'सिद्धू मुसेवालाला संपवण्याशिवाय पर्यायच नव्हता'; गोल्डी ब्रारनं बीबीसीला काय सांगितलं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सौतिक बिस्वास आणि ईशलीन कौर
- Role, बीबीसी आय इन्व्हेस्टिगेशन्स
पंजाबी हिप-हॉप स्टार सिद्धू मुसेवालाची भाडोत्री मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून त्याची हत्या केली तेव्हा ती संपूर्ण घटना भारताला हादरवणारी होती.
काही तासांतच, गोल्डी ब्रार नावाच्या एका पंजाबी गँगस्टरनं फेसबुकवर पोस्ट करून ही हत्या केल्याची जबाबदारी स्वीकारली.
परंतु, हत्येच्या तीन वर्षांनंतरही कोणावरही खटला दाखल केला झालेला नाही आणि गोल्डी ब्रार अजूनही फरार आहे. त्याचा ठावठिकाणा अद्याप समजलेला नाही.
आता 'BBC Eye' ने ब्रारशी संपर्क साधला आणि सिद्धू मुसेवालालाच का आणि कसं लक्ष्य करण्यात आलं याबाबत त्याला थेट प्रश्न विचारला.
यावर त्याची प्रतिक्रिया अत्यंत थंड पण स्पष्ट आणि बोलकी होती.
'त्याला संपवण्याशिवाय आमच्याकडे पर्यायच नव्हता...'
"त्याच्या अहंकारामुळे, त्यानं (सिद्धू मुसेवाला) काही अशा चुका केल्या, ज्या माफ केल्या जाऊ शकत नव्हत्या," ब्रारनं बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसला सांगितलं.
"आमच्याकडे त्याला मारण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्याच्या कृत्याचे परिणाम त्याला भोगावेच लागणार होते. एकतर तो किंवा आम्ही, इतकं सोपं होतं."
2022 च्या मे महिन्यातल्या एका संध्याकाळी, पंजाबमधल्या आपल्या गावाजवळील धुळीने माखलेल्या रस्त्यांवर सिद्धू मुसेवाला आपल्या काळ्या महिंद्रा थार एसयूव्हीने फिरायला निघाला होता. त्यावेळी काही मिनिटांत दोन कार त्याचा पाठलाग करू लागल्या.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
सीसीटीव्ही फुटेजमध्ये नंतर दिसलं की, ती दोन्ही वाहनं अरुंद वळणांमधून वेगवेगळ्या मार्गांनी त्या एसयूव्हीच्या अगदी जवळ आले. नंतर रस्त्याच्या वळणावर, एका वाहनानं जोरात पुढे जात सिद्धू मूसेवाल्याच्या एसयूव्हीला भिंतीच्या बाजूनं दाबलं. त्यामुळे मुसेवालाची गाडी अडकली आणि काही क्षणांतच गोळीबार सुरु झाला.
मोबाईलवर कैद केलेल्या दृश्यांत त्यानंतरचं चित्र दिसतं. त्याची एसयूव्ही गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न झाली होती, विंडशील्ड तुटलेलं आणि बोनट दबलं गेलं होतं.
थरथरत्या आवाजात, आसपासच्या लोकांनी मदतीसाठी आवाहन केलं.
"कोणीतरी त्याला कारमधून बाहेर काढा."
"थोडं पाणी आणा."
"मुसेवालाला गोळी लागली आहे."
पण तेव्हा खूप उशीर झाला होता. त्याला रुग्णालयात पोहोचताच मृत घोषित करण्यात आलं. नंतर पोस्टमॉर्टेममध्ये 24 गोळ्या लागल्याचे उघड झालं.
अठ्ठावीस वर्षांचा हा रॅपर, आधुनिक पंजाबमधील एक मोठा सांस्कृतिक आदर्श मानला जाणारा कलाकार, दिवसाढवळ्या त्याला गोळ्या झाडून ठार करण्यात आलं होतं.
हल्ल्याच्या वेळी मुसेवाला सोबत कारमध्ये असलेला त्याचा एक चुलतभाऊ आणि एक मित्र यातून वाचले, पण ते जखमी झाले होते.
अखेरीस सहा मारेकऱ्यांची ओळख पटली. त्यांच्याकडे एके-47 आणि पिस्तूल होते. हत्येनंतरच्या आठवड्यात सुमारे 30 लोकांना अटक करण्यात आली आणि दोन संशयित शस्त्रधारी लोकांचा पोलिसांनी "एन्काऊंटर" केला.
