You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष आर्टिफिशियल इंटेलिजन्स ठरवेल?
31 मार्च 2023 हा दिवस अमेरिकेसाठी खूपच महत्त्वाचा ठरला होता. कारण यादिवशी दोन गोष्टी घडल्या होत्या. एक म्हणजे अमेरिकेच्या न्यायमूर्तींनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावरील आरोपांची निश्चिती केली होती. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस व्हाईट हाऊसमध्ये पार्टी करतानाचे व्हीडिओ व्हायरल झाले होते.
व्हीडिओ एकदम बारकाईने पाहिला तर समजेल की, कमला हॅरिस यांच्या हाताला सहा बोटं आहेत, तर तळहाताचा वरचा भाग गायब आहे.
खरं सांगायचं तर त्यादिवशी राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष हे दोघेही व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित नव्हते. पण त्यांचा हा फेक व्हीडिओ लाखो लोकांना पाठवण्यात आला होता.
हा व्हीडिओ तयार करण्यात आला होता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने. याला 'एआय' असंही म्हटलं जातं.
येणाऱ्या निवडणुकांमध्ये लाखो मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी याचा प्रभावीपणे वापर करण्यात येईल, असं चित्र सध्या दिसतंय.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून तयार केलेल्या गोष्टी मतदारांच्या लहान लहान गटांना त्यांच्या प्रोफाइलनुसार पाठवल्या जातील.
हे व्हीडिओ तयार करणारं जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅट-जीपीटी आज सर्वांना मुखोद्गत झालंय. मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात याचं लॉन्चिंग झालं होतं आणि आता हे सर्वसामान्य लोकांना वापरासाठी उपलब्ध आहे.
चॅट-जीपीटीचं काम काय? तर इंटरनेटवरून सर्व माहिती शोधून यावर ब्लॉग लिहिणं, अगदी गाणी आणि कविताही लिहिता येतात.
पण याच्या माध्यमातून सुरू असलेला प्रचार खरा की खोटा असा प्रश्न मतदारांसमोर उभा राहणार आहे.
या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की, अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष ठरविण्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठा वाटा असेल का?
डिजिटल युगातील राजकारण
निवडणुकीच्या राजकारणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा केला जाऊ शकते हे समजून घेण्यासाठी बीबीसीने हायर ग्राउंड्स लॅबच्या सह-संस्थापक बेट्सी हूवर यांच्याशी संपर्क साधला.
ही कंपनी निवडणूक प्रचारात वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करते. बेट्सी हूवर यांनी 2007 मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या निवडणूक प्रचारात आयोजक म्हणून काम करत राजकारणात प्रवेश केला.
बेट्सी हूवर सांगतात, "ओबामा हे त्यावेळचे पहिले असे उमेदवार होते ज्यांनी निवडणूक प्रचारात डिजिटल तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला होता. त्यावेळी आमच्याकडे लोकांची आणि पैशांची कमतरता होती. हा अडथळा दूर करण्यासाठी म्हणून आम्ही डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला. सुरुवातीला हा प्रयोग आम्ही राज्य पातळीवर आणि नंतर राष्ट्रीय पातळीवर करण्याचं धोरण अवलंबलं."
त्यांचं म्हणणं होतं की, केवळ पैशांची बचत करण्याचा मुद्दा नव्हता तर लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणं अत्यंत महत्त्वाचं होतं.
लोक घरी, ऑफिसमध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी असू शकतात. पण त्यांचा फोन नेहमीच त्यांच्या जवळ असतो. त्यामुळे डिजिटल माध्यमातून लोकांशी संपर्क साधणं हा एक चांगला मार्ग होता. पण मग यातून लोकांशी थेट संपर्काचा अभाव होईल, अशी भीती त्यांना वाटली नाही का?
बेट्सी हूवर यांचं म्हणणं आहे की, "त्यावेळी देखील या मुद्द्यावर बरीच चर्चा झडली होती. आम्ही लोकांना निवडणुकीचे मॅसेज, ईमेल आणि फेसबुकच्या माध्यमातून पाठवत होतो. शिवाय थेट संपर्कापेक्षा हा मार्ग किती प्रभावी ठरेल याचा आम्ही देखील विचार करू लागलो होतो. पण हे देखील तितकंच खरं होतं की, यामुळे आम्ही एकाचवेळी अनेक लोकांच्या संपर्कात येत होतो."
