मौला जट : पाकिस्तानचा ब्लॉकबस्टर सिनेमा भारतात का प्रदर्शित झाला नाही?

फोटो स्रोत, Twitter
- Author, शकील अख्तर
- Role, बीबीसी उर्दू, नवी दिल्ली
पाकिस्तानमधील ‘द लिजेंड ऑफ मौला जट’ या ब्लॉकबस्टर सिनेमाचं भारतातील प्रदर्शन रद्द करण्यात आलंय. पाकिस्तानमधील हा अॅक्शनपट दिल्ली आणि पंजाबमधील सिनेमागृहांमध्ये 30 डिसेंबरला प्रदर्शित होणार होता.
या सिनेमाचं भारतातील प्रदर्शन रद्द करण्याचं कुठलंच कारण अद्याप सांगितलं गेलं नाहीये.
पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, भारतातील मल्टिप्लेक्स सिनेमा ग्रुप पीव्हीआर आणि आयनॉक्सच्या एका कर्मचाऱ्याला याबाबत कारण विचारलं असताना, त्यांनी सांगितलं की, “आम्हाला सिनेमाच्या वितरकानं सांगितलं की, या सिनेमाचं प्रदर्शन स्थगित करण्यात आलंय.
"आम्हाला याबाबत दोन-तीन दिवसांपूर्वीच सांगण्यात आलं होतं. याचं कोणतंही कारण सांगण्यात आलं नव्हतं आणि प्रदर्शनाच्या पुढील तारखेबाबतही काही माहिती नाही.”
26 डिसेंबरला आयनॉक्स सिनेमा ग्रुपचे मुख्य प्रोग्रामिंग ऑफिसर राजेंद्र सिंह जियाला यांनी सांगितलं होतं की, ‘मौला जट’ सिनेमा अशा थिएटर्समध्ये दाखवलं जाईल, जिथं पंजाबी भाषिकांची संख्या जास्त आहे.
त्यांच्या या घोषणेनंतर भारतात या सिनेमाची वाट पाहिली जात होती. या सिनेमाच्या प्रमोशनचे पोस्टर्सही ‘बुक माय शो’सारख्या प्लॅटफॉर्मवरही आले होते.
या आठवड्याच्या सुरुवातीला पीव्हीआर सिनेमा ग्रुपने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर ‘मौला जट’च्या प्रदर्शनाची तारीखही शेअर केली होती. मात्र, एक-दोन दिवसातच पोस्ट इन्स्टाग्रामवरून काढून टाकण्यात आली.
‘मौला जट’ भारतात प्रदर्शित का झाला नाही?
काही इतर वृत्तांनुसार, भारताच्या सेन्सॉर बोर्डाने ‘मौला जट’ सिनेमाच्या प्रदर्शनाची परवानगी रद्द केलीय. मात्र, सेन्सॉर बोर्डाकडून अद्याप अधिकृत काहीही माहिती देण्यात आली नाहीय किंवा वेबसाईटवरही याबाबत कुठली माहिती प्रसिद्ध करण्यात आली नाहीय.
सिनेमागृहांमध्ये एखादा सिनेमा प्रदर्शित करण्याची घोषणा साधारणत: सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीनंतरच केली जाते. त्यामुळे सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित केल्यानंतर अचानक स्थगित करण्याचा निर्णय वितरकांनी स्वत:हून तर घेतला नसेल, असाही प्रश्न उपस्थित होतोय.

फोटो स्रोत, Twitter
जर ‘मौला जट’ भारताच्या सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला असता, तर 2011 साली प्रदर्शित झालेल्या ‘बोल’ सिनेमानंतरचा पहिला सिनेमा ठरला असता. म्हणजे जवळपास 10 हून अधिक वर्षांनी पाकिस्तानी सिनेमा भारतभूमीवर प्रदर्शित होऊ पाहत होता.
‘मौला जट’ सिनेमाच्या भारतातील वितरणाचे अधिकार ‘झी स्टुडिओज’कडे आहेत. त्यांच्याकडूनही या सिनेमाचं प्रदर्शन रद्द करण्यासंबंधी कुठलीच माहिती देण्यात आली नाही.
झी ग्रुप भारतात सिनेमांची निर्मिती आणि वितरणासह अनेक टीव्ही चॅनेल्सही चालवतं. या ग्रुपने काही वर्षांपूर्वी भारतात एक चॅनल लाँच केलं होतं, ज्या चॅनेलवर पाकिस्तानातील मालिका दाखवण्यात आली होती.
हे चॅनल तेव्हा प्रसिद्धीच्या झोतात आलं होतं. एकदा तर झी ग्रुपने पाकिस्तानी सिनेकलाकरांसोबत सिनेमा बनवण्याचीही तयारी केली होती. मात्र, उरी आणि पुलवामातील घटनांनंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले. परिणामी भारतात प्रसिद्ध होणारी पाकिस्तानी मालिकाही बंद झाली आणि सिनेमाचं नियोजनही कोलमडलं.

फोटो स्रोत, Getty Images
फवाद आणि माहिरानं केलंय बॉलिवूडमध्ये काम
‘मौला जट’ सिनेमात कलाकार असलेल्या अभिनेता फवाद खान आणि अभिनेत्री माहिरा खान यांनी बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केलंय.
माहिरानं 2017 साली शाहरूख खानसोबत ‘रईस’ सिनेमात काम केलं होतं. त्यावेळी ती मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती.
फवाद खानने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलंय.
2016 साली ‘उरी’ हल्ल्यानंतर इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशननं भारतीय सिनेमांमध्ये पाकिस्तानी कलाकारांवर बंदी आणली होती.
महाराष्ट्रात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इशारा दिला होता की, पाकिस्तानी कलाकारांना भारतीय सिनेमांमध्ये काम करू देणार नाही. जर पाकिस्तानी कलाकारांनी काम केल्यास, तो सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही.

फोटो स्रोत, THE LEGEND OF MAULA JATT OFFICIAL
भारतीय माध्यमांमधील वृत्तांमध्ये सांगण्यात येतंय की, ‘मौला जट’ सिनेमावर यासाठीही टीका होतेय की, या सिनेमातील अभिनेता हमजा अली अब्बास हा कथितरित्या हाफिज सईदचा समर्थक आहे.
हाफिज सईद हा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड मानला जातो.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं काही दिवसांपूर्वी धमकी दिली होती की, ‘मौला जट’ सिनेमा भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