अटकसत्र सुरू असलं तरीही, हत्येमागचं कारण अस्पष्टच राहिलं.

फोटो स्रोत, Getty Images
गोल्डी ब्रार, ज्यांनं हत्येचा आदेश दिल्याचा दावा केला आहे, तो हत्येच्या वेळी भारतात नव्हता. त्यावेळी तो कॅनडात असल्याचा अंदाज आहे.
त्याच्यासोबत आमचं सहा तासांहून अधिक काळ संभाषण चाललं. हे संपूर्ण संभाषण व्हाइस नोट्सच्या माध्यमातून झालं. त्यामुळं आम्हाला मुसेवालाची हत्या का करण्यात आली आणि ज्यानं या हत्येची जबाबदारी स्वीकारली त्याच्या हेतूबाबत जाणून घेण्याची संधी मिळाली.
'जागतिक स्तरावर प्रभाव टाकणारा पंजाबी रॅपर'
सिद्धू मुसेवालाचा जन्म पंजाबमधील एक जाट-शीख कुटुंबात झाला. त्याचं नाव शुभदीप सिंग सिद्धू होतं. तो 2016 मध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी कॅनडाला गेला. पंजाबातून कॅनडात गेलेल्या लाखो लोकांसाठी हा एक परिचित, रूळलेला असा प्रवास आहे.
परंतु, मूसा गावापासून खूप दूर, तिथेच त्यानं स्वतःला पुन्हा तयार करून पंजाबी संगीतातील एक प्रभावशाली कलाकार म्हणून ओळख मिळवली. अवघ्या पाच वर्षांतच, मुसेवाला पंजाबी हिप-हॉपचा अनन्यसाधारण आवाज बनला.
त्याच्या खास शैलीनं, चमकदार फॅशननं आणि जोरदार गीतांनी, राजकारण, शस्त्रं आणि बदला या विषयांवर तो मोकळेपणानं गाऊ लागला. साधारणपणे पंजाबी संगीत जे सांगण्यास तयार होत नव्हतं, त्याच्या सीमा त्यानं ओलांडल्या.
तो रॅपर तुपाक शकूरचा चाहता होता, त्याला त्याच्या गाण्यांनी भूरळ घातली होती. शकूरची 1996 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी हत्या करण्यात आली होती. "व्यक्तिमत्वाच्या बाबतीत, मला त्याच्यासारखं व्हायचं आहे," असं मुसेवाला एकदा एका मुलाखतीत म्हणाला होता.
"ज्या दिवशी त्याचा मृत्यू झाला, लोक त्याच्यासाठी रडले. मलाही तेच हवं आहे. जेव्हा मी मरेन, तेव्हा लोकांनी लक्षात ठेवावं की, मी कोणीतरी होतो."
अत्यंत छोट्या पण स्फोटक कारकिर्दीत, या गायकानं पंजाबमधील गँगस्टर संस्कृती, बेरोजगारी आणि राजकीय ऱ्हास यांसारख्या काळ्या बाजूकडे लक्ष वेधलं, आणि त्याच वेळी गाव जीवनाविषयीची खोल आठवणही जागृत केली.
मुसेवाला हा देखील जागतिक स्तरावर प्रभाव टाकणारा एक कलाकार होता.
'प्रसिद्धीची किंमत चुकवावी लागली'
यूट्यूबवर त्याच्या गाण्यांना 5 अब्जांहून अधिक व्ह्यूज, यूके चार्ट्समध्ये टॉप 5 मधील स्थान, आणि बर्ना बॉयसारख्या आंतरराष्ट्रीय हिप-हॉप कलाकारांबरोबरच्या सहकार्यानं त्याने भारत, कॅनडा, यूके आणि जगभरातील प्रेक्षकांमध्ये मोठा चाहता वर्ग तयार केला. विशेषतः त्याला एक आयकॉन आणि बंडखोर मानणाऱ्या पंजाबी समुदायातही...
परंतु, प्रसिद्धीची किंमत त्याला चुकवावी लागली. सामाजिक भान असलेल्या गीतांमुळे आणि वाढत्या लोकप्रियतेमुळे, सिद्धू मुसेवाला धोकादायक वाटेवर चालू लागला होता.
त्याची हट्टी वृत्ती, उघडपणे व्यक्त होणं आणि प्रभावशाली ठरू लागलेली ओळख, यामुळे पंजाबमधील कुप्रसिद्ध गँगस्टर्सचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं.
यामध्ये गोल्डी ब्रार आणि त्याचा मित्र लॉरेन्स बिश्नोई यांचा समावेश होता. जो त्या वेळीही भारतातील उच्च सुरक्षा असलेल्या तुरुंगात होता.
