मिरा रोडः नावे विचारून करण्यात आली वाहनांची तोडफोड

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

मिरा रोड भागात नावे विचारून वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

पोलीस उपायुक्त जयंत बजबाळे यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, 21 जानेवारीला भगवे झेंडे लावलेल्या गाड्यांना थांबवून वाद झाले. यानंतर 22 तारखेला रॅलीदरम्यान वाद झाला, दगडफेक झालेली नाही असंही पोलिसांचं म्हणणं आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 10 दखलपात्र आणि 8 अदखलपात्र गुन्हे नोंदवले आहेत. तर या प्रकरणी आतापर्यंत 19 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

यात हिंदू आणि मुस्लीम दोन्हीकडून आलेल्या फिर्यादी आहेत, तसंच दोन्ही गटाच्या आरोपींना पकडलं आहे असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.

ही सगळी स्थिती अल्पसंख्याकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी तयार केली आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तर मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा अस्थिर करण्यासाठी ही स्थिती निर्माण केलीय असा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

'राम राज रथयात्रा'

21 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी शिवसेना (शिंदे गट) मीरा भाईंदरचे विधानसभा प्रमुख विक्रम प्रताप सिंह यांनी 'राम राज रथयात्रा' नावाने रॅलीचं आयोजन केलं होतं.

संध्याकाळी पाच वाजता रॅली संपली होती असं विक्रम प्रताप सिंह यांचं म्हणणं आहे. "आमच्या रॅलीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाले होते. यात ख्रिश्चन आणि मुस्लीम समुदायाचे लोकही होते. जवळपास 500 लोक मुस्लीम समुदायाचे होते.एकूण जवळपास 10 हजार लोक सहभागी झाले होते. रॅली संध्याकाळी पाच वाजता संपली."

ते पुढे सांगतात, "जी घटना घडली ती रात्री एक कुटुंब जात असताना त्यांचा वाद इतर काही लोकांशी वाद झाला. हिंदू देवतांचा अपमान करण्यात आला. ही घटना घडल्यावर ती सोशल मीडियावर व्हायरल झाली. मग 22 तारखेला पुन्हा त्यावर रिअॅक्शन म्हणून काही ठिकाणी तोडफोड झाली. परंतु यापूर्वी मिरा भाईंदरमध्ये असं कधीही झालं नव्हतं. नया नगर परिसरातील लोकही आम्हाला सहकार्य करतात. हे बाहेरच्या लोकांचं काम आहे. पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा."

हा सर्व वाद शमत नाही तोच 23 जानेवारीला सायंकाळी मुस्लीम समुदायातील लोकांना लक्ष्य करुन त्यांच्या वाहनाची तोडफोड करण्याची घटना काल घडली.

मिरा रोड भागातील नया नगर येथे महापालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. अनेक वर्षांपासून जे लोक आपले दुकान चालवत होते त्यांची दुकाने या मोहिमेत हटवण्यात आली.

ही मोहीम अयोध्येतील रामलला प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या दिवशी राबवण्यात आली. आधीच्या रात्री म्हणजे 21 जानेवारीला दोन गटात वाद झाला आणि त्यातून गोंधळ करणाऱ्या 13 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.

या दुकानांवर आधीही एकदोनवेळा कारवाई झाली होती तसेच त्यांना नोटीसही देण्यात आलेली होती असं सांगण्यात येत आहे. मात्र बीबीसी मराठीशी बोलताना तेथील दुकानदारांनी आपली दुकानं अनेक वर्षांपासून सुरू असून कोणतीही नोटीस न देता कारवाई झाली असं सांगितलं.

नावे विचारून टेम्पो फोडला

मिरा रोड येथील रहिवाशाने त्यांच्यासोबत काय झाले हे बीबीसी मराठीला सांगितले.

काल संध्याकाळी ( 23 जानेवारी) साधारण साडेसात वाजता मीरा रोडमध्ये सेक्टर नंबर 3 जवळ काही लोकांनी गाड्यांवर हल्ला केला. प्रत्यक्षदर्शी आणि पीडित अब्दुल हक चौधरी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "आम्ही भाईंदरहून परत येत होतो तेव्हा अचानक गाडीवर हल्ला झाला. त्यांनी विचारलं की हिंदू आहात की मुस्लीम? टेम्पोवरही लिहिलं होतं मग त्यांनी टेम्पोवर हल्ला केला, आम्ही पळून गेलो नसतो तर त्यांनी आमचा जीव घेतला असता कारण त्यांच्या हातात तलवारी होत्या. ते जय श्री राम असे नारे देत होते."

