नायजेरियात इस्लामिक स्टेटवर अमेरिकेचा हल्ला, डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?

डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डोनाल्ड ट्रम्प
    • Author, जारोस्लाव लुकिव
    • Role, बीबीसी न्यूज

अमेरिकेने उत्तर-पश्चिम नायजेरियामध्ये कट्टरतावादी संघटना इस्लामिक स्टेट (आयएस) विरुद्ध एक 'शक्तिशाली आणि घातक हल्ला' केला आहे, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी आयएसला 'दहशतवादी कचरा' असं संबोधलं आहे. 'मुख्यतः निष्पाप ख्रिश्चनांना लक्ष्य करून त्यांच्या निर्घृण हत्या' केल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला.

त्यांनी सांगितले की अमेरिकी सैन्याने 'अनेक अचूक हल्ले' केले आहेत. मात्र त्यांनी याबाबत अधिक कोणतीही माहिती दिली नाही.

कोणत्या ठिकाणांना लक्ष्य केले गेले आणि हा हल्ला नेमका कधी झाला याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

नोव्हेंबरमध्ये ट्रम्प यांनी अमेरिकी सैन्याला नायजेरियामधील इस्लामी कट्टरतावादी समूहांवर कारवाईसाठी तयारीचे आदेश दिले होते.

गुरुवारी उशिरा केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले की "माझ्या नेतृत्वाखाली आपल्या देशात कट्टर इस्लामी दहशतवादाला फोफावू दिले जाणार नाही."

नोव्हेंबरमध्ये दिलेल्या इशाऱ्यात, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ते कोणत्या हत्येबाबत म्हणत आहेत, हे स्पष्ट केले नव्हते. पण अलिकडच्या काही महिन्यांत अमेरिकेतील काही कट्टरतावादी गटांत नायजेरियामध्ये ख्रिश्चनांचा नरसंहार झाल्याचे दावे केले जात आहेत.

हिंसक घटनांचा अभ्यास करणाऱ्या संस्थांचं म्हणणे आहे की, नायजेरियामध्ये मुस्लिमांपेक्षा ख्रिश्चनांची जास्त हत्या केली जात असल्याचा कोणताही पुरावा नाही. नायजेरियाची लोकसंख्या दोन्ही धर्मांच्या अनुयायांमध्ये जवळजवळ समान प्रमाणात विभागलेली आहे.

'ख्रिश्चनांवर जास्त हल्ल्यांचे पुरावे नाहीत'

यापूर्वी, नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला टिनूबू यांचे एक सल्लागार बीबीसीला म्हणाले होते की, जिहादी गटांविरुद्धची कोणतीही लष्करी कारवाई एकत्रितपणे केली जावी.

नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष टिनूबू यांचे विशेष सल्लागार डॅनियल बवाल म्हणाले की, नायजेरिया इस्लामी कट्टरतावाद्यांशी सामना करण्यासाठी अमेरिकेच्या मदतीचे स्वागत करेल, पण नायजेरिया हा एक 'सार्वभौम' देश आहे हे सांगायला ते विसरले नाहीत.

त्यांनी हेही सांगितले की, जिहादी कोणत्याही विशिष्ट धर्मातील लोकांना लक्ष्य करत नाहीत.

राष्ट्राध्यक्ष टिनूबू यांनी भर देऊन सांगितले आहे की देशात धार्मिक सहिष्णुता आहे आणि सुरक्षा विषयक आव्हाने "सर्व धर्म आणि सर्व प्रदेशांतील" लोकांना प्रभावित करत आहेत.

नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला टिनूबू

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला टिनूबू
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पूर्वी ट्रम्प यांनी नायजेरियाला "विशेष चिंता करण्यासारखा देश" घोषित केले होते आणि तेथील ख्रिश्चन लोकसंख्येच्या अस्तित्वावर धोका असल्याचे म्हटले होते. त्यांनी "हजारो" लोकांची हत्या झाल्याचा दावा केला होता, मात्र त्यासाठी कोणताही पुरावा दिला नव्हता.

अमेरिकेचं परराष्ट्र मंत्रालय जे देश "धार्मिक स्वातंत्र्याचे गंभीर उल्लंघन" करतात त्यांना असा दर्जा देतं. यानुसार काही निर्बंध लागू केले जाऊ शकतात.

या घोषणेनंतर राष्ट्राध्यक्ष टिनूबू यांनी सांगितले होते की, त्यांची सरकार सर्व धार्मिक समुदायांचे संरक्षण करण्यासाठी अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय समुदायासोबत काम करण्यास कटिबद्ध आहे.

बोको हराम आणि इस्लामिक स्टेटचे वेस्ट आफ्रिका प्रांत या कट्टरतावादी गटांनी गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ उत्तर-पूर्व नायजेरियामध्ये मोठी हानी पोहोचवली आहे आणि हजारो लोकांचा बळी घेतला आहे.

मात्र, राजकीय हिंसेचे विश्लेषण करणाऱ्या एसीएलईडी या संस्थेनुसार मृतांपैकी बहुतेक मुस्लीम होते.

मध्य नायजेरियामध्येही पाणी आणि चराऊ कुरणांवर प्रवेश मिळवण्यासाठी प्रामुख्याने मुस्लीम गुराखी आणि प्रामुख्याने ख्रिश्चन असणाऱ्या शेतकरी समुदायांमध्ये वारंवार हिंसक चकमकी होत राहिल्या आहेत.

सुडाच्या या चक्रात हजारो लोक मारले गेले आहेत, पण अत्याचार दोन्ही बाजूंनी झाले आहेत.

मानवाधिकार संघटनांचे म्हणणे आहे की ख्रिश्चनांना विशेष लक्ष्य करून हल्ले केले जात असल्याचा कोणताही पुरावा नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)