'गोल्डी ब्रार- लॉरेन्स बिश्नोईचा इतिहास'
ब्रारबद्दल फारशी माहिती कुठंही उपलब्ध नाही, एवढंच माहीत आहे की तो इंटरपोलच्या रेड नोटीस यादीत आहे आणि बिश्नोई चालवत असलेल्या गुंडांच्या नेटवर्कमधील एक प्रमुख सदस्य आहे.
तो खून करणं, धमक्या देणं आणि गँगचा प्रभाव किंवा आवाका वाढवणं या गोष्टींमध्ये सक्रिय आहे.
असं मानलं जातं की, तो 2017 मध्ये, म्हणजेच मुसेवाला कॅनडात गेल्यानंतरच्या एका वर्षानंतर तो तिथे स्थलांतरित झाला आणि सुरुवातीला ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता.
बिश्नोई, जो एकेकाळी पंजाबच्या हिंसक महाविद्यालयीन राजकारणात सहभागी असलेला विद्यार्थी नेता होता. तो आता भारतातील सर्वात भीतीदायक गुन्हेगारी मास्टरमाइंडपैकी एक बनला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"लॉरेन्स बिश्नोईविरुद्ध दाखल झालेली पहिली (पोलीस) प्रकरणं ही सगळी विद्यार्थी राजकारण आणि विद्यार्थी निवडणुकांशी संबंधित होती... एखाद्या प्रतिस्पर्धी विद्यार्थी नेत्याला मारहाण करणं, त्याचं अपहरण करणं, त्याला दुखापत करणं," असं 'ट्रिब्यून' या वृत्तपत्राचे डेप्युटी एडिटर जुपिंदरजीत सिंग यांनी सांगितलं.
"या कारणांसाठी त्याला तुरुंगवास भोगावा लागला आणि त्यामुळं त्याच्यातील आणखी एका कठोर गुन्हेगाराचं रूप समोर आलं," असं पंजाब पोलिसांच्या अँटी-गँगस्टर टास्क फोर्सचे असिस्टंट इन्स्पेक्टर जनरल गुरमीत सिंग चौहान यांनी सांगितलं.
"एकदा तो तुरुंगात गेला आणि नंतर तो गुन्हेगारी विश्वाच्या आणखी खोलात जाऊ लागला. त्यानंतर त्यानं स्वतःची एक टोळी तयार केली. जेव्हा त्याची टोळी बनली तेव्हा त्याला टिकून राहण्यासाठी पैशांची गरज भासू लागली.
त्याला माणसांची गरज भासू लागली, त्याला अधिक शस्त्रं हवी होती. हे सगळं करण्यासाठी पैसा लागतो आणि पैसे मिळवण्यासाठी खंडणी किंवा गुन्हेगारीच्या मार्गावर जावं लागतं."
आता 31 वर्षांचा झालेला बिश्नोई तुरुंगात बसून आपलं सिंडिकेट चालवतो. ज्याला डेडिकेटेड इन्स्टाग्राम पेजेस आणि फॉलोअर्सचा पाठिंबा मिळाला आहे.
"बिश्नोई तुरुंगात असताना, ब्रार गँगचं कामकाज सांभाळतो," असं असिस्टंट इन्स्पेक्टर जनरल चौहान म्हणाले.
'मुसेवालाचे ब्रार-बिश्नोईशी होते संबंध'
'बीबीसी आय'ने ब्रारशी संपर्क साधण्यासाठी एक वर्ष धडपड केली. स्त्रोत जुळवले, उत्तरांची वाट पाहिली आणि हळूहळू थेट त्यांच्या म्होरक्यापर्यंत जाऊन पोहोचले.
परंतु, जेव्हा आम्ही ब्रारशी संपर्क साधला, तेव्हा आमच्या संभाषणानं ब्रार आणि बिश्नोई यांनी मुसेवालाला शत्रू म्हणून का आणि कसं पाहायला सुरुवात केली यावर नवीन प्रकाश टाकला.

पहिल्या खुलाशांपैकी एक म्हणजे, बिश्नोई आणि मुसेवाला सोबतचे संबंध हत्येपूर्वी अनेक वर्षांपासूनचे होते.
"लॉरेन्स आणि सिद्धूचासंपर्क होता. त्यांची कोण ओळख करून दिली, हे मला माहिती नाही आणि मी कधी ते विचारलंही नाही. पण ते बोलत होते," असं ब्रार म्हणाला.
