सोन्याच्या किमती कोसळणार आहेत का? दरांमधले ट्रेण्ड्स काय सांगतात?

सोनं

फोटो स्रोत, Getty Images

डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ जाहीर केल्यानंतर शेअर बाजार कोसळले तेव्हा सोन्याच्या किमतीही काहीशा खाली आल्या. त्यानंतर काही बातम्या आल्या की सोन्याचे भाव आता कोसळणार आणि काही ठिकाणी लोकांनी घाबरून सोनं विकलं.

पण सोन्याच्या किमती अशा खरंच कोसळण्याची शक्यता आहे का? सोन्याच्या दरातले ट्रेण्ड्स काय सांगतात?

शेअर मार्केट्स अस्थिर असली की सोन्याचे दर नेहमी वाढतात. मग त्या दिवशी सोन्यात घसरण का झाली? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोन्यातल्या गुंतवणुकीचं करायचं काय? जाणून घेऊयात.

डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या टॅरिफमुळे जगभरात उलथापालथ झाली. अमेरिकेसोबतच्या आयात - निर्यातीची जगभरातली गणितं बदलली, अमेरिका - चीन ट्रेडवॉर अधिक उग्र झालं आणि 7 एप्रिलला जगभरातले शेअरबाजार गडगडले.

सोन्याची किंमत कशी ठरते?

जगातलं प्रमुख मार्केट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जाणारं लंडन बुलियन मार्केट सोन्याची किंमत ठरवतं. मोठमोठे खाणमालक, मोठे उद्योगपती या संघटनेत आहेत. भारतामध्ये सोनं आयात केलं जातं. भारत दरवर्षी सरासरी 800 टन सोने आयात करतो.

त्यामुळे भारतातली किंमत ठरताना आयातीसाठी लागणारे पैसे शिवाय या आयातीवर लागणारे कर असं मिळून सोन्याची किंमत ठरते.

भारत सोनं आयात करताना त्याचे पैसे डॉलरमध्ये भरावे लागतात. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर किती आहे याचा खूप मोठा प्रभाव या किमतींवर पडतो.

या आयातीवर बेसिक कस्टम ड्युटी (बीसीडी), अॅग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सेस (एआयडीसी) आकारला जातो.

यावर ठरते सोन्याची मूळ किंमत. तुम्ही आम्ही जेव्हा एखादा सोन्याचा दागिना विकत घेतो तेव्हा त्यावर किती काम केलंय यानुसार घडणावळ लावली जाते.

आणि मग दागिन्यात वापरलेल्या सोन्याचं मूल्य अधिक घडणावळ यावर GST आकारला जातो. त्यामुळे सामान्य ग्राहकांपर्यंत येताना सोनं आणखी महाग होऊन येतं.

7 एप्रिलची घसरण

जागतिक अर्थव्यवस्थेत ज्यावेळी अशी अस्थिरता निर्माण होते, तेव्हा सोन्याच्या किमती वाढतात. कारण सोन्याला सेफ हेवन अॅसेट म्हणतात. म्हणजे गुंतवणुकीचा एक अतिशय सुरक्षित पर्याय.

गुंतवणुकीचे इतर पर्याय डळमळीत झाले, तरी सोन्याचं मूल्य आणि महत्त्व कमी होत नाही म्हणून आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार सोन्याकडे हेजिंग स्ट्रॅटेजी म्हणून पाहतात. म्हणजे एका गुंतवणूक पर्यायातून होणारा तोटा भरून काढण्यासाठी दुसऱ्या पर्यायात गुंतवणूक करणं. म्हणजे जर त्यांना शेअर बाजारात तोट्याची भीती असेल, तर सोन्यात गुंतवणूक केली जाते.

ग्राफिक्स

मग 7 एप्रिलला शेअरबाजार घसरले तेव्हा सोनंही का घसरलं?

तर ते झालं मार्जिन मुळे म्हणजे गुंतवणूकदारांनी त्यांना शेअरबाजारात झालेला तोटा भरून काढण्यासाठी त्यांच्याकडचं सोनं विकलं.

हे पॅनिक सेलिंग म्हणजे भाव कमी होण्याची भीती वाटल्याने घाबरून केलेली विक्री नव्हती, असं वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलचे भारतातले सीईओ असणाऱ्या सचिन जैन यांनी स्पष्ट केलंय.

सोन्याचे भाव घसरण्याची शक्यता आहे का?

7 एप्रिलच्या तात्पुरत्या करेक्शननंतर पुन्हा सोन्याची खरेदी सुरू झाली. त्यामुळे मल्टीकमॉडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स) मधल्या सोन्याच्या किमतीही वाढल्या आणि सोन्याच्या एकूणच भावांमध्ये वाढ झाली.