2012 मध्ये ओबामा पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. मात्र निवडणूक प्रचारातील तंत्रज्ञानाची भूमिका गेल्या दहा वर्षांत खूप बदलली आहे.
आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मतदारांचं प्रोफाइल आणि प्राधान्यं शोधता येतात. आणि त्यानुसार उमेदवार आपल्या प्रचार तंत्रात बदल करू शकतो.
असं म्हटलं जातंय की, अमेरिकेतील 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठा प्रभाव पडू शकतो.
हे तंत्रज्ञान मतदारांच्या प्रोफाइल आणि विचारांवर आधारित निवडणूक प्रचार साहित्याची निर्मिती करू शकतं. याच्या माध्यमातून उमेदवारांना लोकांच्या लहान लहान गटांपर्यंत आपला संदेश पोहोचवता येईल.
बेट्सी हूवर सांगतात की, "उमेदवार त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर कंटेंट रायटर आणि रणनीतीकारांची (स्ट्रॅटॅजिस्ट) नियुक्ती करतात. हे लोक पोस्ट मध्ये वेगळेपण तयार करून वेगवेगळ्या मतदारांपर्यंत पोहोचवतात. हे तयार करण्यासाठी पैसा आणि वेळ अशा दोन्ही गोष्टी लागतात. पण कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे हे काम अधिक जलद आणि स्वस्तात होऊ लागलंय."
पण या तंत्रज्ञानाच्या मदतीने सहज आणि स्वस्तात कंटेंट तयार करता येत असला तरीही त्यात बऱ्याचशा अडचणी आहेत. याचा वापर करून एखाद्या उमेदवाराची प्रतिमा मलिनही केली जाऊ शकते.
कृत्रिम बुद्धिमत्ता
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संभाव्य गैरवापराविषयी आणखीन जाणून घेण्यासाठी बीबीसीने बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील कम्युनिकेशन सायन्सचे प्राध्यापक हनी फरीद यांच्याशी संपर्क केला. यावेळी त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गैरवापराचं एक धक्कादायक उदाहरण दिलं.
ते सांगतात की, "मध्यंतरी एक बातमी आली होती. त्यात असं म्हटलं होतं की, एका महिलेला अनोळखी फोन आला होता. या फोनवर त्या महिलेची मुलगी तिला आपलं अपहरण झाल्याचं सांगत होती. पण या महिलेची मुलगी तर घरीच खेळत होती. कोणीतरी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने मुलीच्या आवाजाची नक्कल करणारा संदेश पाठवला होता. याचा अर्थ कोणीतरी तिच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत होता."
भले ही अशी उदाहरणं अपवाद असतील पण यातून हेच समजतं की, हे तंत्रज्ञान इतकं विकसित झालंय की त्याला कोणाच्याही आवाजाची हुबेहूब नक्कल करता येईल.
मागच्या वीस वर्षांत कॉम्प्युटर आणि सॉफ्टवेअर बनवण्याची आपली क्षमता झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता देखील विकसित झाली आहे. शिवाय लोकही आपली बरीचशी माहिती इंटनेटवर टाकत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर निशाणा साधणं आता सोपं झालंय.
हनी फरीद सांगतात, "गेल्या वीस वर्षांत आपण आपल्या इच्छेनुसार फोटो, व्हीडिओ, आवाज अशी बरीचशी माहिती सोशल मीडियावर टाकली आहे."
"जेव्हा तुम्ही एखाद्या वेबसाइटवर जाता तेव्हा त्यांना तुमच्याबद्दल बरीच माहिती मिळालेली असते. हा खूप फायद्याचा व्यवसाय आहे. आता मशीन तुमचा आवाज ओळखू लागलंय, तुमचा चेहरा ओळखू लागलंय, त्याच्याकडे तुमच्या कुटुंबाची सगळी माहिती आहे. सोशल मीडिया आणि इतर वेबसाइटवर जाऊन डेटा शोधणाऱ्यांकडे लोकांची खूप माहिती असते, त्यामुळे निशाण्यावर येणं आता अगदी सोपं झालंय."
सोशल मीडिया आणि इतर वेबसाइट्स आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून लोकांचे प्रोफाइल्स तयार करतात आणि त्यानुसार त्यांच्यापर्यंत जाहिराती पोहोचवतात.
उदाहरण म्हणून बघायचं झाल्यास, तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं आहे आणि त्यादृष्टीने तुम्ही इंटरनेटवर काही माहिती शोधली तर तुम्हाला सोशल मीडियावर त्या ठिकाणाशी संबंधित जाहिराती दिसू लागतात.