"सिद्धू लॉरेन्सची खुशामत करण्यासाठी 'गुड मॉर्निंग' आणि 'गुड नाईट' संदेश पाठवायचा."
मुसेवालाचा एक मित्र, ज्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटलं की, बिश्नोई 2018 पासूनच मुसेवालाशी संपर्कात होता. जेलमधून त्याला कॉल करून त्याला त्याचं संगीत आवडतं असं सांगत असत.
'कबड्डीच्या सामन्यामुळं संबंध बिघडले'
ब्रारनं आम्हाला सांगितलं की, मुसेवाला भारतात परतल्यावर त्यांच्यात "पहिला वाद" सुरू झाला. ती सुरुवात एका साध्या कबड्डी सामन्यानं झाली होती. हा सामना एका पंजाबी गावात झाला होता.

फोटो स्रोत, Getty Images
मुसेवालानं या स्पर्धेचा प्रचार केला होता, या स्पर्धेचं आयोजन बिश्नोईच्या प्रतिस्पर्धी बंबिहा टोळीनं केलं होतं, अशी माहिती ब्रारनं दिली. या खेळात मॅच-फिक्सिंग आणि गुंडगिरीचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर असतो.
"ते गाव आमच्या प्रतिस्पर्ध्यांचं आहे. तो आमच्या प्रतिस्पर्ध्यांचा प्रचार करत होता. तेव्हाच लॉरेन्स आणि इतर जण त्याच्यावर नाराज झाले. त्यांनी सिद्धूला तुला सोडणार नसल्याचं सांगत धमकावलं," असं ब्रारनं 'बीबीसी आय'ला सांगितलं.
परंतु, मुसेवाला आणि बिश्नोई यांच्यातील वाद शेवटी बिश्नोईच्या सहकाऱ्यानं, विकी मिद्दुखेरानं मिटवला.
'मिद्दुखेरामुळं पॅचअप आणि त्याचीच हत्या'
पण ऑगस्ट 2021 मध्ये मोहालीतील एका पार्किंगमध्ये विकी मिद्दुखेरा याची गँगस्टरकडून गोळ्या घालून हत्या झाली, आणि त्यानंतर ब्रारच्या म्हणण्यानुसार बिश्नोईंचं सिद्धू मुसेवालाविषयीचं वैर परत न फिरण्याच्या टप्प्यावर जाऊन पोहोचलं.
बंबिहा गँगनं मिद्दुखेराच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली. पोलिसांनी आरोपपत्रात सिद्धू मुसेवालाचा मित्र आणि काही काळ त्याचा मॅनेजर राहिलेल्या शगनप्रीत सिंगचं नाव घेतलं.

कारण सिंगने बंदूकधाऱ्यांना माहिती आणि रसद पुरवल्याचे पुरावे होते. सिंग नंतर भारतातून पळाला आणि तो सध्या ऑस्ट्रेलियात असल्याचं मानलं जातं. सिद्धूने मात्र त्याचा या हत्येशी काहीही संबंध असल्याचं नाकारलं.
'मुसेवालावर ब्रार-बिश्नोई टोळीचा संशय'
पंजाब पोलिसांनी बीबीसीला सांगितलं की, मुसेवालाचा मिद्दुखेरा हत्या प्रकरणाशी किंवा कोणत्याही गँगशी संबंधित गुन्ह्याशी कोणताही पुरावा नाही.
पण मुसेवाला शगनप्रीत सिंगचा मित्र होता आणि त्यामुळे तो बंबिहा गँगशी जुळलेला असल्याचा समज तो कधीच पुसून टाकू शकला नाही, आणि कदाचित हाच समज त्याच्या मृत्यूचं कारण ठरलं.
मुसेवाला या हत्या प्रकरणात प्रत्यक्ष सहभागी होता याचा कोणताही पुरावा ब्रारकडे नसला, तरीही तो ठाम आहे की, मिद्दुखेरा हत्या प्रकरणात मुसेवालाचा कशात तरी सहभाग होता.
ब्रारनं वारंवार सांगितलं की, शगनप्रीत सिंगने मिद्दुखेरा याची हत्या करण्यापूर्वी मारेकऱ्यांची मदत केली होती, आणि त्यावरून त्यानं हे गृहीत धरलं की मुसेवालाही त्यामागे असणार.
"सगळ्यांना सिद्धूची भूमिका माहिती होती, तपास करणाऱ्या पोलिसांनाही अगदी याचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनाही माहिती होती. सिद्धू राजकारणी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये उठबस करत होता.
