गुजरातच्या राजाने भेट दिला वळू नि ब्राझीलमध्ये 'असं' मिळालं गीर गायीला महत्त्वाचं स्थान

- Author, जोआ फॅलेट आणि अरविंद छाबडा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारतात गायीची पूजा केली जाते. मात्र भारतापासून दूर अंतरावर असलेल्या ब्राझीलमध्ये देखील भारतीय गाईंना तितकाच सन्मान दिला जातो.
ब्राझील आणि भारतातील संबंधाचे धागे गुजरातशी जोडलेले आहेत. 50 च्या दशकाच्या उत्तरार्धात या संबंधाचा पाया घातला गेला होता. गुजरातमधील भावनगरच्या महाराजांनी ब्राझीलच्या एका शेतकऱ्याला एक वळू भेट म्हणून दिला होता. त्यानंतर हे संबंध निर्माण झाले होते.
यामुळे ब्राझीलमध्ये गायीच्या जातीत सुधारणा होण्यास खूपच मदत झाली. आज ब्राझीलमध्ये गुजरातच्या गीर गायीला एक विशेष स्थान मिळालेलं आहे.
ब्राझीलमध्ये गीर गायी
सध्या ब्राझीलमधील पैराना या प्रांतातील एक डेअरी फार्ममध्ये इल्हाबेला नावाच्या एका गायीची विशेष काळजी घेतली जाते आहे.
हे फक्त ती गाय गरोदर आहे म्हणून केलं जात नाहीये, तर त्यामागे आणखी एक महत्त्वाचं कारण आहे. ते म्हणजे या डेअरी फार्ममधील ती शेवटची गाय आहे जिचं भारताशी नातं आहे.

गुजरातच्या गीर गायी ब्राझीलमध्ये ज्या वळूमुळे प्रसिद्ध झाल्या आणि ज्याच्यामुळे ब्राझीलमधील गायीच्या जातीत सुधारणा झाली, इल्हाबेला ही त्या वळूचीच वंशज आहे.
गुइलहर्म सॅक्टिम ब्राझीलमधील शेतकरी आहेत. ते सांगतात, "जेव्हा माझ्या आजोबांनी कृष्णा नावाच्या या वळूचे फोटो पाहिले, तेव्हा त्यांना देखील तो वळू आवडला. तेव्हा ते वासरूच होतं. त्यावेळेस तो गुजरातमधील भावनगरच्या महाराजांकडे होता. माझे आजोबा त्याला ब्राझीलमध्ये घेऊन आले."
कृष्णाची कहाणी
ही फक्त कृष्णा या वळूचीच गोष्ट नाही, तर गुइलहर्म सॅक्टिम यांचे आजोबा सेल्सो गार्सिया सिद आणि भावनगरचे महाराजा यांच्यातील मैत्रीची देखील कहाणी आहे.
भावगनरच्या महाराजांनी सेल्सो गार्सिया सिद यांना भेट म्हणून हा कृष्णा नावाचा वळू दिला होता.

फोटो स्रोत, DIEGO PADGURSCHI / BBC
कृष्णाचे नवे मालक, सेल्सो गार्सिया सिद यांचं त्याच्यावर खूप प्रेम होतं. इतकं की 1961 मध्ये कृष्णाचा मृत्यू झाल्यानंतर सेल्सो यांनी कृष्णाचा एक पुतळा बनवून घेतला.
त्यांच्या नातवाचं म्हणणं आहे की ब्राझीलमधील जवळपास 80 टक्के गायी कृष्णा नावाच्या या गुजरातच्या वळूच्याच वंशज आहेत.
फक्त या फार्ममध्येच नाही तर त्याच्याबाहेर देखील गीर गाईंचा दबदबा आहे.
गीर गायीची चर्चा
ब्राझीलमधील मेनास रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये जेनेटिक पद्धतीनं गायींचं ब्रीडिंग किंवा प्रजनन केलं जातं.
गीर गायींसाठी ब्राझीलमधील हवामान अनुकूल किंवा पोषक असल्याचं मानलं जातं.
तिथे या गायीना रोगदेखील होत नाहीत. गीर गायीची जात तिथल्या प्रयोगशाळेत आणखी सुधारित, चांगली केली जाते.

