अमनज्योत कौर: हलाखीच्या परिस्थितीतही वडिलांनी कसं बनवलं लेकीला भारतीय संघाची अष्टपैलू खेळाडू?

अमनज्योत आपल्या वडिलांसोबत

फोटो स्रोत, Amanjot

फोटो कॅप्शन, अमनज्योतचे वडील लाकडी फर्निचर बनवण्याचं काम करतात.
    • Author, नवज्योत कौर
    • Role, बीबीसी पंजाबी

क्रिकेटमध्ये साधारणपणे फलंदाज आणि गोलंदाज यांनाच ग्लॅमर असतं. काही निवडक नावं वगळली तर क्षेत्ररक्षण करणाऱ्यांबद्दल फार बोललं जात नाही.

पण या फायनलमध्ये भारताच्या क्षेत्ररक्षणाकडं आणि खासकरून अमनज्योतकडं दुर्लक्ष करून चालणार नाही.

खरंतर सामना भारताच्या बाजूनं कधी फिरला यासाठी प्रत्येक जणाकडे काही वेगवेगळे क्षण असतील यात शंका नाही.

त्यातला सर्वात महत्त्वाचा म्हणता येईल असा क्षण म्हणजे, दक्षिण आफ्रिकेची पहिली विकेट.

ही विकेट अमनज्योतनं चपळाईनं चेंडू अडवत अत्यंत अचूकपणे केलेल्या थ्रोमुळं झालेला रन आऊट होता.

दक्षिण आफ्रिकेच्या डावात दहाव्या ओव्हरमध्ये रेणुकाच्या तिसऱ्या चेंडूवर ब्रिट्सनं चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला.

पण मैदानात ज्या भागातून ती धाव घेण्याचा प्रयत्न ब्रिट करत होती तिथं क्षेत्ररक्षणासाठी भारताच्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक अमनज्योत होती.

तिनं धाव पूर्ण होण्याआधीच थेट स्टंपवर थ्रो केला आणि ब्रिटला धावबाद केलं.

ज्या बाजूनं तिनं हा थ्रो केला होता तिथून तीनपैकी एकच किंवा फार तर दीड स्टंप दिसत असावा.

पण तरीही अमनज्योत चुकली नाही आणि भारताला पहिली विकेट मिळाली.

अमनज्योतनं लॉरा वुलक्राफ्टचा चेंडू झेलला तो क्षण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लॉरा वुलक्राफ्टनं हवेत मारलेल्या एका चेंडूखाली त्यावेळी नेमकी अमनज्योत धाव गेली आणि भारताला मोठी विकेट मिळवून दिली.

दक्षिण आफ्रिकेची कर्णधारा लॉरा आणि ब्रिट यांनी पहिल्या ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी केली.

त्यांची भागिदारी होत होती. ती जर आणखी वाढली असती तर काय होणार हे सर्वांच्याच लक्षात आलं. पण अमनज्योतनं तसं होऊ दिलं नाही.

एवढंच नाही तर भारतासमोर शेवटच्या ओव्हर्समध्ये निर्माण झालेला दुसरा धोका परतवण्यातही तिचाच मोठा वाटा होता.

कर्णधार लॉरा वुलक्राफ्टनं शतक केल्यानंतर ती विजयासाठी फटकेबाजी करणार हे स्पष्ट होतं.

तिनं तशी सुरुवातही केली. पण तिच्या दुर्दैवानं मैदानावर हवेत मारलेल्या एका चेंडूखाली त्यावेळी नेमकी अमनज्योत धावत आली. तिच्या हातातून एकदा नव्हे दोनदा झेल सुटणार होता. पण अमननं चेंडूचा पिच्छा सोडला नाही आणि लॉराला बाद करत भारताची सामन्यावरची पकड मजबूत केली.

सामन्याचा विचार करता खऱ्या अर्थानं हे दोन टर्निंग पॉइंट ठरले आणि दोन्हीतही अमनज्योतचा मोलाचा वाटा होता.

या लेखातून आपण अमनज्योतच्या प्रवासाची गोष्ट जाणून घेणार आहोत.

मोहालीच्या रस्त्यांवर खेळायची क्रिकेट

जुलैमध्ये बीबीसी पंजाबीने अमनज्योतच्या वडिलांची मुलाखत घेतली होती. अमनज्योत कौरचे वडील भूपिंदर सिंग यांनी बीबीसीला सांगितलं होतं की, अमनज्योत कौर लहानपणी रस्त्यावर क्रिकेट खेळायची.

