोबरच इव्हँजेलिकल्सची (ख्रिश्चनांमधील एक समुदाय) मतंही मिळवली. 2016 मध्ये त्यांना ही मतं मिळवता आली नव्हती.
साधारणपणे पराभूत झालेल्या उमेदवाराबाबत फार काही लोकांच्या लक्षात राहत नाही. त्यांना शक्यतो कमबॅक करणं कठीण ठरत असतं.
पण ट्रम्प यांनी या सर्वांवर मात केली. आयोवामध्ये आणि राष्ट्रीय पातळीवरही रिपब्लिकन्सना त्यांनी अद्याप पराभूत झालो नसल्याचं दाखवून दिलं.
आयोवामधील कॉकस गोअर्सच्या एका मोठ्या गटानं सीबीएसशी बोलताना सांगितलं की, त्यांच्यामते 2020 च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत खरे विजेते ट्रम्प हेच होते.
ट्रम्प यांच्या विजयाची वैशिष्ट्ये
रिपब्लिकन पार्टीमध्ये ट्रम्प यांच्या अस्तित्वाबाबत आता कोणालाही काही शंका राहणार नाही. पण आयोवामधील विजय अमेरिकेच्या राजकारणासाठी महत्त्वाचा आहे.
तीन वर्षांपूर्वी ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाची कारकीर्द वादग्रस्तरित्या संपली होती. 6 जानेवारीला कॅपिटॉल हिलवर त्यांच्या समर्थकांनी घातलेला गदारोळ अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत दुर्दैवी घटना होती.
या दंगलीप्रकरणी ट्रम्प यांच्या विरोधात दोन गुन्हेगारी प्रकरणं सुरू आहेत.
आयोवातील विजयानंतर त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार बनण्याच्या दिशेनं पाऊल टाकलं असलं तरी त्यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे. पुढच्या आठवड्यात त्यांना न्यू हॅम्पशायर प्रांतात निक्की हेलीसारख्या शक्तीशाली प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागेल.
न्यू हॅम्पशायरच्या सर्वेक्षणातील ताज्या आकड्यांनुसार ट्रम्प यांची लीड अजूनही 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे. पण अजूनही ते रिपलब्लिकन पक्षाचे प्रबळ दावेदार आहेत.
या निकालांनंतर ट्रम्प यांनी फोडा आणि राज्य करा ही निती त्यांच्यासाठी फायद्याची ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे.
विवेक रामास्वामींची माघार
आयोवा कॉकसच्या या स्पर्धेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना विजय मिळणार असा अंदाज अगदीच सुरुवातीपासूनच लावला जात होता. पण त्यांना मिळालेला विजय अत्यंत मोठा असल्याचं समोर आलं.
ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी असलेले निकी हेली किंवा रॉन डेसेंटिस यांना कुणालाही त्यांना टक्कर देता आली नाही असं पाहायला मिळालं. उलट ट्रम्पविरोधी मतांचं विभाजन झालं आणि ट्रम्प मोठ्या फरकानं विजयी झाले.
त्यात विवेक रामास्वामी त्यांना टक्कर देऊ शकतात अशी चर्चा असताना त्यांनी माघार घेतल्याचं जाहीर केलं. आता न्यू हॅम्पशायरमधील रॅलीत ते ट्रम्प यांच्या समर्थनार्थ सहभागी होतील.
अमेरिका फर्स्टच्या उमेदवाराला व्हाइट हाऊसमध्ये पाठवण्याची प्रतिज्ञा घेत असल्याचं रामास्वामी म्हणाले. हेच देशासाठी योग्य ठरू शकतं असंही त्यांनी म्हटलं.
कोण आहेत विवेक रामास्वामी?
विवेक रामास्वामी यांचे आई-वडील हे अनिवासी भारतीय. त्यांचा जन्म अमेरिकेच्या ओहायोमध्ये झालेला आहे.
हार्वर्ड आणि येलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर विवेक रामास्वामी यांनी औषध उद्योगामध्ये प्रवेश करत, कमी वयात यश मिळवलं आणि प्रगती केल्याचं पाहायला मिळालं.
38 वर्षीय विवेक रामास्वामी यांनी यापूर्वी कधीही राजकीय पद सांभाळलेलं नाही. प्रचारादरम्यान त्यांनी अनेकदा कॉन्स्पिरन्सी थिअरीचं समर्थन केल्यानं वादही निर्माण झाले होते.
त्यांनी जन्माच्या आधारे नागरिकत्व देणं बंद करण्याचा मुद्दा मांडला होता. तसंच शिक्षण विभाग, केंद्रीय तपास विभाग, इंटर्नल रेव्हेन्यू सर्व्हिस आणि इतर सरकारी संस्था बंद करण्याचं आश्वासनही त्यांनी प्रचारादरम्यान दिलं होतं.
विशेष म्हणजे विवेक रामास्वामी यांनी बाहेरचा व्यक्ती अशी स्वतःची प्रतिमा सर्वांसमोर उभी केली. तसंच ट्रम्प यांचा ‘अमेरिका फर्स्ट’चा अजेंडा स्वतःच्या वैयक्तिक मार्गानं पुढं नेण्याची इच्छाही व्यक्त केली होती.
आयोवातील विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचाराला आणखी गती मिळणार आहे. कारण मतदानाची वेळ येईपर्यंत ट्रम्प हे शक्तीशाली उमेदवार म्हणून पुढं येतील, अशी दाट शक्यता आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)