तिबेट भूकंपात 126 जणांचा मृत्यू ; 188 जखमी, हजारो घरं भूईसपाट

    • Author, लारा बिकर, कोह इव आणि फ्लॉरा ड्रूरी
    • Role, बीबीसी न्यूज

तिबेटच्या शिगात्से शहराजवळ मंगळवारी (7 जानेवारी) आलेल्या भूंकपानं नेपाळसह भारताचा उत्तरेकडील भाग हादरला. या दुर्घटनेत आतापर्यंत 126 जणांचा मृत्यू झाला असून 188 जण जखमी झाले आहेत. तर, 3 हजारहून अधिक इमारतींचं नुकसान झालं आहे.

काल रात्री उशिरापर्यंत मदत व बचावकार्य सुरू होतं. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. चीनच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (7 जानेवारी) स्थानिक वेळेनुसार 9 (01:00 GMT) तिबेटच्या दुर्गम भागात, हिमालयाच्या पायथ्याशी हा भूकंप झाला.

दुर्घटनेनंतर वेगाने मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले, परंतु येथे रात्रीचे तापमान -16 डिग्री सेल्सियसपर्यंत घसरत असल्यानं बचावकार्यास अडचणी येत होत्या. तरीही बेपत्ता लोकांचा शोध घेत बचावकार्य गतीनं सुरू होतं.

चीनच्या हवामान खात्यानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू हिमालयाच्या उत्तरेला असलेल्या टिंगरी काउंटीनजीक असून, याची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.1 इतकी नोंदवण्यात आली आहे.

हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या शिगात्से गावात स्थानिक वेळेनुसार मंगळवारी सकाळी साधारण 9 वाजता 7.1 तीव्रतेचा भूकंप आला. शिगात्से हे तिबेटच्या पवित्र शहरांपैकी एक मानलं जातं आणि अतिशय दुर्गम भागात वसलं आहे.

हा भाग भूगर्भीय दोषरेषेवर स्थित असल्यानं येथे वारंवार भूकंप येत असतात. पंरतु, मंगळवारी आलेला भूकंप अलीकडच्या काळातील चीनमधील सर्वांत तीव्र आणि प्राणघातक भूकंपापैकी एक होता.

अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षणानुसार 7.1 तीव्रतेच्या या भूकंपाचे झटके नेपाळ आणि भारताच्या काही भागांतही जाणवले.

चीनचे सरकारी प्रसारमाध्यम सीसीटीव्हीनं काही व्हीडिओ प्रकाशित केले आहे. यात तिबेटच्या शिगात्से शहरात भूकंपामुळं उद्ध्वस्त झालेली घरे आणि कोसळलेल्या इमारती दिसत आहेत.

भूकंपाचा केंद्रबिंदूनजीक असलेल्या टिंगरी काउंटीमधील तापमान -8 डिग्रीपर्यंत घसरल्याची माहिती चीनच्या हवामान खात्यानं दिली.

दुर्घटनाग्रस्त भागात तीव्र थंडीत बचावकार्य सुरू असून ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांना वाचवण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

स्थानिक नागरिकांपैकी एक सांगजी डांगझी यांचं सुपरमार्केट भूकंपात पूर्णत: उद्ध्वस्त झालंय. येथील घरांचं मोठं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं.

सांगजी डांगझी आपला अनुभव सांगताना म्हणाले, "या भागात मातीपासून बनलेली कच्ची घर मोठ्या प्रमाणात आहे. भूकंप आला तेव्हा यातील बरीच घरं कोसळून मोठं नुकसान झालंय." AFP वृत्तसंस्थेला माहिती देताना 34 वर्षीय सांगजी म्हणाले की, रुग्णवाहिका दिवसभर जखमी लोकांना रुग्णालयात घेऊन जात होत्या.

सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 3609 इमारती कोसळल्या आहेत, ज्यामुळे हजारो लोक बेघर झाले असून मोठं नुकसान झालं आहे.

नेपाळमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले असले तरी सुदैवानं मोठी हानी किंवा जीवितहानी झाली नसल्याचं राष्ट्रीय आपत्कालीन संचालन केंद्राच्या अधिकाऱ्यानी बीबीसी न्यूजडेटशी बोलताना म्हणाले. असं असलं तरी, स्थानिकांच्या घरांचं किरकोळ नुकसान झालं असून काही घरांना तडे गेल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, 2015 साली नेपाळची राजधानी काठमांडूजवळ 7.8 तीव्रतेचा भूंकप आला होता. या दुर्घटनेत जवळपास 9 हजार लोकांचा मृत्यू झाला होता तर 20 हजाराहुन अधिक लोकं जखमी झाले होते.

तिबेटच्या या भूकंपानं नेपाळमधील त्या भयंकर आपत्तीच्या कटू आठवणी जाग्या झाल्या. मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवताच काठमांडूतील अनेक रहिवासी घराबाहेर पळाले.

काठमांडू येथील दुकानमालक मंजू न्यौपाने यांनी बीबीसी नेपाळीसोबत बोलताना 2015 सालच्या भूकंपाची आठवणी सांगितल्या.

ते म्हणाले, "2015 साली आलेला भूकंप इतका तीव्र होता, मला हलताही येत नव्हतं. यावेळची परिस्थिती तितकी गंभीर नव्हती. परंतु, या भूकंपानं त्या आठवणी जाग्या झाल्या. मला सातत्यानं भीती वाटत राहते की, एखादा मोठा भूकंपाचा तडाखा बसेल आणि आम्ही उंच इमारतींमध्ये अडकून पडू."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.