पण आता जनरेटिव्ह एआयच्या मदतीने एखाद्याचे टेक्स्ट मेसेज, फोटो, व्हीडिओ किंवा ऑडिओ वापरून बनावट कंटेंट बनवणं देखील सोपं झालंय.
हनी फरीद याविषयी सांगतात की, "आता तर व्हॉइस क्लोनिंग देखील व्हायला लागलंय. उदाहरणार्थ ख्रिश्चन धर्मगुरूंची बनावट विधाने करतानाचा व्हीडिओ जगभरात व्हायरल झाला होता. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून याच पद्धतीचा कंटेंट तयार होतो.
काही लोक अशा सॉफ्टवेअरचा वापर करत आहेत ज्यावर कोणाचंच नियंत्रण नाहीये. आणि ही खूप चिंतेची गोष्ट आहे."
हनी फरीद पुढे सांगतात की, आणि ज्यांचा गैरवापर होऊ शकतो असे बरेच सॉफ्टवेअर सहज उपलब्ध असतात. चॅट-जीपीटी हे कृत्रिम बुद्धिमत्तेचं एक सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरचा वापर करून अनेक नाट्यमय बदल घडवून आणल्याचं बोललं जातंय.
चॅट-जीपीटी मजकूर तयार करू शकतो, पण अशाच प्रकारचे इतर सॉफ्टवेअर व्हीडिओ आणि ऑडिओ तयार करू शकतात.
हनी फरीद सांगतात, पुढच्या वर्षी अमेरिकेत होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारात या पद्धतीचं बनावट साहित्य वापरलं जाण्याची शक्यता आहे.
निवडणूक प्रचारात अशा बनावट साहित्याचा वापर केल्याने मतदारांची दिशाभूल तर होईलच, शिवाय लोकशाही प्रक्रियेलाही तडा जाईल. पण ज्यापद्धतीने निवडणुकांमध्ये त्याचा गैरवापर होण्याचा धोका आहे, त्याच पद्धतीत याचे काही फायदे देखील आहेत.
निवडणूक प्रचाराचा खर्च
निवडणूक लढवण्यासाठी ज्याप्रमाणे निवडणूक प्रचाराची यंत्रणा आवश्यक असते, त्याचप्रमाणे पैसा देखील सर्वांत मोठी गोष्ट असते आणि याचा अंदाज आपल्या सर्वांना आहे.
स्टर्लिंग डेटा ही कंपनी अमेरिकेतील उमेदवारांना निवडणूक प्रचारासाठी निधी उभारण्यासाठी मदत करते. या कंपनीचे सीईओ मार्टिन कुरुझ यांनी बीबीसीशी बोलताना काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.
ते सांगतात, बऱ्याच देशाध्ये उमेदवारांच्या निवडणुकीचा खर्च हा सार्वजनिक स्त्रोतांमार्फत उभारला जातो. पण अमेरिकेत तसं नाहीये. उमेदवाराला त्याच्या समर्थकांकडून किंवा कंपन्यांकडून निधी गोळा करावा लागतो.
ते सांगतात, "उदाहरणार्थ, डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार त्यांच्या प्रचारासाठी पक्ष समर्थकांकडून निधी गोळा करतात. पक्षाचे सुमारे 17 कोटी समर्थक आहेत जे देणगी देऊ शकतात किंवा देणगीदार आहेत."
ते सांगतात, "अशा देणगीदारांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी आमची मदत घेतली जाते. आम्ही कमीत कमी वेळेत संभाव्य देणगीदारांची यादी तयार करावी असं त्यांना वाटतं. मग या कामासाठी आम्ही एआयचा वापर करतो. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संभाव्य देणगीदारांचा शोध घेतला जातो. आणि नंतर यादी बनवली जाते."
मार्टिन कुरुझ म्हणतात की, पूर्वीच्या कॉम्प्युटर इंजिनिअर्सना अशी यादी बनवायला अनेक दिवस काम करावं लागायचं. पण आता हे काम अगदी सोपं झालंय.
ते सांगतात की, "आम्ही आमचा डेटा एका सॉफ्टवेअरमध्ये टाकतो आणि एआय काही मिनिटांतच यावर काम करून देतं. आजकाल इंटरनेटवरील अनेक प्लॅटफॉर्म डीप लर्निंगचं शिक्षण देत आहेत. लोक डेटा प्रोसेसिंगसाठी त्याचा वापर करू शकतात."