इंडिया गोल्ड अँड बुलियन असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "ट्रम्प यांनी टॅरिफबद्दल 90 दिवसांनी निर्णय घेण्याचं जाहीर केल्यावर सोन्याचे भाव पुन्हा वाढले आहेत. भारतात जेव्हा लग्नसराईचा काळ असतो, तेव्हाही सोन्याचे दर वाढतात."

"अमेरिकेच्या टॅरिफ धोरणांमुळे सोन्याचे दर 1 लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. सोन्याचे दर कमी होणार ही अफवा आहे. काल एक व्हीडिओ फिरत होता. आम्हीही तो पाहिला. त्यामुळे लोक पॅनिक होत होते. सोनं विकणाऱ्यांची रांग लागली होती, पण सोनं वाढेलच.

"सोनं 60 हजारांवर येईल, 55 हजारांवर येईल असे व्हीडिओ फिरत आहेत. त्यामुळे पॅनिक होत लोकांनी सोनं विकायला सुरुवात केली. पण असं सोनं विकू नये. काल आणि आजमध्ये सोन्याचे दर 140़ डॉलर्सनी वाढलेले आहेत."

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

जागतिक गुंतवणूदारांना सोनं का आवडतं?

सोन्याला गुंतवणुकीचा एक अतिशय सुरक्षित पर्याय मानलं जातं. गुंतवणुकीचे बाकी पर्याय डळमळीत आले, तरी सोन्याचं मूल्य आणि महत्त्व कमी होत नाही. म्हणूनच अनेक गुंतवणूकदार सोन्याला हेजिंग स्ट्रॅटेजी म्हणून पाहतात.

हेजिंग स्ट्रॅटेजी म्हणजे काय तर एका पर्यायातून होणारा तोटा भरून काढण्यासाठी दुसऱ्या पर्यायात गुंतवणूक करणं. म्हणजे जर त्यांना शेअर बाजारात तोण्याची भीती असेल तर सोन्यात गुंतवणूक केली जाते. कारण शेअर बाजारामध्ये जितकं करेक्शन होण्याची - घसरण होण्याची भीती असते, तितक्या सोन्याच्या किमती झपकन खाली येत नाहीत.

सोन्याला असणारी मागणी का वाढते?

जगात अनिश्चितता असते तेव्हा लोकांना सुरक्षितता हवी असते. त्यामुळे सोन्याची मागणी वाढते, ज्यामुळे त्याच्या किमती वाढतात. मग ही अनिश्चितता कशामुळे निर्माण होऊ शकते, तर केंद्रीय बँकांचं व्याजदराबद्दलचं धोरण किंवा एखाद्या क्षेत्रातल्या कंपन्यांच्या कामगिरीचा वा दुसऱ्या घटनेचा शेअर बाजारांवर झालेला परिणाम.

यामुळे गुंतवणुकीचे इतर पर्याय कमी परतावा देणारे ठरू शकतात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या टॅरिफ धोरणांमुळे ट्रेड वॉर सुरू झालेलं आहे. याचा परिणाम शेअरबाजारांवरही होतोय.

दोन देशांमधला लष्करी तणाव वा संघर्ष, ट्रेड रिलेशन्स, सरकारी धोरणांमध्ये झालेला बदल, त्यामुळे जगभरातल्या मार्केट्सवर होणारा परिणाम, नैसर्गिक आपत्ती या सगळ्या गोष्टींचा परिणाम सोन्याच्या किमतींवर होतो.

चीन, रशिया, दक्षिण आफ्रिका हे देश सोन्याचे सर्वात मोठे उत्पादक आहेत. त्यामुळे या देशांशी संबंधित घडामोडींचा परिणाम सोन्याच्या दरांवर होतो.

डॉलरची परिस्थिती आणि सोन्याची किंमत

डॉलर हे एक मजबूत चलन आहे. 2007 ते 2009 दरम्यानच्या आर्थिक मंदीच्या काळात डॉलरची किंमत वाढली, पण इतर चलनं घसरली. डॉलर आणि सोन्याचं मूल्य घसरणार नाही असं मानलं जातं. त्यामुळे जर डॉलरची किंमत कमी झाली, तर गुंतवणूकदार सोन्यातल्या गुंतवणुकीकडे वळतात.

शिवाय रशिया आणि चीनसह ब्रिक्स देशांनी स्वतःकडची डॉलर रिझर्व्ह कमी करत सोन्याचा साठा (गोल्ड रिझर्व्ह) वाढवायला सुरुवात केलेली आहे.