तो आमच्या प्रतिस्पर्ध्यांना मदत करण्यासाठी राजकीय शक्ती, पैसे आणि त्याची संसाधनं वापरत होता," असं ब्रारनं 'बीबीसी आय'ला सांगितलं.
'कायदा फक्त शक्तिशाली लोकांसाठी... सामान्यांसाठी नाही'
"त्यानं जे केलं त्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी होती. त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा होता. त्याला तुरुंगात टाकायला हवं होतं. पण आमचं कुणीच ऐकलं नाही," असं ब्रार म्हणाला.
"म्हणून आम्हीच जबाबदारी घेतली. जेव्हा सभ्यतेची भाषा कोणी ऐकत नाही, तेव्हा बंदुकीचाच आवाज ऐकू येतो," असं ब्रार म्हणाला.
आम्ही ब्रारला विचारलं की, भारतात न्यायव्यवस्था आहे, कायद्याचं राज्य आहे, मग कायदा हातात घेण्याचं समर्थन तो कसं करतो?
"कायदा, न्याय असं काही नसतं," तो म्हणतो. "फक्त सामर्थ्यवानच न्याय मिळवू शकतात...आमच्यासारखे सामान्य लोक नाही."
तो पुढे म्हणतो की, विकी मिद्दुखेरा याचा भाऊ राजकारणात असूनही, भारताच्या न्यायव्यवस्थेतून न्याय मिळवण्यासाठी त्यालाही संघर्ष करावा लागत आहे.
"तो एक प्रामाणिक माणूस आहे. त्यानं आपल्या भावासाठी कायदेशीर मार्गानं न्याय मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. कृपया त्याला फोन करून कसं चालू आहे, ते एकदा विचारा."

फोटो स्रोत, Getty Images
हे सांगताना त्याच्या बोलण्यात कोणताही पश्चात्ताप दिसला नाही.
"माझ्या भावासाठी मला जे करायचं होतं ते मी केलं. मला अजिबात पश्चात्ताप नाही."
मुसेवालाच्या हत्येमुळे आपण केवळ एक मोठा प्रतिभावान व्यक्ती गमावला नाही, तर यामुळे पंजाबच्या गुंडांनाही बळ मिळालं आहे.
'मुसेवालाची प्रसिद्धी हायजॅक अन् टोळीला बनवलं ब्रँड'
मुसेवालाच्या हत्येपूर्वी, पंजाबबाहेर बहुतांश लोकांना बिश्नोई किंवा ब्रार यांची माहिती नव्हती.
हत्येनंतर त्यांची नावं सर्वत्र गाजली. त्यांनी मुसेवालाची प्रसिद्धी हायजॅक केली आणि त्याचं रूपांतर स्वतःच्या कुख्यात ब्रँडमध्ये केलं. अशी ओळख जी खंडणीसाठी एक प्रभावी साधन बनली.
"ही पंजाबमध्ये गेल्या काही दशकांतील सर्वात मोठी हत्या आहे," असं पंजाबमधील पत्रकार रितेश लाखी सांगतात. "पैसे उकळण्याची गँगस्टर्सची क्षमता वाढली आहे. मुसेवालाची हत्या केल्यानंतर (गोल्डी ब्रार) प्रचंड पैसा मिळवत आहे."
पत्रकार जुपिंदरजीत सिंग हे या मताशी सहमत आहेत, "जनतेमध्ये गँगस्टर्सबाबत भीती वाढली आहे."
पंजाबी संगीत उद्योगात खंडणी ही पूर्वीपासूनची समस्या आहे. परंतु सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर, सिंग म्हणतात की, "आता फक्त संगीत आणि चित्रपट क्षेत्रातील लोकांनाच नव्हे तर स्थानिक व्यापाऱ्यांनाही धमक्या येत आहेत."
जेव्हा 'बीबीसी आय'ने ब्रारला याबाबत विचारलं, तेव्हा त्यानं हे कारण नाकारलं. पण स्पष्ट शब्दांत मान्य केलं की, खंडणी हा गँगच्या कामकाजाचा मुख्य भाग आहे.
"चार जणांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी माणसाला आयुष्यभर संघर्ष करावा लागतो. आमच्यासारख्या लोकांना शेकडो किंवा हजारो लोकांची काळजी घ्यावी लागते, जे आमच्या कुटुंबासारखे आहेत. म्हणूनच आम्हाला लोकांकडून खंडणी गोळा करावी लागते."
"पैसा मिळवण्यासाठी, आपल्याला भीतीदायक असावं लागतं," असं तो म्हणाला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