भूपिंदर सिंग यांनी सांगितलं की, "अमनज्योतचा खेळ पाहिल्यानंतर आमच्या शेजाऱ्यांनी अमनज्योतला क्रिकेटचं प्रशिक्षण देण्याचा सल्ला दिला. नंतर आमचे एक शेजारी अमनला क्रिकेट प्रशिक्षण केंद्रात घेऊन गेले. त्यानंतर ती अधिक चांगलं खेळू लागलं."

प्रशिक्षणासाठी, अमननं मोहाली, चंदीगड आणि पंचकुला इथे मुलींच्या क्रिकेट अकादमी शोधल्या.

अमनज्योत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2023 मध्ये अमनज्योतची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाली.

त्यानंतर वयाच्या 16 व्या वर्षी प्रशिक्षक नागेश गुप्ता यांना ती भेटली, त्यानंतर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तिचा क्रिकेट प्रवास चंदीगड सेक्टर 32 मध्ये सुरू झाला.

प्रशिक्षक नागेश गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अमनज्योत कौरनं पंजाब आणि चंदीगडसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत उत्कृष्ट कामगिरी देखील केली.

चंदीगडच्या महिला क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करत असतानाच, 2021 आणि 2022 मध्ये सिनियर महिला वन डे चॅलेंजर ट्रॉफीमध्ये केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे अमनला राष्ट्रीय संघात स्थान मिळालं.

2023 मध्ये अमनज्योतची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाली.

त्याच वर्षी तिनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 30 चेंडूत 41 धावा केल्या आणि संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलं.

अमनज्योतच्या यशात वडिलांच्या कठोर परिश्रमांचाही वाटा

अमनज्योत कौर मोहालीतील एका साध्या कुटुंबातून येते. तिचे वडील लाकडी फर्निचर बनवण्याचं काम करतात आणि तिची आई गृहिणी आहे.

परंतु, अमनज्योतच्या कुटुंबानं तिची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त योगदान दिलंय.

अमनज्योतची आई मनजीत कौर म्हणाल्या, "अमनज्योतला इथपर्यंत आणण्यात सर्वात महत्त्वाचं योगदान तिच्या वडिलांचं आहे. त्या म्हणतात की मी नेहमीच अमनसोबत असते, पण ती तिचे विचार फक्त तिच्या वडिलांसोबतच शेअर करते."

अमनज्योतची आई मनजीत कौर
फोटो कॅप्शन, अमनज्योतची आई मनजीत कौर

अमनज्योतचा संघर्ष आठवताना त्या म्हणाल्या, "तिला प्रशिक्षणासाठी घेऊन जाण्यासाठी तिचे वडील स्वतःचं काम सोडून जायचे."

"ते पहाटे अमनला 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोचिंग सेंटरमध्ये सोडायचे, नंतर घरी यायचे, नंतर पुन्हा 10 किलोमीटर दूर असलेल्या कामावर जायचे आणि संध्याकाळी परत तिला केंद्रातून घेऊन यायचे."

अमनज्योतचे वडील भूपिंदर सिंग म्हणतात, "क्रिकेट हा खूप महागडा खेळ आहे, मला अमनला प्रशिक्षण देण्यात कोणतीही कसर सोडायची नव्हती, म्हणून मी कठोर परिश्रम केले. पण आता ती स्वतःच सगळ्या गोष्टी सांभाळते."

दुखापतीमुळे जेव्हा अमनज्योतला संघाबाहेर पडावं लागलं

अमनज्योत कौरचे हे यश विशेष आहे कारण ती अलीकडेच गंभीर शारीरिक दुखापतींमधून बरी झाली आहे.

2024 मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेत एका सामन्यादरम्यान अमनज्योत कौरला हाताला आणि पाठीला दुखापत झाली होती, ज्यामुळे तिला टी- 20 विश्वचषक तसेच स्थानिक स्पर्धांमधूनही बाहेर पडावं लागलं होतं.

दुखापतीमुळे ती एक महिना घरी तर नंतर 7 महिने अकादमीत राहिली.