फोटो स्रोत, JOHN FELLET / BBC
वैज्ञानिक विट्रो फर्टिलायझेशनद्वारे गीर गायीचं अशाप्रकारचं भ्रूण विकसित करतात की ज्यामुळे जन्माला आलेली गाय कित्येक लीटर दूध देऊ शकते.
गेल्या दशकभरापासून याप्रकारे जन्माला आलेल्या गायीची ब्राझीलमध्ये जोरात खरेदी-विक्री होते आहे.
एम्ब्रापा लॅबमधील संशोधक, मार्कोस डिसिल्व्हा म्हणतात, "गेल्या 20 वर्षांमध्ये ब्राझीलमध्ये दुग्ध उत्पादन चौपट झालं आहे. यातील 80 टक्के दूध गिरोलँडो गायींपासून मिळतं. गाईची ही जात गीर गायींपासूनच पुढे आली आहे."
गायीच्या या जातीमध्ये काहीतरी जादू आहे...
गीर गायीच्या मदतीनं आता ब्राझीलमधील दूधाचा व्यवसाय वाढतो आहे. मिनास गिरासमधील या डेअरी फार्मध्ये असलेल्या जवळपास 1,200 गायी हे त्याचं उदाहरण आहे.
यातील काही गाईंची किंमत 9 लाख रुपयांपर्यंत आहे. त्या एक दिवसात जवळपास 60 लीटर दूध देतात. यातील काही गायी तर 20 वर्षांपर्यंत दूध देतात.

फोटो स्रोत, DIEGO PADGURSCHI / BBC
लुइज फर्नांडो व्यवसायानं पशू चिकित्सक किंवा जनावरांचे डॉक्टर आहेत. ते म्हणतात, "गायीच्या या जातीमध्ये काहीतरी जादू आहे. हा चांगल्या गायी आहेत. यांना लवकर रोग होत नाहीत आणि त्या दीर्घायुषी असतात."
कित्येक वर्षांपूर्वी गुजरातमधून आणण्यात आलेल्या या गाईंची आता ब्राझीलमध्ये पूजा होते आहे. त्यामागचं एक कारण म्हणजे, या गाईंच्या मदतीनं ब्राझीलमधील लोकांची आर्थिक प्रगती झाली आहे. तिथली उपासमार कमी होते आहे.
गीर वळूच्या वीर्याची आयात
मात्र या चांगल्या परिस्थितीला दुसरी बाजू देखील आहे. ब्राझीलमध्ये वाढलेल्या गीर जातीच्या वळूंचं वीर्य आयात करण्याचा विचार आता भारतातील हरियाणा आणि तेलंगणा सारखी राज्यं करत आहेत.
मात्र गीर गायीचं मूळस्थान असलेल्या गुजरातमधील ब्रीडर्सचं अशाप्रकारच्या आयातीबद्दलचं मत थोडं वेगळं आहे.

कित्येक शतकांपासून गीर गाई या जुनागड, भावनगर, अमरेली आणि राजकोट या भागातील लोकांच्या उपजीविकेचं साधन राहिल्या आहेत.
गायींच्या या जातीला या भागातील उष्ण हवामान फक्त योग्य किंवा अनुकुलच नाही तर एका प्रजनन मोसमात या गायींमध्ये 3 हजार लीटरहून अधिक दूध देण्याची क्षमता आहे. या वैशिष्ट्यामुळे या गाई फक्त भारतातच नाही तर जगात आघाडीची जात आहे.
वीर्य आयात करण्याच्या विरोधातील सूर
60 च्या दशकात पशुधनच्या आयात-निर्यातीबाबतचे नियम कडक करण्यात आले होते. मात्र गीर गायींची मूळ किंवा शुद्ध जात वाचवण्यासाठी कोणतंही लक्ष दिलं गेलं नाही.
श्वेत क्रांतीच्या काळात फॅटचं प्रमाण जास्त असणाऱ्या म्हशीच्या दुधातून अधिक नफा मिळत होता. साहजिकच गीर गायींकडे दुर्लक्ष केलं गेलं.
हरियाणाचे पशुपालन मंत्री ओ पी धनखड सांगतात, "हरियाणा सरकारनं गीर गायींच्या वळूचं वीर्य आयात करण्यासाठी ब्राझीलबरोबर एक करार केला आहे."
मात्र गेल्या काही वर्षांमध्ये गुजरातमध्ये देखील गीर गायींचं वीर्य आयात करण्यावर चर्चा झाली आहे. मात्र याबाबतीत गीर ब्रीडर्स असोसिएशनचं मत थोडंसं वेगळं आहे.
गीर ब्रीडर्स असोसिएशनचे अध्यक्ष बी के अहीर म्हणतात, "ज्यांना पूर्ण माहिती नाही, ते ब्राझीलमधून वीर्य आयात करण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र ज्या लोकांना ब्राझीलमधील गीर गायींच्या जातीची शुद्धता समजते, ते कधीही ब्राझीलमधून येणारं वीर्य घेणार नाहीत."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