भारताच्या दृष्टीने पहायचं झालं, तर 2024 या वर्षात भारतीय रुपयाचं डॉलरच्या तुलनेतलं मूल्य 3% घसरलं. म्हणजे डॉलर महागला. त्यामुळे सोनं आयात करताना पैसेही तितके जास्त मोजावे लागतात.

सोन्यातली गुंतवणूक सुरक्षित आहे का?

सोन्याचे दर

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सोन्यातली सुरक्षितता अजूनही कायम असल्याचं तज्ज्ञ सांगतायत.

गुंतवणुकीसाठी सोनं हा पर्याय अजूनही सुरक्षित असल्याचं आणखी एक उदाहरण म्हणजे वेगवेगळ्या देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून कायम ठेवण्यात आलेली सोनं खरेदी.

जगभरातल्या सेंट्रल बँक्स नियमितपणे सोनं खरेदी करत गोल्ड रिझर्व्ह वाढवत असतात. आजवर उत्खनन करण्यात आलेल्या एकूण सोन्यापैकी 17 टक्के सोनं हे जगभरातल्या सेंट्रल बँकांच्या मालकीचं आहे. 2024 च्या अखेरपर्यंत या गोल्ड रिझर्व्हमध्ये 37,755 मेट्रिक टन्सचा साठा असल्याचं नॅसडॅकनं म्हटलं आहे.

तर फेब्रुवारी महिन्यामध्ये जगभरातल्या सेंट्रल बँक्सनी 24 टन सोनं खरेदी केल्याचं वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या वेबसाईटवर म्हटलंय.

सोन्याचे दर कमी झाल्यानंतर काही ठिकाणी लोकांनी सोनं विकलं. सोन्याचे भाव आणखीन कोसळतील अशी भीती त्यामागे होती. पण जागतिक व्यापारामधली अनिश्चितता, अमेरिकन फेडरल रिझर्व्हची व्याजदरांबद्दलची भूमिका आणि जगभरातल्या देशांमध्ये बदलणारी भौगोलिक आणि राजकीय समीकरणं पाहता सोन्यामधली गुंतवणूक अजूनही सुरक्षित असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय.

अर्थात दोन देशांमधला लष्करी तणाव वा संघर्ष, व्यापारी संबंध, सरकारी धोरणांमध्ये झालेला बदल, त्यामुळे जगभरातल्या मार्केट्सवर होणारा परिणाम, नैसर्गिक आपत्ती या सगळ्या गोष्टींचा परिणाम सोन्याच्या किमतींवर होतो.

चीन, रशिया, दक्षिण आफ्रिका हे देश सोन्याचे सर्वात मोठे उत्पादक आहेत. त्यामुळे या देशांशी संबंधित घडामोडींचा परिणाम सोन्याच्या दरांवर होतो आणि त्या कमी-जास्त होत राहतात.

पॅनिक सेलिंग नको

एक अतिशय महत्त्वाची गोष्ट - स्टॉक्स असो वा सोन्यातली गुंतवणूक - पॅनिक सेलिंग म्हणजे घाबरून किंवा इतर जण विकतायत म्हणून आपली गुंतवणूक मोडणं - विकणं टाळायला हवं.

तुमच्याकडे एखादा मेसेज आला, तर त्यामध्ये किती तथ्य आहे हे तपासायला हवं. मार्केट टिप्सवर, मेसेजवर किंवा व्हायरल व्हीडिओवर विश्वास ठेवून एखादी गुंतवणूक मोडण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

एखादी गुंतवणूक मोडण्यापूर्वी आपल्याला खरंच आता या पैशांची गरज आहे का, काही काळ आपण ही गुंतवणूक आणखी ठेवू शकतो का, याचा विचार करा, कारण शेअरबाजारात घसरण झाली तरी त्यानंतर शेअरबाजार पुन्हा सावरतो.

गेल्या 10 वर्षांतला सोन्याच्या किमतींचा आलेख पाहिलात तर या किंमती वरच गेलेल्या आहेत.

म्हणूनच भीतीपायी सोन्यातली बहुमूल्य गुंतवणूक मोडू नये. पण पैशांची गरज असेल किंवा त्या सोन्याच्या बदल्यात दागिने करायचे असतील तर मात्र वेगळा विचार करायला हरकत नाही.

गुंतवणुकीबद्दलचे निर्णय तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेतले तर तुम्हाला त्याद्वारे गुंतवणूक परताव्यातलं नुकसान टाळता येईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)