यामुळे एकाबाजूला उमेदवाराचा निवडणूक लढवण्याचा खर्च कमी होतो, तर दुसऱ्या बाजूला ज्या लोकांची यादी त्याला मिळते त्याचाही फायदा होतो.
मार्टिन कुरुझ म्हणतात की, "येत्या काळात हा खर्च आणखीन कमी होईल आणि अधिकाधिक लोक निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. निवडणुकांमध्ये समानता आणणं आणि या प्रक्रियेचं लोकशाहीकरण करण्याची क्षमता कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये आहे."
त्यामुळे अमेरिकेच्या येऊ घातलेल्या अध्यक्षीय निवडणुकीवर याचा कोणता परिणाम होईल ते पाहावं लागेल.
2024- वॉटरशेड चळवळ
आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित सुप्रसिद्ध पुस्तक डीपफेक्सच्या लेखिका नीना शिक सांगतात, येत्या निवडणुकीपर्यंत हे तंत्रज्ञान आणखिन विकसित होईल. आणि याचा वापर न करता निवडणूक प्रचार करणं कठीण जाईल.
त्या पुढे सांगतात की, "केवळ प्रचाराची पद्धतच बदलेल असं नाही तर व्यक्तीपरत्वे संदेशही बदलत जातील. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून प्रत्येक मतदारासाठी व्यक्तिगत संदेश तयार करून पाठवले जातील.
यामुळे उमेदवार आणि जनता यांच्यात चांगला संवाद प्रस्थापित होईल. एखाद्या मुद्द्यावर जनमत तयार करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करायचं म्हटलं तर तो वापर सर्वांत आधी निवडणूक प्रचारात होईल असं दिसतंय."
पण लोक याचा गैरवापर करतील असंही नीना शिक यांना वाटतं. चॅट-जीपीटी येण्याआधी सुद्धा असे गैरवापर झाल्याचं दिसून आलंय.
त्यांच्या मते, "गेल्या निवडणुकीच्या वेळी प्रचारात मोठ्या प्रमाणावर खोटी माहिती पसरवण्यात आली होती. डोनाल्ड ट्रपं आणि जो बायडेन यांचे बनावट व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आणि गरजेचं नाही की विरोधकच हे सगळं करतील, बऱ्याचदा काही लोक देखील अशी सामग्री तयार करून पसरवू शकतात."
"नेमकं खरं काय आणि खोटं काय? हे ओळखणं लोकांसाठी अवघड झालंय. जर एखादा उमेदवार लाच घेताना कॅमेऱ्यात कैद झाला तर तो उलटपक्षी म्हणू शकतो की हा मी नाहीये, किंवा हा व्हीीिओ खोटा आहे. त्यामुळे खऱ्या गोष्टींविषयीही संभ्रम निर्माण होऊ शकतो."
2016 साली पार पडलेल्या निवडणुकांमध्ये रशियाने हस्तक्षेप केल्याचे आरोप होऊ लागले होते. मग आता येत्या निवडणुकांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून परकीय हस्तक्षेपाची शक्यता पूर्वीपेक्षा जास्त वाढली आहे का?
यावर नीना शिक म्हणतात, "परकीय लोक खोटी माहिती पसरवत असतील यात काही शंका नाही. मागच्या निवडणुकांनंतर परकीय शक्तींनी जगभरातील इतरही ठिकाणी असेच हस्तक्षेप सुरू केल्याचं दिसून आलंय."
साहजिकच यामुळे लोकशाही व्यवस्थेला आव्हान निर्माण होईल पण तरीही ही व्यवस्था अबाधित राहील, असा विश्वास नीना शिक यांनी व्यक्त केलाय.
पण अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष ठरवण्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सहभाग असेल का?
या मूळ प्रश्नावर तज्ज्ञ सांगतात की, लोकशाही व्यवस्थेला कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जसे फायदे मिळतात तसंच या व्यवस्थेचं नुकसान करण्याची क्षमता देखील यात आहे.
पण एक लक्षात घ्या की, पेरीले तैसेची उगविते. आपण पेरलेल्या गोष्टीच उगवून येणार आहेत आणि आपल्यालाच त्याची कापणी करायची आहे. आणि आपल्याला कशापद्धतीचा समाज अभिप्रेत आहे हे आपण ठरवलं पाहिजे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)