शस्त्रक्रियेमुळे अमनज्योत क्रिकेटपासून पूर्णपणे दूर झाली होती. पण तरी तिचं लक्ष नेहमीच क्रिकेटवर होतं.

अमनज्योत
फोटो कॅप्शन, अमनज्योत कौरचे हे यश विशेष आहे कारण ती अलीकडेच गंभीर शारीरिक दुखापतींमधून बरी झाली आहे.

अमनज्योतचे वडील म्हणतात, "तो काळ कठीण होता पण आम्हाला माहिती होतं की अमन त्यातून बाहेर पडेल कारण ती खूप खंबीर आहे. ती पुन्हा क्रिकेट खेळेल, याबाबतीत ती नेहमीच सकारात्मक होती."

"असंच झालं. ती दोन्ही दुखापतींमधून खूप लवकर बरी झाली आणि लवकरच तिचा सराव पुन्हा सुरू झाला. त्यानंतर, तिनं श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळली आणि नंतर इंग्लंडविरुद्धही खेळली."

मुंबई इंडियन्ससाठी अमनज्योतचं योगदान

अमनज्योत कौरनं महिला क्रिकेट स्पर्धा असलेल्या महिला प्रीमियर लीगमध्येही भाग घेतला होता.

मुंबई इंडियन्सनं तिला 50 लाख रुपये मानधन देत टीममध्ये सामील करुन घेतलं.

मुंबई इंडियन्सला 2025 ची महिला प्रीमियर लीग जिंकण्यात अमनजोतनं महत्त्वाची भूमिका बजावली होती.

अमनज्योत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुंबई इंडियन्सला 2025 ची महिला प्रीमियर लीग जिंकण्यात अमनजोतनं महत्त्वाची भूमिका बजावली होती.

आरसीबी विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात, अमननं 27 चेंडूत नाबाद 34 धावा करत विजयी खेळी केली, ज्यामुळे अमनज्योतला सामनावीर म्हणूनही घोषित करण्यात आलं.

या स्पर्धेत अमनज्योत कौरला हंगामातील उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कारही देण्यात आला होता.

9 वर्ष घेतलं प्रशिक्षण

जेव्हा जेव्हा अमनज्योतचं कुटुंबीय तिच्या यशाबद्दल बोलतात तेव्हा ते सर्वात आधी अमनज्योतचे प्रशिक्षक नागेश गुप्ता यांचा उल्लेख करतात.

भूपिंदर सिंग म्हणतात, "आज अमनज्योत जिथं पोहोचली आहे, ते फक्त नागेश गुप्तांमुळेच शक्य झालं आहे."

ते म्हणाले, "नागेशजींनी त्यांच्या अकादमीचं ठिकाणही बदललं आहे, पण अमनज्योत अजूनही त्यांच्यासोबत प्रशिक्षण घेण्यासाठी दीड तास प्रवास करते."

अमनज्योत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, त्यानंतर वयाच्या 16 व्या वर्षी प्रशिक्षक नागेश गुप्ता यांना ती भेटली, त्यानंतर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तिचा क्रिकेट प्रवास चंदीगड सेक्टर 32 मध्ये सुरू झाला.

अमनज्योतने इंग्लडविरोधात दमदार खेळी केली होती. त्या संदर्भात तिच्या प्रशिक्षकांनी तेव्हा दिलेली प्रतिक्रिया फारच बोलकी आहे.

अमनज्योतला 9 वर्षांपासून प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक नागेश गुप्ता बीबीसीला म्हणाले होते की, "मी रात्री उशिरा इंग्लंडविरुद्धचा सामना पाहिला. भारताचे 3 फलंदाज 30 वर बाद झाले होते आणि अमननं जेमीसोबत मिळून भारताला जिंकण्यास ज्या सहजतेनं मदत केली ते आश्चर्यकारक होतं."

"मी 9 वर्षांपासून अमनला शिकवत आहे, दुखापतीनंतर मी तिच्यात बदल पाहिला आहे. आता ती जबाबदारीनं खेळते."

ते हसत हसत म्हणाले की, "एखादा प्रशिक्षक फक्त त्याचा विद्यार्थी खास शॉट्स मारत आहे याचा अभिमान बाळगू शकतो. अमनज्योतचा खेळ दिवसेंदिवस चांगला होत चालला आहे, मला स्वतःला ते जाणवत आहे."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.