अब्दुल हक चौधरी यांचा ड्रायव्हर या हल्ल्यात जखमी असून त्याला टाके पडले असून सीटी स्कॅन केले जात आहे असंही त्यांनी सांगितलं.

ते पुढे सांगतात, "फक्त आमची गाडी नाही तर आसपासच्या अशा गाड्यांवरही ते हल्ला करत होते. रिक्षावरही हल्ला केला."

22 वर्षांपासून दुकान होते त्यावर झाली कारवाई

या परिसरातील मोहम्मद शेख नावाचे गॅरेजमालक म्हणाले, "आम्ही दुकानात होतो, हाताला धरुन बाहेर काढलं आणि थेट बुलडोझर चालवला. का तोडलं हे सांगितलं नाही, विचारायची संधीच दिली नाही, 22 वर्षं आमचं इथं गॅरेज आहे. अशी कारवाई कधीच झाली नव्हती. आमचं पाच ते सहा लाखांचं नुकसान झालं आहे. गॅरेज का तोडलं हे माहितीच नाही. इथं काहीच झालं नव्हतं. आता पुन्हा उभं करू देतील की नाही ते माहिती नाही."

त्याबरोबरच तेथे असलेल्या एका कांदा-लसणाच्या दुकानावरही कारवाई झाली. त्यांच्याशी बीबीसी मराठीने संवाद साधल्यावर त्यांचंही सगळं सामान तोडलं आहे, असं त्यांनी सांगितलं.

चाळीस वर्षांपासून तिकडे आहेत. दोन दिवस जे मीरा रोडमध्ये झालं यामुळेच आमच्यावर कारवाई केली असं, ते म्हणाले आहेत.

ते म्हणाले, “माझं इथं 40 वर्षांपासून दुकान होतं, आम्हाला काहीच सांगण्यात आलं नाही. सांगितलं असतं तर नुकसान झालं नसतं. पोलिसांनी आम्हाला बाहेर काढलं आणि दुकानं पाडण्यात आली. गल्ल्यातला पैसाही बाहेर काढू दिला नाही. माझ्या दुकानाचं साधारणपणे दिड लाखांचं नुकसान झालं आहे. आमचं लाईटचं मीटर आहे. आम्ही बिल भरत होतो.”

“ही कारवाई का केली हेच समजत नाही. इथं काहीच झालेलं नव्हतं. आमचं कोणाशी प्रशासनाशी बोलणं झालेलं नाही. पुढं काय करायचं हे अजून ठरलेलं नाही.”

एम. डी. मुश्ताक नावाचे दुकानदार बीबीसीशी बोलताना म्हणाले, आम्ही यावरच कसंबसं घर चालवत होतो. पण आता तेच पाडून टाकलंय. कारवाई का केली हे सांगितलंच नाही. आज कमवून आजच खात होतो. आता आज काम नाही राहिलं तर उद्या कसं होणार, आमचं सगळं यावरच चाललं होतं. आम्ही दुकानात बसलो होतो.

"ते आले, आम्हाला बाहेर यायला सांगितलं आणि सगळं दुकान पाडून टाकलं. इथं कधीच कारवाई झाली नव्हती. आताची कारवाई 20 वर्षांनी झाली आहे. इथं कोणताच तणाव निर्माण झाला नव्हता. ती स्थिती दुसरीकडे झाली होती, पण कारवाई इथं करण्यात आली," असं मुश्ताक सांगतात.

मीरा भाईंदर महानगरपालिकेचे उपायुक्त मारुती गायकवाड यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं,

"नया नगरमधील 15 दुकानांवरती आम्ही कारवाई केली. ही दैनंदिन कारवाई होती. ही दुकानं रस्त्यावरती गटारांवरती बांधली होती. रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी नियमानुसार आम्हाला नोटीस देण्याची गरज नाही. आम्ही कारवाई करू शकतो."

22-30 वर्षांपासून ही दुकानं आहेत असं दुकानदारांचं म्हणणं आहे मग कारवाई आत्ताच का केली गेली? यावर ते म्हणाले,

"असं काही नाही. त्यावर कोणत्याही अँगलने चर्चा सुरू आहे पण तसं काही नाही. आम्ही गेल्या दीड महिन्यांपासून अशी कारवाई नियमितपणे करत आहोत."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)